"नवीन शैक्षणिक धोरणातील शिफारशीनुसार अनेक भारतीय भाषांतून अभियांत्रिकी शाखेतील शिक्षण देण्याचा निर्णय राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनानेही अभियांत्रिकी विद्याशाखेतील उच्च शिक्षण मराठीतून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा अन्य विज्ञानाधारित विषयांचे अभ्यासक्रम शिकण्या-शिकवण्यासाठी जो आशय (content) निर्माण करावा लागेल; त्या आशयात मराठी तांत्रिक शब्दांसह मराठी वाक्ये असावीत किंवा अमराठी तांत्रिक शब्दांसह मराठी वाक्ये असावीत, असे दोन पर्याय चर्चेत आहेत. यातील पहिला पर्याय हा लांबचा, थोडासा कष्टाचा, अवघड भासणारा मार्ग आहे. दुसरा पर्याय सहजसाध्य, कमी कष्टाचा, सोपा वाटणारा मार्ग आहे. पहिल्या मार्गाने गेल्यास हे उच्च शिक्षण खरोखरच मराठीतून देता-घेता येईल. दुसरा मार्ग स्वीकारल्यास ते मराठीतून दिले-घेतलेले उच्चशिक्षण नसेल; तसेच भाषिक अनागोंदी वाढण्यास ते कारणीभूत ठरेल."मराठी उच्च शिक्षणातील परिभाषेविषयी विचार मांडणारा अनिल गोरे यांचा लेख.
महाराष्ट्र शासनाने अभियांत्रिकी विद्याशाखेतील उच्च शिक्षण मराठीतून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या विद्याशाखेतील अभ्यासक्रम शिकताना तांत्रिक शब्द वापरले जातील. हे तांत्रिक शब्द मराठी शब्द असावेत की आजवर रुळलेले इंग्लिश समजले जाणारे अमराठी शब्दच असावेत, याबाबत मतमतांतरे आहेत. पुढील काळात वैद्यकीय तसेच शेकडो विज्ञानाधारित विषयांचे उच्च शिक्षणदेखील मराठीतून उपलब्ध होईल.
उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा अन्य विज्ञानाधारित विषयांचे अभ्यासक्रम शिकण्या-शिकवण्यासाठी जो आशय (content) निर्माण करावा लागेल; त्या आशयात मराठी तांत्रिक शब्दांसह मराठी वाक्ये असावीत किंवा अमराठी तांत्रिक शब्दांसह मराठी वाक्ये असावीत, असे दोन पर्याय चर्चेत आहेत. यातील पहिला पर्याय हा लांबचा, थोडासा कष्टाचा, अवघड भासणारा मार्ग आहे. दुसरा पर्याय सहजसाध्य, कमी कष्टाचा, सोपा वाटणारा मार्ग आहे. पहिल्या मार्गाने गेल्यास हे उच्च शिक्षण खरोखरच मराठीतून देता-घेता येईल. दुसरा मार्ग स्वीकारल्यास ते मराठीतून दिले-घेतलेले उच्च शिक्षण नसेल; तसेच भाषिक अनागोंदी वाढण्यास ते कारणीभूत ठरेल.
सोप्या वाटणाऱ्या दुसऱ्या मार्गाचे आकर्षण अधिक प्रमाणात आहे. मराठी तांत्रिक शब्दांबाबत एक अनामिक भीती बहुतेकांच्या मनात आहे. मराठी तांत्रिक शब्द अवघड आणि बोजड आहेत, अशी सार्वत्रिक समजूत आढळते. उच्च शिक्षण घेण्याचे भाषा माध्यम आणि शिक्षणानंतरच्या नोकरी, व्यवसाय यात वापरली जाणारी भाषा वेगळी असल्यास, व्यावसायिक कारकिर्दीत प्रचंड अडचणी येतील, अशी भीतीही मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे.
तांत्रिक मराठी शब्द अवघड आहेत ही समजूत म्हणजे केवळ गैरसमजूत आहे. मराठीच काय, पण कोणत्याही भाषेतील शब्दांचे मुळात अवघड शब्द आणि सोपे शब्द असे वर्गीकरण होतच नाही. शब्दांचे वर्गीकरण अगोदरपासून परिचित शब्द किंवा अपरिचित शब्द अशा दोनच वर्गात होऊ शकते. परिचित शब्द सोपे भासतात आणि अपरिचित शब्द अवघड भासतात. शब्दांचा उच्चार, शब्दांचे वाचन आणि लेखन या संदर्भात गुंतागुत कमी असणारे शब्द सोपे भासतात; आणि त्याच संदर्भात गुंतागुत अधिक असणारे शब्द अवघड भासतात.
शब्दांचा उच्चार, शब्दांचे वाचन आणि लेखन या संदर्भात गुंतागुतीच्या मुद्द्यावर शब्द अवघड किंवा सोपे ठरवता येणार नाहीत. असे असले तरी शब्दांचे उच्चार, वाचन, लेखन या क्रियांसाठी लागणारा वेळ हा मात्र या संदर्भात कळीचा मुद्दा ठरू शकेल. अशा कळीच्या मुद्द्यावर मराठी शब्द वेळ वाचविण्यास अधिक उपयुक्त आहेत. मुळाक्षर आणि जोडाक्षर यांना प्रत्येकी एक अक्षर मानल्यास असे आढळते की, बहुसंख्य मराठी शब्द एक ते पाच अक्षरी आहेत, सहा अक्षरी मराठी शब्द पाचशेहून कमी असतील, सात अक्षरी मराठी शब्द शंभरहून कमी, तर आठ अक्षरी किंवा त्याहून अधिक अक्षरी मराठी शब्द दहादेखील सापडत नाहीत.
मराठी शब्द अशा प्रकारे लहान असल्याने बारावी रसायनशास्त्राच्या ५६५ पानांच्या इंग्लिश पुस्तकाचे मराठी रूपांतर ३३० पानांचे झाले आहे! इंग्लिश पुस्तकात एक मजली लिपी वापरली आहे, तर मराठी पुस्तकात तीन मजली देवनागरी लिपी वापरली आहे. इंग्लिश पुस्तकातील अक्षरे लहान आकाराची, तर मराठी पुस्तकातील अक्षरे मोठी व टपोरी आहेत. शब्दसंख्येचा विचार केल्यास इंग्लिश पुस्तकातील सरासरी १००० शब्दांचे मराठी रूपांतर सरासरी ४४५ मराठी शब्दांत होते.
मी प्रकाशित केलेल्या भौतिकशास्त्र (अकरावी, बारावी), रसायनशास्त्र (अकरावी, बारावी),जीवशास्त्र (अकरावी, बारावी), कृषिविज्ञान व तंत्रज्ञान (अकरावी, बारावी) या आठ पुस्तकांच्या दहा वर्षांतील तीन आवृत्त्यांच्या पाहणीतून; सरासरी १००० इंग्लिश शब्दांचे मराठी रूपांतर सरासरी ४४५ शब्दांचे होते, हे आढळले आहे. वरील आठ पुस्तकांच्या इंग्लिश आणि मराठी प्रती माझ्याकडे उपलब्ध असून, कोणालाही वरील तुलनेसाठी या प्रती पाहता येतील.
वरीलप्रमाणे शब्दसंख्येत आढळणाऱ्या फरकाहून मोठा फरक अक्षरसंख्येत आढळतो. आठ अक्षरी 'Velocity' चे मराठी रूपांतर दोन अक्षरी 'वेग' असे होते. अकरा अक्षरी 'integration' चे मराठी रूपांतर चार अक्षरी 'संकलन' असे होते. चौदा अक्षरी 'fertilization' चे मराठी रूपांतर तीन अक्षरी 'फलन' असे होते. हजारो तांत्रिक शब्दांबाबत असेच घडत असल्याने सरासरी १००० रोमन अक्षरांतील इंग्लिश आशयाचे रूपांतर सरासरी २१३ देवनागरी अक्षरांतील (जोडाक्षरासहित) मराठी आशयात होते.
अक्षरांप्रमाणेच फरक इंग्लिश आणि मराठी वाक्यांत आहे. When a force is applied on a body, an acceleration is produced in that body या पंधरा शब्दांच्या आणि साठ अक्षरी अशा रोमन लिपीतील इंग्लिश वाक्याचे मराठी रूपांतर "वस्तूवर बल लावल्याने तिच्यात त्वरण निर्माण होते" या सात शब्दांच्या आणि एकवीस अक्षरी देवनागरी लिपीतील मराठी वाक्यात होते. इंग्लिशमध्ये सक्तीने वापरावे लागणारे a, an, the, of, at, in, on सारखे शब्द मराठीत विभक्ती प्रत्यय पद्धत असल्याने सुट्या स्वरूपात वापरावे लागत नाहीत. ९९ टक्क्यांहून अधिक मराठी वाक्ये त्यांच्या संगत (corresponding) इंग्लिश वाक्यांच्या तुलनेने निम्म्याहून कमी लांबीची असतात. लेखन, टंकलेखन आणि संगणक स्मृती या तीनही बाबतीत मराठी आशय त्याच्या संगत (corresponding) इंग्लिश आशयापेक्षा कमी जागा व्यापतो. कागद, शाई, ऊर्जा यांच्या बचतीसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी हे फार महत्त्वाचे आहे.
या फरकामुळेच एकाच परीक्षा मंडळाशी जोडलेल्या, समान अभ्यासक्रम व समान आशयाची पाठ्यपुस्तके शिकवण्यासाठी मराठी माध्यम शाळांना रोज साडेचार तास शाळा भरवूनही, वर्षाचा अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी एक महिनाआधी पूर्ण करता येतो; तर इंग्लिश माध्यम शाळांना तोच अभ्यासक्रम त्याच आशयासह शिकवायला, रोज सहा ते आठ तास शाळा भरवूनही, शैक्षणिक वर्ष संपले तरी पूर्ण करता येत नाही. यात इंग्लिश माध्यम शाळांची काही चूक नसून; इंग्लिश शब्दांची तसेच वाक्यांची अधिक लांबी, उच्चार व लेखनातील भयंकर विसंगती, ढिसाळ इंग्लिश व्याकरण, यामुळे बहुतेक इंग्लिश शाळा कोणत्याही वर्षी संपूर्ण अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षाच्या मर्यादेत शिकवू शकत नाहीत.
याचा अर्थ असा की, देवनागरी लिपीतील मराठी तांत्रिक शब्द उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा अन्य विज्ञानाधारित विषयांचे अभ्यासक्रम शिकण्या-शिकवण्यासाठीच्या आशयात (content) वापरल्यास, उच्चार, वाचन यांचा वेग रोमन लिपीतील इंग्लिश आशयाचा उच्चार व त्याचे वाचन या तुलनेत किमान साडेचार पट होईल; तर लेखनाचा तसेच टंकलेखनाचा वेग किमान अडीचपट होईल.
या सर्वांचा विचार करता, उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी, वैद्यकीय किंवा अन्य विज्ञानाधारित विषयांच्या अभ्यासक्रमातील पुस्तकी आशय शिकण्या-शिकवण्यासाठी लागणारा वेळ मराठीच्या वरील गुणांमुळे प्रचंड प्रमाणात वाचेल. हा वाचलेला वेळ, प्रात्यक्षिके, औद्योगिक अनुभव, संशोधन अशा कामांत कारणी लागू शकेल. मराठीला ज्ञानभाषा म्हणतात, याचे कारण मराठीचे वरील गुणच आहेत.
- प्रा.अनिल गोरे (मराठी काका)
[email protected]...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
mahesh phadke
4 वर्षांपूर्वीखूप छान, उदाहरण देऊन छान चर्चा केली आहे.
mahesh phadke
4 वर्षांपूर्वीखूप छान, उदाहरण देऊन छान चर्चा केली आहे.
Abhinav Benodekar
4 वर्षांपूर्वीशब्द परिचित किंवा अपरिचित असतात हे अजब वाटले तरी सत्य आहे. मराठीच्या तुलनेत हिंदी भाषेत हे शिक्षण सहज स्विकारल्या जाईल कारण त्यांच्या मनात मराठी भाषकांसारखा न्यूनगंड नाही!
Sanjay Ratnaparkhi
4 वर्षांपूर्वीलेख छान आहे. अभियांत्रिकी,तांत्रिक ,वैद्यकीय शिक्षणात मराठीचा वापर ही भाषा विकासासाठी संधी आहे.
Yogesh Tadwalkar
4 वर्षांपूर्वीअतिशय छान, वस्तुनिष्ठ पद्धतीने आणि सोपी उदाहरणं देत लिहिलेला लेख. धन्यवाद. 🙏 पण शिकण्या-शिकवण्यासाठी लागणारा वेळ हा मुख्यत्वे हा वाचन क्रियेमध्ये खर्ची पडतो असं लेखात गृहीत धरल्यासारखं वाटलं, जे पटलं नाही. अध्यापन /अध्ययन करताना शिकवल्या जात असलेल्या संकल्पनेचे स्वरूप, त्याची क्लिष्टता आणि विद्यार्थ्याची आकलनशक्ती ह्या बाबी सुद्धा महत्त्वाच्या शिक्षण प्रक्रियेचा वेग ठरवतात असं आपल्याला वाटतं का? म्हणजेच केवळ इंग्रजीचं मराठीत भाषांतर हा उद्देश न ठेवता नव्हे विषयाची सोप्या, प्रभावी शब्दांत पुनर्मांडणी ह्याकडे लक्ष द्यावं लागेल. ह्यासाठी केवळ भाषा-तज्ज्ञ नव्हे तर मराठीवर प्रभुत्व असलेले विषय तज्ज्ञ नेमावे लागतील. एखादी गोष्ट समजण्यासाठी इंग्रजीत जेवढा वेळ लागू शकतो त्यापेक्षा कमी वेळ मराठीत लागावा ह्यासाठी इंग्रजी ऐवजी वापरलेले पर्यायी मराठी शब्द प्रचलित भाषेच्या किती जवळचे आहेत तेही पहावं का? उदा. 'संक्रमण' हा शब्द 'Transfer' ह्यापेक्षा नक्कीच अपरिचित/बोजड आहे. कधीकधी पर्यायी मराठी शब्द सोपा/परिचित नसेल तर तो वापरण्याचा दुराग्रह न ठेवता रुळलेल्या इंग्रजी शब्दांचा वापर करायला काय हरकत आहे? सरकारचा हा उपक्रम स्तुत्य आहेच. पण ज्ञान-संक्रमणाचं यशापयश केवळ मराठी भाषा वापरणं ह्याशिवाय काही इतर गोष्टींवर सुद्धा अवलंबून आहे ह्याचाही विचार व्हावा.