शैक्षणिक धोरण आणि मूलभूत शिक्षण


नवीन शैक्षणिक धोरणात पूर्वप्राथमिकची तीन वर्षे आणि प्राथमिकमधील पहिली दोन वर्षे (इ. पहिली आणि दुसरी) यांचे एकत्रीकरण करून; त्याला मूलभूत शिक्षण म्हटले गेले आहे. ह्या पाच इयत्तांच्या एकत्रीकरणामागील कारणांचा आढावा घेणारा शिक्षण-अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांचा हा स्फूट लेख -
नवीन शैक्षणिक धोरणात जो आकृतिबंध आकड्यांच्या स्‍वरूपात दिला आहे, तो याप्रकारे ५ + ३ + ३ + ४ + ३ + १. यातील पहिल्‍या – ५ - टप्‍प्‍यास मूलभूत शिक्षण (Fundamental Education) या नावाने संबोधले जाणार आहे. त्‍याचीच चर्चा प्रथम करू. सोप्‍या शब्दांत सांगायचं तर, खेळवाडी, अंगणवाडी (छोटा शिशू), बालवाडी (मोठा शिशू) ही तीन वर्षे व त्‍यालाच जोडून इ. पहिली, इ. दुसरी ही मिळून पाच वर्षे एकत्रित घटक (Unit) म्‍हणून धरली जाणार आहेत. हा पहिला एकात्मिक टप्पा पुढीलप्रमाणे मांडता येईल :
इयत्ता                                          वय
बालवर्ग (नर्सरी) :–                         ४ वर्षे
लहान शिशू (सीनियर के.जी.) :–       ५ वर्षे
मोठा शिशू – (ज्यूनियर के.जी.) :–     ६ वर्षे
पहिली :–                                      ७ वर्षे
​दुसरी :–                                        ८ वर्षे
म्‍हणजेच सध्याच्‍या बालशिक्षणाची तीन वर्षे व निम्‍न प्राथमिकमधील पहिली दोन वर्षे मिळून पाच वर्षांचा हा मूलभूत शिक्षणाचा टप्‍पा, एक घटक म्‍हणून धरला जाईल.
बालवाड्या या पहिली व दुसरी या वर्गास जोडण्याची जी कारणे नवीन धोरणात दिली आहेत; त्‍यात मुख्यत: बालकांच्‍या मेंदूच्‍या विकासाचे स्‍वरूप व टप्‍पे लक्षात घेतले आहेत, असे सांगितले जाते. सर्वसाधारणपणे बालकाच्‍या मेंदूची ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता वयाच्‍या ८व्‍या वर्षापर्यंत बरीच असते. जसं, काही घरांतून लहानपणी मुलांना संध्याकाळी परवचा, पाढे, रामरक्षा इत्‍यादी म्‍हणायला शिकवितात. ती रामरक्षा (अर्थ कळला नाही तरीही) शेवटपर्यंत पाठ असते. किंवा सतरा सक्‍कम दुवोदरशे (१७ x ६ =  १०२) हे मला अजूनही (वयाच्‍या ७८व्‍या वर्षी) सांगता येते. म्‍हणजे इ. दुसरीपर्यंतचे शिक्षण व मेंदूची ज्ञान ग्रहण शकण्याची क्षमता व स्‍मृती यांचा अनोन्‍य संबंध लक्षात घेऊन, हा मूलभूत शिक्षणाचा घटक या पाच वर्षांचा सुचविला गेला आहे. अर्थात, हे शिक्षण पुस्‍तकी न राहता मुख्यत: हसत-खेळत, गाणी म्‍हणत; नाचत-गाजत, सहजपणे, अनौपचारिक पद्धतीने व अत्‍यंत आनंदमयी झाले पाहिजे, यावर तज्ज्ञाचा भर होता; व त्‍यास या रचनेमुळे नवीन धोरणाने पुष्टीच दिली आहे. त्‍यात लिखाणापेक्षा बोलण्याला महत्‍त्‍व आहे. पुस्‍तकांपेक्षा चित्रे व पूरक साधने वापरून अक्षर व शब्‍दओळख, एक ते दहा/वीस आकडे यांवर भर देणे अत्‍यावश्यक आहे. किमान अध्ययनक्षमता अत्‍यंत मर्यादित असून; कडक शिस्‍त, गणवेश, घोकंपट्टी, जड दफ्तर, गृहपाठ, परीक्षा या सर्व ‘राक्षसांना’ दूर ठेवण्यात आपण यशस्‍वी झालो, तरच नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचा पाया पक्‍का होईल. शिक्षकास लहान मुलांना हाताळण्याचे, खेळातून व विविध आनंददायी कृतीतून रचनावादी शिक्षणपद्धती वापरूनच हा टप्‍पा यशस्‍वीपणे पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्‍यासाठी शिक्षकांचे सतत प्रशिक्षण तर आवश्यक आहेच; पण या सर्व व्‍यापाचे योग्‍य ते प्रशिक्षण हे शिक्षक तयार करणाऱ्या संस्‍थांतूनच सुरू झाले पाहिजे. बी.एड्-डी.एड्.च्‍या वर्गांतून जे शिकविले जाते, ते केवळ परीक्षेपुरते न राहता, पुढे प्रत्‍यक्ष अध्यापन कार्यात वापरले गेले पाहिजे. उदा. प्रश्नपत्रिकेचा ब्ल्यू-प्रिंट शिकविला गेला, पण प्रत्‍यक्ष प्रश्नपत्रिका वेगळीच (किंवा त्‍याच-त्‍याच प्रकारची), असे होता कामा नये. कौशल्‍याधारित व वरच्‍या स्‍तरावर उपयोजित प्रश्न कसे काढावयाचे, याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्‍यामुळे बी.एड्.च्‍या अभ्यासक्रमात आवश्यक तो बदल करावा लागेल. विषयानुसार व वयोगटानुसार प्रश्न काढणे, त्‍यांचा साठा तयार करणे (पेढी), इत्‍यादींसाठी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. विविध प्रतिमाने केवळ माहीत असणे उपयोगाचे नाही, तर त्‍यांचा वापर विषयानुसार प्रत्‍यक्ष अध्यापन कार्यात व पाठ्यपुस्‍तक निर्मितीमध्ये झाला पाहिजे. इयत्ता तिसरीपासून सोप्या पद्धतीचे मूल्‍यमापन होणे व इयत्‍तेनुसार उद्दिष्टानुसार प्रश्नांच्‍या स्‍वरूपात व त्‍याच्‍या महत्‍त्‍वांमध्ये (वेटेज) हळुवार बदल होणे अपेक्षित आहे.
दुसरे म्‍हणजे, अध्यापनाची विविध प्रतिमाने बी.एड्.ला शिकवितात; पण, पुढे प्रत्‍यक्ष अध्यापनात किती शिक्षक ती अमलात आणतात? जवळ-जवळ नाहीच. फार पूर्वीपासून बालवाडीचे ‘शिक्षण’ हे अनौपचारिक व इयत्ता पहिलीपासून औपचारिक असे राहिले आहे. त्‍याऐवजी इयत्ता दुसरीपर्यत हे शिक्षण अनौपचारिक व बंधनमुक्‍त असले पाहिजे. त्‍यात अध्यापकांना प्रयोग करण्याचे पूर्ण स्‍वातंत्र्य मिळाले, तरच हा टप्‍पा सतत अधिकाधिक सक्षम, गर्भश्रीमंत व सर्जनशील राहू शकेल. पाठ्यपुस्‍तकांपेक्षा अध्यापकांसाठी मार्गदर्शन-पुस्‍तके असणे जास्‍त आवश्यक आहे, असे अनेक तज्ज्ञांना वाटते. हा ‘मूलभूत शिक्षणाचा’ पाया पक्‍का झाल्‍यासच पुढील इमारत पक्‍की होईल.
-  प्रा. विद्याधर अमृते
(लेखक भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
संपर्क : ९६१९६७९५७०

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शिक्षण , प्राथमिक शिक्षण , मूलभूत शिक्षण , शैक्षणिक धोरण , विद्याधऱ अमृते , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen