उपक्रमशील शिक्षणाची डिजिटल चळवळ - झेडपी लाइव्ह


लॉकडाऊन काळात शाळा घरीच भरू लागली आणि मुलांचा ऑनलाइन अभ्यास सुरू झाला. विद्यार्थ्यांची या  ऑनलाइन शाळेतील उपस्थिती  मात्र इंटरनेटच्या हातात होती. ज्याच्याकडे स्मार्टफोनसह इंटरनेटची सोय, तो शाळेत हजर आणि ज्याच्याकडे स्मार्टफोन असूनही इंटरनेट नाही, तो गैरहजर. इंटरनेट अभावी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणप्रवाहापासून दूर होऊ लागले.  म्हणूनच औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षक मित्रांनी विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन अभ्यासासाठी उपक्रमशील शिक्षणाची डिजिटल चळवळ उभी केली. ही चळवळ नेमकी कशी उभी राहिली हे वाचकांपर्यंत पोहोचवतायत विशालाक्षी चव्हाण-
विद्यार्थ्यांना मनापासून शिकवण्याची तळमळ आणि नवे तंत्रज्ञान यांची सांगड घालत, जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षक मित्रांनी गाठलाय ऑनलाइन शिक्षणातील एक नवा पल्ला. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची मुलांना शिकवण्याची तळमळ महाराष्ट्राला काही नवीन नाही. त्यातच श्री. गजेंद्र बोंबले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एकोडतांडा औरंगाबाद आणि  नितीन अंतरकर जिल्हापरिषद प्राथमिक शाळा, सालूखेडा औरंगाबाद या दोन शिक्षक मित्रांनी एकत्र येऊन, प्राथमिक आणि माध्यमिक गटांतील विद्यार्थ्यांसाठी आणि पर्यायाने शिक्षकांसाठीही मोफत शिक्षण देणारे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
२०२० साली कोरोना आला आणि घरातच ऑनलाइन शाळा सुरू झाली.  त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रातली सगळीच गणितं बदलली. शहरी भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटसेवा सहज उपलब्ध असल्याने त्यांना सहजरीत्या शिक्षण मिळत होते, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तीन ते पाच किलोमीटर दूरवर जाऊन, इंटरनेट उपलब्ध होईल अशा ठिकाणी पोहोचून, ऑनलाइन वर्गात हजर राहावे लागत होते. यावर उपाय म्हणून काय करता येईल याचा विचार करत असताना, ग्रामीण भागातील परिस्थितीचा जवळून अनुभव घेतलेले गजेंद्र बोंबले सर आणि नितीन अंतरकर सर यांना एक भन्नाट कल्पना सुचली. ती कल्पना म्हणजे, पाठ्यपुस्तकातील  पाठ हे यूट्युबवर लाइव्ह घ्यावेत आणि आपल्यासारख्या संपूर्ण महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांना एकत्र करून, सर्वांसाठी तासिका तयार कराव्यात. आणि मग सुरू झाली ‘नव्या उपक्रमशील शिक्षणाची चळवळ’. टाळेबंदीच्या कालावधीत २७१ दिवस सलग लाइव्ह सत्रे घेऊन, पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडीओ आपसूक तयार झाले. मग हे व्हिडिओ ‘झेडपी लाइव्ह एज्युकेशन’ नावाच्या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आले. हे अॅप मोफत असून https://play.google.com/store/apps/details?id=in.ekatta.zpeducation  यातील व्हिडीओ ऑफलाइनदेखील उपलब्ध आहेत. जेणेकरून महाराष्ट्रातील ग्रामिण भागात जिथे इंटरनेट उपलब्ध नाही अशा ठिकाणच्याही शिक्षकांना आणि  पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक व्हिडीओ पाहता येतील. हे व्हिडीओ यूट्युबवर पाहण्यासाठीचा दुवा : https://www.youtube.com/channel/UCAMzUS-PSuU6dHLAQaO7SYw
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे, हा सगळा उपक्रमशील शिक्षणाचा घाट एकही रुपया न घेता विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याविषयी गजेंद्र सर आणि नितीन सर यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. पण त्यांच्या या संकल्पनेची तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या ‘इ-कट्टा इन्व्हेस्टर्स एलएलपी’ या संस्थेचेही आभार मानावे लागतील; कारण या संस्थेने ‘झेडपी लाइव्ह एज्युकेशन’ हे अॅप पूर्णतः मोफत तयार करून दिले आहे. आणि कोणत्याही तांत्रिक गडबडीशिवाय हे अॅप विद्यार्थ्यांपर्यंत मातृभाषेतून शिक्षण पोहोचवण्यास तत्पर आहे.  
झेडपी लाइव्ह एज्युकेशन अॅपची वैशिष्ट्ये :
पाठांचे दर्जेदार, संपूर्ण मूल्यमापनासह सादरीकरण
पाठ सादरीकरण व्हीडीओ, शैक्षणिक साहित्य, प्रत्यक्ष कृती. आणि पाठ अधिक मनोरंजक व दर्जेदार होण्यासाठी पीपीटी स्लाइडसचा  सुंदर वापर.
महाराष्ट्रातील ५००हून अधिक शिक्षकांनी एकत्र येऊन पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विषयांचा अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे.
शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम, सरावपत्रिका उपलब्ध.
२१वे शतक तंत्रज्ञानाचे आहे, यात रोबोटिक्स आणि कोडिंग खूप महत्त्वाचे आहे. यासाठी या दोन्ही विषयांतर्गत अभ्यासू शिक्षकांनी एकत्र येऊन घेतलेली सत्रे येथे उपलब्ध आहेत.
विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता यावे म्हणून स्पोकन इंग्लिशचे वर्ग.
मराठी संबोध, गणित संबोध, इंग्रजी संबोध यांचा वापर.
बोधकथांच्या माध्यमातून मुलांसाठी रंगतदार गोष्टी उपलब्ध.
अभ्यासक्रमाव्यतिरिक्त ‘गंमत शाळेत’ अनेक विषय घेऊन आपल्या पारंपरिक सण-उत्सवांच्या वेळी सजावटीसाठी लागणारे साहित्याचे कृती वर्ग :
गणेश चतुर्थी या सणांतर्गत गणेश मूर्ती बनवणे, मखर सजावट
दिवाळीनिमित्त आकाश कंदील बनवणे, रांगोळी काढणे, पणती सजावट
चित्रकला विषयांतर्गत वारली चित्रकला, निसर्ग चित्रकला, दगड चित्रकला, इमोजी चित्रकला इत्यादी विषयांवरील वर्ग उपलब्ध.
बुद्धीबळ : संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या मागणीचा विचार करून, आतापर्यंत तीन सत्रे बुद्धिबळ या विषयावर घेण्यात आली आहेत आणि पुढेही अशी सत्रे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
शून्य खर्च विज्ञान प्रयोग : या घटकांतर्गत कोणताही खर्च न करता मुलांना विज्ञानाचे विविध प्रयोग कसे करता येतील, याचे संपूर्ण मार्गदर्शन वर्ग.
मेंदू विकासासाठी ‘रुबिक क्युब’सारख्या खेळाविषयी मार्गदर्शनपर वर्ग उपलब्ध.
बडबडगीते व कविता गायन याबाबतीत कलाविषयक प्रवीण शिक्षकांकडून वर्ग उपलब्ध.
सद्यःस्थितीत संगणकाचे ज्ञान विद्यार्थ्यांना असणे खूप गरजेचे आहे, हे ओळखून संगणक ओळख, वापर याबाबतचे पाठ उपलब्ध.
हसत-खेळत गणित शिक्षण उपक्रम.
इयत्ता चौथीसाठी ‘शिवरायांचा इतिहास’ गप्पा आणि गोष्टींच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष सत्रांचे व्हिडीओ.
मातृभाषेतील शिक्षणाबरोबरच विदेशी भाषाही विद्यार्थ्यांसाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत, हे ओळखून जर्मन व जपानी भाषा मराठीतून शिकविण्याचे वर्ग या अॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याबद्दल विचारले असता नितीन अंतरकर सर  यांनी असे सांगितले की, “ऑनलाइनच्या माध्यमातून जग वेगाने जवळ येऊ लागले आहे; त्यामुळे मराठी, हिंदी इंग्रजी यांसहित एखादी विदेशी भाषाही विद्यार्थ्यांना सहजरीत्या बोलता यायला हवी. जपान हे तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करणारे एक मुख्य राष्ट्र आहे. तिथे प्रगतशील तंत्रज्ञान तर आहेच, तसेच संपूर्ण जगाला नवी दिशा देणारे नवनवीन प्रयोगही तिथे केले जातात. आणि हे तंत्रज्ञान आपल्या भारतात आणायचे असेल, ते समजून घ्यायचे असेल तर जर्मन व जपानी भाषा आत्मसात करावी लागेल. भारतात उदयाला येणाऱ्या टेक्नोसॅव्ही पिढीची ही नांदी आहे. आज आपण आपल्या घरात बसून जगभरात कुठेही व्हिडीओच्या माध्यमातून बैठकीला आणि चर्चासत्राला उपस्थित राहू शकतो.”
‘सुदंर अक्षर हाच खरा दागिना’ हा सुविचार महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेच्या भिंतीवर रंगवलेला दिसतो.  हस्ताक्षर सुंदर असावे म्हणून जिल्हापरिषदेच्या शाळेतील शिक्षक नेहमीच कार्यशील असलेले दिसून येतात.  म्हणूनच टाळेबंदीच्या काळातील मोकळ्या वेळेचा उपयोग करत  विद्यार्थ्यासाठी कॅलीग्राफी व सुंदर हस्ताक्षराच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचेही व्हिडीओ झेडपी लाइव्ह ऍपवर तसेच यूट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत.  या कार्यशाळेचा
नवोदय परीक्षेच्या सराव पत्रिकेचे आयोजन :
जवाहर नवोदय विद्यालयामार्फत दरवर्षी नवोदय परीक्षा घेतल्या जातात. या वर्षी ही परीक्षा ११ ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा सराव व्हावा म्हणून झेडपी लाइव्ह एज्युकेशन अॅपच्या माध्यमातून ‘तयारी नवोदय परीक्षेची’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १० ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

या परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठीही अॅपवर अभ्यासक्रमाचे व्हिडीओ उपलब्ध आहेत. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसेही जिंकता येणार आहेत.
विशालाक्षी चव्हाण
[email protected]

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


उपक्रमशील शिक्षण , जिल्हापरिषद शाळा , प्रयोगशील शिक्षण , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Jayashree patankar

      4 वर्षांपूर्वी

    छान उपक्रम.

  2. Prashant Varadkar

      4 वर्षांपूर्वी

    महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांचे किंवा इतरही मराठी माध्यमातील शिक्षक हे सध्या विद्यार्थ्यांसाठी नाविण्यपूर्ण उपक्रम राबवताना दिसतात. झेडपी लाइव्ह ऍप हा मराठी विद्यार्थ्यांसाठी आणि पर्यायाने इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त ठरेल.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen