‘शौर्याची तव परंपरा। महाराष्ट्रा वळुनि बघ जरा।।’ अशा रचनांनी अंगावर रोमांच उभे करणारे एक महत्त्वाचे शाहीर म्हणजे द. ना. गव्हाणकर. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाचे योगदान देणारे शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे २८ मार्च १९७१ रोजी निधन झाले. त्यांच्या पन्नासाव्या स्मृतिवर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा पूजा सामंत यांचा हा लेख –
‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ हे महाराष्ट्राच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पर्व होते. या वेळी जनतेला सावध करण्याचे काम महाराष्ट्रातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि शाहीर यांनी केले. या तेजस्वी लढ्याला पूर्णत्वास नेण्यास अनेकांचे योगदान लाभले, अनेकांनी यासाठी आपले आयुष्य वेचले. काहींचे कार्य जगासमोर आले, पण काही नावे काळाच्या ओघात विरूनदेखील गेली. जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नाव येते, तेव्हा शाहीर आणि शाहिरी यांचे स्मरण नक्कीच होते. अशा शाहिरांपैकी एक महत्त्वाचे शाहीर, यांनी थोडी-थोडकी नाही, तर आयुष्यातील चाळीस वर्षे शाहिरीला दिली. लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी समाजवादी दृष्टिकोन महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचवला, लोकजागृती केली. तसेच त्यांचे कार्य महाराष्ट्रातील सांस्कृतिक इतिहासातील एक महत्त्वाचे पर्व म्हणावे लागेल.
शौर्याची तव परंपरा। महाराष्ट्रा वळुनि बघ जरा,
शिवबाच्या कीर्तीचे झडती चौघडे। गड-किल्ले अजुनीही गाती पवाडे।
दरी खोरे वीर कथा सांगे पठारा।।
अशा आपल्या शब्दांनी, अंगावर रोमांच उभे करणारे शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे संपूर्ण नाव दत्तात्रय नारायण गव्हाणकर. यांचा जन्म २२ एप्रिल १९१५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात महागोंड येथे झाला. कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयातून इंग्रजी विषय घेऊन त्यांनी बी.ए. पदवी संपादन केली. राष्ट्रीय शाहीर नानिवडेकर यांच्या सहवासात गव्हाणकर आले आणि त्यांनी नानिवडेकरांकडून शाहिरीचे धडे घेतले. १९४२ ते १९४४ मध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख आणि शाहीर गव्हाणकर या तिघा मित्रांनी मिळून ‘लालबावटा कलापथका’ची स्थापना केली. याच लालबावटा कलापथकाने पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजवली. गव्हाणकर यांचा दृष्टिकोन हा कष्टकऱ्यांची बाजू घेणारा होता, कामगारांच्या जीवनाचा वेध घेणारा होता.
धरतीची आम्ही लेकरं। भाग्यवान।धरतीची आम्ही लेकरं।।
शेतावर जाऊ या सांगाती गाऊ या। रानी वनी गाती जशी रानपाखरं।।
गव्हाणकर यांची रचना अत्यंत साधी, सोपी, हृदयाला भिडेल अशीच आहे. ‘बंडया दिवाण’, ‘मुंबईचा कामगार’, ‘शेतकऱ्यांची पंढरी’, ‘स्वर्गलोकीचा बातमीदार’, ‘काई चालना गा ’, ‘महाराजा ग्रामसिंह’, अशी अनेक लोकनाट्यं आणि ‘महाराष्ट्रा वळुनि बघ जरा’, ‘अजरामर लेनिन’, ‘हुतात्म्यांना आवाहन’, ‘मोटकरी दादा’, ‘गड्या हे सवराज असलं रं कसलं?’, ‘धरतीची लेकरं’ असे अनेक पोवाडे, गीतं गव्हाणकरांच्या प्रतिभेची साक्ष देणारी ठरतात. सामाजिक, राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार संपावा आणि एक नवा सुधारित समाज उदयास यावा, हीच गव्हाणकर यांची तळमळ दिसून येते. खरंतर गव्हाणकर यांनी मोजकेच साहित्य लिहिले; पण हे सर्व साहित्य अगदी गुणात्मक स्वरूपाचेच आहे, असाच प्रत्यय येतो. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी-ज्यांनी बलिदान दिले, त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शाहीर द. ना. गव्हाणकर आपल्या ‘हुतात्म्यांना आवाहन’ या गीतात म्हणतात,
स्मृति तुमची ये भरुनी ऊर, जन घोष करी या, या।
तुमच्या प्राणाहूती दिव्य त्या नच गेल्या वाया।।
तसेच,
परि प्राण पणा लावोनी, आम्ही जिंकू संशय नाही।
जन-राज्य सूर्य उगवेल, उजळील दिशा तो दाही।।
याविषयी शाहिरी वाङ्मयाचे गाढे अभ्यासक डॉ. माधव पोतदार म्हणतात, “हुतात्म्यांची पुण्याई फळास आली ही गोष्ट लोकनिदर्शनास आणणे हाच हेतू ह्या गीत निर्मितीमागे आहे.”
महाराष्ट्रात शाहिरांचे संघटन होणे आवश्यक होते. त्यासाठी ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’ची स्थापना करण्याचा विचार होऊ लागला. यामध्ये गव्हाणकर यांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. अशा ह्या शाहिरांचे जीवन ‘स्फूर्तीदायक’ वाटते. शाहीर, कलावंत असलेले गव्हाणकर फोटोग्राफीच्या क्षेत्रातही चमकले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गोवा मुक्ती लढा या चळवळीची त्यांनी टिपलेली छायाचित्रे त्या काळी खूप गाजली होती. शाहीर गव्हाणकर हे अतिशय प्रभावीपणे पोवाडे म्हणत. यंग इंडिया व कोलंबिया या कंपन्यांनी त्यांच्या ‘डौलाने चाल ढवळ्या’, ‘जाती घडी पुन्हा येणार न्हाय रे’, ‘स्वर्गलोकचा नारद’, ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ हे पोवाडे ध्वनिमुद्रित केले होते. शाहीर अण्णाभाऊंच्या 'माझी मैना गावावर राहिली' या लावणीचे संगीत गव्हाणकरांचे होते. याबाबत शाहीर सदानंद कानिटकर गव्हाणकरांबद्दल लिहितात,“माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली ही लावणी तुमच्या ढंगात अजूनपर्यंत गायला कोणाला जमत नाही.”
छायाचित्रकार, कवी, गायक अशा विविध भूमिकेत ते वावरले. त्याचबरोबर त्यांनी चित्रपट क्षेत्रातही नाव कमावले. के. अब्बास यांच्याबरोबर असिस्टंट डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केले. शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीवर आधारित ‘फकिरा’ हा चित्रपट गव्हाणकर यांनी काढला. एके काळी गाजलेल्या या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला होता.
असे हे महाराष्ट्राचे तेजस्वी, तडफदार शाहीर २८ मार्च १९७१ रोजी पंचतत्त्वात विलीन झाले. शाहीर गव्हाणकर यांना जाऊन ५० वर्षे पूर्ण होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर गव्हाणकर यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं. लोकांचे प्रबोधन केले, लोकांना लढण्यास भाग पाडले. हे शाहीर गव्हाणकर यांचे महत्वपूर्ण योगदान म्हणावे लागेल. असे हे शाहीर द. ना. गव्हाणकर यांचे कार्य नव्या पिढीला मार्गदर्शक तसेच प्रेरणादायी ठरेल असेच आहे.
- पूजा पराग सामंत, औंध पुणे.
संपर्क – ९८८१४६२१८२, [email protected]
(लेखिका पुणे विद्यापीठामधील मराठी विभागातील विद्यावाचस्पती(पीएच.डी)च्या विद्यार्थिनी आहेत.)
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
शाहीर द. ना. गव्हाणकर
, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ
, पूजा सामंत
, मराठी अभ्यास केंद्र
Prathamesh Kale
4 वर्षांपूर्वीअतिशय अभ्यासपूर्ण मांडणी..... नव्या पिढीला मार्गदर्शक.....प्रेरणादायी लेख.. अभिनंदन पूजा!