गंमतशाळा - (भाग ७)


एखाद्या मुलाच्या वाईट वागणुकीवरून आपण त्याच्याबद्दल सहजपणे आपलं  मत ठरवून मोकळे होतो. पणज्या कुटुंबांमध्ये मुलभूत गरजांची वनवा आहेअशा कुटुंबांत मुलांच्या जडणघडणीकडे लक्ष द्यायला पालक कमी पडतात. अशा मुलांची व्यक्तिमत्त्वे घडताना – बिघडतानात्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घेत मुलांमध्ये चांगले बदल कसे घडवता येतीलयाबद्दल सांगतायत सेवाग्रामच्या अनुराधा मोहनी -
माझे हे नवीन काम कुणाला तरी एकदा सांगितले, तर त्याने विचारले, “ह्या सगळ्यासाठी तुमचा खर्च किती झाला? असा प्रश्न आणखीही कुणाच्या मनात येऊ शकतो म्हणून स्पष्ट करते. दीडशे रुपयांचा फळा, दहा रुपयांचे खडू आणि दहा रुपयांचे डस्टर एवढाच खर्च झाला. मुलांना अधूनमधून खाऊ देतो, राजगिऱ्याचे लाडू, दाण्याची चिक्की, फळे वगैरे. पण, लहान मुलांना खाऊ देणे हा आपल्या संस्कृतीचाच भाग असल्यामुळे तो खर्च खाती टाकला नाही.  इतर साहित्य जसे की, गोष्टींची पुस्तके, पाठकोरे कागद, रंगकांड्या वगैरे सर्व घरचेच.
कौटुंबिक व सामाजिक व्यवस्था
आता थोडं ह्या मुलांबद्दल लिहिते. बहुतांश मुले ही तुटलेल्या कुटुंबातील आहेत. ज्यांचे आई-वडील आहेत, त्यांनाही वाईट सवयी वगैरे आहेत, त्यामुळे चांगले वातावरण तर नाहीच. सेवाग्राम खेडे बरेच पसरलेले आहे, मधूनमधून वस्त्या आहेत, वस्त्यांच्या मधेमधे मोकळी जागा. त्यातील ही वस्ती मला सगळ्यात जुनी. नांदुरा रोडच्या बाजूने अनेकांनी अलीकडे पक्की घरे बांधली आहेत; म्हणून रस्त्याच्या त्या बाजूला पसरलेल्या विस्तीर्ण वस्तीचे दोन भाग पडले आहेत. ग्रामपंचायतीच्या आणि बौद्ध विहाराच्या पलीकडची म्हणजे पश्चिमेची जुनी वस्ती आणि पूर्वेकडची नवी वस्ती. विहाराच्या समोर मोठे उद्यान आहे. डॉ. आंबेडकरांचा पुतळा आहे. तेथे कधी-कधी प्रवचने वगैरे होतात. ही पक्की घरे केव्हा बांधली गेली म्हणून आमच्या कमळाबाईंना विचारले तर त्या म्हणाल्या, गेल्या जेमतेम दहा वर्षांत सरकारी योजनांमधून पैसे मिळवून ही घरे बांधण्यात आली आहेत. बाकीच्या वस्त्यांची नावे नव्या पद्धतीची आहेत. जसे - उगले ले आउट, हावरे ले आउट, (सेवाग्राम रुग्णायलाची) डॉक्टर्स कॉलनी वगैरे. तेथील रहिवाशीही उच्चभ्रू आहेत. तसे पाहिले तर ही गावकुसाबाहेरची वस्ती आहे. जमीन किंवा शेती फार कमी लोकांकडे आहे. कोणतेही परंपरागत कसब नाही. शिक्षणाचा प्रसार म्हणावा तसा नाही. मागच्या पिढीतील बरेचसे लोक सेवाग्राम आश्रमातील शेतीवर, तेथील गोशाळेत किंवा इतर उपक्रमांमध्ये काम करीत होते. कमळाबाई आठवण सांगतात, “तेथले लोकं गायीसाठी दलिया (गोड सांजा) बनवायचे नं ताई, तो इतका बढिया असायचा, इतका बढिया असायचा, की सर्वे लोकंबी प्लेटा भरू भरू घेऊ खायचेत. फळे तर अश्शी असायची, संतरे, पपया, केळे... सगळं आमच्या घरीबी यायचं. आम्हीबी पोटभर खायचेत.” त्यावेळच्या समृद्धीच्या ह्या कहाण्या आज मात्र कालबाह्य झाल्या आहेत. आजही आश्रमाची शेती व गोशाळा आहे, पण...
कस्तुरबा ट्रस्टद्वारा संचालित सेवाग्रामच्या प्रसिद्ध कस्तुरबा रुग्णालयातही अनेक लोक नोकरी करीत होते व ते सुस्थितीत होते. पण, अनेकांना काही ना काही कारणाने ती नोकरी सोडावी लागली व आज ते रस्त्यावर आले आहेत. आमच्या समोरचे काका रुग्णालयात कामावर होते. पण त्यांना कमरेचे दुखणे लागले. रुग्णांना उचलून स्ट्रेचरवर ठेवण्याचे काम त्यांना करता येईनासे झाले. नोकरी सुटली. आज ते खर्ऱ्याचे दुकान चालवतात. बापू कुटीवरून सरळ पुढे आले की समोर आंबेडकर पुतळा. तिथून डावीकडे वळले की आमच्या घराचा रस्ता. त्या वळणावर एक अगदी छोटी (कपड्यांना इस्त्री करण्याची) टपरी आहे. ती चालवणारे सुखदेव कदम हे धोबी समाजाचे आहेत. त्यांच्या मूळ गावातून ते इथे आले तेव्हा रुग्णालयातच काम करीत होते. पण युनियनबाजीमध्ये नोकरी गेली असे ते सांगतात. मतिमंद पत्नीला घेऊन कसाबसा संसार रेटत आहेत. मोठी मुलगी हुशार आहे. तिला सिकंदराबादच्या नर्सिंग कॉलेजला टाकले आहे. तिची फी भरायला आम्ही मदत करतो. धाकट्या मुलाला दुसऱ्या गावच्या शाळेत घातले आहे. “त्याचे अभ्यासात लक्ष नाही. कबड्डी चांगला खेळतो. शाळेतल्या मास्तरांनी मला कबूल केले आहे की आम्ही त्याला बारावी पास करून देऊ म्हणून.” ते म्हणाले. त्यासाठी किती किंमत मोजावी लागली ते मी त्यांना विचारले नाही.
गाडी दुरुस्तीचे दुकान, ऑटोरिक्षा चालविणे, कच्च्या चिवड्याची किंवा वड्याची गाडी चालविणे हे इतर काही उद्योग आहेत. पण आता दुर्दैवाने त्यांच्यावरही संक्रांत आली आहे. ‘वर्धा फॉर टुमारो’ म्हणून एक सरकारी योजना आहे. तिच्यामधून वर्धा, सेवाग्राम आणि पवनार ह्या तीन गावांचे पुनर्निर्माण व सौंदर्यीकरण केले जाणार आहे. जागोजागी जुने काही पाडून नवे बांधणे सुरू आहे. रस्ते तर सगळीकडेच अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहेत.  पुतळे, म्यूरल्स उभारले जात आहेत. सेवाग्राम रुग्णालयाकडून येणारा रस्ता जिथे उजवीकडे वळतो, त्या मोठ्या नाक्याचा तर पूर्ण कायापालटच केला जात आहे. तेथली सगळी दुकाने हटवण्यात आली आहेत. प्रशस्त दगडी भिंती उभारण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर गांधीजींच्या जीवनातील प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. आमच्या ह्या बेकसूर मुलांच्या आईबापांची दुकाने, ठेले, टपऱ्या मात्र ह्याच्यात नष्ट झाली आहेत. चित्रातल्या महामानवाने ज्यांच्यासाठी आयुष्य वेचले, तो गरीब-मजूर माणूस ह्या ‘सुंदर’ गावामधून बेदखल केला जात आहे. कुठे जावे त्यांनी? कुणाकडे दाद मागावी?  दोन धंद्यांना मात्र मरण नाही. खर्रा विकणे व दारू विकणे. त्यामुळे आज जास्तीत-जास्त बेरोजगार युवक ह्याकडे वळताना दिसत आहेत. अर्थात, त्याचे परिणाम जे व्हायचे, तेच होतात.  अनेकदा तर, आमच्या वर्गात येणाऱ्या मोठ्या मुलांच्या अंगाला सिगारेटचा वास येतो. कधीकधी दारूचाही येतो. एवढे सगळे होऊन मुले वर्गात यायचे अजिबात चुकवत नाहीत, हेही तेवढेच खरे.
मुलांना आपण वाईट आयुष्य जगतो आहोत, हे कळत नाही का? तर कळते. इतकेच नाही, तर चांगले आयुष्य जगावे अशी त्यांची इच्छाही असते. पण चांगले म्हणजे काय? (आपल्याशी वाईट वागणाऱ्या) जगाशी चांगले वागायचे म्हणजे नक्की कसे वागायचे? चांगला अभ्यास करायचा म्हणजे नक्की कसा? वर्गात लक्ष द्यायचे म्हणजे कसे? मुलींना पाहून शिट्टी नाही वाजवायची, शेरेबाजी नाही करायची तर त्या मुलींचे करायचे तरी काय? ह्याची त्यांना खरोखर कल्पना नसते. आणि जरी अशी काही कल्पना असली, तरी तसे करणे-बोलणे-वागणे म्हणजे अतिशय कठीण आहे, आपल्याला जमण्यासारखे नाही. ‘अपने बसकी बात नहीं,’ असेच त्यांना वाटते. बरं जर आपण ते करायला गेलो, आणि आपल्याला जमले नाही तर? आपली फजिती नाही का होणार? किंवा हे जे सगळे ‘व्हाइट कॉलर’ लोक आहेत, त्यांनी आपल्याला त्यांच्यात घेतले नाही तर मग कसे होणार? धोबी का कुत्ता, ना घर का, ना घाट का. आज आपले दारुडे मित्र तरी आपल्या अडीअडचणींना धावून येतात. त्यांना सोडले आणि ह्या शहरी, सुशिक्षित लोकांचे काय सांगावे बाप्पा! ते थोडेच आपल्यासाठी धावून येणार आहेत? असे सगळे त्यांना वाटत असले पाहिजे. त्यामुळे चांगल्या वाटेवरून चालण्यास ती कचरतात. म्हणून साधी राहणी, ठाम विचार, ठाम कृती, चिकाटी, सातत्य, वर्गावर पूर्ण नियंत्रण व त्याचवेळी त्यांच्यावर पूर्ण विश्वास आणि जिव्हाळा दाखवत हे काम करावे लागत आहे. त्यांना काय फायदा व्हायचा तो होवो, मला मात्र जाणवते, की मी आता पूर्वीपेक्षा शांत, समाधानी व क्षमाशील झाले आहे. मी मुलांवर केले त्यापेक्षा त्यांनीच माझ्यावर अधिक प्रेम केले म्हणूनच हे शक्य झाले.
अभ्यासवर्ग आणि परीक्षा
असेच दिवस जात होते. फेब्रुवारी (२०२०) महिन्यात वर्गातील मोठी मुले म्हणाली, “आक्का, आमचा वर्ग वेगळा घ्या. आमच्या परीक्षा जवळ आल्यात. आमचा अभ्यास घेत जा.” मग आम्ही दोघांनी त्यावर विचार केला. नववी व दहावीच्या मुलांचा वर्ग वेगळा घ्यायचा. त्यांचा अभ्यास घ्यायचा व त्यात विज्ञान- गणित रवींद्रने शिकवायचे असे ठरले. दुसऱ्या दिवशी मी मुलांना म्हटले, “आम्ही वेगळा वर्ग तर घ्यायला तयार आहोत. पण हा ट्युशनचा नाही हे लक्षात ठेवा. ट्युशनमध्ये आईबापांनी फी भरली की तुमचे काम झाले. मग तुम्ही शिका किंवा शिकू नका. शिक्षक तुम्हांला काही म्हणणार नाहीत. पण आपले असे नाही. आपण फी घेत नाही. तेव्हा जर तुम्हांला मनापासून शिकायचे असेल, तरच आम्ही वेळ देऊन तुमचा मोठ्यांचा वर्ग घेऊ, हे लक्षात ठेवा.” मुलांनी मान्य केले. मग सायंकाळी ६ ते ७ लहान मुलांचा वर्ग, ७ ते ८ जेवणाची सुटी आणि रात्री ८ ते ९ मोठ्या मुलांचा वर्ग घेऊ लागलो. लहान मुलांसाठी कधी खेळ, कधी चित्र काढणे, तर कधी नाटक. एकदा रविवारीही मुले आली आणि त्यांचे अंगणातले खेळ आणि नाच घेतला. मोठ्या मुलांचा मात्र अभ्यास. त्यांना मी परोपरीने सांगायचे, की लवकर जेवून येत जा. पण मुलांना सायंकाळी घरी जायलाच नको असायचे. रात्री कुठेही जाता येईनासे झाले, की मग कुठे ती घरी जाणार. मी रोज विचारायचे, “जेवून आलात काय?” तर ती “होय” म्हणायची. इकडे दिवसभर उनाडक्या करून सायंकाळी त्यांच्या डोळ्यांवर पेंग आल्याचे मला स्पष्ट दिसायचे. एकदा एका मुलाने मात्र खरे-खरे सांगितले, की तो रात्री ११ पूर्वी कधीच जेवत नाही. मुलांचे काही असो, त्या निमित्ताने आमच्या घराला शिस्त लागली, रात्री ८ च्या आधी जेवायची, आणि तिचा मात्र आम्हांला खूप फायदा झाला.
असे करून मुलांच्या परीक्षा एकदाच्या  पार पडल्या. ह्या वर्षी बारावीची परीक्षा झाली. दहावीची संपत आली होती. एकच पेपर राहिला होता, तेव्हाच कोरोनाची साथ आली आणि सर्वांना घरात बंद व्हावे लागले. पण गंमत म्हणजे, दहावीची परीक्षा सुरू असतानाही आमचा वर्ग सुरू होता. सगळे यायचे. तोपर्यंत कोण किती पाण्यात आहेत हे माझ्या लक्षात आलेच होते. त्यामुळे मी ठरवले, की आता पहिल्यापासून शिकवायचे. मग मार्च महिन्यात अ आ इ ई शिकवायला सुरुवात झाली. तेव्हा मुले खूप चांगले लक्ष देऊ लागली. ह्याशिवाय कधी झालेल्या पेपरवर चर्चा, तर कधी दुसऱ्या दिवशीच्या शंका असेही चालत असे. माझ्या लक्षात आले होते की, पेपर सोडवून बघताना मुले उत्तरे तर बरोबर सांगतात, पण त्यामागचे कारण त्यांना माहीत नसते. एकदा असेच झाले इतिहासाच्या पेपरबद्दल. मी खोदून-खोदून विचारल्यावर एका हुशार मुलानेच सांगितले की, ते कॉपी करतात. त्याने वर्गात चिठ्ठी कशी येते, मग सर्वजण ती चिठ्ठी पाहून कसे लिहितात वगैरे सर्व ‘सिस्टिम’ समजावून दिली. मी म्हटले, “अरे, अशी कॉपी करून तुम्ही ह्या परीक्षेत तर पास व्हाल, पण पुढे आयुष्यात ज्या परीक्षा येणार आहेत, तेथे तुम्ही कसे बरे पास होणार?” ...ह्या टप्प्यावर मुलांना काहीतरी जाणवू लागले होते, की आपल्याला पहिल्यापासून चांगले शिकावे लागेल. त्याचबरोबर आणखीही एक प्रयोग तेव्हाच सुरू केला. अभिनवला अ आ इ ई शिकवायला सांगितले. त्याने फळ्यावर लिहून द्यायचे, शिकवायचे. वर्गावर नियंत्रण मात्र मी ठेवायचे. सौरभने रोज हजेरी घ्यायची आणि तिसरा मोठा मुलगा शिवान ह्याने मुलांनी आपल्या चपला रांगेत ठेवल्या आहेत का ते पाहायचे आणि वर्गाच्या सुरुवातीचे दोन मिनिटांचे ध्यानही त्याने घ्यायचे. शिवान एकदम मोठ्याने बोलून मुलांना सूचना देऊ लागला. “जे कोणी रांगेत ठेवणार नाहीत, त्यांच्या चपला मी उचलून फेकून देईन.” मग त्याला समजावून सांगितले, असे नाही म्हणायचे. लहान मुलांना प्रेमाने शिकवावे लागेल. त्यांनी नाही ठेवल्या तर तुला त्यांच्या चपला रांगेत ठेवाव्या लागतील, निदान त्यांना सवय लागेपर्यंत तरी. एवढे सांगितल्यावर मात्र तो समजला आणि तसे करूही लागला. अशा रीतीने तीन मोठ्या मुलांना कामाला लावल्यावर किंवा असे म्हणूया की त्यांना मोठेपणाची काही जबाबदारी दिल्यावर वर्ग बराच शांत झाला.
त्यानंतर पाठोपाठ कोरोना  आला आणि आम्हांला आमचा वर्ग बंद करावा लागला... कितीही सांगितले तरी मुले अधूनमधून येऊन विचारीत आहेत. लवकर क्लास सुरू करा म्हणत आहेत. “आम्हांला घरी गमत नाही नं जी...” असेही म्हणत आहेत; पण सध्या तरी काही उपाय नाही. सर्वांनी घरातच दडून बसायचे आहे...
(समाप्त)
अनुराधा मोहनी
संपर्क : ९८८१४४२४४८, [email protected]
​(लेखिक भाषा संचालनालयाच्या माजी साहाय्यक संचालक आहेत.)

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी अभ्यास केंद्र , अनुराधा मोहनी ,
भाषा

प्रतिक्रिया

  1. Ashwini Gore

      5 महिन्यांपूर्वी

    उत्तम काम करीत आहात !!

  2. Sudam Kumbhar

      5 महिन्यांपूर्वी

    अनुराधा मॅडम, तुमच्या कार्याला सलाम !!🙏 शिक्षिका व समुपदेशक याचं एक उत्कृष्ट उदाहरण. प्रत्येक वेळी कडक शिस्तीचे पालन व धाक दाखवूनच मूल शिकतं असं नाही. येथून पुढे जेव्हा केव्हा शाळा सुरू होतील त्यावेळी प्रत्येक शाळेमध्ये असाच शिक्षक असणे अनिवार्य आहे.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen