मराठी : व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा


भाषा जगते कशी - मरते कशी, भाषेची प्रगती व ऱ्हास म्हणजे काय, यांची शास्त्रीय जाण असणारी मंडळी आपल्याकडे कमीच. शिवाय मराठीला काही झालेले नाही अशी समजूत करून घेतल्याने तिच्यासाठी वेगळे काही करण्याची जबाबदारीही घ्यावी लागत नाही. साहित्यव्यहार हेच मराठीचे जग मानून त्यात रममाण होणारे लोकही यांपैकीच. साहित्यव्यवहारापलीकडे भाषेचे एक मोठे जग असते आणि कोणत्याही भाषेच्या सुरक्षित व प्रगत वाटचालीसाठी ते महत्त्वाचे असते याची त्यांना फिकीर नसते. सांगतायत ज्येष्ठ भाषा-अभ्यासक डॉ. प्रकाश परब.
भाषकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्र या निकषांवर मराठी ही जगातील प्रमुख भाषांपैकी एक भाषा समजली जाते. दहा कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि आकारमानाने काही युरोपीय देशांपेक्षा मोठ्या असलेल्या महाराष्ट्र राज्याची ती लोकभाषा आणि राजभाषा आहे. एखादी भाषा प्रगत होण्यासाठी ज्या दोन प्राथमिक गोष्टी आवश्यक असतात; त्या म्हणजे, भाषेला स्वत:चा भूप्रदेश असणे व तिला अधिकृत किंवा राजभाषेचा दर्जा असणे. या दोन्ही गोष्टी मराठीकडे आहेत. तरीही वर्षातून एक दिवस मराठीसाठी राखून ठेवावा लागतो याचा अर्थ काही तरी बिघडलेले आहे. एकविसाव्या शतकाच्या अखेर जगातील साठ टक्क्यांहून अधिक भाषा विनाश पावतील व अनेक भाषांचा व्यावहारिक संकोच होईल, अशी भीती भाषाभ्यासक व्यक्त करीत आहेत. युनेस्कोने तर जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या भाषा सांभाळा म्हणून अखिल जगाला आवाहन केले आहे.  मराठी भाषा आज विनाशाच्या उंबरठ्यावर नसली तरी ती सुरक्षित व प्रगत भाषा आहे असे म्हणता येईल, अशी स्थिती नाही.
‘पूर्वदिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावीकाळ’ असे म्हणून भाषेचा भविष्यकाळ उज्ज्वल होत नाही. त्यासाठी भाषेचा वर्तमान काळ घडवावा लागतो. मराठी ही ना वर्तमान जगाची व्यवहारभाषा आहे, ना ज्ञानभाषा आहे, असे म्हटले तर ते अनेकांना आवडणार नाही. मराठीला काहीही झालेले नाही आणि काही होणार नाही, असा भाबडा समज व आशावाद बाळगणारे अनेक लोक आहेत. त्यांना मराठी भाषेचे जतन व संवर्धन ही एक ‘समस्या’ आहे असे वाटत नाही. त्यांच्या मते, पुण्यामुंबईसारखी शहरे सोडली तर आजही महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून लोक मराठी भाषेतूनच सर्व प्रकारचा व्यवहार करतात. असे लोक जापर्यंत महाराष्ट्रात आहेत, तोपर्यंत तरी मराठीला भीती नाही. भाषा जगते कशी- मरते कशी, भाषेची प्रगती व ऱ्हास म्हणजे काय यांची शास्त्रीय जाण असणारी मंडळी आपल्याकडे कमीच. शिवाय मराठीला काही झालेले नाही अशी समजूत करून घेतल्याने तिच्यासाठी वेगळे काही करण्याची जबाबदारीही घ्यावी लागत नाही. साहित्यव्यहार हेच मराठीचे जग मानून त्यात रममाण होणारे लोकही यांपैकीच. साहित्यव्यवहारापलीकडे भाषेचे एक मोठे जग असते आणि कोणत्याही भाषेच्या सुरक्षित व प्रगत वाटचालीसाठी ते महत्त्वाचे असते, याची त्यांना फिकीर नसते.
तसे पाहिले तर, प्रत्येक भाषेमध्ये व्यवहारभाषा व ज्ञानभाषा होण्याची अंगभूत क्षमता असते. पण, ही क्षमता संबंधित समाजाकडून किती व कशी वापरली, त्यावर तिचे समाजातील स्थान अवलंबून असते. कोणत्याही भाषेचा विकास तिच्या सर्वक्षेत्रीय व गुणवत्तापूर्ण वापरावर अवलंबून असतो. पाणी, वीज, खनिजे आदी नैसर्गिक संसाधनांचा वापर केल्याने त्यांचा संकोच होतो, म्हणून ती काटकसरीने वापरावी लागतात. भाषेचे नेमके उलटे आहे. भाषा ही असे सामाजिक संसाधन आहे, की तिचा जितका वापर करावा तितका तिचा विकास होतो व जितका तो टाळावा तितका तिचा ऱ्हास होतो. ‘वापरा नाही तर गमवा’ हे भाषेच्या अस्तित्वाचे सूत्र म्हणावे लागेल.
भाषा किती लोक वापरतात त्यापेक्षा ती कोणकोणत्या व्यवहारक्षेत्रांत वापरली जाते यालाही महत्त्व आहे. भारतात आज घडीला दहा टक्के लोकही इंग्रजीचा वापर करीत नाहीत, तरीही ती हिंदीसह सर्व भारतीय भाषांपेक्षा  प्रगत व्यवहारभाषा आहे आणि ज्ञानभाषाही आहे. समाजाचे वेगवेगळे व्यवहार असतात. त्यांत दैनंदिन संपर्काच्या व्यवहाराव्यतिरिक्त सार्वत्रिक, बौद्धिक, प्रगत व्यवहार असतात : विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण, संशोधन,  प्रशासन, माध्यम, विधी व न्याय, उद्योग व वाणिज्य इत्यादी. समाजाची भौतिक व बौद्धिक प्रगती जशी या व्यवहारांवर अवलंबून असते, तशी ज्ञानभाषा म्हणून भाषेची जडणघडणही या व्यवहारांवर अवलंबून असते. समाजाच्या दैनंदिन व्यवहारात संपर्क भाषा म्हणून मराठी-हिंदीला आज महत्त्व असले तरी, या प्रगत व्यवहारक्षेत्रांत त्यांना, विशेषत: मराठीला दुय्यम किंवा नाममात्र स्थान आहे. त्यामुळे मराठीला ज्ञानभाषा करण्याची आपली खरोखरीच आकांक्षा असेल, तर खूप लोक मराठी बोलतात, मराठी वापरतात यावर समाधान मानून चालणार नाही.
ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीशी तुलना करता मराठी ही आजही काळजी वाटावी इतकी कुपोषित भाषा आहे. मराठीचे बौद्धिक जग फार छोटे आहे आणि जे आहे तेही आक्रसते आहे. ते विस्तारण्यासाठी जी यंत्रणा  व बांधिलकी लागते ती  मराठी समाजाकडे नाही. ना राजकीय इच्छाशक्ती आहे, ना समाजिक. समाजातील अभिजन व बुद्धिमान लोक मराठीचे ज्ञानभाषा म्हणून सक्षमीकरण करण्याऐवजी इंग्रजीला कवटाळतात व स्वत:ची प्रगती करून घेण्यात धन्यता मानतात. कारण, मराठीपेक्षा इंग्रजीचे जग मोठे आहे आणि तिथे भौतिक प्रगतीच्या अधिक संधी आहेत. या संधींकडे पाठ फिरवून मराठीचे जग विस्तारण्यासाठी प्रवाहाविरुद्ध पोहण्याची ना कोणाची इच्छा आहे, ना बळ. त्यामुळे मराठी ही उच्च शिक्षणाची व संशोधनाची भाषा नाही, विज्ञान-तंत्रज्ञानाचीही नाही. सरकारी धोरणांमुळे आणि इंग्रजीच्या प्रभावामुळे मराठीच्या शालेय शिक्षणाचा पाया ढासळतो आहे. मराठी माध्यमातील उच्च शिक्षण मौलिक ज्ञाननिर्मितीऐवजी अनुवादावर कसेबसे जगते आहे. मराठीचे नाव घेत स्थापन झालेली विद्यापीठेही मराठीला विसरलेली आहेत. मराठीचे उच्च शिक्षण हे आजही साहित्यकेंद्री आहे. त्यात साहित्येतर व उपयोजित विषयांचा  समावेश व्हावा यासाठी ना विद्यापीठांना रस आहे, ना मराठीच्या प्राध्यापकांना. मराठीची ज्ञानभाषा म्हणून जडणघडण करण्यात मराठी लेखक, संशोधक,  विचारवंत, प्राध्यापक, पत्रकार आदींची भूमिका महत्त्वाची आहे. विविध व्यवहारक्षेत्रांसाठी, ज्ञानक्षेत्रांसाठी मराठीची परिभाषा सिद्ध करण्याचे मोठे आव्हान या मंडळीपुढे आहे. पण, काही अपवाद वगळता हे आव्हान स्वीकारून मराठीची नवी परिभाषा घडवण्याचे, मराठीत नवीन संकल्पना मांडण्याचे काम होताना दिसत नाही. आपल्याकडचा बुद्धिजीवी वर्ग आपले उत्तम विचार व उत्तम कल्पना प्रथम इंग्रजीतून व्यक्त करणे पसंत करतो; त्यामुळे आपल्या देशी भाषा उपेक्षित राहिल्या – राहतात, हे महात्मा गांधींचे निरीक्षण मराठीलाही लागू आहे. इंग्रजीतून शिक्षण घ्यायचे आणि मराठी ही ज्ञानभाषा होण्याचे स्वप्न पाहायचे, हा शुद्ध वेडेपणा आहे. मराठी ही सर्वार्थाने जगण्याची व शिक्षणाची भाषा झाल्याशिवाय ज्ञानभाषा म्हणून तिचे भवितव्य धूसर आहे.
डॉ. प्रकाश परब
संपर्क –  ९८९२८१६२४० 
(लेखक ज्येष्ठ भाषाभ्यासक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत.)

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषा , व्यवहार भाषा , ज्ञान भाषा , राजभाषा , डॉ. प्रकाश परब , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Sanjay Ratnaparkhi

      3 वर्षांपूर्वी

    उत्तम लेख.

  2. Mukund Deshpande

      3 वर्षांपूर्वी

    सुरेख

  3. Amol Patil

      3 वर्षांपूर्वी

    आज खरंच इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पगडा सामान्य जनतेवर एवढा आहे की इथं प्रत्येकाला वाटते मराठी भाषा म्हणजे एकदम कनिष्ठ भाषा. प्रत्येकाला आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यम शाळेत टाकायचं आहे. पालकांच्या व्यवहारीक भाषेवरही हल्ली इंग्रजी शब्दांचा पगडा आहे. मराठी बोलणारी लोकं म्हणजे मागासलेली लोकं अशीच आता समज झालेय...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen