अमेरिकेतील शालेय शिक्षण : शिक्षकांची कार्यपद्धती (भाग – ३)


अमेरिकन शिक्षणात नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. असे प्रयोग करताना वेगवेगळ्या सिद्धांतांचा उपयोग केला जातो. प्रा. हॉवर्ड गार्डनर यांची ‘मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी’ अमेरिकेत खूप चर्चेत आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या क्षमता असतात. वर्ग अध्यापन करताना प्रत्येक मुलातील वेगवेगळ्या क्षमता ओळखून, त्यानुसार पाठनियोजन करून शिक्षक अध्यापन करतात.” – गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे यांचा अमेरिकेतील शालेय शिक्षणाची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या लेखमालेतील हा तिसरा लेख.
अमेरिकेतील शिक्षकांना प्रत्येक पाच वर्षांनतर त्यांचे शिक्षण परवान्याचे नूतनीकरण करावे लागते. याकरता विद्यापीठातून शिक्षकांना आपापल्या विषयात संशोधन करावे लागते. ज्या शिक्षकांना हे शक्य नाही, अशा शिक्षकांना विद्यापीठातून आपल्या विषयाशी संबंधित काही प्रशिक्षण घेणे बंधनकारक असते. शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी नियमित प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. यात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, या विषयीच्या प्रशिक्षणाचाही समावेश असतो. अमेरिकेतील शाळांचे व्यवस्थापन आणि शिक्षण विभाग शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाकरता सातत्याने प्रयत्न करतात. त्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा प्रशिक्षणात मुख्य भर हा कौशल्य विकसित करण्यावर दिला जातो. तिथल्या शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. मुख्यत: संगणक, कॅमेरा, स्कॅनर, डॉक्युमेंट कॅमेरा इत्यादी तंत्रज्ञानाच्या वापराबाबतचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाते. अमेरिकेतील शाळांत शिकविणारे शिक्षक हे विद्यार्थ्यांप्रमाणे भिन्न भाषा बोलणारे असतात. अशा शिक्षकांना इंग्रजी भाषेचे प्रशिक्षण दिले जाते. या सर्व प्रशिक्षणाचा मूळ हेतू हा शाळांतील सर्व विषयांचे अध्यापन इंग्रजीतून शिकवणे सोपे आणि प्रभावी व्हावे हा असतो.
आपल्याकडे गुरूबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. त्याच पद्धतीने अमेरिकेत विद्यार्थी त्यांना त्यांच्या शिक्षकांबद्दल वाटणारा आदरभाव व्यक्त करण्यासाठी Teacher Appreciation Day साजरा करतात. या दिवशी मोठी मुले आपल्या शिक्षकांसाठी ब्रेकफास्ट अथवा लंचचे आयोजन करतात. आपल्या आवडत्या शिक्षकांना भेटकार्ड देतात. शिक्षकांप्रति भावना व्यक्त करण्यासाठी ते पोस्टर्स तयार करतात.
अमेरिकन विद्यार्थी टेक्नोसॅव्ही आहेत, त्यामुळे ते जेव्हा स्वत: अथवा गटाने प्रेझेन्टेशन करतात तेव्हा तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. बहुतेक वेळेला पॉवरपॉइंट प्रेझेन्टेशन केले जाते. वर्गात शिक्षक शिकवत असताना विद्यार्थी सतत प्रश्न विचारत असतात. विद्यार्थी आणि शिक्षक यांत सतत संवाद असतो. वर्गात कुठेही गडबड अथवा गोंधळ असे चित्र दिसत नाही.
अमेरिकन शिक्षणात नेहमीच वेगवेगळे प्रयोग केले जातात. असे प्रयोग करताना वेगवेगळ्या सिद्धांतांचा उपयोग केला जातो. प्रा. हॉवर्ड गार्डनर यांची ‘मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी’ अमेरिकेत खूप चर्चेत आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळ्या क्षमता असतात. वर्ग अध्यापन करताना प्रत्येक मुलातील वेगवेगळ्या क्षमता ओळखून, त्यानुसार पाठनियोजन करून शिक्षक अध्यापन करत असल्याचे आम्हांला आढळून आले. या सिद्धांताचा उपयोग अध्यापनात केल्याने अमेरिकेतील विद्यार्थ्यांच्या गुणात्मकतेत वाढ झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.


सर्व मुले शिक्षणप्रवाहात समाविष्ट व्हावीत, यासाठी अमेरिकेचे सरकार प्रयत्नशील असते. आपल्या पाल्याला शाळेत पाठवणे पालकांना बंधनकारक आहे. पालक आपल्या मुलांना शाळेत शिकायला पाठवत नसतील तर अशा पालकांवर कायदेशीर कारवाई केली जाते. तशी तरतूद कायद्यात आहे. शाळा दूर असेल तर पालकांना शाळेला तसे कळवावे लागते. अशा मुलांची ने-आण करणे शाळांना बंधनकारक आहे. बहुतेक शाळांत विषयांच्या तासिका या एकाच वेळेत सुरू असतात. उदाहरण द्यायचे झाल्यास, इयत्ता नववीतील सर्व तुकडय़ांत एकाच विषयाचे आणि एकाच पाठाचे अध्यापन एका वेळेला सुरू असते. त्यामुळे सर्व वर्गाचा अभ्यास सारखाच सुरू असतो. एखाद्या वर्गाचा अभ्यास पुढे आणि एखाद्या वर्गाचा अभ्यास मागे असे चित्र दिसत नाही.
शिक्षक एकटय़ाने अथवा स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी गटा-गटाने काम करणे अधिक पसंत करतात. कोणत्याही प्रकारचे नियोजन सर्वजण मिळून करतात. काही शाळांमध्ये आठवडय़ाच्या शेवटच्या दिवशी तासभर थांबून पुढच्या आठवडय़ात आपण कोणते घटक शिकवणार आहोत,  त्या विषयी चर्चा केली जाते. कधी-कधी शिक्षक एकमेकांच्या तासाला जाऊन पाठ पाहतात. त्यातून ते खूप काही शिकतात आणि समृद्ध होतात. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्यात आठवडय़ातून एकदा सभा होते. या सभेत अध्यापनविषयक बाबींवर मुख्यत: चर्चा होते.
अमेरिकन शाळांमध्ये मुख्याध्यापकपद हे सेवाज्येष्ठतेनुसार मिळत नाही, तर त्यासाठी किमान तीन ते पाच वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असावा लागतो. प्रशासकीय बाबी हाताळण्याचे ज्ञान असावे लागते. त्यांना पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि व्यवस्थापन यांच्याशी उत्तम संवाद साधता यावा लागतो. वर्गात शिकवणे मुख्याध्यापकांना बंधनकारक नाही. काही कारणास्तव शिक्षक वर्गावर आले नाहीत तर मुख्याध्यापक वर्गावर जाऊन शिकवतात. शालेय शिस्त आणि अन्य काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी प्रिन्सिपलच्या जोडीला पर्यवेक्षक असतात. ते फक्त शाळेतील कामाची देखरेख करतात.
पालक आणि शिक्षक यांच्यातील संबंध मोकळेपणाचे असल्याचे शाळांच्या भेटीदरम्यान जाणवले. मुलांच्या प्रगतीत पालकांच्या मदतीची गरज शाळांना भासल्यास शाळा अशा पालकांचे सहकार्य घेतात. वर्ग अध्यापन पाहण्याची इच्छा पालकांनी व्यक्त केल्यास मुख्याध्यापकांच्या परवानगीने पालक आपल्या पाल्याच्या वर्गात बसू शकतात किंवा शाळेचे कामकाज पाहू शकतात. अभ्यासात मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शनाची सोय सर्वच शाळांमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी वेळापत्रकात शेवटची तासिका राखून ठेवलेली असते. हे मार्गदर्शन मुख्यत: विषय शिक्षक करतात. याशिवाय, शाळेतील वरिष्ठ विद्यार्थ्यांचीही मदत घेतली जाते. पालकांनी आपल्या पाल्यांसाठी अशा प्रकारच्या विशेष मार्गदर्शनाची मागणी केल्यास, ती मागणी शाळांकडून पूर्ण केली जाते.
सॅक्रमॅन्टो शहरातील एका शाळेतील मुख्याध्यापकांनी त्यांच्या सर्व शिक्षकांचे दूरध्वनी क्रमांक पालकांना दिले होते. या पालकांना एका विशिष्ट वेळेत आपल्या पाल्याच्या प्रगतीसंदर्भात शिक्षकांशी संपर्क साधायला परवानगी होती. शिक्षकांकडेही पालकांचे दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल असतात. त्यामुळे तेसुद्धा पालकांबरोबर संपर्क साधू शकत होते. वर्षभरात किमान दोनदा पालक सभांचे आयोजन केले जाते. पालकांनी विशेष सभेची मागणी केल्यास शाळा पालकसभांचे आयोजन करतात.
(क्रमश:)
मच्छिंद्र बोऱ्हाडे
(लेखक गोरेगांव, मुंबई याथील नंदादीप विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत)
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


शालेय शिक्षण , प्रयोगशील शिक्षण , मच्छिंद्र बोऱ्हाडे , अमेरिकेतील शिक्षण , नंदादीप विद्यालय , मराठी अभ्यास केंद्र
शिक्षण

प्रतिक्रिया

  1. NISHA Kajave

      3 वर्षांपूर्वी

    अतिशय उपयुक्त लेख . आणखी सखोल माहितीचे लेख वाचण्यास आवडतील



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen