गेल्या वर्ष-दीड वर्षांपासून मुलांचं शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. सुरुवातीला आभासी व्यासपीठांवर शिकवताना मुलांना आणि शिक्षकांना अनेक अडचणी आल्या, अजूनही येतायत. पण, आपल्या पेशाविषयी तळमळ असणाऱ्या शिक्षकांनी त्यातूनही मार्ग काढत मुलांना शिकतं ठेवलं. गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील शिक्षिका मंजुळा गाडगे-बोडके यांनी आपल्या इंग्रजी विषयाच्या संदर्भात, अशाच तळमळीने केलेले प्रयोग आणि त्याला मिळालेलं यश, याविषयी सागंणारा हा लेख –
लॉकडाऊनच्या काळात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला आणि माझ्याकडे असलेल्या पाचवी-अ आणि सहावी-अ या वर्गांना इंग्रजी हा विषय कसा शिकवायचा, हा प्रश्न मला सतावू लागला होता. वर्गात मी व विद्यार्थी यांच्यामधील संवादातून, विद्यार्थ्यांच्या बोलक्या चेहऱ्यांवरून इंग्रजीसारखा तृतीय भाषा विषय शिकवणे आनंददायी करण्याची कला मला जमली होती. पण, विद्यार्थी समोर, शेजारी नसताना आभासी माध्यमातून त्यांच्याशी संवाद कसा साधायचा? त्यांचे नवीन चेहरे कसे ओळखायचे? आणि त्या चेहर्यांवरील भाव कसे वाचायचे? इंग्रजीतून त्यांचा नि माझा सूर जुळेल का? असे अनेक प्रश्न मला सतावू लागले. पण तरी माझ्या मूळ स्वभावानुसार परिस्थितीला दोष न देता तिला स्वीकारून जिद्दीने पुढे जाण्याचा मी निश्चय केला. ऑनलाइन तर ऑनलाइन, काही हरकत नाही. आपण प्रामाणिकपणे जेवढे शक्य होईल तेवढे प्रयत्न करायचे, असे मन सांगू लागले नि ऑनलाइन इंग्रजी अध्यापनाचा मार्ग मला दिसू लागला. सर्वप्रथम मी ऑनलाइन हे माध्यम व हायर लेव्हल लँग्वेज, हा निकष लक्षात घेऊन त्यावर केंब्रिजच्या आंतरराष्ट्रीय परीक्षांवर (सदर परीक्षेची तयारी आम्ही गेली सात-आठ वर्षे करून घेत आहोत.) आधारित अभ्यासक्रम राबवण्याचे निश्चित केले. हेतू हाच की या ऑनलाइनच्या काळात विद्यार्थ्यांची श्रवणक्षमता वाढून त्यांना इंग्रजीतून बोलण्याचा सराव व्हावा.
प्रत्यक्ष अध्यापन करताना वर्ड लिस्ट, त्यावर आधारित विविध वाक्यप्रकार, मुलांच्या भावविश्वातील घटकांविषयी (घर, कुटुंब, मित्र-मैत्रिणी, सण, शाळा, घरातील वस्तू, परिसरातील पक्षी-प्राणी, फळे इत्यादी) परिच्छेद, छोटे निबंध, धडे, चित्र-वर्णन, चित्रावरून कथाकथन, असे सोप्याकडून कठीणाकडे जाण्याचे तंत्र वापरले. मुलांचे इंग्रजीसाठीचे कान तयार होणे, त्यांना इंग्रजीतून बोलता येणे, इंग्रजीचे प्रकट वाचन करता येणे, या क्षमता विकासावर मी भरपूर भर दिला होता. त्यामागचे कारण असे होते की, माझा अध्यापन क्षेत्रातील अनुभव मला असे सांगतो की, मुलांना इंग्रजी बोलण्यास शिकवले असता, त्यांना ते बोलता आल्यावर त्यांचा इंग्रजी भाषेविषयीचा न्यूनगंड नाहीसा होतो. त्यांचा आत्मविश्वास वाढतो व विषयाची गोडी लागते. तसेच, जेवढा इंग्रजी बोलण्याचा वेग व दर्जा उत्तम तेवढा लेखनाचाही वेग व दर्जा उत्तम होत जातो. एकूण काय तर, इंग्रजीतून बोलणे (spoken English) हा माझा इंग्रजी विषयासंबधीच्या नियोजनाचा व अध्यापनाचा पाया होता.
ऑनलाइन अध्यापनात जिवंतपणा येण्यासाठी गूगल जॅमबोर्ड, व्हाइट बोर्ड, स्वनिर्मित फळा (फ्रीजची काच, मोबाइल कॅमेरा, व्हाइट बोर्ड, मार्कर यांचा समन्वय साधून तयार केलेला), या तंत्रांचा वापर केला. त्यामुळे अध्ययन-अध्यापनास अनुकूल अशी वातावरण निर्मिती होत होती व मुलांच्या संकल्पनाही स्पष्ट होत होत्या. केंब्रिजच्या ऑनलाइन टेस्ट, वर्ड लिस्ट व स्टोरी-फन पुस्तकांतील धडे इत्यादींच्या व्हिडिओजद्वारे विद्यार्थ्यांना ब्रिटिश इंग्लिश श्रवणाचा आदर्श अनुभव जाणीवपूर्वक दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेसाठी अपेक्षित असे कान तयार झाले आहेत, याची मला खात्री आहे. विद्यार्थी ऑनलाइन तासिकेला जे काही इंग्रजी शिकतो, ते सर्व काही बोलून त्याची उजळणी करावी, या उद्देशाने स्पेलिंग पाठांतर, शब्द-वाक्य पाठांतर, निबंध, चित्र-वर्णन, कथाकथन, पाठवाचन, या घटकांच्या ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची अॅक्टिव्हिटी मी घेतली. त्याचा खूपच फायदा झाला. मुलांच्या जिभेला इंग्रजीचे वळण लागले. कळत-नकळत मुले व्याकरणाचे कोणतेही नियम न शिकता इंग्रजी सहज बोलू लागली. विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे, नंदादीप विद्यालयात नव्याने दाखल झालेल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या उपक्रमाला मिळाला. ही मुले त्यांना दिलेली वाक्ये, प्रश्नोत्तरे, एखाद्या घटकावर आधारित छोटी माहिती इंग्रजीतून अस्खलितपणे बोलत, सांगत होती. इंग्रजीतून बोलताना त्यांच्या चेहर्यावरचा आत्मविश्वास व आनंद स्पष्ट दिसत होता. इंग्रजीतून बोलतानाचा, प्रश्नांची उत्तरे देण्याचा व्हिडिओ तयार करण्याची त्यांनाही गोडी लागली होती. त्यामुळेच अभ्यास पाठवल्याबरोबर व्हिडिओ पाठवण्याचीही स्पर्धा सुरू व्हायची. गंमत अशी की, ज्यांना काही अडचणींमुळे दिवसभरात व्हिडिओ पाठवणे शक्य व्हायचे नाही, ती मुले रात्री अकरा-बारा वाजेपर्यंतपण व्हिडिओ पाठवून आपला अभ्यास पूर्ण करायची! विद्यार्थ्यांच्या या उत्साही प्रतिसादामुळेच त्यांचे अचूक मूल्यमापन करणे मला शक्य होऊ लागले. ह्या अॅक्टिव्हिटीच्या रूपाने पालकांनीही सक्रिय सहभाग घेतला. पालक व विद्यार्थ्यांनी या अॅक्टिव्हिटीच्या संदर्भात फोनद्वारे मला खूप चांगला अभिप्राय दिला. विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन क्लासवेळी वा सहज गप्पांमध्येही, 'बाई, आमचा असाच अभ्यास घ्या, आम्हांला तो खूप आवडतोय' असा आग्रह धरला. अर्थात, माझ्या मुलांना इंग्रजी भाषेची भीती न वाटता ती त्यांना आवडू लागली होती!
इंग्रजीच्या वर्कशीटस् वहीत सोडवणे, इंग्रजी परिच्छेद मराठीत व मराठी परिच्छेद इंग्रजीत भाषांतरीत करणे, अशा स्वरूपाचा त्यांचा लेखन सराव घेण्यात आला. भाषांतर पद्धतीचा इंग्रजी अध्यापनात मी आवर्जून वापर केला. परकीय भाषा-शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात तरी मातृभाषेचा आधार घ्यायला हवा, असे मला मनापासून वाटते. पुढे-पुढे नियोजनपूर्वक हळूहळू मातृभाषेचा वापर कमी करून, इंग्रजीतूनच विचार करण्यावर व संभाषणावर भर दिल्यास विद्यार्थ्यांना इंग्रजीची भीती वाटत नाही. आणि एकदा इंग्रजीतून व्यक्त होणे जमल्यास ते वहीवर उतरवणे सहज शक्य होते. अशा पद्धतीच्या लेखन सरावाला पाचवी-अ आणि सहावी-अ या दोन्ही वर्गांनी व्हॉट्सअॅपच्या लेखी अभ्यासातून मला उत्तम प्रतिसाद दिला. सहावी-अ या वर्गाचा लेखी अभ्यासातील प्रतिसाद तर दखल घेण्यासारखा होता. मी वर्गशिक्षक असलेल्या सहावी-‘अ’च्या एकूण विद्यार्थ्यांपैकी तीन-चार विद्यार्थी (त्यांची इतर काहीएक अडचण होती) वगळता, सर्व विद्यार्थी व्हॉट्सअॅपवरील लेखी अभ्यासाला छान प्रतिसाद देत होते.फोनद्वारे पालकांच्या सतत संपर्कात राहणे; मुलांच्या अभ्यासाविषयी त्यांचे उद्बोधन करणे; त्यांच्या अडचणी ऐकून घेणे; दिवसभरात अभ्यासाविषयी विद्यार्थ्यांचे कधीही येणारे फोन स्वीकारून, त्यांच्या शंका व अडचणी दूर करणे; या सर्व गोष्टी न कंटाळता आवडीने केल्याचा परिणाम म्हणून इंग्रजीबाबत व्हॉट्सअॅप अभ्यासाची हजेरी वाढत होतीच. त्याबरोबरीने ऑनलाइन तासिकेच्या
हजेरीचा आलेख तर दिवसागणिक अधिक वेगाने वाढत होता. वर्षाच्या शेवटी-शेवटी तो शंभर टक्केपर्यंत पोहोचला होता! ही माझ्यासाठी खूपच समाधानकारक व आनंददायी बाब होती. सुरुवातीला ऑनलाइन इंग्रजी अध्यापनासंदर्भात मला वाटणारी भीती, संकोच तर कधीच गळून पडले होते. माझ्या मुलांसोबत मीही इंग्रजीच्या नावेत बसून ऑनलाइनच्या जलप्रवासाचा आनंद अनुभवत होते! सगळ्यात महत्त्वाची व अभिमानास्पद गोष्ट म्हणजे, माझ्या वर्गातील निखिल देवकर ह्या विद्यार्थ्याने तर आपल्या इंग्रजी अध्ययनातून प्रेरणा घेऊन स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू केले आहे. आपल्याबरोबर इतर लहानग्यांनाही इंग्रजी सोपी वाटावी, त्यांना ती भाषा सहज अवगत व्हावी या प्रांजळ हेतूने सुरू केलेल्या या चॅनलचे नावही त्याने अगदी त्याच्या हेतूला साजेसे LEE (Learn English Easily) असे ठेवले आहे. त्याचा दुवा पुढीलप्रमाणे आहे - https://www.youtube.com/channel/UCnN4Y2wNrxnNEGLe1BIl0gA तो स्वतः आता मार्गदर्शकाच्या भूमिकेतून त्याच्या मित्रांना सोप्या व मनोरंजक शैलीत इंग्रजी भाषेसंदर्भात मार्गदर्शन करतो!
मंजुळा गाडगे-बोडके
संपर्क - ८४२४०१९५८९
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात इंग्रजी विषयाच्या शिक्षिका आहेत.)...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रयोगशिल इंग्रजी शिक्षण
, इंग्रजी विषय
, माध्यमिक शिक्षण
, मंजुळा गाडगे-बोडके
, मराठी अभ्यास केंद्र
Dr. Anuradha Deshpande
4 वर्षांपूर्वीखूप छान माहिती मिळाली
Kiran Joshi
4 वर्षांपूर्वीग्रेट! हार्दिक सदिच्छा!👍🙏
Sudam Kumbhar
4 वर्षांपूर्वीA very good attempt !! Keep it up.🙏🙏 My suggestion...Once in a week try to conduct a period of English in English. Strictly avoid use of mother tongue. Let the children be habitual to the instructions that they hear every day. e.g.... open your book at page no...... Can you do this ? Repeat after me.... Have you understood ?....etc. Overall an excellent attempt 💐💐
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वीखूपच उपयोगी आणि महत्वपूर्ण लेख , आपला अनुभव share केल्याबद्दल धन्यवाद मॅडम.
Sucheta Mane
4 वर्षांपूर्वीखूप सुंदर प्रयत्न मॅडम. आणि त्याला मिळालेलं सुंदर यश. गोडी निर्माण करता येणं गरजेचं. ते तुम्ही केलं. मुलं छान इंग्लिश शिकली. सर्व शिक्षकांनी अनुकरण करावे असा उपक्रम.