“पाठयपुस्तकातील माहिती डोक्यात भरणे आणि ती परीक्षेत जशीच्या तशी लिहून काढणे, यालाच आपण शिक्षण समजत आलो आहोत. हा विचार सोडा अन् जरा वेगळ्या नजरेने शिक्षण प्रक्रियेकडे पाहा; अनेक नव्या दिशा दिसतील, नवे दरवाजे आणि खिडक्या उघड्या होतील. जरा डोकावून पाहाण्याची, उंबरठा ओलांडण्याची मात्र सवड, आवड आणि निवड हवी. शिक्षणविषयक सर्व प्रक्रियांकडे जर आपण वेगळ्या चष्म्यातून पाहायचे ठरवले तर अनेक पर्याय आपल्या नजरेत येतील; पण आपण पर्यायांचा विचारच करत नाही; ते स्वीकारायला आम्ही तयारच होत नाही. तेच ते, मागील पानावरून पुढे चालू, यातच आपल्याला धन्यता वाटते. या सर्व प्रक्रियेचा वेगळ्या नजरेने विचार केला तर आत्ताचे निम्मेअधिक प्रश्न निर्माणच होणार नाहीत.” महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासमंडळाचे (माध्यमिक) माजी संयोजक डॉ. उमेश प्रधान यांचा हा टाळेबंदीतील पर्यायी शिक्षणव्यवस्था कशी हवी हे सांगणारा हा लेख -
सध्याची न स्थिरावणारी सभोवतालची परिस्थिती आणि वातावरणातील अनिश्चितता ही सगळ्यांनाच विचारात पाडणारी, चक्रावून टाकणारी, संभ्रमात सोडणारी. सर्व काही मागील वर्षावरून पुढे चालू अशी आवस्था. तेच ते प्रश्न उत्तराची वाट पाहत. मागील वर्षाच्या अनुभवावरून आम्ही काही शिकलो का? नक्की काय करावे बरे? शिक्षण कसे चालू करावे? मुलांपर्यंत कसे पोहोचावे? ऑनलाइन शिकवावे की ऑफलाइन? त्यांचे मूल्यमापन कसे करावे? काही आदेश येईल का? कोणता? कधी? प्रश्न, प्रश्न आणि फक्त प्रश्नच. हा करुणामय समय कधी संपेल आणि कधी एकदा त्या जिवंत, रसरशीत वातावरणाला सुरुवात होईल, याचे उत्तर कोणाकडेही नाही. सर्वकाही अनुत्तरित. आपल्याला असे तर वाटत नाही ना, की जूनमध्ये सर्व परिस्थिती जैसे थे होईल; आणि मग शाळा काय अगदी वेळेवर सुरळीत सुरू होतील. असे जर धरून चालला असाल तर मात्र आपण दिवास्वप्नात दंग आहात, असेच म्हणावे लागेल. उघडा डोळे, भानावर या, आत्तापासूनच काहीतरी विचार करा. काय-काय करता येईल, जर हे असेच चालू राहिले तर. तसे आपण या आपत्तीत काय करायचे, हे मागील वर्षाच्या अनुभवावरून शिकलेलोच नाही, शिकल्याचे कुठे जाणवतदेखील नाही. मधल्या काळात आपण केले काय? मागील वर्षाच्या धक्क्यातून आपण अजूनही सावरत नाही अन् अजूनही त्या ब्रेकींग न्युज हैराण करतच आहेत.
आता विद्यार्थी व शिक्षक यांची हक्काची सुट्टी सुरू झाली आहे, जवळ-जवळ एक ते दीड महिन्यांची. या काळातच शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक हे पुढील वर्षासाठीचे नियोजन करून शिक्षणाची गाडी वेळेतच योग्य रुळावर आणू शकतील. पण, आपण जर थांबलो तर मात्र आपल्याबरोबर आपल्या मुलांचे भविष्यसुद्धा आपण अंधारात ढकलतो आहोत असा अर्थ होईल. आवश्यकता आहे दूरगामी विचारमंथन करण्याची. सकारात्मक आणि होकारात्मक विचारधारा प्रवाही करण्याची. यासाठी मागील वर्षाच्या अनुभवाचा आढावा घ्यावा लागेल, काही आडाखे बांधावे लागतील, अनेक अंगाने अभ्यास करावा लागेल. इच्छा असेल तर नक्की मार्ग निघेल.
जे-जे करता येईल, ते-ते करायला पाहिजे. काय करता येऊ शकते याविषयी प्रकट विचारमंथन करण्याची ही वेळ आहे. स्वस्थ बसून न राहता चिंतन, मनन करणे गरजेचे आहे; वेळ घालवून चालणार नाही. त्यासाठी आता वाट पाहण्याची गरज नाही, उशीर झालाच आहे, पण सुरुवात करायला काही हरकत नाही. याला कारण म्हणजे आपली आव्हाने मोठी आहेत. आपली वैविध्यता सर्वांना एकसमान आणण्यासाठी अडसर आहे. उपचारांची गोंधळात पाडणारी विविधता कृतीपासून वंचित ठेवणारी आहे. मी म्हणतो तेवढेच खरे अशी एकमेकांवर कुरघोडी करणारे, आहेरे आणि नाहीरे यांच्यातील उभी दरी, या सर्वांचा विचार करायला हवा. उपलब्ध स्रोतांवरून तर असेच जाणवते आहे की, अशा विचार करण्याच्या प्रवृत्तींचा दुष्काळच पडलेला आहे. तज्ज्ञांविषयी तर न बोललेच बरे! अशी अवस्था. अन्यथा, गेला बाजार असंख्य उपाययोजनांचा पाऊस पडला असता आणि त्यातील काहींची तरी निवड होऊन अमंलबजावणी झाली असती. आणि शिक्षणाचे ‘महाराष्ट्र मॉडेल’ उदयाला आले असते. असो!
परंपरावादी आपण
अनेक वेळा आपण पठडीमधून बाहेर यायलाच तयार नसतो. जुने ते सोने समजण्यातच आपण धन्यता मानत असतो. आपल्या अभ्यासाच्या, शिकण्याच्या आणि मूल्यमापनाच्या जुन्या सवयी आपण सोडायला तयार नसतो. पाठयपुस्तकातील माहिती डोक्यात भरणे आणि ती परीक्षेत जशीच्या तशी लिहून काढणे, यालाच आपण शिक्षण समजत आलो आहोत. हा विचार सोडा अन् जरा वेगळ्या नजरेने शिक्षण प्रक्रियेकडे पाहा; अनेक नव्या दिशा दिसतील, नवे दरवाजे आणि खिडक्या उघड्या होतील. जरा डोकावून पाहाण्याची, उंबरठा ओलांडण्याची मात्र सवड, आवड आणि निवड हवी. शिक्षणविषयक सर्व प्रक्रियांकडे जर आपण वेगळ्या चष्म्यातून पाहायचे ठरवले तर अनेक पर्याय आपल्या नजरेत येतील; पण आपण पर्यायांचा विचारच करत नाही; ते स्वीकारायला आम्ही तयारच होत नाही. तेच ते, मागील पानावरून पुढे चालू, यातच आपल्याला धन्यता वाटते. या सर्व प्रक्रियेचा वेगळ्या नजरेने विचार केला तर आत्ताचे निम्मेअधिक प्रश्न निर्माणच होणार नाहीत. आमूलाग्र बदल करायला हवा असे म्हणायचे, पण जुन्यालाच चिकटून राहायचे ही आपली जुनीच खोड. असे आपण परंपरावादी, एकाच वेळेस अठराव्या शतकाला न सोडता एकविसाव्या शतकाच्या गोष्टी करणार!
येथे ऑनलाइन शिक्षणाचा अजिबात विचार केलेला नाही. केवळ ऑफलाइन पद्धतीने शिक्षण प्रक्रिया कशी चालू करता येईल, ज्ञानगंगा कशी वाहती ठेवता येईल याविषयी जरा बोलू या, मंथन करू या. बघू या काय नवे सापडतेय का ते; जे निघेल त्यातील स्वीकारायचे. ऑफलाइन शिक्षण याचा अर्थ ऑनलाइन शिक्षणासाठी उपलब्ध असणाऱ्या कोणत्याही साहित्याशिवायचे शिक्षण, अशी सोपी व्याख्या येथे अपेक्षित आहे. ऑफलाइन पद्धतीने शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यासुद्धा जास्त म्हणूनच त्यांचा विचार पहिला. नाहीरेंची काळजी, तळागाळात पोहोचण्याची आवश्यकता, वंचितांसाठीची कळवळ, अन् सर्वदूर जाऊन पोहोचण्याची गरज मनाशी बाळगून, काय करता येईल याचा ऊहापोह करू या. सूचवू या तर खरं, बिया पेरायच्या चौफेर, रुजण्याच्या अपेक्षेत आणि पडला पाऊस तर फुलण्याच्या स्वप्नात!
नियोजनाची गरज व प्रकार
येत्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आपण कशी करणार आहोत? ही वेळ आहे अनेक प्रकारची नियोजने करण्याची. स्वस्ठ बसून राहणे तर आपल्या रक्तातच नाहीये. प्रथमतः आपल्याला आपला वर्ग समजून घ्यावा लागेल. त्याचा केस स्टडी करून त्यांच्यात विभाग, गट करावे लागतील. वर्गातील ऑनलाइन माध्यमांवरून संपर्क साधू शकणारे आणि केवळ ऑफलाइनवरच शिक्षण शक्य असणारे असे गट करून घ्यावे लागतील. विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या जागेवरून त्यांची विभागणी संपर्कासाठी करून ठेवता येईल. विद्यार्थ्यांशी संपर्क कसा साधता येईल याचा विचार करून ठेवता येईल. आता आपल्या अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन या संदर्भात आपल्याला कॅलेंडर हाताशी घेऊन नियोजनाला सुरुवात करता येईल. त्यात पुढील विचार तुम्हांला नक्कीच दिशा देईल.
ऑफलाइन पद्धतीने अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन करण्यासाठी काय उपाय करता येतील, याविषयी बुद्धिमंथन पद्धती वापरून, जनमानस आजमावून विचारमंथन करायला लावता येईल. (यासाठी मात्र ऑनलाइनचा विचार, कारण समाजातील या भागाकडे साधन उपलब्धता बरी आहे या समजुतीने) जिल्हा स्तरावर, विभागीय स्तरावर, लोकप्रतिनिधी, मुख्याध्यापक, शिक्षक, विषय संघटना, पालक संघटना इ. असे अनेक घटक घेता येतील; जे शिक्षणविषयक प्रश्नांमध्ये रुची दाखवतात, त्यांना निमंत्रित करून हा प्रश्न धसास लावता येईल. हा प्रत्येक घटक अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन या सर्वांविषयी काय-काय उपाययोजना सुचवितो आहे, याचे एकत्रीकरण करता येईल. त्या संदर्भातील नियोजनाची जबाबदारी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याला किंवा इतर सक्षम अधिकाऱ्याला देता येईल. आवश्यकता आहे या सर्व घटकांना एकत्र आणण्याची, विचार करायला लावण्याची. सर्वसामान्यांत देखील तज्ज्ञ दडलेला असतो! बघू या जुगाडाचा काय आविष्कार होतोय. आव्हान स्वीकारायची आपल्याला सवय आहे, केवळ लढ म्हणण्याची खोटी. हो अंधार दाटलेला आहे, पण आशेच्या सोनेरी कडाकडे लक्ष वेधायचे आहे.
नियोजनात पहिली महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे परिस्थितीचा आढावा घेत-घेत आपल्याला पुढे जायला हवे.
नियोजन अ : जर परिस्थिती जून-जुलैपर्यंत सुधारली तर आपल्या काय योजना असणार आहेत?
नियोजन ब : सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत नियमितता येईल असे गृहीत धरुन.
नियोजन क : डिसेंबर-जानेवारीनंतर परिस्थिती निवळल्यानंतर.
तर अशा किमान तीन स्तरांवर विचार व्हायला हवा. तसेच हा विचार करताना महामारीचा आलेख किती खाली आल्यावर आपण शाळा सुरू करू शकणार आहोत, या विषयीचा निर्णय आपण आत्ताच घेऊ शकतो. त्यासाठीची कोणती परिस्थिती अनुकूल म्हणता येईल, यासाठी वाट पाहण्याची गरज नाही. जसे की, गावातील नवीन केसेसचे प्रमाण जर लोकसंख्येच्या ५ ते १० टक्क्यांपर्यंत झाले तर शक्य होईल का? याचा विचारसुद्धा आजच करता येणे शक्य आहे. त्याचा आधार घेऊनच नियोजनाच्या विविध प्रकारांना सुरुवात करता येईल. नियोजनचा हा विचार आशयाविषयी, अध्ययन-अध्यापन पद्धतींविषयी, साहित्यनिर्मितीविषयी, अन् मूल्यमापनाविषयी असेल. अभ्यासक्रमाबाबत प्राधान्यक्रम ठरवावा लागेल. जे अत्यंत आवश्यक, अशा घटकांना निवडले तर अभ्यासाचा बोजापण कमी होईल. तसेच विविध स्तरांवर किती टक्के भाग असावा, याचेपण नियोजन करता येईल. या प्रत्येक प्रातांतील विविध घटकांचे नियोजन करणे गरजेचे आहे. या काळात शिक्षक जास्तच कार्यरत झाला आहे; झगडतो आहे अविरत आणि परिस्थितीशी सामना देत, रोज नव्या आव्हानांना तोंड देत उभा आहे. आपल्या कार्याला पूर्णपणे वाहून घेतलेले शिक्षक हे नक्की करू शकतील.
असे नियोजन करण्याची कारणे अनेक सांगता येतील. एकतर शिक्षण क्षेत्राशी निगडीत (शिक्षक, शिक्षक-प्रशिक्षक, डाएट, डी. एल. एड., केंद्र प्रमुख) असणाऱ्यांना काहीतरी मेनूकार्ड देणे गरजेचे आहे. ज्यांना जे शक्य आहे ते निवडावे. आपल्या परिस्थितीप्रमाणे, उपलब्धतेप्रमाणे, आवडीप्रमाणे निवड करता यावी यासाठी नियोजन आवश्यक. एक खरे की, सर्वांचे अंतिम शैक्षणिक उद्दिष्ट मात्र एकच असणार आहे. शिक्षणाच्या संदर्भातील प्रत्येक घटकाला त्याच्या क्षमतेनुसार विविध कामात मग्न करणे गरजेचे आहे, जेणेकरून प्रश्नांची उत्तरे अगदी सहजपणे सापडतील. शिवाय सर्वांना या प्रक्रियेत समाविष्ट केल्याने त्याचे उत्तरदायित्व सगळ्यांच्यात वाटले जाईल. कोणत्या गावाला जायचे आहे हे निश्चित अन् जाण्याचे मार्ग मात्र अनेक. तेव्हा कोणत्या व्यवस्थेची निवड करायची तुम्हीच ठरवा.
आपली अवस्था म्हणजे ‘पराधीन आहे जगती’ अशीच असते. आपण स्वतःहून कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. तसेच फतवा येण्याची वाट पाहण्याशिवाय आपण काही करूही शकत नाही. जोपर्यंत वरून येत नाही तोपर्यंत राहू या की जरा निवांत, घाई काय आहे? असा विचार केला जातो. पण, विचार करणारी माणसे ही सतत प्रत्यक्ष जीवनातली सुडोकू सोडवत असतात. आपला विचार, उपाययोजना तयार करायला काय हरकत आहे? निदान विचारांचे दारिद्र्य कशाला दाखवा, पटले तर होय म्हणा एवढेच.
अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन पर्यायांची निवड
नियोजनातच विचार व्हायला हवा, अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन या महत्त्वाच्या घटकांसाठीच्या विविध पर्यायांचा. ऑफलाइन की ऑनलाइन की मिश्र पद्धतीचा वापर आपण करणार आहोत, ते ठरवावे लागेल. विविध स्रोतांचेपण पर्याय असू शकतात. संकेतस्थळे, टी.व्ही.वरील कार्यक्रम, यूट्युबवरील कार्यक्रम इ. यांपैकी कशाचा आधार आपण शिकविण्यासाठी घेणार आहोत ते ठरवावे लागेल. आपल्याला विचार करायला वेळ आहे, काय करायचे आणि कसे करावे याची कल्पना मागील वर्षभरात येऊन गेलेली आहे. प्रश्न आहे मागील वर्षाच्या अनुभवातून आपण काही शिकलो आहोत की नाही याचा. अध्ययनाच्या विविध पद्धतींची जाणीव आपल्याला करून देता येईल. स्वयंअध्ययन, पाठांतर, सराव, मनन व चिंतन, वाचन, लेखन, निरीक्षण, स्मरण, उपयोजन अशा अनेक पर्यायांचा विचार देता येईल. विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रेरीत करणाऱ्या अशा कृतींचे आयोजन करता येईल. त्यांना अभ्यासाची तंत्रे आणि मंत्रे देता येतील.
अध्यापनाबाबतच्या अनेक पद्धतींमधून एकत्रित अशी, आपल्या विद्यार्थ्यांना मानवेल अशी पद्धत देता येईल; ज्यात अनुभव पद्धती, मार्गदर्शित अध्यापन, कृतियुक्त अध्यापन यांसारख्या पर्यायांचा वापर करून पाहता येईल. मूल्यमापनात तर विविध पर्यायांचा आवर्जून वापर करायला हवा. स्वयं-मूल्यमापन, गृहकार्य, आकारिक मूल्यमापन, वर्कशीट्स यांसारख्या अनेक तपासणी साहित्यांमधून एकापेक्षा जास्त साहित्याची निवड वेळीच करता येईल. जेव्हा आपण विविध पर्यायांचा विचार करतो, तेव्हा त्यातील एखादा तरी कामाला येईल, अशी आपल्याला खात्री असते. म्हणूनच पर्याय महत्त्वाचे. येथेच परंपरेला छेद देऊन नव्याची कास धरता येईल.
पालकांची वाढीव जबाबदारी
परिस्थितीमुळे आता पालकांना आपल्या पाल्याच्या बाबतीत अतिरिक्त जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. केवळ शाळेत पाठवले की झाले, असे करून कोणे एके काळी चालायचे. मागितले ते दिले असे पुरवठामंत्री म्हणूनही आपण देत राहिलो. आता जरा यापुढे जाऊन काम करण्याची वेळ आली आहे. शिक्षकाने पालकांच्या साहाय्याने मुलांची घरातील अभ्यासाची जागा नक्की करायला सांगावी. घरातच ठरवीक वेळ हा शाळेचा वेळ समजून मुलांना वेगळे बसायला लावावे. अभ्यासाचे एक वेळापत्रक मुलांना तयार करायला उद्युक्त करावे. या काळात पालकांनी मुलांना इतर कामात न गुंतवता, ती पूर्णपणे शाळेत गेली आहेत असे समजूनच आपली घरकामे करावीत. घरीपण शालेय वातावरणनिर्मितीची गरज आहे. यात अगदी शालेय प्रार्थना, राष्ट्रगीत, शारीरिक शिक्षण, योग या सर्वांचा समावेश असावा. त्यातूनच मुलांच्या मनात सकारात्मकता वाढीस लागेल. अशा वेळेस मुलांच्या अध्ययन प्रक्रियेत कुणीही अडसर बनू नये. त्यांना पूर्णवेळ शिकू द्यावे. तसेच पाल्यांना ऑफलाइन पद्धतीने शिकवताना शाळा, शिक्षक आणि मूलल यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी लागेल. मूल घराबाहेर पडू नये आणि आपल्याला नेमून दिलेल्या वेळेत शाळेत जाऊन शिक्षकांनी दिलेले निरोप मुलांपर्यंत पोहोचवणे, हे सगळे पालकांना करावे लागेल. ऑनलाइन शिक्षणापेक्षा ऑफलाइन पद्धतीनेच आपली मुले जास्त प्रभावीपणे शिकणार आहेत, स्वतःला जास्त सक्षम करणार आहेत, याची खात्री बाळगा. तसेच पालकांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकणे ही त्यांची जबाबदारी आहे, याची जाणीव सदोदित करून देणे गरजेचे आहे. तशी खात्री देण्याचे काम शिक्षकांचेच आहे.
अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन साहित्यनिर्मिती
या नववर्षात अध्ययन-अध्यापन कसे चालू ठेवता येईल याचा प्रथम विचार व्हायला पाहिजे. यासाठी प्राधान्य द्यायला हवे, अध्ययन-अध्यापन-मूल्यमापन यांच्या साहित्यनिर्मितीला आणि उपलब्धतेला. पाठ्यपुस्तकांच्या उपलब्धतेबरोबर स्वयंअध्ययनासाठी साहित्य उपलब्ध करून द्यायला हवे. आपली पाठयपुस्तके ही बऱ्याच प्रमाणात वर्गाध्यापनासाठी म्हणून बेतलेली आहेत. त्यांना स्व-अध्ययनाची जोड द्यावी लागणार आहे. स्वयंअध्ययनावर आधारित असे स्वाध्याय-साहित्य आपल्या मुलांची क्षमता लक्षात घेऊन विकसित करावे लागेल. अध्ययन साहित्यनिर्मिती, स्वाध्याय पॅकेजेस यावर भर द्यायला हवा. त्या अनुषंगाने शिक्षकांना स्वयंअध्ययनासाठी साहित्यनिर्मिती कशी करावी, याविषयी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. तशा साहित्यनिर्मितीच्या कार्यशाळा घ्यायला हव्यात. पाठ्यपुस्तकांतील वर्गपाठ आणि स्वयंअध्ययन साहित्य यांमधील फरक समजून द्यायला हवा. वेगळे साहित्य निर्माण करावे लागेल, मूल्यमापनासाठी विविध कृतिपत्रिका निर्माण कराव्या लागतील.
विद्यार्थ्यांना शिकायला देण्यासाठी वर्कशीट्स, कृतिपत्रिका उपयुक्त ठरू शकतात. त्यांच्या अभ्यासाला, स्वयंशिक्षणाला दिशा मिळू शकते. एका वेळेस एकच कृतीसुद्धा एक मोठे पाऊल ठरू शकते. आपल्याला येते आहे, जमते आहे ही भावना यातून उमटू लागते. संकल्पनानिहाय अशा वर्कशीट्स निर्माण करता येतील.
अध्ययन पद्धती
घरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्याच्या वापराविषयीचे मार्गदर्शन दूरस्थ पद्धतीने द्यायला हवे. स्वतःचे स्वतः वाचून मुलं योग्य त्या कृती करायला लागली तर नक्कीच ते शिकू शकतील. या काळात शिक्षकाला अध्यापनाच्या विविध पद्धतींचा उपयोग करावा लागेल, ज्यात स्वयंअध्ययन पद्धतींचा अंगीकार करावाच लागेल. तसेच, त्याला अध्ययन पद्धतींचा पुरेपूर वापर करावा लागेल. शिकण्याच्या प्रक्रिया समजून घेऊन आपले विश्लेषण विद्यार्थ्यांना कृतिरूपात द्यावे लागते. तसेच प्रयोग पद्धती, प्रकल्प पद्धती, वाचन पद्धती, चिंतन-मनन पद्धती, यांसारख्या पद्धतींचा वापर करता येईल. या प्रत्येक पद्धतीच्या अंगाने विद्यार्थ्यांचा अभ्यास, स्वाध्याय नव्याने तयार करावा लागेल. तसे साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावे लागेल. ज्यांनी शिकण्याच्या मूलभूत कौशल्यांना आत्मसात केले आहे, ज्यात प्रामुख्याने वाचन, लेखन यांचा समावेश आहे, या क्षमता ज्यांनी विकसित केलेल्या आहेत, त्यांना स्वयंअध्ययन करणे शक्य होईल.
तसेच अनेक ठिकाणी पीअर टिचिंगचा उपयोग केल्याचेही अनुभवाला आलेले आहे. मोठ्या बहीण-भावाने आपल्या लहानग्यांसाठी वेळ द्यायचा. कृतिपत्रिका सोडवायला, संकल्पना समजून घ्यायला मदत करायची. अडीअडचणी सोडवण्यास मदत करायची. शेजारी असणाऱ्या आपल्यापेक्षा जरा जास्त शिकलेल्या दादा-ताईची मदत नक्कीच उपयुक्त ठरू शकेल. मार्ग शोधले पाहिजेत. त्यांना प्रक्रियेत सामावून घेतले पाहिजे. काहीही न येणाऱ्या पालकांना आपल्या पाल्याने शिकावे असे वाटत असते. त्यांनी मुलांना वाचायला बसवले आणि स्वतः ऐकत राहिले तरी मुलं शिकतील. पालकांचा आपल्या पाल्यांवर असणारा विश्वास आणि शिस्त महत्त्वाची.
होम असाइनमेंट्स यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. घरीच राहून मुलं अनेक प्रकारच्या असाइनमेंट्स पूर्ण करू शकतात. एखाद्या संकल्पनेवर आधारित असे हे स्वाध्याय असू शकतील. अशा असाइनमेंट्सचे गुणांकनपण करता येईल, जेणेकरून विद्यार्थी ते सर्व गांभीर्याने घेतील. जेव्हा असे गृहपाठ विद्यार्थी सोडवत असतात, तेव्हा ते जास्त सक्षमपणे शिकत असतात. स्वतःच्या बुद्धीचा विकास करत असतात.
घरगुती प्रयोगातून, साहित्यातून शिकणे शक्य आहे. ज्ञानरचनावादाचा अत्यंत प्रभावी वापर या ठिकाणी सहज शक्य आहे. उलट त्यासाठी हे पोषक वातावरण आहे असेच म्हणावे लागेल. विद्यार्थ्यांच्या शिकण्यात आता कोणताच बाह्य अडथळा नाही. त्याचा तो विचार करणारा, शिकणारा, मूल्यमापन करणारा, सर्वकाही स्वतःचे स्वतः स्वतःसाठी करणारा. केवळ विद्यार्थ्याला अध्ययनाच्या प्रक्रियेची समज द्या, अध्ययनासाठीचे टप्पे, पायऱ्या समजावून द्या. काय केले म्हणजे काय होईल हे नीट लिहून द्या. आपली मुले ही टिपकागदासारखी आहेत. मुख्य म्हणजे ती त्वरित ग्रहण करणारी आहेत, चाणाक्ष आहेत, धडपडी आहेत, प्रयत्नशील आहेत. गरज आहे त्यांच्यातील स्फुल्लिंग जागृत करण्याची. शिक्षकाचे हेच तर खरे काम!
प्रकल्प व घरातच प्रदर्शन भरवणे याचा उपयोग ऑफलाइन शिक्षणात करून घेता येईल. घटकानुसार तक्ते तयार करणे, काही अध्ययन साहित्य जसे की, तरंग पट्ट्या, चित्र काढणे, मॉडेल्स इ. तयार करून त्याची मांडणी केली तरी जाता-येता सहज अभ्यास होऊन जाईल. विविध प्रकारचे घरगुती साहित्य वापरून तयार केलेल्या अभ्यासाच्या गोष्टींच्या आधारेपण शिकणे कसे शक्य आहे, हे सांगितले जाणे आवश्यक आहे. जसे की, रॅपर्स, जुनी वर्तमानपत्रे. अर्थात, हे सर्व शिक्षकांनी सुचवणे गरजेचे आहे.
अध्ययनाच्या पद्धतींविषयी शिक्षकाने विद्यार्थ्यांना साहित्याद्वारे सूचित करणे आवश्यक आहे. प्रत्येक संकल्पना स्पष्ट करताना विविध टप्प्यांची जाणीव शिक्षकाने करून द्यायला हवी. अशा प्रकारे शिक्षक विद्यार्थ्याच्या प्रत्येक कृतीला योग्य दिशा देऊ शकतो. शिकावे कसे हे शिकवले तर मुले स्वतःहून प्रगती करू शकतील. यात शिक्षकाची देण्याची भूमिका जास्त महत्त्वाची आहे.
संकल्पनांवर आधारित शिक्षण
पाठ्यपुस्तकातील प्रमुख संकल्पनांचे शिक्षण या काळात देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक विषयातील संकल्पनांची यादी करून; त्या प्रयोगातून, प्रकल्पातून शिकता येणे शक्य होईल. पाठ्यपुस्तकातील आशयाला दुय्यम महत्त्व देऊन, संकल्पनांच्या अध्ययनाला महत्त्व द्यायला हवे, जे ऑफलाइन शिक्षणाद्वारे करता येणे शक्य आहे. शिक्षकांनी विषयानुसार कार्यशाळा घेऊन या संकल्पनांची निवड करणे आवश्यक आहे. नंतर त्या संकल्पनांना विश्लेषणाची जोड, कृतीची जोड देऊन अध्ययन सुकर करता येईल. त्यामुळे शिक्षणाचे ओझेसुद्धा कमी होणार आहे. मुलांना शिक्षण आटोक्यातले वाटणार आहे. अपेक्षित कृती या संकल्पनांवर आधारित ठेवल्या तर शिकावयाच्या बाबी आटोक्यात येतील. या अनुषंगाने प्रत्येक विषयाच्या आशयाची व्याप्ती आणि मर्यादा निश्चित करून देणे गरजेचे आहे. काय शिकायचे आहे व कितपत तपशिलात जायचे आहे, याच्या मर्यादा आखून दिल्यास त्या गाठणे हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. अभ्यास जमेल असे वाटू लागते.
किमान आवश्यक घटकांचे अध्यापन
याच अनुषंगाने प्रत्येक विषयातील किमान आवश्यक बाबी जर वेगळ्या करता आल्या, तर त्याचा फायदा सर्वच विद्यार्थ्यांना होऊ शकतो. प्रत्येक विषयातून संकल्पनाच्या अनुषंगाने अनेक स्पष्टीकरणात्मक बाबी आलेल्या असतात. अनेक बाबींचा दृढीकरणासाठी समावेश केलेला असतो. मागील वर्षाच्याच घटकांचा परत एकदा अभ्यास दिलेला असतो. परिणामतः अभ्यासाचा भाग बराच फुगल्यासारखे दिसतो. जर आपण किमान आवश्यक अध्ययन घटकांवर लक्ष केंद्रित केले तर अभ्यास आपल्या आवाक्यात येऊ शकतो. नाहीतर काय कराल आणि किती कराल हे अमर्यादित होऊन जाते. कमीत-कमी एवढे तरी करा, तुम्ही नक्कीच उत्तीर्ण व्हाल, असा आत्मविश्वास निर्माण करता येतो.
अध्ययन साहित्य वितरण
ऑफलाइन शिक्षणामधील महत्त्वाचा अडसर म्हणजे साधनांची उपलब्धता आणि शिक्षकाशी आवश्यक असणारा संवाद. दूरस्थ राहून मले शिकणार कशी? त्यांना स्पष्टीकरण मिळणार कसे? त्यांच्या अडचणी कशा सोडवल्या जाणार? त्यांचे मूल्यमापन आणि प्रत्याभरण कसे होणार? हे सर्व शिक्षकांना पत्रव्यवहारातून करता येणे शक्य आहे. मुलांना घरपोच सर्व साहित्य ठरावीक अंतराने नियोजनपूर्वक मिळायला हवे, अगदी वेळेत. शिक्षकाची भूमिका ही एक रिमोट कंट्रोलर म्हणून राहणार आहे. या काळात शिक्षकाला विविध पद्धतींनी काम करावे लागेल. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विषयनिहाय अध्ययन आणि मूल्यमापन साहित्य मिळावे म्हणून त्याच्या आवश्यक त्या प्रती तयार कराव्या लागतील. अध्ययनाचे हे पॅकेज मुलांना वेळोवेळी मिळायला हवे. वितरणाचे चक्र साधारणपणे खालीलप्रमाणे कार्यरत राहिले तर मुले शाळेत न येता, ऑनलाइन पद्धतीचा आग्रह न धरता, सक्षमपणे शिकू शकतील. एक प्रकारे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील हा सातत्यपूर्ण पत्रसंवाद असेल. त्यामुळे दोघांनाही भरपूर लिखापडी मात्र करावी लागेल. पण, ती काळाची गरज आहे, आपल्याला तसे वागले पाहिजे, बदलले पाहिजे.
तेव्हा आता मुख्य प्रश्न असा आहे, मुलांपर्यंत हे सगळे साहित्य कसे पोहोचवणार? यासाठी शाळेतील केंद्रामध्ये हे सर्व साहित्य वेळापत्रकाप्रमाणे उपलब्ध असावे. पालक किंवा जबाबदार व्यक्ती हे साहित्य शाळेतून घेऊन जाऊ शकतील. पालकांना पोस्ट्मन किंवा कुरिअर बॉयची भूमिका बजावावी लागेल. आपल्या पाल्यासाठी हे काम ते करतील. काही ठिकाणी हे साहित्य पोलीस चौकीत, चावडीत, ग्रामपंचायतीच्या कार्यालयात, देवळात अशा ठरावीक ठिकाणी नियोजनपूर्वक उपलब्ध करून देता येईल. याकरता समाजातील विविध घटकांशी बोलून एक चांगले, पक्के, विश्वासाचे जाळे विणावे लागेल. शिक्षणाची जबाबदारी ही एकट्या शिक्षकाची नव्हे, तर ती सर्व समाजाची गरज आहे, याचे सर्वांना भान करून द्यावे लागेल. शिक्षण हे काही केवळ शिक्षकांच्या अथक मेहनतीने होत नाही, त्याला समाजातील विविध घटकांचे साहाय्य गरजेचे असते, हे परत एकदा अधोरेखित होईल
विद्यार्थ्यांनी सांगितल्याप्रमाणे स्वाध्याय, वर्कशीट्स, घरी करून ते सर्व साहित्य परत एकदा पालकांनी किंवा जबाबदार व्यक्तींनी संकलित करून, तपासणीसाठी परत शिक्षकांकडे येईल, असे पाहिले पाहिजे. प्रत्याभरणासाठी शिक्षकांनी सर्व स्वाध्याय तपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत याच मार्गाने येईल असे पाहायला हवे, जेणेकरून शिक्षकांकडून पालकाकडे, पालकांकडून विद्यार्थ्यांकडे आणि परत ते पालकांमार्फत शिक्षकांकडे, आणि तपासून सुधारणा सूचवून परत विद्यार्थ्यांकडे असे हे चक्र सतत चालू राहू शकते. यात विद्यार्थी हे शिक्षकाशी दूरस्थ पद्धतीने जोडले जातील. हे नियोजन योग्य पद्धतीने केले तर ते नक्की यशस्वी होऊ शकते.दूरस्थ मूल्यमापन व्यवस्था
...
योग्य नियोजनातून साकार झालेल्या शिक्षक – पालक – विद्यार्थी – पालक – शिक्षक या चक्राचाच उपयोग करून विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करता येईल. मूल्यमापनात अंतर्गत मूल्यमापनाचे, आकारिक मूल्यमापनाचे स्थान नाकारून चालणार नाही. यात विद्यार्थ्यांनी केलेल्या गृहकार्याला मूल्यमापनात भारांश तर द्यायलाच हवा. यातील पुस्तकासह चाचणीचा पर्याय हा उपयुक्त ठरू शकतो. मुलांनी सर्व संदर्भांचा आधार घेतला तरी प्रतिसाद मात्र स्वतःच्या आकलनावर आधारित असल्याने त्याचे स्वतःचे उत्तर अतिशय महत्त्वाचे. केवळ पेपर-पेन्सिल टेस्ट किंवा ऑफलाइन परीक्षांवरील फाजील विश्वास कमी करून, या पर्यायांची निवड केली तर आयत्या वेळेस परीक्षा रद्द करून सर्वांना वरच्या वर्गात ढकलण्याची नामुष्की टाळता येईल.
तसेच परिस्थितीचा फायदा घेऊन मुलांना स्वयं-मूल्यमापनाचे धडेपण देता येतील. स्वतःमधील चूका शोधून त्या दूरुस्त करायला सांगता येईल. विद्यार्थ्यांनी केलेले लेखन, स्वयंशिस्तीने सोडवलेले स्वाध्याय, वर्कशीट्स हे सर्व मूल्यांकनासाठी उपयोगी ठरू शकते. प्रत्येक गृहपाठ, प्रकल्प, चार्ट्स यांना गुणदान ठेवता येईल. केवळ पारंपरिक पाठांतरावर आधारित मूल्यमापनाऐवजी प्रत्यक्ष मुलांनी केलेल्या कार्याला गुण देण्यात यावेत. या सर्वांचे रेकॉर्ड ठेवण्यात यावे. त्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देता येऊ शकेल. विद्यार्थ्यांनी करावयाच्या किमान गोष्टी निश्चित करता येतील. मूल्यमापनाबाबत अधिक व्यापक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे. विशिष्ट कृती, प्रकल्प, उपक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यास ठरावीक गुण देऊन, त्याची उत्तीर्णता ठरवता येईल. प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान किती गुण मिळवायचे आहेत, हे अगोदरच निर्धारित करता येईल. केवळ लेखी परीक्षा हाच एक विश्वासार्ह प्रकार आहे, हा दूराग्रह थांबवला पाहिजे. एवढेच नव्हे, तर परीक्षा आणि गुणांची चढाओढ टाळूनसुद्धा पुढे जाता येते, हे ध्यानात घ्यायची ही चांगलीच आयती संधी आहे. जग बदलेले आहे, आपण आपले मूल्यमापनाचे निकषसुद्धा बदलण्याची गरज आहे. आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले, अशा मूल्यमापन साहित्याचा वापर करून ही वेळ निभावून नेली पाहिजे. कदाचित यातच उद्याचा उषःकाल दडलेला असेल.
पर्याय कोणताही निवडला तरी त्याला मर्यादा या राहणारच. वर्गाध्यापनाच्या परीणामकारकतेला दुसरी कोणतीही पद्धत कमी फायद्याची होणार. आवश्यकता आहे ती विचार करण्याची, तो मांडण्याची, तो स्वीकारण्याची आणि आवश्यक ती कृती करण्याची. तहान लागल्यावर विहीर खोदण्याच्या आपल्या सवयींना आळा घालून नियोजनपूर्वक या संकटाला सामोरे जायला हवे. आपल्यामध्ये ती क्षमता आहे. उठा, कृती करा. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करा, अविरत, न थकता, न थांबता. मादी कासव आपल्या पिलांचे संगोपन दूर राहून केवळ नजरेने करते असे म्हणतात; तद्वतच शिक्षकाला दूर राहून आपल्या विद्यार्थ्यांवर आपुलकीने लक्ष ठेवायला पाहिजे.
डॉ. उमेश दे. प्रधान
(लेखक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासमंडळाचे (माध्यमिक) माजी संयोजक आहेत.)
संपर्क – ९४२२०३६०७०, [email protected]
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी शाळा
, टाळेबंदीतील शिक्षण
, डॉ. उमेश प्रधान
, मराठी अभ्यास केंद्र
Shubhangi methepatil
4 वर्षांपूर्वीलेख अतिशय छान आहे.सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे मूल्यमापनासाठी नसून शिकण्यासाठी खूप उपयुक्त आहे हे जाणवते. ऑनलाईन शिक्षण सर्व ठिकाणी होऊ शकत नाही असे म्हणून काहीच न करणाऱ्या मंडळींना हा एक दिशा देणारा एक मार्गच आहे. प्रत्येक शिक्षकाने जर असा विचार केला तर कितीही मोठी आपत्ती आली तरीही शिक्षण मात्र चालूच राहील.
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीछान. योग्य तो समतोल साधला आहे.