मुलांचं शिकणं किंवा उनाडक्या करत फिरणं, त्यांची अभ्यासातील प्रगती किंवा अधोगती, त्यांचं जगाकडे पाहणं, मुलांच्या या सगळ्या कृतींकडे सुटंसुटं पाहता येत नाही. त्यांच्या या प्रत्येक कृतीमागे त्यांची अनन्य अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असते. सेवाग्रामच्या अनुराधा मोहनी मुलांना समजून घेताना त्यांची कौटुंबिक परिस्थितीही समजून घेताना दिसतात -
एक दिवस मोठी मुले (नववी-दहावीची) मला सांगत आली, की अभिनवला आपल्या वर्गात यायचे आहे. मी म्हटले, “मग येऊ द्या की.”
“नाही, त्याचे आई-अप्पाजी येऊ देत नाहीत.”
“मग आपण काय करायचे?” मी विचारले.
“तुम्ही त्यांना जाऊन भेटलात तर ते मानतील” मुलांनी सांगितले.
“त्याच्या घरी कोण कोण आहेत?”
“आई-अप्पाजी, अभिनव आणि त्याची मोठी बहीण”.
“आई वडील?”
“वडील वारले. मम्मी दुसरीकडे राहते.”
मला ह्या मुलांसाठी खूप वाईट वाटते. हयात असलेल्या पालकांच्या सहवासालाही ती मुकत आहेत. कारण म्हणाल तर कोणाचा तरी अहंकार आणि मूर्खपणा. असो. मी त्यांच्याबरोबर अभिनवच्या घरी गेले. छोटेसे घर. उभ्याउभ्याच बोलणे झाले. त्याची बहीण एका खाजगी नर्सिंग कॉलेजमध्ये जाते. ती तिचा अभ्यास करत होती. आजी डोक्यावरून पदर घेऊन एका बाजूला गप्प बसली होती. अप्पाजी मात्र धिप्पाड व आक्रमक होते. “कोण आहात, कशाला आलात?” वगैरे त्यांनी विचारले. मी सांगितले. “मी रस्त्याच्या पलीकडच्या त्या घरात राहते. इथल्या मुलांचा वर्ग घेते. गावातली बरीच मुले येतात. तुम्हीही पाठवा अभिनवला. त्याला फायदा होईल.”
“पण तो क्लासच्या निमित्ताने बाहेर पडेल आणि दोस्तांबरोबर घुमत राहील, तर हे मला चालणार नाही.”
“तो तसे करणार नाही. सायंकाळी साडेसहाची वेळ आहे आमची. त्यावेळी ही सारी मुले तेथेच येतात.” “ठीक आहे. पण लक्षात ठेवा. त्याची जबाबदारी माझ्यावर आहे. तो वाया गेलेला मला चालणार नाही. आणि ज्या दिवशी तो येणार नाही, तेव्हा मला फोन करा. म्हणजे कुठे भटकत असेल ते मी शोधून काढीन. हा घ्या माझा नंबर.”
मी नंबर घेतला. अभिला त्यांच्यासमोर थोडी समज दिली आणि आम्ही सगळे वर्गाला निघालो. हा अभि अत्यंत बुद्धिमान, पण मोठ्या मुलांमध्ये सगळ्यात व्रात्य असा मुलगा आहे. एकदा सांगितले की समजते. लेखन उत्तम. अक्षर उत्तम. पाढे पाठ. पण गांभीर्य म्हणून कशाचे नाहीच.**********
तेथून परत येतानाच, आमचा आणखी एक मोठा मुलगा शिवान ह्याची आई मला भेटली. तिला मला पाहून खूप आनंद झाला. थोड्या दिवसांनी मला भेटायला येईल असे म्हणाली आणि खरेच एकदा घरी आली. खूप मनापासून बोलली. “लहानपणापासून वडिलांचे पिणे, आईला छळणे आम्ही पाहिले. ते घरी आले, की आम्ही विळा, पावशी (विळी) दडवून ठेवायचो. तीन बहिणी. मी मोठी. मला शाळेत घातलेच नाही. धाकट्या दोघी थोड्याफार शिकल्या आहेत. त्या खाऊनपिऊन सुखी घरांमध्ये पडल्या आहेत. मी हॉस्पिटलच्या मेसमध्ये काम करते. तेथे मी समोसे, कचोरी वगैरे बनवते. माझे मालक कुठेसे सुरक्षा रक्षकाचे काम करतात. दोघांनाही थोडाच पगार मिळतो. तसे त्यांना व्यसन वगैरे नाही, घर चालवायला पैसेही देतात, पण वागणे मात्र खूपच वाईट आहे. मुलांनाही सतत हिडीस-फिडीसच करतात. आम्ही कधीही त्यांच्या तोंडचा एखादा प्रेमाचा शब्द ऐकलेला नाही. मोठा मुलगा तुषार वाया गेल्यात जमा आहे. धाकटा तुमच्याकडे येतो म्हणून त्याच्याकडून मी थोडी आशा ठेवून आहे. नाहीतर तोही उनाडक्याच करत असतो. गावातल्या मुलांना उचलेगिरीची सवय आहे. मागे तुमचे घड्याळ नेले होते असे ऐकले. तुम्ही तुमच्या वस्तू जपून ठेवत जा. मुलांसमोर आणायच्याच नाहीत. आणि मुख्य म्हणजे त्यांना तुम्ही कामाला लावत जा. मुलांना अजिबात कामाची सवय राहिली नाही. नुसती बसून असतात. काम न करता ह्यांचे कसे भागणार आहे? आणि ह्या तरुण मुलांची रग तरी कशी जिरणार आहे?” असे बोलून ती गेली. पुढील रविवारी मी मुलांकडून काही श्रमदान करून घेतले. ते मुलांनी हौसेने केले.
***************
आमची एक मुलगी आशा अत्यंत अनियमितपणे यायची. मी म्हणायचे, “अगं, तू नियमितपणे आलीस तर तुला फायदा होईल. तुझा अभ्यास सुधरेल. तुला चांगले मार्क मिळतील. कधीमधी येण्याने काय होणार आहे?” मग एक दिवस ती म्हणाली की, “तुम्ही मला इंग्लिश शिकवाल का? माझी मम्मी म्हणाली की, मॅडमना विचार, त्या वर्गानंतर तुझी वेगळी ट्युशन घेतील का म्हणून.” मी म्हटले, “एक तर हा काही ट्युशनचा वर्ग नाही. आणि तसेही इंग्रजी मी शिकवणार आहे, पण मराठी थोडेतरी येऊ लागल्यावर. वाटल्यास तुझ्या आईला इकडे घेऊन ये. मी तिलाच समजावून सांगेन.”
दुसऱ्या दिवशी ती आईला घेऊन आली. मी तिला समजावून सांगितले. तिला ते पटले. पण तिची कहाणी आणखी करुण होती.
“मी आश्रमासमोर कच्च्या चिवड्याची गाडी लावते. फार कमी उत्पन्न मिळते. त्यातच कसातरी संसार ढकलत आहे. मालक ऑटोरिक्षा भाड्याने घेऊन चालवतात. पण सध्या दोन महिने झाले घरीच आहेत. खूप पितात. घरात बसून सतत मला व मुलांना छळत असतात. माझेच काय मुलांचेही लक्ष कशातच अजिबात लागत नाही.”
“तुमचा मुलगा थोडे दिवस वर्गात येत होता.”
“हो. पण मला त्याची मदत मला लागते व्यवसायात. म्हणून त्याला पाठवू शकत नाही. अभ्यासातून तर त्याचे लक्ष उडालेच आहे. दारूने सगळा सत्यानाश केलाय माझ्या संसाराचा. आणि फक्त माझेच नाही, गावात सर्वत्र हेच आहे. ”
“पोलिस काही करत नाहीत काय?”
“पोलिसांना चुकवून सारा व्यवहार चालतो. शिवाय त्यांना हप्ताही मिळतो. मग कशाला ते लक्ष घालतील?”
“दारुबंदीविरोधी महिलांचे भरारी पथकही असते ना? ते नाही तुमच्या मदतीला येत?”
“असे पथक होते पूर्वी. पण हे दारुबाज लोक त्यांना नाही नाही ते बोलतात. त्यांच्या चारित्र्याबद्दल वाईट बोलतात. त्याला घाबरून सगळ्या बायका गप्प बसल्या आहेत.”
“एवढ्या सहजतेने दारू मिळते तरी कुठे?”
“अहो, प्रत्येक गल्लीत एक तरी विक्रेता आहेच. दारूचा नुसता पूर आलाय गावात.” एवढे सांगून ती गेली. त्यावरून आम्हांला गावाची चांगली कल्पना आली.***************
आमची शाळा सुरू असताना आमचे घर आणि गाव ह्यांच्यामधला रस्ता, नवीन करण्यासाठी तोडला. खूप खोल खणले होते. कठड्यावर खूप घाण, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, कचरा वगैरे होता. एक मोठ्ठा दगडही पडला होता तिथे. आम्हांला जायला-यायला त्रास होई. आता दोन महिने झाले तरी तो चालूच आहे. स्कूटरवरून जायचे तर लांबच्या वाईट रस्त्याने जावे लागते, ते सोडाच, पण इकडे येणाऱ्यांना कसेतरी चढून वगैरे यावे लागते. मुले तर कठड्यावर हात टेकवतात आणि धप्पकन उडी मारून येतात. पण, कमळाबाई कशी येत असेल? मी तिला एकदा विचारले, तर ती म्हणाली की, “विजेच्या खांबाच्या जमिनीत गाडलेल्या तारेला धरून येते.” मी “तसे धरून चढत जाऊ नका. कधी काही...” वगैरे म्हटले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. “मी जशी चढते, तशा तुम्ही नाही चढू शकणार” एवढे मात्र तिने मला ऐकवले. मग एक दिवस आम्ही ठरवले, आम्ही म्हणजे मीच. एका रविवारी सकाळी उठून तिकडे गेले. माझ्या अपेक्षेप्रमाणे आमची मुले तेथे टाइमपास करत होतीच. “आपण इथे उतरायला जागा करू या का?” मी विचारले. मुले लगेच तयार झाली. दोन-चार मुले होतीच. त्यांनी पटापट आणखी काहींना बोलावून आणले. दोघे-तिघे तिथे मावा (गुटखा) खात पडली होती. त्यांनाही बोलावले आम्ही. मग सगळे मिळून कामाला लागलो. घरून काही अवजारे आणली. फावड्याने कठड्यावरची माती बाजूला केली. मोठ्ठा दगड सगळ्यांनी हातभार लावून हळूहळू रेटत मागेपर्यंत आणला. कागद आणि प्लास्टिक वेचून वेगळे केले. माचिस आणून ते तेथेच जाळून टाकले. मग एक मोठ्ठा श्वास घेतला. “आता फक्त खाली उतरायला पायऱ्या केल्या म्हणजे पुरे.” मी म्हटले. माळरानावर एक विटांचा ढीग होता. तो वापरण्याची आम्ही परवानगी घेतली. मग सगळ्यांनी मिळून तेथपर्यंत विटा वाहून नेल्या. मग विटांच्या आम्ही पायऱ्या रचल्या... काम फत्ते! तिथल्या काही स्थानिक लोकांनीही आम्हांला मदत केली. तेव्हापासून आमच्यासाठी येणे-जाणे खूप सोपे झाले.
...
(क्रमशः)
- अनुराधा मोहनी
संपर्कः ९८८१४४२४४८, [email protected]
(लेखिका भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शिक्षण
, अनौपचारिक शिक्षण
, शाळेबाहेरील शिक्षण
, अनुराधा मोहनी
, मराठी अभ्यास केंद्र
शिक्षण