“शिक्षक नोट्स लिहून देत आहेत आणि विद्यार्थी त्या उतरवून घेत आहेत असा प्रकार या शाळांमधून दिसून आला नाही. शिक्षक मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसले. मुले ग्रंथालयात जाऊन संदर्भग्रंथ वाचतात, इंटरनेटवरून माहिती मिळवतात.” गोरेगाव मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे यांचा अमेरिकेतील शालेय शिक्षणाची अभ्यासपूर्ण मांडणी करणाऱ्या लेखमालेतील हा पाचवा भाग.
...
गुणवत्तादायी शिक्षण देणाऱ्या जगातील काही मोजक्या देशांत अमेरिका अग्रस्थानी आहे. यामागचे कारण म्हणजे, तेथील शैक्षणिक धोरण आणि शाळांमधील सुविधांबरोबरच त्यांनी जाणीवपूर्वक जोपासलेले ‘क्लासरूम कल्चर’ आहे. अमेरिकेतील शिक्षणप्रणाली मुख्यत: विद्यार्थीकेंद्री आहे; त्यामुळे वर्गात विद्यार्थ्यांच्या सहभागाला अतिशय महत्त्व दिले जाते. अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील ‘सॉक्रेटीसचे मॉडेल’ इथे अक्षरश: अनुभवायला मिळते. वर्गात होणाऱ्या चर्चांमध्ये जास्तीत-जास्त विद्यार्थी सहभागी होऊ शकतील, या दृष्टीने शिक्षक पाठांचे नियोजन करतात. वर्गातल्या या चर्चा नीरस आणि कंटाळवाण्या होणार नाहीत, याची काळजी घेतली जाते. वर्गामध्ये स्मार्ट बोर्ड, व्हाइट बोर्ड, ओव्हरहेड प्रोजेक्टर, डॉक्युमेंट कॅमेरे, संगणक, इंटरनेट, यांसारखे अद्ययावत तंत्रज्ञान शिक्षकांना उपलब्ध आहे. शिक्षकही या तंत्रज्ञानाचा अतिशय प्रभावीपणे वापर करतात. शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही टेक्नोसॅव्ही असल्याचे जाणवले.
अमेरिकेतल्या शाळा भेटीदरम्यान अमेरिकन संशोधक हॉवर्ड गार्डनर यांच्या ‘बहुविध प्रज्ञा सिद्धांता’चा प्रत्यक्ष वापर पाहायला मिळाला. या प्रकारच्या पाठनियोजनामध्ये भरपूर प्रमाणात कल्पक आणि उपक्रमशील कृतींचा समावेश असतो. शिक्षक बोलत आहेत आणि विद्यार्थी श्रोत्यांच्या भूमिकेत आहेत, असे चित्र जवळपास कुठेही दिसले नाही. अध्यापन सुरू असताना वर्गात शिक्षक-विद्यार्थी यांच्यात सतत संवाद सुरू असतो. वर्गातील वातावरण अगदी मोकळेढाकळे असते. शिक्षक मुलांबरोबर मित्रांसारखे वागतात. थेट आणि मोकळेपणाने बोलण्याचा संस्कार अमेरिकन कुटुंबात केला जात असल्याने मुलेही वर्गात आपल्या शिक्षकांना प्रश्न विचारताना दिसली. शिक्षकही मुलांच्या मताचा आदर करतात; त्यांना स्वत:ला व्यक्त करावे, यासाठी प्रोत्साहन देतात. मुख्य म्हणजे, एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकाचे म्हणणे पटले नाही आणि ते त्याने शिक्षकांना नम्रपणे सांगितले तर शिक्षकही शांतपणे त्या विद्यार्थ्याचे मत ऐकून घेतात. वर्ग अध्यापनात सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांनी शंका विचारणे अपेक्षित असते. मुलांनी शंका विचारल्या नाहीत किंवा ती शांत बसून राहिली तर आपल्या अध्यापनात दोष आहे, असे इथले शिक्षक मानतात. त्यामुळे वर्ग अध्यापनात शंका निरसनाला महत्त्व दिले जाते.
शिक्षक नोट्स लिहून देत आहेत आणि विद्यार्थी त्या उतरवून घेत आहेत असा प्रकार या शाळांमधून दिसून आला नाही. शिक्षक मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसले. मुले ग्रंथालयात जाऊन संदर्भग्रंथ वाचतात, इंटरनेटवरून माहिती मिळवतात. शिक्षक आणि समवयस्क मित्रांबरोबर चर्चा करतात. अमेरिकन शिक्षणप्रणालीमध्ये घोकंपट्टीला स्थान नाही. या प्रणालीत स्वयंअध्ययनासाठी मुलांना सातत्याने प्रेरित केले जाते.
विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अनेक प्रकारांनी केले जाते. लेखी आणि तोंडी परीक्षा या पारंपरिक मूल्यमापन पद्धतींबरोबरच प्रकल्प, प्रश्नमंजूषा, वादविवाद, वैयक्तिक आणि गटांनी केलेले सादरीकरण, वर्गात होणाऱ्या चर्चा आणि वेगवेगळ्या उपक्रमांतील विद्यार्थ्यांचा सहभाग, या बाबींना मूल्यमापनात महत्त्वाचे स्थान आहे. विशेष म्हणजे, मूल्यमापनाची ही प्रक्रिया वर्षभर सुरू असते. काही उपक्रमांत तर विद्यार्थी परस्परांचे मूल्यमापन करतात.
अमेरिकेतील क्लासरूम कल्चर हे खऱ्या अर्थाने खूप वेगळे आहे. हे वेगळेपण कल्पक आणि प्रयोगशील शिक्षकांमुळे जोपासले गेले आहे, हेही तितकेच खरे आहे. या संदर्भातील काही उदाहरणे देता येतील.
एका शाळेत स्पॅनिश विषय शिकवणाऱ्या शिक्षिकेने मुलांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ तयार करायला सांगितले होते. हे खाद्यपदार्थ मुलांनी स्वत: त्यांच्या घरी करणे अपेक्षित होते. मुलांनीही बर्गर-पिझ्झापासून ते केकपर्यंत वेगवेगळे पदार्थ तयार करून शाळेत आणले होते. वर्गात प्रत्येक मुलाला त्याने केलेल्या खाद्यपदार्थाच्या संदर्भात स्पॅनिश भाषेतून सादरीकरण करायला सांगण्यात आले होते. त्यासाठी चार-पाच मिनिटांचा अवधी प्रत्येकाला देण्यात आला होता. या सादरीकरणामध्ये मुले खाद्यपदार्थ कसा केला आणि तो करत असताना आपल्याला काय अनुभव आले, हे सांगत होती. वर्गातली इतर मुले त्यांना प्रश्न विचारत होती आणि आणलेल्या पदार्थाचा अधूनमधून आस्वादही घेत होती. एका मुलाच्या वडिलांनी खाद्यपदार्थ करताना व्हिडीओ शूटिंग केले होते. हे शूटिंग वर्गात दाखवण्यात आले. या सगळ्या उपक्रमातून मुलांना प्रत्यक्ष कृती करण्याचा अनुभव तर मिळालाच; शिवाय स्पॅनिश भाषेतून बोलणे बंधनकारक असल्याने प्रत्यक्ष भाषेचाही वापर झाला. हे उपक्रम मुलांना आवडले असल्याने वर्ग नियंत्रणाचा प्रश्न निर्माण झाला नाही.
शाळांमध्ये मुलांना असे अनेक कल्पक उपक्रम दिले जातात. या उपक्रमांसाठी विषय निवडतानाही ते मुलांना आवडतील असे आणि त्यांची क्षमता लक्षात घेऊन दिले जातात.
एका शिक्षिकेने वर्गातील मुलांना त्यांच्या पसंतीच्या देशाची माहिती पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशनच्या मदतीने द्यायला सांगितली होती. हे प्रेझेन्टेशन दाखवताना आपण विशिष्ट देश का निवडला आणि हे देश त्याच्या कोणत्या वैशिष्ट्यांमुळे अमेरिकेपेक्षा कसे वेगळे आहेत, हे मुलांनी सांगितले. मुलांना या तासाला वेगवेगळ्या देशांची माहिती तर मिळालीच, पण पुस्तकात नसलेल्याही अनेक गोष्टी समजल्या.
अमेरिकेतल्या शाळांमधील वर्गाचे दरवाजे आणि खिडक्या आतून बंद असले तरी वर्गात मात्र तो बंदिस्तपणा नाही. मुलांच्या वर्गातील वावरावर जाचक वाटतील अशी बंधने नाहीत. मुलांना हवे तिथे ती बसू शकतात, अध्यापन सुरू असताना तहान लागली तर पाणी पिऊ शकतात, भूक लागली तर डबा खाऊ शकतात. हा मोकळेपणाच अमेरिकेच्या ‘क्लासरूम कल्चर’चे वेगळेपण दाखवून देतो. अर्थात, लोकशाहीची तत्त्वे कसोशीने पाळणारे शिक्षक आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग करणारे विद्यार्थी, हे दोघेही तिथले हे ‘मोकळे’ क्लासरूम कल्चर जोपासण्यास सक्षम आहेत, यात शंका नाही.
(समाप्त)
मच्छिंद्र बोऱ्हाडे
[email protected]
(लेखक गोरेगाव मुंबई नंदादीप विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत.
पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
अमेरिकन शिक्षण
, जीवनकेंद्री शिक्षण
, मच्छिंद्र बोऱ्हाडे
, मराठी अभ्यास केंद्र
भाषा
निशिकांत tendulkar
4 वर्षांपूर्वीकित्ती आनंदी शिक्षण!