गंमतशाळा - (भाग ६)


मुलांची पौगंडावस्था, त्या वयात वाटणारं विरुद्धलिंगी आकर्षण, त्याविषयी मोठ्यांना सांगता न येणं, मोठे समजून घेतील की नाही ही धास्ती; आणि आई-वडिलांना त्यांच्या सांसारिक विवंचनेतून मुलांकडे लक्ष न देता येणं, त्यामुळे मुलांमध्ये निर्माण होणारी असुरक्षितता, या सगळ्यांकडे अनुराधाताई एकाच वेळी तटस्थतेने पाहतात आणि संवेदनशीलपणेही, हे त्यांच्या लेखनशैलीतून पदोपदी प्रतीत होते -
एकदा निरोप देण्यात काहीतरी गडबड झाली आणि तीन मोठी मुलेच वर्गात आली. मी म्हटले, “आज तुम्ही तिघेच आहात, तर  आज तुम्ही आपापल्या समस्या सांगा. आज आपण त्यावर बोलू या.” मला वाटले, एकतर अभ्यास किंवा घरगुती प्रश्न – आईवडिलांचा बेबनाव, दारू पिणे, ह्यांपैकी कशावर तरी बोलतील. पण त्यांनी अनपेक्षितपणे वेगळाच मुद्दा काढला. त्यांनी काय म्हणावे? “आमची सगळ्यात मोठी अडचण सांगू का ... मुलींना कसे पटवायचे?” मी स्वतःला सावरले आणि सहजता आणून बोलू लागले. त्यांना खूप-खूप सांगायचे होते. तिघांपैकी एकाला एक मैत्रीण होती व त्यांचे अफेअर चालू होते. (हा दहावी फेल आणि ती नववी) ती मुलगीही गंमतशाळेत येते आणि ह्याच्यापेक्षा खूपच हुशार व स्मार्ट आहे. उरलेल्या दोघांनी त्यांच्या मैत्रिणी शोधल्या आहेत, पण त्यांच्याशी अजून बोलणी नाही केलेली. ते दोघे असेही म्हणाले की “ह्याला अजून काही कळत नाही. शिक्षण वगैरे व्हायचे आहे. तर अशा परिस्थितीत त्यांचे किती दिवस चालू शकेल? त्या मुलीची आई ह्यांना कशी बरे परवानगी देईल?” मी म्हटले, “होय.” पहिल्यांदा ह्या दिवसांत वाटते, ते काही खरे, टिकाऊ प्रेम नाही, ते केवळ आकर्षण असू शकते, वगैरे सांगितले. मग म्हटले की, “तू तिला अवकाश माग. मला थोडा वेळ दे म्हण. मी स्वतःच्या तयारीचा, भवितव्याचा विचार करतो. आपण काही दिवसांनी भेटू व तेव्हा काय वाटते ते बघू. असे तिला सांग.” मग (त्याच्या वतीने) त्या दोन मुलांनी विचारले की, “हे त्याला वर्गात सांगता येईल का? तुम्ही तशी संधी द्याल का?” मी म्हटले, “हा वर्ग त्यासाठी नाही. हा तुमचा दोघांचा खाजगी प्रश्न वर्गाच्या समोर कसा काय आणायचा? आणि त्या मुलीलाही ते कसे बरे वाटणार?” पण तेव्हा, हा मुलगा तिला व्यक्तिगत भेटून हे सांगण्यास कचरतो आहे, हे माझ्या लक्षात आले.
*             *             *             *             *             *             *             *             *
एकदा संध्याकाळ झाली होती. वेळ झाली तरी मुले आली नव्हती. मी विचारात पडले होते. एवढ्यात बाहेरून कुणी आवाज दिला, “राधा आक्का...”
मी दार उघडले. काही मोठी मुले आली होती. हळू आवाजात त्यांनी सांगितले की, आज गावात मयत झालीय. कुणीच येणार नाहीत.
“होय, पण कुणाची?”
“वीरेंद्रचे पप्पा.”
“अरे बाप रे! त्यांचे वय तर काही जास्त नसेल. ” वीरेंद्र तिसरीतला एक स्मार्ट मुलगा. गोरागोमटा आणि लोभस.
“नाही ना. पण ते खूप आजारी होते. त्यांना रक्ताच्या उलट्या वगैरे होत होत्या.”
“ठीक आहे. आज सुट्टी.” मी म्हटले
दुसऱ्या दिवशी दुपारी बारा-एकच्या सुमारास मोठ्ठी अंत्ययात्रा जाताना दिसली. त्यात महिलाही मोठ्या प्रमाणावर होत्या. त्या दिवशी रविवार असल्यामुळे तशीही सुट्टीच होती. पण, सायंकाळी काही मुलांचा आवाज आला. मी संगणक बंद करून, वरून खाली येईपर्यंत, ते फाटक उघडून घरात आलेच होते. एवढेच नव्हे, तर त्यांनी नेहमीच्या पद्धतीने नळावर हात-पाय-तोंड धुतले, आत येऊन सतरंज्या अंथरल्या व त्यावर रांगेने बसून माझी वाट पाहू लागले. (आमचे दार उघडेच असते. फक्त जाळीचे दार बंद असते व त्याला बाहेरून उघडता येण्यासारखी कडी असते.) मला खूपच आश्चर्य वाटले. सगळ्यात जास्त आश्चर्य ह्याचे की, सुट्टीचा दिवस असूनही वीरेंद्र आला होता; आपल्यासोबत आणखी पाच मुलामुलींना घेऊन. (त्यांच्यापैकी काही जण मोठे असल्यामुळे त्यांना फाटक उघडता आले. नाहीतरी लहान मुलांचे काही अडत नाही. ती उडी मारून येतातच.) आश्चर्य न दाखवता मी म्हटले, “अरे वा! आज नवीन मुले-मुली आलेली दिसतात. चला, आधी त्यांची ओळख करून घेऊ.” मग त्या पाच जणांनी आपली नावे, शाळा, त्यातील इयत्ता आणि आपली गावे सांगितली. मी म्हटले, “तुम्ही दुसऱ्या गावांहून आलात का? सेवाग्रामचे नाहीत का तुम्ही?”  तर त्यांनी काही म्हणायच्या आधीच वीरेंद्र म्हणाला, “होय. माझे पप्पा मरण पावले ना, म्हणून हे लोक आले आहेत. ही सर्व माझ्या मावशांची मुले आहेत.” हे ऐकताच त्यातल्या एका मोठ्या, समंजस मुलीने त्याच्या तोंडावर हात ठेवला. “असं बोलू नये.” ती म्हणाली. मी म्हटले, “अगं, बोलू दे त्याला. इथे बोलायला काही हरकत नाही.”
मग आमचा वर्ग झाला. त्या दिवशी त्यांना कोरे कागद व रंगकांड्या वाटल्या व चित्रे काढायला सांगितली. त्या सर्व मुलांनी खूपच छान चित्रे काढली. मग वीरेंद्र म्हणाला, “आज ‘जय जगत’चे गाणे घ्या आक्का.” मी मुलांना मला ‘राधा आक्का’ म्हणायला शिकवले आहे. पण तरीही काही मुले, विशेषतः नवीन आलेली, ‘मॅडम’ म्हणतात. ‘आक्का’ वगैरे म्हणणे त्यांना ‘बॅड मॅनर्स’ वाटते. मोठी बहीण ह्या अर्थाने विदर्भात पूर्वी प्रचलित असलेला हा शब्द आता आत्तेसाठी वापरला जातो, असे मला ह्या मुलांकडूनच कळले.
मग ते गाणे म्हणवून घेतले. एन् सुब्बाराव ह्यांनी स्वतः गाऊन, इतरांकडून गाऊन घेऊन देशभर लोकप्रिय केलेले गीत.
जय जगत जय जगत जय जगत पुकारे जा
जय जगत पुकारे जा, सिर अमन पे वारे जा
सबके हित के वास्ते तू अपना सुख विसारे जा
वर्ग संपला. सगळे परत जायला निघाले. वीरेंद्र दारापर्यंत गेला आणि परत आला. म्हणाला, “पोचवून द्या नं जी. भेव लागते नं मले.” ते ऐकून तर खूपच वाईट वाटले. वीरेंद्रने वरून कितीही शौर्याचा आव आणला असला तरी, आतून तो हादरलाच होता. घरातले ते वातावरण असह्य झाल्यामुळेच त्याने आपल्या भावंडांना घेऊन इकडे येण्याची शक्कल लढवली होती. सुट्टी असली तरी आपण जाऊन बसलो म्हणजे आक्का घेणारच, हेही त्याला माहीत होते. वीरेंद्र बुद्धिमान, संवेदनशील मुलगा. खेळात पक्का. इतरांपेक्षा त्याचा स्टॅमिनाही जास्त. अशा मुलांना तर खूप जपावे लागते. ती लवकर चुकीच्या मार्गावर जाण्याचा धोका असतो. वीरेंद्रला एक मोठा भाऊ आहे, सहावीतला. तोही हुशार आहेच, पण बहुधा थोडा अधिक सात्त्विक वृत्तीचा.
मी वीरेंद्रला जवळ घेऊन त्याचे सांत्वन केले. मग त्यांना पोहोचवायला त्यांच्याबरोबर निघाले. आमचे माळरान पार करून आम्ही रस्त्यापर्यंत आलो. रस्ता नवीन करण्यासाठी खणून ठेवला आहे. आम्ही रचलेल्या विटांवरून बुलडोझर फिरला आहे. त्यानंतर आणखी एकदोनदा केलेले प्रयत्नही भुईसपाट झाले आहेत. मुले त्यात पटापट उड्या मारून जातात. मी मात्र तेथूनच निरोप घेतला.
“तुझं घर कोणतं रे वीरेन?”
“हे काय तं सामोरचंच. पडवीत लोकं बसलेले दिसून नाई ऱ्हायले का… तुमी चाला नं जी माह्या घरी.”
“हो. येईन कधीतरी.”
“नाई. आत्ताच चाला. रातचं जेवायला चाला आमच्यासंगं.”
“अरे, आज कशी मी येणार? आज तर तुझ्याकडे स्वयंपाकही केला नसेल. दुसरे कुणी करून आणून देणार असतील. मी नंतर कधीतरी येईन हां.”
परत फिरल्यावर सारखे त्या मुलांचे चेहरे डोळ्यांसमोर येत होते. इतके लोक असले तरी ते कोणत्या मूडमध्ये असणार? वीरेंद्रसारख्या मुलांना आज आपल्या घरात जो आधार हवा आहे, तो देण्याची जाणीव ह्या वडीलधाऱ्यांपैकी कुणाकडेच नसावी. त्या घरात परत जावेसे वाटत नसेल त्याला. म्हणूनच तो आपल्याला सोबत यायला म्हणत असेल, माझ्या लक्षात आले.
नंतर ह्या प्रकरणाबद्दल आणखी माहिती मिळाली ती अशी :  वीरेंद्रचे पप्पा दारूच्या व्यसनानेच गेले. ते काही काम करत नव्हते. घरात झोपूनच असायचे अनेक दिवसांपासून. त्याची मम्मी दारूचाच व्यवसाय करते. अर्थात गावठी दारूचा. भट्टीवरून आलेली दारू, तीत पाणी मिसळून विकते. कपभर चहाइतकी दारू २५ रुपयांना विकते म्हणे. थोड्या दिवसांनी मी तिला भेटायला जाण्याची इच्छा दर्शवली. जाणकारांनी मला थोडे नाउमेद केले, तरी मी आग्रह धरला. मग गावातल्या दोन मुलींना सोबत घेऊन एकदा गेलेच. पाहते तर, एक सुंदरी फॅशनेबल कपडे घालून बसली होती. घर एकदम पॉश. गुबगुबीत सोफासेट. तिचे वय जेमतेम तिशीचे. एकूण राहणी देहाकडे लक्ष वेधून घेणारी. सोबत आलेलीने माझी ओळख करून दिली. मुले मामाकडे गेली होती व तीही जाणार होती लवकरच. थोडे कामाचे व थोडे इकडचे-तिकडचे बोलणे झाले. दुःख वगैरे काही नव्हतेच. आणि तेही बरोबर आहे. एक दारुडा मेला, तर त्याचे दुःख करायचे की सुख? पण, मग ती करत असलेल्या कामाचे काय? मी तर असेही ऐकले होते की, हा धंदा काही झाले तरी लपूनछपून करायचा असतो. तर ती आपल्या मुलांना  माल पोहोचवायच्या, वसुली करायच्या कामांना लावते. मी तेथे असतानाच एक फोन आला. त्यावर ती मोठमोठ्याने बोलत होती. “ते अमुकतमुक पाटील आहेत ना, त्यांच्याकडे पोचवायचे आहे उत्पादन.” मला ह्या शब्दाचेही हसू आले. थोड्या वेळाने आम्ही उठलो. बाहेर पडल्यावर पडवीच्या एका बाजूला एक खोली दिसली. खोलीला मोठी खिडकी होती. तिच्यात नव्या कपड्यांचे ढिगारे अस्ताव्यस्त पडले होते. “हे माझे दुकान. मी कपडे विकते.” ती म्हणाली. मोठी खिडकी विक्रीसाठी आहे हे समजले. “काय-काय माल ठेवता तुम्ही?” मी विचारले. तिने काही क्षणांतच लेगिनपासून ते नऊवारी लुगड्यांपर्यंत अनेक वस्त्रप्रकारांची नावे घेतली. “लग्नात भरायचा हिरवा चुडा आणि इतर वस्तूही ठेवते.” ती म्हणाली. एकूण, बोलण्यात ती चांगलीच चतुर होती. मी दुकानाकडे नजर टाकली. तिथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था वा रचना नव्हती. ती चटकन म्हणाली, “गेल्या काही महिन्यांत ह्यांच्या तब्येतीमुळे मला इकडे लक्ष देणं झालं नाही. पण आता मी पुन्हा सुरू करणार आहे.” “ठीक आहे.” मी म्हटले. “मला काही लागलं तर येईन तुमच्याकडे.” मनातल्या मनात तिला ह्या व्यवसायाबद्दल सदिच्छा देऊन मी निघाले. मुलांचे भवितव्य काय, हा प्रश्न मला छळत होता.
(क्रमशः)
- अनुराधा मोहनी
संपर्क : ९८८१४४२४४८, [email protected]
(लेखिका भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अनुभवकथन , भाषा , शिक्षण , प्रयोगशील शिक्षण , नावीन्यपूर्ण शिक्षण , मराठी अभ्यास केंद्र , अनुराधा मोहनी , बालसाहित्य

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen