ग्रंथालय संचालनालय : मराठी भाषेचा प्रचार व प्रसार (भाग ३)


ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध भागात वाचनप्रेमींसाठी नवनवीन उपक्रम आखले जातात.  मराठीला अनेकानेक ग्रंथांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. तो वारसा वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांबद्दल सांगतायत महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या प्रभारी संचालक शालिनी इंगोले -
मराठी भाषेचा प्रचार  प्रसार करण्याकरिता ग्रंथालय संचालनालयाची भूमिका:-
मराठी भाषेला हजारो वर्षांचा श्रीमंत इतिहास आहे. मराठी भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री’ या बोलीभाषेपासून झाला. ही भाषा सर्व प्रथम सातवाहन या साम्राज्याच्या प्रशासनात उपयोगात होती. तिची यादवकाळामध्ये मोठ्या प्रमाणावर भरभराट झाली. विवेकसिंधू हा ग्रंथ लिहून मुकूंदराज हे मराठीतील पहिले कवी ठरले. पुढे ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ लिहून मराठी भाषेला दर्जेदार साहित्य दिले.
समस्त प्राणीमित्रांच्या कल्याणासाठी जे ‘पसायपान’ मागितले ते मराठीतच लिहिलं आहे, याचा प्रत्येक मराठी भाषकाला अभिमान आहे. नंतर बहामणी काळात संत एकनाथांनी मराठी भाषेत भारुडे लिहिली. तसेच इतर महान संतानी ओव्या, भजने आणि कीर्तने लिहिली. अशाप्रकारे मराठी भाषेत संत साहित्य रुजत असताना, छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या काळात संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मराठीत ४१४१ अभंग लिहून मराठी भाषेला धन्य केले. या दरम्यान, समर्थ रामदास स्वामींच्या हातून दासबोधसारख्या महान ग्रंथाची निर्मिती झाली.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळक, महात्मा फुले, सानेगुरुजी, स्वातंत्र्यवीर सावरकर, इत्यादी स्वातंत्र्यसेनानी; तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळे ग्रंथ, लेख आणि पुस्तके लिहिली, यामुळे स्वातंत्र्य लढ्याला आणि लोकांच्या विचारसरणीला योग्य दिशा मिळाली.
रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनी तुझ्या प्रेषिता, अजुनि शब्दांचे।।
अशा ओळीत जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करणारे कवी कुसुमाग्रज हेपण याच काळातले. या शतकामधे वेगवेगळे मराठी लेखक, कवी, वक्ते महाराष्ट्राला लाभले.
मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात
आता व्हतं भुईवर गेलं गेलं आभायात
असे व्यवहारिक तत्त्वज्ञान शिकवणारी कवयित्री बहिणाबाई चौधरींचे साहित्य आजही जनमानसात रुजलेले आहे. सुवर्णकाळाचे नाटय शिल्पकार राम गणेश गडकरी यांचे भावबंधन, एकच प्याला, पुण्यप्रभाव, राजसंन्यास ही नाटके रंगभूमीवर नव्याने येऊन पुन्हा-पुन्हा आजही वाचली जात आहेत. व्यास, वाल्मिकी, कालिदास, मोरोपंत व केशवसुत यांचे काव्य अजरामर आहे. निबंध हा लेखनप्रकार जाणीवपूर्वक रुजवणारे ना.सी. फडके यांच्या कांदबऱ्या आजही वाचल्या जातात. आचार्य अत्रे, चि. वि. जोशी आणि पु. ल. देशपांडे यांनी मराठी माणसाचे खडतर जीवन आपल्या विनोदी साहित्याने सुसह्य केले आहे.
दलित साहित्याचे मार्गदर्शक अण्णाभाऊ साठे, गूढ साहित्ययात्री जी. ए. कुलकर्णी, प्रतिभावान लेखक शं. ना. नवरे, ‘स्वामी’ कादंबरीचे लेखक रणजित देसाई यांच्या साहित्याला आजही मागणी आहे. ‘गीत रामायण’सारखे महाकाव्य लिहिणारे, आधुनिक वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध ग. दि. माडगूळकर आणि “सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत” असा प्रश्न विचारून विचार करायला लावणारे, मुलांसाठी बोलगाणी लिहिणारे मंगेश पाडगावकर यांचं साहित्यही अजरामर आहे.
वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे या ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांनी मराठी भाषेला जगात मान्यता मिळवून दिलेली आहे, त्यांचे साहित्य वंदनीय आहे.
जागतिक कीर्तींची व्यक्तीमत्त्वे; जशी, शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर, तसेच खेळाडू सचिन तेंडूलकर, कला क्षेत्रातील लता मंगेशकर, व्ही. शांताराम, उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर, विठ्ठल कामत इत्यादी महान व्यक्तिमत्त्वांची चरित्रे आजही प्रेरणादायी आहेत.
मध्यमवरर्गियांचे साहित्यिक व.पु.काळे, शब्दस्वर प्रभु सुधीर मोघे, ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत, तसेच द. मा. मिरासदार, नामदेव ढसाळ, ‘पानिपत’कार विश्वास पाटील, अशा अनेक दिग्गज साहित्यिकांनी लिहिलेले साहित्य आपल्याजवळ घेऊन, मराठी भाषा एखादया खजिन्यासारखी उभी आहे.
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या ग्रंथालय संचालनालयांतर्गत असलेली महाराष्ट्रातील शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये मराठी भाषेतील साहित्याचा हा खजिना, सर्व वयोगटांतील, स्तरांतील वाचकांना देण्यासाठी सदैव तत्पर आहेत. तसेच हा खजिना पुढील पिढीसाठी जतन व संवर्धन करण्याचे मोलाचे काम संचालनालयामार्फत केले जाते.
सार्वजनिक ग्रंथालयांच्या या साहित्य खजिन्यात अगदी प्राचीन, मध्य आणि आधुनिक युगातील सर्व प्रकारच्या साहित्यांचा समावेश आहे. कथा, कादंबऱ्या, काव्य, चरित्रग्रंथ, विविध संदर्भग्रंथ, ज्ञानकोश, शैक्षणिक ग्रंथ, संशोधनात्मक ग्रंथ, वृत्तपत्रे, नियतकालिके, असे पारंपारिक साहित्येतर ग्रंथही यामध्ये आहेत. तसेच, डिजिटल माध्यमाद्वारे, इंटरनेटद्वारे वाचनीय साहित्याचादेखील समावेश आता होतो आहे.
आज मराठीतील साहित्य हे गावपातळीवरून पुढे येताना दिसत आहे. मराठी भाषा व साहित्य मूठभरांची मक्तेदारी राहिलेली नाही. धर्म, जात, प्रदेश, आर्थिक स्तर यांच्या चौकटी ओलांडून साहित्य निर्माण होताना दिसत आहे. मराठी साहित्य पुस्तकांच्या माध्यमातूनच पुढे आले पाहिजे ही अनिवार्यता देखील आता रााहिलेली नाही. समाजमाध्यमे इतकी प्रभावी आणि संवेदनशील झाली आहेत, की आता बरेच नवे लेखक ब्लॉग, फेसबूक या नव्या माध्यमांतून आपले लेखन एका क्षणात लाखो वाचकांपर्यत पोहोचवत आहेत आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियासुद्धा अगदी तातडीने येऊ लागली आहे. म्हणजेच लेखन, त्याचा प्रचार-प्रसार आणि त्यांचे समीक्षण या तीनही बाबी अत्यंत गतिमान झाल्या आहेत. सर्वात आनंदाची बाब म्हणजे तरुणाईचा सहभाग लक्षवेधी प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नव्या पिढीकरता समाजमाध्यम या नव्या व्यासपीठाचा उपयोग करण्यासाठी, मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी ग्रंथालय संचालनालय पुढे सरसावले आहे. या व्यतिरिक्त विविध उपक्रम राबवून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करीत आहे.
मराठी भाषकांचे राज्य म्हणून महाराष्ट्राची एक अनन्य ओळख आहे. मराठी भाषा केवळ महाराष्ट्राची भाषा नसून महाराष्ट्राची संस्कृती आहे. भाषा-संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि तिचा सन्मान करण्यासाठी राज्यशासनाने अनेक अभिनव, उपयुक्त उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे पुस्तकांचे गाव.
पुस्तकांचे गाव (भिल्लार:- महाबळेश्वर-पाचगणी या शहरांच्या मध्यात वसलेले, स्ट्रॉबेरीच्या विक्री-उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले, भिलार गाव आता भारतातील पहिले पुस्तकांचे गाव म्हणून नवी ओळख प्राप्त करीत आहे. इंग्लडमधील ‘हे ऑन वे’ या पुस्तकांच्या गावावरून तत्कालीन महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांना ही संकल्पना सुचली. भिलार गावामध्ये विविध घरे, लॉजेस, मंदिरे, शाळा या ठिकाणी विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या निमित्ताने घरांचे आणि पर्यायाने संपूर्ण गावाचे रूपांतर एका सुसज्ज ग्रंथालयात करण्यात आले आहे. आम्हा घरी धनशब्दांचीच रत्ने हे या उपक्रमाचे बोधवाक्य आहे. या स्वरूपाचा देशातील हा पहिलाच उपक्रम आहे. या उपक्रमाच्या निमित्ताने भित्तिचित्रे, शिल्पचित्रे यांच्या माध्यमांतून गावाचा कायापालट करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने या उपक्रमासाठी भक्कम पाठबळ दिले आहे. महाबळेश्वर-पाचगणी या पर्यटन स्थळांच्या जवळच विकसित करण्यात आलेल्या पुस्तकांच्या गावामुळे पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच, वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी देखील हातभार लागत आहे.
राज्यात मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर करण्याच्या दृष्टीने ग्रंथालय संचालनालय अनेक उपक्रम राबवित आहे. त्यापैकी काही उल्लेखनीय उपक्रम पुढीलप्रमाणे :
१. राष्ट्रीय ग्रंथसूची :- ग्रंथ प्रदान अधिनियम कायदा १९५४ (सुधारित १९५६) अन्वये राष्ट्रीय ग्रंथालय, कोलकता येथे सर्व मराठी भाषेतील प्रकाशित पुस्तकांची नोंद करण्यात येते. सदर नोंदींना राष्ट्रीय ग्रंथसूची असे म्हणतात. सदर राष्ट्रीय ग्रंथसूचीचे प्रकाशन ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, मुंबई येथून करण्यात येते.
२. ग्रंथोत्सव :- दिनांक १६ जुलै २०१६च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ३५ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांमार्फत वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी व ग्रंथांचा सर्वदूर प्रसार करण्यासाठी ‘ग्रंथोत्सव’ हा उपक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत यासाठी प्रकाशक व ग्रंथविक्रेता यांना ग्रंथविक्रीसाठी एकाच ठिकाण आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी; हा ‘ग्रंथोत्सव’ आयोजनाचा मुख्य उद्देश आहे.
३. वाचन प्रेरणा दिन :- माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने, दि. १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
४. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा :- मराठी भाषेचा प्रचार, प्रसार व संवर्धन व्हावे या हेतूने सन २०१३ पासून दरवर्षी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे.
५. मराठी भाषा गौरव दिन :- वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून, मराठी भाषेचा गौरव म्हणून दि. २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून ग्रंथालय संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये साजरा केला जातो.
६. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभाग :-  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषा व संस्कृती यांचा प्रचार व प्रसार, विकास व समृद्धी यांसाठी काम करणाऱ्या ग्रंथालयांना अर्थसाहाय्य देण्याबाबतची योजना ग्रंथालय संचालनालयामार्फत कार्यन्वित आहे.
७. फिरते ग्रंथालये :- ग्रंथालय संचालनालयामार्फत ‘पुणे-मुंबई-पुणे दक्खन राणी एक्सप्रेस’ आणि ‘मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस’ या रेल्वे गाडयांमध्ये फिरते ग्रंथालय सुरू करून, प्रवासादरम्यान प्रवाशांना वाचण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
८. बीकेसी कोवि केंद्राला ग्रंथ भेट :- महाराष्ट्रासह जगभर कोरोना नामक संकटाने प्रत्येक व्यक्ती त्रस्त आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून प्रायोगिक तत्त्वावर, मुंबई येथील बीकेसीस्थित कोरोना केंद्रातील रुग्णांसाठी, ग्रंथालय संचालनालयातील अधिकारी/कर्मचारी वर्गाने स्वंयप्रेरणेने जमा केलेल्या वर्गणीतून, मराठी भाषेतील दर्जेदार २०० ग्रंथ भेट स्वरूपात देण्याचा उपक्रम या वर्षापासून सुरू करण्यात आलेला आहे.
अशा प्रकारे महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालये इतिहास काळापासून पारंपारिक ते आधुनिक माध्यमांद्वारे, विविध उपक्रमांद्वारे मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करीत आहेत. या लेखमालिकेचा समारोप करताना, अजरामर मराठी अभिमान गीत लिहिणारे कवी सुरेश भट यांना वंदन करून संकल्प करू या की, मी रोज एक तरी मराठी पुस्तक वाचेन आणि म्हणेन,
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्मपंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी।।
(समाप्त)
शालिनी इंगोले
(लेखिका महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या प्रभारी संचालक आहेत)
​संपर्क : ८७७७९३७४८०७

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी साहित्य , महाराष्ट्र ग्रंथालय संचालनालय , शालिनी इंगोले , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen