पोहे पुराण


“'पोहे' म्हटलं की आठवते ती सुदाम्याची पोह्याची पुरचुंडी. गोपाळकाल्याला मी आवर्जून 'दही काकडी पोह्याचा’ नैवेद्य दाखवते. 'पोहे' म्हटलं की श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं 'सुदाम्याचे पोहे' हे पुस्तकही आठवतं. मी शाळेत असताना, दिवाळीच्या सुट्टीत दरवर्षी मिरजेला आजी, आजोबा, काका-काकूंकडे जात असे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी साग्रसंगीत फराळ करून झाला की शेवटी आजी दहीपोहे वाढायची. शांत वाटायचं. त्याची चव अजून जीभेवर आहे.” खवय्यांसाठी पोहे म्हणजे आवडीचा पदार्थ याच पोह्यांच्या विविध तऱ्हा सांगतायत वृत्तनिवेदिका दीपाली केळकर-
एके दिवशी सकाळी न्याहारीसाठी पोहे करताना मनात विचार आला की 'पोहे' हा पदार्थ, मराठी माणसाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक. झटपट होणारा, साधा, सोपा आणि स्वस्तही. अर्थात, करायला सोपा असला तरी भट्टी जमून यायला हवीच. मुंबई दूरदर्शनच्या कॅन्टीनमध्ये सकाळी जे पोहे मिळतात, त्याचा आस्वाद अनेकदा घेतला आहे. सकाळी साडेआठच्या  बातम्या झाल्यावर कॅन्टीनमध्ये गेलं की पोहे हमखास मिळतात. उपमा, शिरा , इडली हे पदार्थही कधी-कधी पोह्याच्या जोडीला असतात, पण पोहे नाहीत असं कधीही होत नाही. गंमत म्हणजे प्रत्येक वेळी पोह्याची चव अगदी सारखी असते. चवीत कणमात्रही बदल नाही. ही किमया त्या पोहे करणाऱ्याला कशी साधली आहे कोण जाणे? कारण मी जेव्हा घरी पोहे करते तेव्हा प्रत्येक वेळी चव वेगळी. दूरदर्शनच्या कॅन्टीनमध्ये मिळणाऱ्या पोह्यांमध्ये कांदा आणि बरेचदा शेंगदाणे असतात. नारळ, कोथिंबीर अशी सजावट नसते, पण पोह्याबरोबर मिसळीची  तरी (रस्सा) घेण्याची सवय दूरदर्शनच्या कॅन्टीनमुळे लागली.
कार्यक्रमांच्या निमित्ताने विविध ठिकाणी पोहे खाण्याचा योग आला. कधी कांदा घातलेले, कधी मटार घातलेले, कधी बटाटे घातलेले हे पोहे. काही ठिकाणी पोह्यावर भरपूर नारळ, कोथिंबीर आणि रसरशीत लिंबाची फोड. काही वेळेला बारीक पिवळी शेव वर भुरभुरवलेली. कधी-कधी या पोह्याबरोबर तळलेला पोह्याचा पापड आणि मिरगुंडं. प्रत्येक ठिकाणी चव मात्र वेगळी. डाळिंब्या घालून किंवा वांगं घालूनही पोहे करतात, असं ऐकलं आहे.
मी पोह्यात थोडंसं आलं आणि मेतकूट घालते. काही वेळेला कांदा, बटाटा, मटार, टोमॅटो असं सगळं थोडं-थोडं घालते.  ताटलीत बारीक चिरलेला कांदा, बटाटा आणि टोमॅटो, मटार दाणे, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे  हे रंगसंमेलन खूपच छान दिसतं. माझ्याकडे असलेल्या पाकशास्त्राच्या पुस्तकात एक छान युक्ती दिली आहे. ती मी नेहमी वापरते. पोहे करताना फोडणीत कांदा आणि इतर जिन्नस छान परतल्यावर त्यात अगदी थोडं, पाव वाटी पाणी घालायचं आणि मग भिजवलेले पोहे घालायचे. पोहे छान मऊ होतात. पण पाणी अगदी थोडं घालायचं, नाहीतर गचका व्हायचा. माझा आणखी एक अनुभव आहे की थोड्या प्रमाणात पोहे केले की ते अधिक चांगले, रुचकर होतात. म्हणूनच की काय बहुतांश मराठी मालिकांमध्ये न्याहारीसाठी पोहे दाखवतात आणि घरात माणसं बरीच असली तरी पोहे मात्रं अगदी थोडेसेच केलेले असतात.
सध्या बऱ्याच रेल्वेस्थानकांबाहेर, कार्यालयांबाहेर सकाळच्या वेळी घरगुती पोहे, उपमा विकणारी मंडळी असतात. साधारण दोन किंवा तीन मोठे डबे घेऊन ही मंडळी उभी असतात आणि मुख्य म्हणजे सकाळच्या दोन-तीन तासांत त्यांचे पदार्थ संपतातही. अलीकडे बऱ्याच घरांमध्ये सकाळच्या घाईच्या वेळेत पोहे, उपमा करण्यापेक्षा पोळी-भाजी खाणंच पसंत करतात आणि रात्रीचं जेवण म्हणून पोहे, उपमा करतात.
मुंबईत मिळणारे कच्चे पोहे वेगळे; तर पेण, रोहा, अलिबाग इथे मिळणारे कच्चे पोहे वेगळे. पेण ,रोहा इकडचे पोहे किंचित लालसर असतात आणि त्यांची चवही थोडी वेगळी असते. इंदूरचे पोहेपण प्रसिद्ध आहेत. इंदूरला कार्यक्रमानिमित्त गेले होते तेव्हा सराफात भरपूर खादाडी केली, पण सकाळी पोहे खायचे मात्र राहिले. इंदूरच्या पोह्यात बडीशोप घालतात असं ऐकलं आहे. 'ऋतुगंधा' नावाचा एक कार्यक्रम आम्ही बदलापूरचे काही कलाकार मिळून करतो. त्यात सात ते दहा वयोगटातील चौदा-पंधरा मुली आहेत. अनुभव असा की, कार्यक्रमाआधी पोहे असतील तर मुली आवडीने ते  खातात, पण उपमा असेल तर मात्र तितक्या आवडीनं खात नाहीत. माझ्या घरातला अनुभवही असाच आहे. माझ्या लेकीलासुद्धा पोहे अधिक आवडतात. उपमाही ती खाते, पण पोहे अधिक प्रिय. मी जेव्हा घरी नसते तेव्हा संध्याकाळच्या वेळी दूध, गूळ, पोहे असंही ती खाते. हा पदार्थ तिला शेजारच्या काकूंनी शिकवला आहे.
'पोहे' म्हटलं की आठवते ती सुदाम्याची पोह्याची पुरचुंडी. गोपाळकाल्याला मी आवर्जून 'दही काकडी पोह्याचा’ नैवेद्य दाखवते. 'पोहे' म्हटलं की श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं 'सुदाम्याचे पोहे' हे पुस्तकही आठवतं. मी शाळेत असताना, दिवाळीच्या सुट्टीत दरवर्षी मिरजेला आजी, आजोबा, काका-काकूंकडे जात असे. दिवाळीच्या पहिल्या दिवशी साग्रसंगीत फराळ करून झाला की शेवटी आजी दहीपोहे वाढायची. शांत वाटायचं. त्याची चव अजून जीभेवर आहे.
दिवाळीच्या फराळाच्या पदार्थात चिवडा महत्त्वाचा. अर्थात, अलीकडे कायमच चिवडा लागतो म्हणा. या चिवड्याला लागतात ते पातळ पोहे. माझे गिरगावातले आजोबा मी लहान असताना मला 'चिवडा तयार करण्याची गोष्ट' सांगायचे. अगदी बाजारातून पोहे, डाळं, दाणे, सुकं खोबरं, तीळ, कढीपत्ता, मिरच्या आणण्यापासून आजोबा गोष्टीला सुरुवात करायचे. आजोबा गोष्ट इतकी छान सांगायचे की मी अगदी रंगून जात असे. गोरेपान, घाऱ्या डोळ्यांचे, सडसडीत बांध्याचे, पांढऱ्या केसांचे, धोतर  नेसलेले आजोबा. त्यांच्या शेजारी मी झोपले आहे आणि आजोबा मला 'चिवडा तयार करण्याची गोष्ट' सांगत आहेत, हे दृश्य आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे.
पातळ पोहे अजिबात आक्रसू न देता भाजणं आणि कुरकुरीत खमंग चिवडा तयार करणं कौशल्याचंच काम आहे. या चिवड्यातही विविध प्रकार आहेत. काही जणं डाळ, दाणे, खोबऱ्याचे पातळ काप यांच्याबरोबरच काजूचे तुकडे घालतात, काही जण लसूण चिरून घालतात, काही ठिकाणी धने घालतात, तर काही ठिकाणी या चिवड्यात चुरमुरे घालतात.  घरातील वयोवृद्ध मंडळींना खायला सोयीचं व्हावं म्हणून काहीजण कढीपत्ता, सुकं खोबरं, बडीशोप भाजून आणि मिक्सरमध्ये वाटून चिवड्यात घालतात. त्यामुळे स्वादही छान येतो.
आपल्या मराठी भाषेची कशी गंमत आहे पाहा; डाळं, दाणे, तीळ  घालून केलेला कुरकुरीत चिवडा आपल्या सर्वांना आवडतो. पण, 'चिवडणे' या शब्दाला मात्र जरा नकारात्मक छटा आहे. "अन्न चिवडीत बसू नको ", असं आपण चिडवतो.
पातळ पोहे म्हटल्यावर जसा चिवडा आठवतो, तसेच आठवतात दडपे पोहे. नारळाची भरपूर चव, नारळ पाणी घालून केलेले दडपे पोहेही फर्मास लागतात. हे पोहेही वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात. साने गुरुजींना 'हातपोहे' आवडायचे आणि ते स्वतःही 'हातपोहे' करत असत, असं वाचल्याचं आठवतं. साने गुरुजींची 'हातपोहे' करायची कृती म्हणजे पातळ पोहे चाळून घ्यायचे, पोह्याच्या प्रमाणानुसार त्यात कच्चे तेल, तिखट, मीठ घालायचं  आणि एकजीव करून खायचं. डाळं, दाणे, तीळ, पातळ पोहे भाजून, मिक्सरमध्ये वाटून, त्यात गूळ, तूप घालून एकजीव करून पौष्टीक लाडूही छान होतात. कणकेचे लाडू करतानाही त्यात थोडेसे जाड पोहे तळून कुस्करून घालतात. इडली करतानाही पिठात मूठभर जाड पोहे भिजवून, वाटून घालतात.
कोळाचे पोहे, पोह्याचे कटलेट, असे पोह्याचे अनेक  पदार्थ आहेत. सध्याच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात, पोह्यापासून विविध पदार्थ कसे करायचे ते यूट्युबवर अगदी सहज पाहायला मिळतं. पुण्यातील एका हॉटेलमध्ये फक्त विविध प्रकारचे 'पोहे'च मिळतात, असं ऐकलं आहे. श्रीगणरायाचं विसर्जन करताना त्याच्या बाजूला निरोपाची शिदोरी म्हणून पळसाच्या पानावर दहीपोहे ठेवण्याची प्रथाही काही ठिकाणी आढळते.
पोह्याच्या बाबतीतील एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे 'चहा-पोह्याचे कार्यक्रम', म्हणूनच संगीतकार, गीतकार, गायक अवधूत गुप्ते यांना म्हणावंसं वाटलं, "भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मन अन् कांती, आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदे पोहे "
हा लेख वाचताना पोह्यासंदर्भातील काही गोष्टी तुम्हांलाही आठवल्या असतील. पोह्याचे काही हटके पदार्थ तुम्हांलाही येत असतील. मला नक्की सांगा , कारण जोपर्यंत खाद्यसंस्कृती आहे, तोपर्यंत हे 'पोहे' पुराण सुरूच रहाणार आहे.
दीपाली केळकर
(लेखिका वृत्तनिवेदिका आहेत.)

संपर्क - [email protected]
पूर्वप्रसिद्धी – रंगाई दिवाळी अंक

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पोहे , दीपाली केळकर , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Shreekrushna Manohar

      4 वर्षांपूर्वी

    छान लेख, बदलापूर असल्याने जास्तच भावला .

  2. Sanjay Ratnaparkhi

      4 वर्षांपूर्वी

    'पोहे' माहिती छान वाटली. प्रांतानुसार पोहे रेसिपी बदलत जाते. कोकणातील पोह्यात नारळ तर घाटावर शेंगदाणे आणि तिखटपूड वापरली जाते. एस.टी.स्टँड असो टपरी कोठेही पोहे आस्वाद देण्यात तयार असतात. 'कांदापोहे'हा लग्नापूर्वीच्या प्रथम बैठकीतील मानाचा पदार्थ. अनेकांच्या संसाराची सुरुवात बहुधा बैठकीत पोहे खाऊन होते. पोहे हा पदार्थ स्थानमहात्म्य सांभाळून असतो. दही पोहे हा नैवेद्य तर कांदा पोहे हा बैठकीत जावून बसतो. त्यामुळे देवघर ते हाँटेल असा वावर पोह्यांचा दिसतो. मराठी मुलखात पोहे न आवडणारा माणूस मिळणं कठीण. एवढे प्रेम पोह्यांनी प्राप्त केलं आहे. डॉ. संजय रत्नपारखी

  3. Jagadish Palnitkar

      4 वर्षांपूर्वी

    वा!! छान लेख!! "हातपोहे" ला "तेल तिखट पोहे" असं एक सूचक नावंही आहे!

  4. Varsha Sidhaye

      4 वर्षांपूर्वी

    mala matra chhan mausoot pohe jamatch najit ajun



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen