की न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने


महाराष्ट्रातल्या सगळ्या महत्त्वाच्या शहरांतले व्यवसाय, उद्योग अमराठी माणसांच्या हातात आहेत, हे उघड गुपित आहे. मराठी तरुण या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आल्यावरच हे चित्र पालटू शकेल. एखादा धंदा-व्यवसाय करताना कोणती कौशल्ये जोपासायला हवीत, कोणत्या खुब्या अंगिकाराव्यात, या विषयीचे स्वानुभव मांडणारा मयूरेश गद्रे यांचा हा लालित्यपूर्ण लेख. 
'की न घेतले व्रत हे आम्ही अंधतेने' स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ह्या अजरामर ओळी आज अगदी वेगळ्या संदर्भात मी वापरतो आहे. काल संध्याकाळी डोबिंवलीतील फडके रोडवरून घरी येत होतो. सध्या लॉकडाऊनमुळे दुपारी चार वाजता दुकानं बंद करावी लागतात. त्यामुळे संध्याकाळी पाच-साडेपाचनंतर फडके रोडवर सुनसान वाटतं. एरवी रात्री उशिरापर्यंत चैतन्याने सळसळणारा हा रस्ता सध्या अकाली वृद्धत्व आलेल्या तरुणासारखा वाटायला लागतो. असो, पण त्यानिमित्ताने त्या बंद दुकानांकडे पाहताना काही वेगळाच विचार मनाला स्पर्श करून गेला; आणि मी अचानक थरारलो.
फडके रोड तसा फक्त अर्धा किलोमीटर लांबीचा. बाजीप्रभू चौकातून सुरुवात केली तर गणपती मंदिरापर्यंत डाव्या-उजव्या बाजूला मिळून, फारफार तर दहा-दहा म्हणजे, एकूण वीसेक इमारती. प्रत्येक इमारतीत पाच-सात दुकानं. (इमारतीच्या काटकोनात, गल्लीत असणारी दुकानं धरली नाहीत) तर ही सगळी मिळून ११०-१२० दुकानं होतात. यापैकी जेमतेम वीस-बावीस दुकानं मराठी माणसांची, म्हणजे शेकडा पंधरा टक्के. मुळात हे सगळे वाडे, कौलारू घरं एकेकाळी बहुतांश मराठी माणसांची होती. सत्तर-ऐंशीच्या दशकात डोंबिवलीने कात टाकायला सुरुवात केली. आज दोन-तीन अपवाद वगळता या जुन्या वाड्यांच्या सोसायट्या झाल्या. जुनी बिऱ्हाडं वर ब्लॉकमध्ये राहू लागली. दुकानं मात्र मराठी माणसांनी घेतली नाहीत. परभाषिक मंडळी व्यापार करण्यासाठी इथे येऊन स्थायिक झाली. त्यात मारवाडी आणि गुजराती मंडळींचा भरणा जास्त. नियमाला अपवाद म्हणून एखादा दक्षिण भारतीय असेल. या सगळ्यांनी इथे संपत्ती-निर्मिती केली. (wealth Creation)  मत्ता-निर्मिती (Asset Creation) केली. संस्था-निर्मिती (Institutional province) केली.
एवढंच कशाला, आज फडके रोडवरचे फेरीवाले बघा. त्यातले भाजीवाले थोडेफार मराठी आहेत. पण, फुलं आणि फळं, ज्यात भाजीपेक्षा जास्त फायदा आहे, यांची विक्री करणारे मोठ्या संख्येने उत्तर भारतीय आहेत. आणि महिन्याला लाखो रुपये आपल्या गावी पाठवत आहेत. (पूर्वी मनिऑर्डरने आता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच्या साहाय्याने). त्यातल्या अनेकांची मुलं आमच्या दुकानातून पुस्तकं घेऊन शिकली आणि वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षी वडिलांचा व्यवसाय पुढे नेऊ लागली आहेत. मला त्यांच्या या वृत्तीचा राग अजिबात नाही, उलट त्यांचं कौतुकच जास्त वाटतं. मोठमोठ्या कॉर्पोरेट्समध्ये कोटींचा पोर्टफोलिओ सांभाळणारे अनेक मराठी डोंबिवलीकर माझ्या परिचयाचे आहेत, मित्र आहेत. (माझी शैक्षणिक पार्श्वभूमी बघता, कदाचित मीही त्यांच्यापैकी एक झालो असतो.). पण, या प्रकारचं wealth creation आपल्याला जमू शकलेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे.
थोड्याफार फरकाने पुण्याचा लक्ष्मीरोड, ठाण्याचा गोखले रोड, कल्याणचा आग्रा रोड आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक महत्त्वाच्या गावातला प्रत्येक महत्त्वाचा रोड, इथे हीच परिस्थिती असेल  किंवा आहे.
बाहेरून फिरणारा माझ्या लिखाणाचा कॅमेरा आता थोडा आतमध्ये वळवतो.
यापुढचं लेखन काहीसं आत्मपर आहे. त्यात कदाचित कुणाला आत्मप्रौढी वाटली तर तो माझ्या लेखनातला दोष समजावा. पण, त्यातून कुणाच्या विचारांना चालना मिळाली तर या लेखनाचं सार्थक होईल. मुळात माझी शैक्षणिक कारकिर्द बरी होती. कल्याणच्या ओक हायस्कूलचा विद्यार्थी. दहावीला राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती ( National Talent Scholarship) मिळाली. नंतर केळकर कॉलेजमध्ये बीकॉमला पहिला आलो. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या दहाजणांच्या (Top 10) यादीत येण्याचा मान केवळ पाच मार्कांनी हुकला. नंतर कॉस्ट अकाउंटंट आणि दोन वर्षं कायद्याचं (Law) शिक्षण.
दरम्यान वडिलांचं अचानक निधन झाल्यामुळे कौटुंबिक व्यवसायात आलो. खरंतर मी आलो असं म्हणण्यापेक्षा काकांनी, म्हणजे कै. निळूभाऊ गद्रे यांनी मला व्यवसायात ओढलं, असं म्हणणं जास्त सयुक्तिक ठरेल. दुकान पुढे चाललं पाहिजे ही त्यांची जिद्द होती. त्यावेळी कल्याणचा माझा चुलतभाऊ सुद्धा दुकानात येत होता. आठवड्यातून दोनदा मी आणि दोनदा तो असे आम्ही मुंबईला जायचो. काका यादी लिहून द्यायचे. चिंचपोकळी, मस्जिद, गिरगाव; आणि अर्थातच, स्टेशनरी व्यवसायाची पंढरी म्हणजे क्रॉफर्ड मार्केटसमोरच असलेला अब्दुल रहमान स्ट्रीट. सामानाचे पंधरा-वीस किलोचे बोजे उचलून आणावे लागायचे. कॉलेजला असताना फर्स्ट क्लासचा पास होता. पण, लोकलमधून हे बोजे आणायचे तर माल डब्यातून यावं लागायचं. वडिलांनी-काकांनी हे आयुष्यभर केलं होतं; पण माझं शिक्षण आणि त्यातून तयार झालेला ‘अहं’ आड यायचा. खूप लाज वाटायची. मानसिकदृष्ट्या स्वतःशीच खूप झगडावं लागायचं. काकांना हे समजत नसेल असं नाही; पण, जाणतेपणी त्यांनी ही श्रमप्रतिष्ठा माझ्या मनात रुजवली. आईचे आणि वडिलांचे अफाट कष्ट मी पाहिले होते; पण तरीसुद्धा माझ्यात ते उतरवायला मला बरेच मानसिक कष्ट घ्यावे लागले. कदाचित आज आमचे सप्लायर जेव्हा रोज मुंबईत जाऊन अशा भरलेल्या पिशव्या घेऊन येतात, तेव्हा मी त्यांच्या कष्टांचा अधिक चांगल्या प्रकारे आदर करू शकतो.
दुसरा एक नेहमीचा आणि काही वर्षांपूर्वी मला अनेकदा अस्वस्थ करणारा अनुभव सांगतो. गेली अनेक वर्षे डोंबिवलीतील अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांची तिकीट-विक्री आमच्या दुकानातून होत असते. दुकान प्राइम स्पॉटवर असल्याने आयोजकांची आमच्याकडे सतत ये-जा असते. कॉलेजमध्ये असताना मी स्वतः अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजवल्या, जिंकल्या. तेव्हापासून अशा कार्यक्रमांची झिंग अनुभवली. त्यामुळे ही मेजवानी हवीहवीशी वाटते. पण योगायोग असा की, यातले बहुतेक कार्यक्रम रविवारी संध्याकाळी असतात. रविवार संध्याकाळी दुकानात कायम गर्दी; कारण कुटुंबासहित खरेदीला बाहेर पडण्यासाठी डोंबिवलीकर ग्राहकांना रविवार संध्याकाळ ही हक्काची. त्यामुळे चांगल्या कार्यक्रमाचे पास माझ्याकडे असूनही, अनेकदा मी स्वतः तिथे जाऊ शकत नाही. दुकान बंद करून साडेनऊच्या सुमारास भैरवी ऐकायला मिळायची. (भैरवी हा शब्द लाक्षणिक अर्थाने!) सुरवातीला याचं वैषम्य वाटायचं. आता ती खळखळ खूपच कमी झाली. काळानुरूप तसं अस्वस्थपण जाणवत नाही. अनुभवातून आलेली ही परिपक्वता असेल; पण, हे प्रत्येकाला जमेल का? 
काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला याबाबत विचारलं. त्याचा मुलगा तबला वाजवतो. साथीला जातो. त्यांना एक दुकानाचा गाळा स्वस्तात मिळत होता. मुलाला दुकान टाकून द्यावं, म्हणजे जेव्हा कार्यक्रम नसेल तेव्हा दुकानात व्यवसाय करेल, अशी कल्पना. मी त्याला प्रेमाने सांगितलं की, असा दोन दगडांवर पाय नाही ठेवता येत. गाडून घ्यावं लागतं. ती तयारी असेल तरच रिटेल दुकानाचा विचार करावा.
आणखी एक वेगळा पैलू म्हणजे गोड बोलून काम साधायची हातोटी. शिक्षणाचे फायदे होतातच. पण, मुळात माझं शिक्षण इतपत बरं आहे याची लोकांना कल्पना नसते. त्यामुळे कधी-कधी वेगळेच कसोटीचे क्षण येतात. एकदा कुणीतरी रबर स्टॅम्प बनवून घ्यायला आला. त्याचं स्पेलिंग दोन ठिकाणी चुकलं होतं. मी सांगितलं तर तो ऐकेचना! शेवटी ऑक्सफर्ड डिक्शनरी काढून दाखवली. तेव्हा त्याला पटलं. मला मुळात ही वाद घालण्याची खोड आहेच. त्यातही ‘किमान शब्दांत कमाल अपमान’ करण्याची हौस. पण, त्यातून ग्राहक तुटतो हे समजायला फार वेळ जावा लागला. स्मिता (माझी पत्नी) यावरून अनेकदा मला टोकते. माझे काही जवळचे मित्रही याबद्दल माझी टर उडवतात. या सगळ्यांच्या रेट्यामुळे माझ्यातही हळूहळू थोडे बदल झाले. कारण, तुम्हांला ग्राहकांना जे सांगायचंय, मग ते कटू का असेना, ते सगळं वेगळ्या शब्दांत सांगता येऊ शकतं, याचा मला मानसिक पातळीवर खूप सराव करावा लागला. अजूनही ते मला पुरेसं साध्य झालेलं नाही. आमचे मारवाडी,  गुजराती मित्र ज्या पद्धतीने गोड बोलून कार्यभाग साधतात, ते खरंच शिकण्यासारखं असतं. त्यांनाही राग येतो. उद्धटपणे बोलणाऱ्या कस्टमरला चार शब्द सुनवावेत, असं त्यांनाही वाटतं. हे ते खाजगीत मान्य करतात, पण तरीही ग्राहकांशी गोडच बोलतात.  हे दरवेळी आपल्याला जमेल का? कविवर्य मर्ढेकरांच्या शब्दांत सांगायचं तर -
भंगू दे काठिण्य माझे
आम्ल जाऊ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सूर तुझ्या आवडीचे
ही स्थिती यायला हवी. पण, काही गोष्टी मात्र आपल्या संस्कारातून आलेल्या असतात, त्या सोडून नाही चालत. मी अनेकदा अब्दुल रहमान स्ट्रीटवर हा अनुभव घेतला आहे. आपण एखाद्या विशिष्ट गोष्टीची चौकशी केली आणि ती वस्तू त्या दुकानात नसेल, तर ते एका झटक्यात कधीही दुसऱ्या दुकानाचं नाव सांगत नाहीत. अगदी त्यांच्या शेजारच्या दुकानात ती वस्तू मिळत असेल तरी. "हमें मालूम नहीं। आगे पूछो।" हे ठरलेलं उत्तर असतं. ही गोष्ट मात्र आम्ही कटाक्षाने टाळतो. जर एखादी वस्तू आमच्याकडे नसेल आणि मला किंवा आमच्या दुकानातल्या कुणालाही ती कुठे मिळेल हे माहीत असेल, तर आम्ही ताबडतोब तसं सांगतो. एकप्रकारे हा सगळा  learning to de-learning   या प्रक्रियेचा भाग आहे.
पन्नास वर्षांचा अनुभव घेऊन काका माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. मी चुकलो तरी त्यांनी मला निर्णय घ्यायचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं, हा त्यांचा मोठेपणा आहे. पण असे काका (नातेवाईक) प्रत्येकाला मिळाले तर तो साजरा करण्याचा दिवस असेल. पुलंच्या भाषेत सांगायचं तर, तीर्थरूपांच्या कृपेने जागा मिळाली म्हणून धंदा टाकून बघायचा, नाही जमलं की जागा विकून पैसे बँकेत टाकायचे आणि मग व्याजावर जगताना, मराठी माणूस धंदा करायच्या लायकीचा नाही, यावर व्याख्यानं देत गावभर फिरायचं. यातला गमतीचा भाग सोडून द्या. विशेषतः नोकरदार मराठी मंडळी जेव्हा व्यवसाय कसा करावा याच्या सूचना करतात, तेव्हा मला ते फारच धाडसाचं वाटतं; आणि त्यांच्या या सुप्रीम कॉन्फिडन्सला दाद द्यावीशी वाटते. कारण व्यवसाय चालवणं ही जाता-जाता करायची गोष्ट नव्हे.  त्यासाठी पाय रोवून उभं राहावं लागतं. स्वतःला गाडून घ्यावं लागतं.
आर्थिक पाठबळ हा मराठी व्यावसायिकांसाठी अनेकदा अडचणींचा विषय आहेच; पण, मानसिक तयारी हा त्याहीपेक्षा मोठा अडथळा असतो, हा माझा अनुभव आहे. आपल्यातल्या कमतरतांवर मात करत, मराठी समाजाने श्रमप्रतिष्ठा शिकून घ्यायची तयारी दाखवली, तरच हे चित्र बदलू शकेल. कोरोनामुळे अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. ‘हीच ती वेळ, हाच तो क्षण’ असं म्हणून व्यवसाय-उद्योग क्षेत्रात झोकून देण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आत्ताच ही संधी साधली तर येत्या काळात आपण स्वातंत्रवीर सावरकरांचे हे अजरामर वाक्य वेगळ्या संदर्भात सार्थ करू शकू.
की न घेतले व्रत हे
आम्ही अंधतेने
मयूरेश गद्रे
(लेखक डोंबिवलीतील ‘गद्रे बंधू’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या दुकानाचे मालक आणि चोखंदळ वाचक आहेत.)
संपर्क - ९९३०९७७७४६

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी व्यवसायिक , गद्रे बंधू , मयूरेश गद्रे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

 1. Chandrakant Chandratre

    3 महिन्यांपूर्वी

  नेमके वर्म सांगितले. ऊद्धट बोलणे मराठी माणसाच्या रक्तातून जात नाही.

 2. Sanjay Ratnaparkhi

    3 महिन्यांपूर्वी

  सुंदर लेख. मराठी माणूस चौकटीतून बाहेर पडला पाहिजे. अवकाश व्यापता येईल. डॉ. संजय रत्नपारखी

 3. Anant Tadwalkar

    3 महिन्यांपूर्वी

  सुंदर लेखन!

 4. atmaram jagdale

    3 महिन्यांपूर्वी

  छान लेख .वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen