सिग्नल शाळा - गरजेतून सुधारणा (भाग – पाच)


"लॉकरच्या दिशेने प्रत्येकाला रांगेत उभे केले आणि सांगितले, ‘बघा, प्रत्येकाने स्वत:चा लॉकर पाहायचा, कसा दिसतोय?’ एकएक करत सर्वांना तोच प्रश्न. प्रत्येकजण लॉकरकडे बघून, ‘नीट नाहीय. मुंग्या आहेत, खाऊ बाहेर पडलाय’, असे सांगत होता. जमिनीवर चटई अंथरून त्यावर प्रत्येकाने सामान बाहेर काढायचे आणि नीट मांडणी करायची, असे सांगितले. थोडेसे ओरडल्यामुळे मुले पटापट लॉकर लावायला लागली. शाळेचा गणवेश, कपडे, खाऊचा डब्बा, टूथ ब्रश, हातरुमाल अशा दैनंदिन वापरातल्या सर्व वस्तू मुले लॉकरमध्ये ठेवतात. सर्वांना लॉकर नीट लावायला सांगितले. स्वतःच्या वस्तू शिस्तीत आणि व्यवस्थित लावून ठेवणे, हे मुलांना पद्धतशीर गजरे विणण्याहून कठीण वाटावे, असे चेहरे मुले करत." - आरती पवार-परब सिग्नल शाळेतील आपले अनुभव सांगतायत - 

गरज ही शोधाची जननी मानून शाळेचा प्रवास सुरू झाला. हळूहळू गरजेची आणि शोधाची व्याप्ती अशी काही वाढत गेली की, शाळा मुलांच्या अंगवळणी पडतेय हे आम्हा शिक्षकांना जाणवू लागले. मुलांच्या वाढत्या संख्येसाठी नवे कंटेनर, त्यांच्या वैयक्तीक गोष्टी सांभाळण्यासाठीची जागा, त्याची शिस्त या सगळ्यांत आम्ही आणि मुलं घडत होतो.
सामाजिक बांधिलकी
खेळघरातील खेळणी, पुस्तकं ही लोकांकडून शाळेस भेट स्वरूपात मिळालेली देणगी आहे. ही खेळणी, पुस्तकं या गोष्टी आपल्याला समाजाकडून मिळाल्या आहेत, त्यामुळे त्या फक्त माझ्या वैयक्तिक मालकीच्या नाहीत, तर सर्व मुलांचा त्यावर हक्क आहे. म्हणून आपण त्या जपून वापरायला हव्यात, हे भान मुलांमधे विकसित  करण्यासाठी आम्हांला थोडे शिकस्तीचे प्रयत्न करावे लागले.
खेळघरात बालकेंद्री वातावरण असावं यासाठी प्रयत्न केला जातो. येथे शिस्त राखण्यासाठी शिक्षा आणि बक्षिसं यांचा अजिबात वापर केला जात नाही. खेळघरात लहान-मोठी मुलं-मुली यांच्यात भेदभाव केला जात नाही. येथे स्पर्धेऐवजी सहकार्याला महत्त्व दिलं जातं. खेळघरात, पुस्तकघरात कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन केले जात नाही.
लॉकरची शिस्त
लगबगीने मी रस्ता ओलांडत होते. शाळेत पोहोचायला उशीर झाला होता. रस्ता ओलांडताना नेहमीप्रमाणे डोळे रस्त्यावर ओळखीचे चेहरे शोधत होते. तेवढ्यात रस्त्याच्या डिव्हायडरला लागून असलेल्या झाडाखाली, विलास झाडावर पाहत हातवारे करताना दिसला. तो असा  हातवारे का करतोय, हे पाहायला उत्सुकतेनेच पुढे गेले. झाडावर त्याचाच मोठा भाऊ राहुल गाठोडं काढताना दिसला. मी क्षणभर थबकलेच. धाडटोळीपासून (पोलिसांपासून) वाचण्यासाठी साऱ्यांनी आपलं सामान झाडाच्या फांद्यांमध्ये लटकून ठेवले होते. मला बघताच राहुल खाली आला.
“मॅडम, मी नाही समद्यांनीच ठेवलीया”, असे म्हणत शाळेच्या दिशेने पळाला.
दैनंदिन जीवनातल्या साध्या गोष्टींचे, असे एक नाही कित्येक प्रश्न या कुटुंबांना आणि पर्यायाने त्यांच्या मुलांना होते. आपल्याला साधे वाटणारे प्रश्न त्यांच्यासाठी ‘आ’ वासणारे आहेत. शाळेत सतत मुलांच्या व पालकांच्या शिस्तीविषयी, स्वच्छतेविषयी सांगितले जायचे. त्यासाठी शिक्षक सतत पालकसभा घेत. वाळलेले कपडे शाळेच्या कुंपणाच्या तारेवर सुकत घालू नयेत, नेहमी कपडे धुवावेत, अत्यावश्यक सामानाशिवाय जास्त पसारा करू नये; अशा सूचना पालकांना, मुलांना वारंवार दिल्या जायच्या. परंतु, त्याची अंमलबजावणी मात्र नीट होत नव्हती. मुलांच्या वह्या सातत्याने हरवत, शाळेतून दिलेले सामान हरवत असे. याचे कारण त्यांना स्वत:ची म्हणावी अशी नीट जागा रस्त्यावर नव्हती. ती मिळाली तरी अचानक येणाऱ्या टोळधाडीमुळे सामान उद्धवस्त होत असे. त्यात मुलांच्या कपड्यालत्त्यापासून, शाळेतून दिलेल्या वह्यांचाही समावेश असे. यातून मार्ग काढायचा म्हणून, मुलांसाठी शाळेत लॉकरची सोय असणे गरजेचे आहे, असे सर्वांनुमते ठरले. त्यामुळे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नव्हे, तर सुव्यवस्थेसाठी शाळेत लॉकर वापरले जातात.
मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी व्हावे म्हणून हल्ली शाळांशाळांमध्ये ‘लॉकर’ची सोय मुलांना उपलब्ध करून दिली जाते. त्यात मुले त्यांची वह्या-पुस्तके ठेवतात. आमच्या शाळेतील मुले लॉकरमध्ये त्यांच्या दैनंदिन वापरातील सर्वच गोष्टी ठेवतात. पण, आमच्या मुलांना शिस्तीचे थोडे वावडे आहे, असे कधीकधी वाटते. कधीकधी एकदम शहाण्यासारखी वागतात तर कधी एकदम बेशिस्तीचा कहर. अर्थात, शेवटी ती लहान मुलेच ना!
शिस्तीशी गट्टी करणारी मुले
आजच्या दिवसाची सुरुवातच मुलांना ओरडण्याने झाली. लॉकरमध्ये आपले सामान नीट ठेवा, असे सांगूनही मुलांनी लॉकरची दैना उडवली होती. प्रत्येक लॉकर बेशिस्त अवस्थेत दिसत होता. काहींच्या लॉकरमधून मुंग्यांचे दर्शन होत होते. म्हणजे मुलांनी लॉकरमध्ये मुंग्यांच्या पाहुणचारासाठी खाऊ ठेवला होता. सर्वांचे लॉकर्स उघडून त्यांचे दरवाजे तसेच उघडे ठेवले. लॉकरच्या दिशेने प्रत्येकाला रांगेत उभे केले. आणि सांगितले, ‘बघा, प्रत्येकाने स्वत:चा लॉकर पाहायचा, कसा दिसतोय?’ एकएक करत सर्वांना तोच प्रश्न. प्रत्येकजण लॉकरकडे बघून, ‘नीट नाहीय. मुंग्या आहेत, खाऊ बाहेर पडलाय’, असे सांगत होता. जमिनीवर चटई अंथरून त्यावर प्रत्येकाने सामान बाहेर काढायचे आणि नीट मांडणी करायची, असे सांगितले. थोडेसे ओरडल्यामुळे मुले पटापट लॉकर लावायला लागली. शाळेचा गणवेश, कपडे, खाऊचा डब्बा, टूथ ब्रश, हातरुमाल अशा दैनंदिन वापरातल्या सर्व वस्तू मुले लॉकरमध्ये ठेवतात. सर्वांना लॉकर नीट लावायला सांगितले. स्वतःच्या वस्तू शिस्तीत आणि व्यवस्थित लावून ठेवणे, हे मुलांना पद्धतशीर गजरे विणण्याहून कठीण वाटावे, असे चेहरे मुले करत.
शिस्त मोडली म्हणून शारीरिक शिक्षा करण्यापेक्षा, ज्याकरता शिस्त मोडली आहे, तीच गोष्ट सारखी-सारखी नीट करून घेणे, आमच्या आणि मुलांच्याही फायद्याचे होते. शिक्षा कशाबद्दल व कोणत्या चुकीबद्दल, गैरवर्तणुकीबद्दल आहे, हे समजावून देऊनच शिक्षा करण्यात येऊ लागली. पुढे अशाच प्रकारची शिक्षा मुलांसाठी कायम झाली.
कधीकधी दोन मुलांमध्ये चिडवाचिडवीवरून शिवीगाळ किंवा चक्क एकमेकांना मारण्यापर्यंत मजल जाई. कुठे वारंवार समज देऊनही काहीमुले अजिबात अभ्यास करत नाहीत, काही जण शिक्षकांना अजिबात जुमानत नाहीत. टीनएजर किंवा किशोरवयीन मुलांमध्ये मस्तीची रग असतेच. या वयातील मुलांनी मस्ती, दंगा करणे यात नवे काही नाही, पण बेशिस्त वर्तनाच्या काही मर्यादा असतात. त्या ओलांडल्या जाऊ नयेत यासाठी  अशा विद्यार्थ्यांना शारीरिक, मानसिक वा भावनिक दुखापत होईल, अशी शिक्षा दिली जात नाही. तर शालेय मुलांचे आदर्श वर्तन कसे असावे, चुकीच्या वर्तनात कोणकोणत्या गोष्टी मोडतात, त्या चुका मुलांकडून पुन्हा होऊ नयेत, यासाठी उपाययोजना म्हणजे गैरवर्तणूक असलेल्या मुलांना सुधारण्यासाठी एकेकट्या मुलांचं काऊन्सलिंग केले गेले. तेवढे पुरेसे नाही असे वाटल्याने कालांतराने त्यांचे ‘ग्रुप काऊन्सलिंग केले गेले.  त्यातही केवळ गैरवर्तणूक असलेल्या मुलांना वेगळे न काढता, संपूर्ण वर्गातील सर्व मुलांना चांगल्या वर्तनाला प्रवृत्त करणारे पोषक वातावरण पुरवण्याचा प्रयत्न केला गेला.
चांगल्या वर्तणुकीचे कौतुक करून, त्याची स्तुती करून बक्षीसही दिले जाते. त्यांना शाबासकी द्यावी म्हणजे त्याला आणखी चांगले वागण्यास प्रोत्साहन मिळेल. त्याचबरोबर त्यांच्या गैरवर्तणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली जाते.
शिस्तीतूनच मुलांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. मुलांनी रस्त्यावर झोपण्याऐवजी शाळेच्या प्रागंणात येऊन झोपण्याची सोय केलेली आहे, त्यामुळे रात्री मुले शाळेच्या आवारात झोपतात. त्यासाठी पांघरुणांची सोय केलेली आहे. मुलांना योग्य वळण लावावे यासाठी झोपून उठल्यावर स्वत:च्या पांघरुणाची घडी घालायाला लावणे; अभ्यासाची पुस्तके, वह्या नीटनेटक्या व जागच्याजागी ठेवणे; शाळेतून अथवा बाहेरून आल्यावर चप्पल-बूट, दफ्तर वगैरे ठरावीक जागीच ठेवणे; तसेच हातपाय स्वच्छ धुतल्यावर कपडे बदलून त्यांच्या नीट घड्या घालून ठेवणे; अशी सगळी कामे मुले करतात. इतकेच नाही, तर स्वत:चे कपडे धुतात. स्वत:चे स्वत: करण्यात मुलांनाही आनंद वाटतो. थोडक्यात म्हणजे, मुलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न आहे.
शाळेने ‘शिस्त’ आणि ‘गुणवत्ता’ हा मंत्र जिवापाड जपला. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच शाळेव्यतिरिक्तच्या वेळेत छंद वर्ग, संस्कार वर्ग, इंग्रजी संभाषण असे खास मार्गदर्शन वर्ग घेऊन, विद्यार्थ्यांना तयार करण्यात येते. जागतिकीकरणाच्या वावटळीत आपला विद्यार्थी मागे पडू नये, यासाठी शाळेत इंग्रजीचे वर्ग सुरू केले आहेत. विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाला आणि संशोधनाला प्रवृत्त करणे, हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. मुलांचे व्यक्तिमत्त्व त्यांना स्वत:ला समजावे यासाठी आणखी काही कल्पक प्रकारांनी मुलांना बोलते केले जाते. शिवाय, या उपक्रमातून मुलांना विविध जीवनकौशल्ये शिकायला प्रोत्साहन दिले जाते. मुलांची वाचन-लेखन क्षमता वाढावी, त्यांनी अभ्यासाची योग्य पद्धत वापरावी, तार्किकपणे विचार करावा, संवादकौशल्ये आत्मसात करावी,  निर्णयक्षमता विकसित करावी, या हेतूने काही ठोस प्रयत्न केले जातात. 
जेवण
“वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे” या श्लोकाची जागा ‘वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे’ याने घेतली आहे. रस्त्यावर भीक मागून मिळणाऱ्या अन्नापेक्षा कष्ट करून मिळवलेले अन्न आणि ज्यांच्यामुळे अन्न मिळाले त्यांचे आभार मानणे महत्त्वाचे आहे, हे सिग्नल शाळेतील मुलांना उमगायला लागले आहे. दिवसभराच्या वेळापत्रकातील जेवणाचा तास मुलांच्या आवडीचा. पुलाव, बिर्याणी यांसारख्या राजेशाही जेवणापेक्षा “मॅडम, वरण-भातच आठवड्यातून चारदा द्या ना” असे मुले म्हणायला लागली.  वडापाव हे या मुलांचं आवडत खाद्य किंवा रस्यावर मिळणारे चायनीज भेळ, चायनीज पकोडे सगळ्यात स्वस्त, आणि सहज मिळणारे आणि चविष्ट जेवण. शाळा सुरू होण्यापूर्वी दिवसभर हेच मुलांचे जेवण होते. निकृष्ट दर्जाचे अन्न पोटात ढकलत ही मुले पालकांसोबतच काम करायची. धंदा नीट होईल की नाही याची सतत टांगती तलवार घेऊन फिरणाऱ्या पालकांच्या मनात मुलांच्या खाण्या-पिण्याचा विचारही येत नसे. परिणामी, मुले हातात चार पैसे कुणी टेकवले तर स्वत:चं पोट स्वत: भरण्याचा प्रयत्न करत. मग ते वडापावने असो किंवा कुणीतरी दिलेल्या भिकेच्या अन्नाने असो. व्यवस्थित वाढलेले ताट आणि योग्यरीत्या घेतलेले जेवण, हा त्यांच्या दैनंदिनीचा भागच नव्हता.
सिग्नल शाळा सुरू करताना मुलांच्या जेवणाची नेमकी वेळ ठरवता येत नव्हती. मुळात शाळेचे स्वरूप कसे असेल किंवा ते कसे ठरवावे, वेळ काय ठरवावी या सगळ्याच बाबतीत आम्ही सुरुवातीला साशंक होतो. कारण, येणारी मुले किती वेळ शाळेत थांबू शकतील? पालक किती वेळासाठी त्यांना पाठवण्यास तयार होतील? असे अनेक प्रश्न आमच्यासमोर होते. पण, काम करता-करता नकळत आम्हांला यावरील उत्तरे सापडत गेली. मुलांचे वर्गात रमणे वाढू लागले. पालकांनी बाहेर वस्तू विकण्यासाठी बोलावले तरी मुले जायला तयार होईनात.
“थोडा वेळ थांबून मग येतो,” अशी उत्तरे पालकांना मिळायला लागली. मग काय, शिक्षकांचाही आत्मविश्वास वाढायला लागला. हा प्रवास योग्य दिशेने होतोय ही निश्चिती व्हायला लागली. मग एकेका गोष्टीचे नियोजन आखत गेलो. सरसकट जेवण देण्यापेक्षा मुलांच्या आरोग्याकडे आणि शरीराकडे पाहत आठवडाभराचे जेवणातील पदार्थांचे नियोजन केले. आठवड्याच्या प्रत्येक वाराला वेगवेगळा पदार्थ. त्यात कडधान्य, मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी, पालेभाज्या, चपाती, उकडलेले अंडे, वरण-भात, पुलाव, लोणी, दूध, ताक यांचा समावेश केला. याचा सकारात्मक परिणाम काही काळाने मुलांच्या शरीरावर व एकंदरीतच वागणुकीत दिसून आला. मुले शाळेत थांबण्यास आता मनाने तयार झाली आहेत, असे दिसताच आम्ही शाळेची वेळ त्यांच्या नकळत वाढवली. सकाळी शाळेत पाऊल ठेवताच थोडासा नाश्ता व नंतर जेवण असे त्यांना सांगितले. जेवणाआधी वेगळा खाऊ मिळणार म्हणून सगळेच खूश. त्यामुळे जेवणाची वेळ दुपारी एक वाजताची ठरवली.
जेवणाआधी उल्लेख केल्याप्रमाणे प्रार्थना होते. जेवण वाढल्यावर सगळीच मुले चपाती भाजीत कुस्करून, तिचा अगदी पार लगदा करून, हाताची पाचही बोटे त्यात बुडवून काला करून, विचित्र पद्धतीने खात असत. अर्थात, त्यात मुलांची चूक नाही. शांतपणे कसे जेवावे हे त्यांना कधी कुणी सांगितलेले नव्हते. शिवाय, एखाद्या वाटसरूने जेवण आणून दिल्यावर ते अधाशीपणाने संपवावे, एवढेच त्यांना माहीत. रस्त्यावर सतत भटकून भूक लागलेलीच असते. जेवायची पद्धत आम्ही हळूहळू मुलांना सांगायला लागलो. मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवले. मुलांच्या पंगतीत बसून ताट कसे समोर ठेवायचे, आपल्या हाताचा पंजा कसा पकडायचा, त्यात घास कसा घ्यायचा, इथपर्यंत सगळ्या गोष्टी त्यांना करून दाखवल्या. मुलांना आपण कसे जेवत होतो व आता कसे जेवायला हवे, यातला नेमका फरक कळला.
१. एकाच हाताने चपातीचे तुकडे करणे.
२. दोन्ही हातांनी जेवू नये.
३. उष्ट्या हाताने पाण्याची बाटली घेऊ नये, त्यामुळे ती तेलकट होते.
४. जेवताना कमीतकमी उष्टे टाका, किंबहुना उष्टे खाली पडणार नाही याची काळजी घ्या.
५. चपातीचे  तुकडे नीट मोडून भाजीसोबत खा. तिचा कुस्करून लगदा करू नका.
६. भात कालवताना हाताचा पूर्ण पंजा वापरू नका. फक्त पाचही बोटे वापरा.
७. जेवण आटोपल्यावर सांडलेले उष्टे नीट उचलून ताटात ठेवा व ताट जागेवर ठेवा.
अशा गोष्टी आम्ही सतत मुलांना सांगितल्या. परिणामी, हळूहळू मुलांमध्ये बदल होत आहेत. बदल स्वीकारायला वेळ लागतो म्हणतात. काही बदल असे असतात की, ते त्या-त्या योग्य वयात करण्यास सुरुवात केली की ते आवडायला लागतात. जेवण आटोपल्यानंतर उष्टे तसेच टाकून एखादे मूल उठत असल्यास, बाकीचे लगेच त्याला ओरडायला चालू करतात. मुलांनी स्वत:हून उमजून केलेली ही क्रिया. जी मुलांमधील सकारात्मक बदल दर्शवते.
- आरती पवार - परब
(लेखिका ठाणे येथील सिग्नल शाळेत शिक्षक आणि प्रकल्प प्रमुख आहेत.)
संपर्क – ८१०८५१११८५, [email protected]

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शाळा , मराठी शाळा , सिग्नल शाळा , प्रयोगशील शिक्षण , उपक्रमशील शिक्षण , आरती पवार - परब , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen