बेळगावच्या ऋणातून मुक्त


बेळगाववर प्रचंड प्रेम करणारे आणि बेळगावकरांचं प्रचंड प्रेम लाभलेले बॅरिस्टर नाथ पै, त्यांच्या मृत्यूआधी एक दिवस हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात बोलले होते, ते हे भाषण. संसदेच्या व्यासपीठावर सीमाप्रश्नासाठी आवाज उठवणारा प्रगल्भ वक्ता आपल्या प्रकृतीची हेळसांड न करता, तर सीमाप्रश्नाची चार पावलं वेगानं पडली असती...
मित्रांनो, मी आज तुमच्याशी मनमोकळेपणाने बोलणार आहे. भावनात्मकदृष्ट्या मी बेळगावच्या प्रश्नाशी जेवढा निगडित आहे, तेवढा दुसऱ्या कोणत्याही प्रश्नाशी नाही. बेळगावच्या मातीतच मी वाढलो. तेथील जनतेने मला पोसले, वाढवले, मोठे केले. अनेक वर्षांनंतर मी आपल्याशी बोलत आहे. आपण सीमाप्रश्नाकरता जो लढा दिला, त्याला महाराष्ट्राच्या इतिहासात तोड नाही. महाराष्ट्रासाठी, मराठी भाषेसाठी तुम्ही मोठे कार्य केले आहे. एवढे एकच वर्ष तुम्हाला कसोटीचे जाणार आहे. यावेळी तुम्ही साऱ्यांनी आपापसांतील मतभेद विसरून एकदिलाने काम केले पाहिजे. बेळगावमधील ऐक्य, निश्चय, उमेद, तोल टिकून राहिला पाहिजे.
सीमेच्या प्रश्नावर सेनापती बापट यांचे उपोषण चालू होते आणि त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर बनत चालली होती. शेवटी त्यांना रक्तस्राव होऊ लागला आणि त्यांनी मला बोलावणे पाठवले. मी गेलो. सेनापतींच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. जवळच असलेल्या सहकाऱ्यांकडून सेनापतींनी हार मागवून घेतला आणि माझ्या गळ्यात हार घालून सेनापतींनी आशीर्वाद दिला. ते म्हणाले, “देशसेवेसाठी तुम्हांला उदंड आयुष्य लाभो!" माझ्या आयुष्यातील अत्युत्कट सुंदर असा एखादा क्षण असेल, तर तो हाच. मी ह्या सन्मानापुढे भारतरत्न, पद्मभूषण आदि पदव्या क:पदार्थ मानतो.
महाजन आयोगाला माझा विरोधच होता. तेव्हा लोकांनी मला दूषणे दिली. “नाथ, तू तरुण आहेस. तुझ्या हट्टापायी अनेकांचे प्राण धोक्यात येण्यासारखे आहेत. तू हट्ट सोडून दे. सध्या जे पदरी प्राप्त होण्यासारखे आहे, त्याचा स्वीकार करू या.” माझा विरोध होता तो महाजन आयोगाच्या बिनबुडाच्या स्थापनेसाठी! कालमर्यादा न ठेवता, प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीच तत्त्वे निश्चित न करता आयोग, कमिट्या, मंडळे नेमण्याला माझा विरोध होता, आजही आहे. अशी बिनआधाराची मंडळे जनतेची फसवणूक करणारे, जनतेला अडकवून ठेवणारे सोनेरी पिंजरेच आहेत!
लोकसभा विसर्जित केव्हा करायची याची खात्री सरकारी पक्षाला होती आणि कुमुहूर्त साधून लोकसभेपुढे महाजन अहवाल आला. लोकसभेवर म्हैसुरी प्रतिनिधींचा चौफेर हल्ला चालू होता. लोकसभा आपल्याकडे वळवून घ्यावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. सुंदर नक्षीदार अशा चंदनी चकत्या वाटण्यात आल्या. खुशबूचे वातावरण होते. मी सहज म्हणालो, “सुवासिक चंदनी चकत्यांचा वास घेता-घेता महाजन अहवालाची दुर्गंधी दूर करू या."
बेळगावच्या प्रश्नावर मी अधिक लक्ष देतो, म्हणून मला परावृत्त करण्याचा प्रयत्न होई. 'तुम्ही अखिल भारतीय नेते. तुम्ही स्थानिक प्रश्नांत गुंतू नये.' मी म्हणे, 'बेळगावच्या स्थानिक प्रश्नासाठी मी झगडत नाही, तर स्थानिक प्रश्नाच्या स्वरूपात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध झगडत आहे.' बेळगावसाठी हौतात्म्य पत्करणे याचाच अर्थ अन्यायाविरुद्ध लढता-लढता हौतात्म्य पत्करण्यासारखे आहे. बाबू गेनू, मारुती बेन्नाळकर यांचे हौतात्म्य हे असे अखिल भारतीय स्वरूपात आहे.
महाजन अहवाल लोकसभेपुढे आला. दुपारचा एक वाजला होता. एक वाजून पाचच मिनिटांनी अहवालासंबंधी पाठवलेले दोन ठराव चर्चेसाठी घेण्याचे सभापतींनी घोषित केले. म्हैसूरच्या सदस्यांनी आकांडतांडव केले. सरकार व नाथ पै यांचे मेतकूट जमले आहे, असेही ते म्हणाले. मी त्यांना म्हणालो, “मित्रांनो, तुम्हाला लोकसभेचे कामकाज माहीत असते, तर तुम्हांलाही अशा प्रकारचे ठराव पाठवता आले असते." लोकसभेचा मुहूर्त साधावा लागतो, लोकप्रतिनिधींना सतत जागृत राहावे लागते. शरसंधान करावे लागते. खेडे, भाषा, सलगता आणि लोकेच्छा या तत्त्वांच्या आधारावर सीमाप्रश्न सोडवला जावा, असे या लोकसभेला वाटते, अशा स्वरूपाची सूचना मी लोकसभेपुढे मांडली. संघटना काँग्रेस पक्षाखेरीज अन्य साऱ्या पक्षांनी माझ्या सूचनेला अनुमती दर्शवली.
देशाची पाळणी करून सत्ता मिळवणाऱ्यांनी बेळगावच्या फाळणीचा बेत आखला. मी कसून विरोध केला. अखेर फाळणीची योजना उडवून लावण्यात आम्ही यशस्वी झालो. पार्लमेंटरी कमिटी नेमण्याचा बूट निघाला. त्यालाही विरोध केला, कारण नव्या सापळ्यात सीमाभागातील जनता अडकू नये, असे मला वाटले.
भारताच्या स्वातंत्र्यावर आघात झाला तर तळमळणारा आणि स्वातंत्र्यरक्षणासाठी पुढे होणारा तोच मराठी माणूस होय! या पिढीचा सर्वात थोर वारसा आहे भारताचे ऐक्य राखण्याचा! या वारशाला तडे जाऊ देता कामा नयेत. कन्नड भाषा, कर्नाटक यांच्याशी आमचे भांडण नसून आमचे भांडण त्यांच्या नेत्यांशी आहे, त्यांच्या धोरणाशी आहे. माझ्याविरुद्ध कोण आहे याचा मी विचार करत नाही. माझ्या पाठीशी कोण उभे आहेत, किती उभे आहेत याचाच मी विचार करतो; तेच माझे सामर्थ्य आहे!
श्री. हळ्ळीकेरी हे विधानपरिषदेचे अध्यक्ष आहेत. ते एका विद्यापीठाचे उपकलगुरू आहेत. उपकुलगुरू कसा पाहिजे? सुसंस्कृत, सुविद्य, संयमी! आणि श्री हळ्ळीकेरी फुटीर भाषा काढत आहेत. ‘बेळगाव महाराष्ट्रात गेले, तर आम्ही भारतातून फुटून निघू', अशी भाषा ते करत आहेत. भारतातून फुटून निघण्याची शेख अब्दुल्ला, मिर्झाबेग ही मंडळी अशीच भाषा वापरतात. त्यांच्याचप्रमाणे हळ्ळीकेरींवर कारवाई करा; त्यांना बंदिस्त ठेवा.
सीमाप्रश्नाचा निर्णय लागावा म्हणून गेली १४ वर्षे आपण प्रदीर्घ लढा दिला. साराबंदीचाही आपण प्रयोग केला. साराबंदीचा प्रयोग सहजासहजी वापरता येत नाही. त्याला दीर्घ तयारी लागते, जनाची आणि मनाची. त्यासाठी लोकांनी प्रचंड आंदोलन खडे केले. मीही लढ्यात भाग घेतला. खेड्यात गेलो. आमची जीपच जप्त करण्यात आली. पोलिसांनी खेड्याला वेढा घातला होता. हातात संगिनी होत्या. मला पोलिसांनी अडवले. मी चौकशी केली, तर ‘वरचा हुकूम आहे' असे मला सांगण्यात आले. मी म्हणालो, “मला भारतमातेचा हुकूम आहे." पोलिसांचे नेतृत्व विदेशी पोलिस अधिकाऱ्यांकडे होते. मी म्हणालो, “लोकांना मारू नका." त्या वेळी त्याने माझ्यावर काठी उगारली. मी कोण आहे हे मी त्याला सांगितले. “मी खासदार आहे. सौजन्य दाखव. काठी काय उगारतोस?" त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला आवरले. पोलिस बायकामंडळींकडून चहा-पाण्याची सोय करून घेत होते, इतके ते हीन वृत्तीचे होते. आमची भांडणे जरूर आहेत, म्हणून अधिकाऱ्यांनी भारतीयत्व विसरावयाचे? सीमाप्रश्नाबाबत झगडत असताना राष्ट्रीय दृष्टिकोन कुणीही टाकू नये. कटुता, वैरभाव नको. स्वकीयांवर पोलिस शस्त्रे उगारतात, हे स्वतंत्र भारताला शोभत नाही. लष्कर-पोलिस स्वकीयांविरुद्ध वापरण्यासाठी नसून, ते चीन-पाकिस्तान अशा आक्रमकांविरुद्ध वापरण्यासाठीच असायला पाहिजे. सीमाप्रश्नाच्या बाबतीत पार्लमेंटचे मत मी महाराष्ट्राच्या बाजूला वळवू शकेन, असा मला विश्वास वाटतो; कारण सीमेचा प्रश्न हा न्यायाचा आहे, नीतीचा आहे, धर्माचा आहे. अखेर न्याय-नीतीचाच जय होतो, असा इतिहासाचा दाखला आहे. दक्षिण रत्नागिरीत मला केवढाही विरोध झाला, तरी तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी विजयी होईन, अशी मला उमेद आहे. मित्रांनो, मी तुम्हांला अभिवादन करतो.
जय हिंद! जय महाराष्ट्र!!
बॅ. नाथ पै
(संपादक डॉ. दीपक पवार यांच्या ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ या पुस्तकातून साभार. मूळ पुस्तक : लोकशाहीची आराधना – संपा. वासू देशपांडे)

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कर्नाटक सीमाप्रश्न , ‘महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद : संघर्ष आणि संकल्प’ , लोकशाहीची आराधना , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Jayashree patankar

      2 महिन्यांपूर्वी

    भाषण छानच आहे.तळमळ दिसते. दीपक पवारांचा नंबर मिळेल काय.वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen