असे घडलो कोरोना काळात


गतवर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे मार्चच्या मध्यावर शाळा-महाविद्यालये अचानक बंद झाली. त्या घटनेला वर्ष पूर्ण झालं. शाळा बंद होऊन अचानक घरात बंद झालेल्या या मुलांचं हे वर्ष कसं गेलं, त्यांनी काय अनुभवलं, ती नवं काय शिकली, यासंबंधी दहिसर, मुंबई येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमिक शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक सुदाम कुंभार यांनी मुंबईतील आणि मुंबईबाहेरील अनेक शाळांमधील मुलांशी संवाद साधला. मुलांचं मनोगत मांडणारा त्यांचा हा लेख -
माहे सप्टेंबर २०२० ते माहे जानेवारी २०२१ पर्यंत लॉकडाऊनच्या कालावधीत काही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांचा खूप चांगला आधार होता. ज्या पालकांची नोकरी गेलेली नव्हती, ज्यांची आर्थिक स्थिती बरी होती, त्यांच्या मुलांना वेळ घालवण्यासाठी अनेक गोष्टी होत्या. त्यांच्या घरांमध्ये सर्व सोयी उपलब्ध असल्याने एखादा दिवस का असेना, ती मुलं पालकांबरोबर आलिशान गाडीतून किंवा बाइकवरून कुठेतरी फिरून येत असत, मॉलमध्ये जात असत, एखादी छोटी वाढदिवसाची पार्टीसुद्धा करत. परंतु, असेही काही विद्यार्थी आहेत, ज्यांना कोणाच्या गाडीतून किंवा बाइकवरून कुठेही जाता आलं नाही. आई-बाबांसोबत रस्त्याने चालत जावं लागलं, वेळप्रसंगी इच्छा नसताना रिक्षा अथवा एसटी-बसमधून किंवा मिळेल त्या खाजगी वाहनाने प्रवास करावा लागला. काही मुलांनी आपल्या आई-बाबांच्या कामाला हातभार लावला. अर्थातच, आई-बाबांच्या कामाला हातभार म्हणजे संपूर्ण कुटुंबाला हातभार. हे करत असताना या मुलांनी अभ्यास आणि ऑनलाइन शिक्षण याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही.
कोरोना काळात हे विद्यार्थी बरंच काही वेगळं शिकले. जसे की, रस्त्यावरून जाता-येताना, दुकानात गेल्यावर, ऑनलाइन शिक्षणातील उपस्थिती, बाजारात खरेदी करताना, रिक्षा/बस/एसटी यांतून प्रवास करताना, आई अन्य ठिकाणी घरकाम करत असल्यास तेथे मदत करत असताना...इ. याविषयीचे विविध अनुभव मुंबई आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहेत. मुंबई आणि ठाणे शहर वगळता  इतर जिल्ह्यांत मुलं आता शाळेत जाऊ लागली आहेत. (काही ठिकाणी सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद झाल्या आहेत).  गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांनी घेतलेले अनुभव जितके मनोरंजक आहेत, तितकेच हृदयस्पर्शीही आहेत.
विलेपार्ले, मुंबई येथील माधवराव भागवत हायस्कूलचा विद्यार्थी हर्ष वरठे सांगतो,  लॉकडाऊन, कर्फ्यू, ऑनलाइन शिक्षण, क्वारंटाइन इत्यादी नवीन शब्दांची ओळख झाली. स्मार्टफोनचा योग्य उपयोग केला तर आपण काय-काय करू  शकतो हे कळलं. आई-बाबांना होणारा त्रास बघवत नव्हता. घराची साफसफाई करताना, घराच्या कोणत्या कोपऱ्यात किती धूळ साठते, हे पहिल्यांदाच पाहायला मिळालं. दादर, मुंबई येथील साने गुरुजी विद्यालयातील विद्यार्थी कैवल्य राणे याने आपल्या भावना एका कवितेतून व्यक्त केल्या आहेत :
नुसतं हॉटेलमध्ये खाणे आणि मॉलमध्ये जाणे
व्यसनांच्या आहारी जाऊन घातले जातात धिंगाणे
विसरून गेला होता प्रत्येक जण आपली सुशील संस्कृती
मॉडर्नतेचे नाव देऊन फोफावत होती विकृती
हॉटेलांना लागलेले कुलूप सात्विक बनवून गेले
कोरोना, तू तर माणसाला जगाकडे बघण्याचे नवे चष्मे दिलेस.
मानखुर्द, मुंबई येथील मातोश्री विद्यामंदिर या शाळेची विद्यार्थिनी सारिका निकम लिहिते, मुंबईत झपाट्याने वाढलेला कोरोना आणि घरची परिस्थिती यामुळे आम्ही गावी आलो. त्यातच जूनमध्ये सुरू झाले ऑनलाइन शिक्षण. खेडेगाव असल्यामुळे नेटवर्कची मोठी समस्या. तरीही हार न मानता ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवले. परंतु, पुन्हा-पुन्हा जाणवतंय वर्गात फळ्यासमोर व आपल्या शिक्षकांशी गप्पा मारत शिकण्याचा आनंद कोरोनाने हिरावून नेला आहे. बोरिवली, मुंबई येथील कॉसमॉस हायस्कूलची विद्यार्थिनी प्रांजली मनोज खेडेकर आपल्या भावना व्यक्त करताना सांगतेय, कोरोनाच्या महामारीने तिच्या बहिणीचे व भावाचे शिक्षण बंद झाले.  नाईलाजाने त्यांना गावी जावे लागले. पालकांच्या हातात असलेले पैसे  लवकरच संपले.  तिच्या पुढील काव्यपंक्तीमधून आजची मुलं खरोखर या कोरोनामुळे नक्कीच सज्ञान झालेली आहेत, असं आपल्याला म्हणावे लागेल.
भावंडं व घर सांभाळून मी आई-वडिलांना अनुभवले
प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यास आता मी सज्ज झाले
ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून तंत्रज्ञान शिकले
कर्तृत्व व ज्ञानाच्या जोरावर कष्ट करण्यास शिकले
आत्मनिर्भर होताना, नवी वाट शोधताना,
मी जगणं शिकले.
भूमी सदानंद कदम ही आणखी एक विद्यार्थिनी. हिने लॉकडाउनच्या काळात घरातल्या पुस्तकांचा वाचून-वाचून फडशा पाडला आणि पुस्तकांच्या विश्वात रमण्याचा आनंद उपभोगला. शीव, मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचा विद्यार्थी आर्यन चोरगे सांगतोय की, लॉकडाऊनमुळे संपूर्ण कुटुंबाला गावी जावे लागले. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यामुळे कुटुंबातील सर्वजण एकत्र आले. पावसाळा सुरू झाल्यावर गावाकडचे लोक पावसातसुद्धा शेतीची कामे कशा प्रकारे करतात, हे पाहायला मिळालं. दहिसर, मुंबई शक्ती सेवा हायस्कूलमधील विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी पवार आणि तिच्या मैत्रिणी सांगत आहेत, लॉकडाऊनमुळे नजर कैद काय असते ती कळली. आपण मरणार तर नाही ना, असंही एखाद्या दिवशी वाटत होतं. लहान घरात राहणं अगदी जिकिरीचं झालं होतं.
बोरिवली, मुंबई येथील अभिनव विद्यामंदिरची विद्यार्थिनी रिद्धी हतपले सांगते, मोबाइलच्या साहाय्याने दिलेली ऑनलाइन परीक्षा कधीच आवडली नाही. दहा महिने चार भिंतीच्या आत राहणं खूपच कंटाळवाणं वाटलं. बोरिवलीच्या शेठ जी. एच. हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी मात्र वेगळ्याच भावना व्यक्त केलेल्या आहेत. ऑनलाइन शिक्षणाबरोबर शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा ऑनलाइनच करण्यात आले. प्रत्यक्ष शाळा सुरू असते तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी शिक्षक शाळेत करून घेतात, परंतु लॉकडाऊन असल्यामुळे ही तयारी तिची तीलाच करावी लागली.
ग्रँड रोड, मुंबई येथील एस. एल. अँड एस. एस. गर्ल्स हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी कृतिका ढोणे म्हणते, सुशिक्षितांपेक्षा अशिक्षितांमध्ये कोरोना व त्याविषयी घ्यावयाची काळजी जास्त दिसून आली. तसेच या काळात घरी तसेच शाळेत कोणतेही सण-उत्सव किंवा समारंभ साजरे करता आले नाहीत. तर बोरिवली येथील आर. सी. पटेल हायस्कूलचा विद्यार्थी अभिषेक तांबे म्हणतो, ऑनलाइनचे वर्ग एकट्यानेच पाहिले. मित्र सोबत नसल्यामुळे मजा नाही आली. लोकमान्य विद्यालयची विद्यार्थिनी आसावरी कांबळे व्यक्त होताना थोडी भावुक होते. तिच्या मते, सर्व वैद्यकीय क्षेत्रात सेवा देणारे कर्मचारी, शाळांमधील शिक्षक व अहोरात्र झटणारे पोलिस हे देव आहेत. त्यांच्या अथक परिश्रमाबद्दल ती म्हणते, The harder the battle, The sweeter the victory.
बोरीवलीच्या चोगले हायस्कूलची विद्यार्थीनी  मनाली सांगतेय, ऑनलाइन शिक्षणासाठी रिचार्ज करणं कठीण होतं आणि या संपूर्ण काळात दोन दिवस उपाशी झोपावं लागलं. सामाजिक कार्यकर्त्यांना हे कळलं तेव्हा तिच्या कुटुंबाला थोडी मदत मिळाली. तर इशान काव्यातून असा व्यक्त झाला :
दूर कर हे संकट दयाळू दयाघना
पूर्ण करा माझी मनोकामना
अन् जाऊ दे एकदाचा कोरोना.
देवा, प्लीज सुरू कर माझी शाळा
मालाड, मुंबई येथील विदर्भ विद्या मंदिरची विद्यार्थिनी प्रांजली दुर्गोळी सांगतेय, लॉकडाउनच्या काळात रस्ते कसे छान दिसत होते आणि ऑनलाइनच्या माध्यमातून सर्व लहान मुलं मोबाइल कसा ऑपरेट करावा, हे अत्यंत सफाईदारपणे शिकली.
कांदिवली, मुंबई येथील ज्ञानेश्वर विद्यालयची विद्यार्थिनी तिचा अनुभव सांगताना, या आपत्तीवर मात करणारे संपूर्ण पोलिस दल, डॉक्टर्स आणि परिचारिका यांना श्रेय देते. याच शाळेची विद्यार्थिनी पूनम साळुंखे कोरोनाच्या आपत्तीला पाहुणा म्हणते, कारण हा पाहुणा अचानक आला खरा, पण बरंच काही शिकवतोय. पुढे ती म्हणते, खरा अनुभव घेतला तो गावी गेल्यानंतर. १४ दिवस घरातून बाहेर पडायचं नसल्यामुळे गावात कुणाला मुंबईकर आल्याचं कसलंच कौतुक वाटलं नाही. पूर्वी शाळेची सुट्टी खूप आवडायची, पण आता सुट्टी नकोशी झाली आहे. मुंबईतील नाना चौक येथील सेवा सदन सोसायटीच्या गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी सलोनी नवले सांगते, एका धार्मिक उत्सवानिमित्त तिचं कुटुंब गावी गेलं होतं, परंतु कोरोनाच्या भीतीमुळे गावातील नवीन बांधलेल्या मंदिराचा उद्घाटन कार्यक्रम रद्द करावा लागला. गावीच राहायला लागल्यामुळे दररोज वापरायच्या वस्तू अगदी जपून-जपून वापरण्याची सवय लागली.
मालाड, मुंबई येथील जिजामाता विद्या मंदिरची विद्यार्थिनी तनुजा सूर्वे म्हणते, कोरोनाच्या आपत्तीने जगण्याची एक नवी दृष्टी दिली. दहिसर येथील पूर्ण प्रज्ञा हायस्कूलचा विद्यार्थी मंथन सावंत लिहितो, ब्रेकिंग न्यूज वाचताना खूप भीती वाटायची. मोबाइलच्या साहाय्याने ऑनलाइन शिक्षण थोडे कंटाळवाणे वाटले. काही दिवसांनी तर मोबाइलचाच कंटाळा आला. बोरिवलीमधील मंगूबाई दत्तानी हायस्कूल या शाळेची विद्यार्थिनी शर्वरी बागवे म्हणते, ‘कोरोनाने केला कहर, पण नाती जपण्यात आला मोठा बहर’. दहिसर येथील विद्या भूषण हायस्कूलची विद्यार्थिनी सृष्टी शेळके सांगते, एवढ्या दीर्घ सुट्टीमुळे अभ्यासाचं खूप नुकसान झालं. ऑनलाइन शिक्षणामुळे काही प्रमाणात शाळेशी कनेक्ट होण्याचा एक वेगळाच अनुभव मिळाला. एस. आर. डब्ल्यू. एस. हायस्कूलची विद्यार्थिनी श्रद्धा बेल्हेकर लिहिते, ‘मास्क नाही प्रवेश नाही’ या प्रकारच्या सूचना, मशीनच्या साहाय्याने होणारी तपासणी आणि त्यामुळे शांत दिसणारी मुंबई, सर्व काही विचित्रच वाटतं.
दादरमधील शारदाश्रम तांत्रिक विद्यालयची विद्यार्थिनी वैष्णवी नागलवाड हिच्या भावना खूप वेगळ्या आहेत. तिची आई जे. जे. रुग्णालयात काम करत असल्यामुळे तिथेच राहून रुग्णांची सेवा करत होती. त्यामुळे कोरोना काय असतो हे तिने अगदी जवळून पाहिलं. आईला कधीही रजा मिळत नव्हती, त्यामुळे घरातील सर्वजण तिची वाट पाहत असत. आजही ते दिवस आठवतात व पुन्हा-पुन्हा जबाबदारीची जाणीव करून देतात. आई घरात नसताना घर कसं सांभाळायचं याची चांगली सवय लागली आणि समंजसपणा काय असतो, हे शिकायला मिळालं.
शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी भूषण जाधव कोरोनाकाळातील त्याचा अनुभव व्यक्त करताना सांगतो, अचानक हसणं-खेळणं बंद झाल्यानंतर एखाद्या कैद्यासारखं जगणं सुरू झालं. वर्षाच्या अखेरीस होणारी वार्षिक परीक्षासुद्धा रद्द झाली. काही दिवस खूप आनंद वाटला, पण नंतर मात्र कळलं की परीक्षा ही हवीच. लॉकडाऊनमुळे एक गोष्ट अनुभवायला मिळाली, ती म्हणजे सकाळ संध्याकाळ घरचं खाण्याचा आनंद मिळाला. सकाळी आईने केलेली गरम-गरम पोळी-भाजी खायला मिळाली. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून मोबाइलचा खरा उपयोग समजला, पण शेवटी शाळेत मित्र-मैत्रिणींसोबत वर्गात शिकणं आणि मोबाइलवर शिकणं यात खूप फरक जाणवला. एक अदृश्य विषाणू काय करू शकतो, हे या काळात समजलं. तसेच शैलेंद्र कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी सुप्रिया गांधी सांगतेय, आपल्या धावपळीच्या जीवनशैलीला ब्रेक लागला! लॉकडाऊनमुळे आपले जनजीवन विस्कळीत झाले हे खरे, पण स्वच्छतेचे महत्त्व, कौटुंबिक प्रेम, जिव्हाळा आणि माणुसकीचे विलोभनीय दर्शन या कोरोना काळातच घडले. ऑनलाइन तासिकांमुळे तंत्रज्ञानाचा सदुपयोग करता आला, पण शिक्षकांची नेहमीच उणीव भासली. मास्क व सेनिटायझरचा कटाक्षाने वापर करताना स्वच्छतेसोबत पर्यावरणाचे महत्त्व पटले. घरच्यांसोबत वेळ घालवताना चँटिंगमुळे अबोल झालेली नाती सुसंवादाने एकत्र आली, ‘आई कुठे काय करते?’ या प्रश्नाचं उत्तरदेखील मिळालं. कोरोना योद्ध्यांच्या रूपात माणुसकीची व देशाप्रति कर्तव्याची उदाहरणे पाहायला मिळाली.
गांधी बाल मंदिर विद्यालयात शिकणारा यश रांगल सांगतोय, घर आणि शाळा यांच्या मधला रस्ताच बंद झाल्यामुळे अस्वस्थ झाल्यासारखं वाटलं. आणि एक महत्त्वाचं, ऑनलाइन शिक्षणामुळे तांत्रिक ज्ञान पण मिळालं. त्याच शाळेचा सतीश पांगम सांगतो, दररोज वेगाने धावणारी मुंबई अचानक स्तब्ध झाल्यामुळे काय घडलं ते कळलंच नाही. कधीही न थांबणारी रेल्वेसुद्धा ठप्प झाली आणि आख्खी मुंबई त्यामुळे स्तब्ध झाल्यासारखी वाटली. दक्षता तिचा अनुभव सांगताना म्हणते, मुंबईसारख्या महानगरांमध्ये ऑनलाइन शिक्षण घेत असताना जर तिचा गोंधळ उडाला, तर खेडोपाडी वेगवेगळ्या वाड्यावस्त्यांवर शिक्षण घेणार्‍या मुलांचं काय झालं असेल, ही चिंता तिला कायम सतावत होती.
बालमोहन शाळेचा भाग्येश कुलकर्णी आपल्या भावना व्यक्त करताना सांगतोय, कोरोनाच्या दीर्घ सुट्टीमुळे आई-बाबा, आजी या सर्वांसोबत खूप छान वेळ घालवता आला. सर्वांबरोबर राहिल्यामुळे  प्रेम, जिव्हाळा व आपुलकी वाढतच गेली. त्याच्या परिचयातल्या खूप लोकांना या कोरोनाच्या महामारीमुळे जीव गमवावा लागला. तसेच रस्त्यावरून बिनधास्त फिरणाऱ्या लोकांना तसेच तरुणांना पाहून तो अस्वस्थ होताना दिसतोय. वांद्रे येथील महात्मा गांधी विद्या मंदिरची विद्यार्थिनी अनुष्का पवार व्यक्त होताना सांगते, लॉकडाऊनमुळे तिला कुटुंबाबरोबर काही आनंदाचे क्षण घालवता आले. घरच्या लोकांसोबत नाहीसा झालेला संवाद वाढलेला दिसला.
मुंबई मालवणी येथील साई विद्या मंदिरची तनैय्या गावडे लिहिते, तिच्या परिसरात अत्यंत भीतीचे वातावरण असूनसुद्धा अत्यंत धैर्याने तिच्या संपूर्ण कुटुंबाने कठीण परिस्थितीवर मात केली. कुर्ला येथील सेंट मायकेल हायस्कूलची विद्यार्थिनी गायत्री केशेवाड सांगते, घरातल्या सर्वांसोबत ती सर्वच बाबतीत तडजोड करायला शिकली आणि दीर्घ सुट्टीमुळे वाचनाची आवड चांगलीच वृद्धिंगत झाली. आकांक्षा शिंदे म्हणते, थोडीतरी सर्दी किंवा खोकला झाला तर भीतीने शरीराचा थरकाप उडायचा.
करजुवे, रत्नागिरी येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी पायल डावल सांगतेय, शाळेभोवती छोट्या-छोट्या वाड्या असल्यामुळे शिक्षकांनी वाडीनुसार अभ्यासक्रम दिला व मुलांनी एकत्रित येऊन पूर्ण केला. फक्त शाळाच नाही, तर आख्ख जग ऑनलाइन झालं. तिच्या निरीक्षणानुसार, मोठी माणसंसुद्धा घरात कधी न करणारी कामं करू लागली. याच शाळेची दुसरी विद्यार्थिनी नूतन गोवळकर सांगते, कोरोनाची ही महामारी साक्षात एखाद्या महायुद्धासारखी वाटली.
देऊळगाव राजा, बुलढाणा येथील देऊळगाव राजा हायस्कूलची विद्यार्थिनी अनुराधा गजानन शेळके सांगते, कोरोनाच्या आपत्तीने बरंच काही चांगलं शिकवलं. काही काळ आपण नाती विसरायला लागलो होतो, आपलं प्राणिमात्रांवरचं प्रेम कमी झालं होतं, आपलं स्वच्छतेकडेपण थोडं दुर्लक्ष झालं होतं. आणि रोजच्या धावपळीत लोक तब्येतीची काळजी घ्यायला विसरले होते. कोरोनाच्या आपत्तीमुळे मास्क आणि सॅनिटायझर आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले आहेत. आता अशाच सवयी आपण भविष्यातसुद्धा जोपासल्या पाहिजेत.
मंगळवेढा, सोलापूर येथील इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आरती वाठारे म्हणते, उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या एका विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले व त्याच वेळी लोकांनी आलेल्या परिस्थितीवर, संकटावर मात कशी करावी हेसुद्धा शिकून घेतलं. याच शाळेची विद्यार्थिनी रामेश्वरी गवळी काव्यातून सांगते :
काय सांगू कोरोनाबद्दलचा अनुभव माझा
हिरावून घेतली त्याने माझी खेळण्याची मजा
घरात बसून राहायची दिली त्याने सजा
पुरे झाले आता, कोरोना जा बाबा जा 

कोरोनाची ही चीनमधून आलेली स्वारी
जगासाठी ठरली सर्वात मोठी महामारी
खबरदारी घेणे हीच आहे आपली जबाबदारी.

सुखात लोळणाऱ्यांना जीवनाकडे पाहायला शिकवलं
शहरांमध्ये डोलणाऱ्यांना मातीत राहायला शिकवलं
पोलिस, डॉक्टर आणि प्रशासनात देव पाहायला शिकवलं
कोरोना तू माणसाला माणुसकीने जगायला शिकवलं.
नाशिकच्या रचना विद्यालयाची चेतना पाटील सांगते, २०२०चे सर्वांनी अगदी धूमधडाक्यात स्वागत केले, परंतु संपूर्ण वर्ष असं दुःखदायक असेल याची कोणीही कल्पना केली नव्हती. आनंदाची बाब म्हणजे, लहानपणी ऐकलेल्या रामायण-महाभारतासारख्या मालिका पुन्हा एकदा पाहायला मिळाल्या.
लॉकडाऊनमुळे संपूर्ण जग होरपळून निघत असताना बालमनावरसुद्धा त्याचा किती विपरीत परिणाम झाला, ही बालके स्वतःला कशी घडवत गेली व त्यांनी स्वतःमध्ये कसे बदल केले आणि आलेल्या आपत्तीवर कशाप्रकारे मात केली, हेच या विद्यार्थ्यांच्या लेखणी मधून व्यक्त झालं आहे.
- संकलन व शब्दांकन - सुदाम कुंभार
(लेखक दहिसर, मुंबई येथील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमिक शाळेतील निवृत्त मुख्याध्यापक आहेत.)
संपर्क – ९८३३४१४९९२

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कोरोनाकाळातील मुलांचे शिक्षण , कोरोनाकाळाविषयी मुलांचे मनोगत , कोरोनाकाळ आणि शिक्षण , कोरोनाकाळ आणि शाळा

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen