“१५ ते १८ या वयोगटातील मुले हळूहळू पौंगडावस्थेत जाण्याच्या काळात असतात. त्यांच्यात शारीरिक, मानसिक व सामाजिक बदलांना सामोरे जाण्याची तयारी याच काळात होणार असते. स्वत:ला अधिकाधिक विचार प्रवृत्त करण्याचा हा काळ असतो. कोणतीही समस्या समजून घेण्याचा हा टप्पा आहे. त्या-त्या प्रश्नांची उकल कशी करता येईल, यावर विचार करण्याचाही हाच काळ आहे. एवढेच नव्हे, तर आकलन, उपयोजन, तसेच कौशल्ये शिकण्याचा हा काळ भावी आयुष्याची पायाभरणी करू शकतो.” शिक्षण – अभ्यासक प्रा. विद्याधर अमृते यांचा उच्च माध्यमिक शिक्षणावरील लेख.
नवीन शैक्षणिक धोरणातील उच्च माध्यमिक शिक्षणाचा चौथा टप्पा इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावी असा एकत्रितपणे करण्यात आलेला आहे. हा टप्पा चार इयत्तांचा असून अतिशय महत्त्वाचा व कसोटीचा आहे. यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे एस.एस.सीची परीक्षा रद्द होऊन एच.एच.सी हीच एक सर्वांना समान परीक्षा असेल. या टप्प्यात, वय १५ ते १८ या वयोगटातील मुले हळूहळू पौंगडावस्थेत जाण्याच्या काळात असतात. त्यांच्यात शारीरिक, मानसिक व सामाजिक बदलांना सामोरे जाण्याची तयारी याच काळात होणार असते. स्वत:ला अधिकाधिक विचार प्रवृत्त करण्याचा हा काळ असतो. कोणतीही समस्या समजून घेण्याचा हा टप्पा आहे. त्या-त्या प्रश्नांची उकल कशी करता येईल, यावर विचार करण्याचाही हाच काळ आहे. एवढेच नव्हे, तर आकलन, उपयोजन, तसेच कौशल्ये शिकण्याचा (थोडा उच्च स्तरावरील) हा काळ भावी आयुष्याची पायाभरणी करू शकतो.
याच काळात विद्यार्थ्यांच्या जीवनात अनेकानेक छंद जोपासण्यासाठी उत्तेजन देणे, त्यास रोजच्या जीवनात जास्तीत-जास्त स्वावलंबी होण्यास प्रवृत्त करणे, प्रथा-रुढी-परंपरा यांचे ज्ञान व त्याबद्दलची चिकित्साही विशेषत: अकरावी-बारावीच्या वर्षांमध्ये आवश्यक आहे. इयत्ता बारावीनंतर जरी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी गेला नाही किंवा जाऊ शकला नाही, तरीही त्याचा चरितार्थ चालेल असे ज्ञान, विज्ञान, कला, कौशल्य त्याने हस्तगत केलेले असेल, असा अभ्यासक्रम तयार करावा लागेल. केवळ बौद्धिक-पुस्तकी नको किंवा केवळ व्यावसायिक नको, तर या दोन्ही बाबींची सांगड घालणारा अभ्यासक्रम करणे, तसेच त्यासाठीचे योग्य ते तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे, ही उद्दिष्टे या टप्प्यावर महत्त्वाची ठरतात.
वर उल्लेख केलेल्या विविध अपेक्षांसाठी दैनंदिन जीवनातील काही उदाहरणे देता येतील.
१. ‘मृदा’ या संज्ञेचा अर्थ, प्रकार, गुणधर्म, पसारा इत्यादीचे केवळ पुस्तकी ज्ञान न देता; प्रत्यक्ष शेतात नेऊन मातीचा रंग, पोत, जलधारण क्षमता, पिकांचा सहसंबंध इ. दाखविणे योग्य होईल.
२. नैसर्गिक वनस्पतींचा अभ्यास केवळ भूगोल व वनस्पती शास्त्रांतील प्रचलित पद्धतीप्रमाणे न करता; प्रत्यक्ष लाकडांचे प्रकार (कठीण/मऊ) रंग, बांधकाम, सुतारकामाच्या दृष्टीने त्यांची उपयोगिता, औषधी गुणधर्म इत्यादी अंगाने अभ्यासक्रम तयार करावा लागेल. (मी माझ्या मुलीसाठी तीन प्रकारच्या पेट्या बनवून दिल्या होत्या. कंपासपेटी बरोबरच खडक पेटी, काष्ट पेटी, स्टेनसिल्सची पेटी)
३. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यास टूल बॉक्स देऊन ती हाताळण्याचे प्रशिक्षण द्यावे. तीच गोष्ट विद्युत साधनांसाठी लागू होईल.
४. खरे म्हणजे इयत्ता बारावीपर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याने नेमकी कोणती कौशल्ये व ज्ञान हस्तगत केले पाहिजे, याची सर्वमान्य यादी करता येईल. उदा. सायकल चालविणे, पोहणे, योग व आसने, ठरावीक खेळ (मैदानी व बैठे), चित्रकला (कमीत कमी दुसरी परीक्षा), हिंदी, संस्कृत, गणित, भूगोल, विज्ञान, इंग्रजी, यांच्या विशेष परीक्षा (खाजगी), या सर्वांना जेवढे प्रोत्साहन द्याल तेवढे थोडेच!
५. संगणकीय ज्ञान आवश्यकच! पण फक्त तेवढेच नको, याचेही भान ठेवले पाहिजे.
६. कमीत-कमी दहा घटकांची तपशिलात ओळख व्हायला हवी. पक्षी, प्राणी, झाडे (फूल व फळ), भाज्या, कडधान्ये, खडक, खनिजे, ग्रह-तारे इ.
७. या टप्प्यात मुलांना क्षेत्रभेटीसाठी घेऊन जावे. या क्षत्रभेटीही तीन प्रकारच्या असाव्यात याकडे लक्ष दिले पाहिजे. उदा.
अ. किल्ले, डोंगरी गड, मैदानी किल्ले, सागरी दुर्ग.
आ. वस्तुसंग्रहालयास भेटी, तारांगण भेट (दुर्बिणीद्वारे), बंदर भेट, आठवडी बाजार/कृषी उत्पन्न बाजार समिती/ मासळी बाजार किंवा मासेमारी.
इ. व्यक्ती आणि मानवी वस्त्यांना भेटी : शेतकऱ्याशी शेतात जाऊन संवाद (उत्पन्न, खर्च व नफा यांच्या गणितासाठीही उपयुक्त), बारा बलुतेदारांची कामे/वैशिष्ट्ये, भटक्या जमाती–तांड्याबरोबर सहल.
याशिवाय, या टप्प्यांतील विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाक घर, भोजन बनविणे व वैज्ञानिक संकल्पना यांची सांगड घालता येईल. शाळेतील आणि गावातील प्रत्येक ग्रंथालय हे केवळ पुस्तक संग्रहाची खोली न होता खऱ्या अर्थाने वाचनालय व्हावे, यादृष्टीने वाचनाच्या सवयी, महत्त्व मुलांच्या मनावर बिंबवता येईल. वाचन, लेखन, मनन, चिंतन, नकाशा वाचन, व्यंगचित्र वाचन, छायाचित्र वाचन, गायन, वादन, शिल्पकला, चित्रकला, घडी शिल्प, सजावट, इ. विविध कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करता येतील.
कार्यक्रम व्यवस्थापन शिकवताना सजावट, इतर तयारी, सभाशास्त्र यांची माहिती देता येईल. सहल-आयोजन कसे करायचे हेही एक कौशल्य सहज शिकवण्यासारखे आहे. इत्यादी सारख्या विविध जीवनोपयोगी कला व कौशल्ये प्राप्त केल्यास, पुढील आयुष्यासाठी विद्यार्थी आत्मविश्वासाने जीवनास सामोरे जाईल याची खात्री वाटते.
(विशेष नोंद – नवीन शैक्षणिक धोरणांची ही लेख मालिका या लेखासोबत समाप्त होते आहे. आपण सगळे जाणताच की, सदर शैक्षणिक धोरणाबद्दलची माहिती दोन टप्प्यांत उपलब्ध झाली, त्यात शैक्षणिक टप्प्यांच्या नावांच्या बाबतीत काही बदल झाले. ते लक्षात घेऊनच वाचकांनी सदर लेख वाचले व समजून घेतले याबद्दल आभार! हा सर्व टप्प्यांचा बदल व आकडेमोड यांची क्लिष्टता हा आकृतिबंध अमलात आणताना लक्षात येईल, तेव्हा बराच गोंधळ उडणार आहे, हे मी आजच नमूद करतो. शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीकडे लक्ष न देता आकृतिबंधावर जास्त लक्ष दिल्यामुळे प्रशासकीय समस्या वाढणार आहेत. त्यावर आधीपासूनच विचार करून पुढची पावले टाकावी लागणार आहेत. इतर राज्यांपेक्षा आपल्या महाराष्ट्रात हा प्रश्न अधिक जटिल होणार आहे, कारण आपण इ. अकरावी व बारावीचे वर्ग वरिष्ठ महाविद्यालये आणि शाळा अशा दोन्ही ठिकाणी चालू ठेवले. खरे तर ते पूर्णपणे शाळांनाच जोडायला हवे होते.)
विद्याधर अमृते
(लेखक भूगोल विषयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)
संपर्क - ९६१९६७९५७०...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
उच्च माध्यमिक शिक्षण
, शालेय अभ्यासक्रम
, प्रा. विद्याधर अमृते
, मराठी अभ्यास केंद्र
शिक्षण
Sudam Kumbhar
4 वर्षांपूर्वीउपयोजना वर आधारित शिक्षण पद्धती वर आपण खूपच चांगला प्रकाश टाकलेला आहे. थोडक्यात शिक्षणातील ' प्रत्यक्ष अनुभव ' ही संकल्पना राबवण्यावर प्रस्तुत लेखात आपण जो विचार मांडलेला आहे तो स्वागतार्ह आहे. धन्यवाद.