“ज्या दुकानातून पुस्तकं विकत घेऊन आजोबा-आजी शिकले; आज त्याच दुकानातून त्याच घरातल्या नातवासाठी किंवा नातीसाठी पुस्तकं घेतली जात आहेत, ही केवढी नवलाची गोष्ट आहे! अशी शेकडो घरं आज डोंबिवलीत आहेत. या आणि अशा लाखो ग्राहकांनी गेली पाऊणशे वर्षं आम्हांला सेवेची संधी दिली, यासाठी आम्ही खरोखरच सर्वांचे ऋणी आहोत.” सांगतायत डोंबिवली येथील प्रसिद्ध पुस्तकाचे व्यापारी मयूरेश गद्रे.
...
८ ऑगस्ट २०२१ रोजी आमच्या ‘गद्रे बंधू’ दुकानाला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाली, त्या निमित्ताने या भावना आपल्यापुढे मांडत आहे.
फडके रोडवरून राकेश ज्वेलर्सच्या बाजूच्या आगरकर पथावर वळलं, की आता ‘राजे अपार्टमेंट’ दिसतं, इथं पूर्वी राजे यांचं टुमदार घर होतं. इथं राहाणारे कै. शशी राजे हे आमचे पहिले ग्राहक. १९४६ साली ते जेमतेम पाच-सहा वर्षांचे असतील. आपल्या वडिलांसाठी दाढीच्या ब्लेडचं पाकीट घ्यायला ते आमच्याकडे आले आणि आमच्या व्यवसायाला सुरुवात झाली. अगदी अलीकडे शशीकाकांचं निधन होईपर्यंत, दरवर्षी न चुकता ते ८ ऑगस्टला आम्हांला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून दुकानात येत असत.
दुसरा एक उल्लेख करायला हवा तो भुरे कुटुंबाचा. देवळालीमध्ये आजोबा पोस्टमास्तर असताना शिवदे कुटुंबाचा स्नेह जुळला. कै. दादा भुरे हे शिवदे यांचे जावई आणि डोंबिवलीत वास्तव्यास होते. दिवाळी पाडव्याला नवीन व्यापारी वर्ष सुरू होतं. त्यावेळी पहिली खरेदी चांगल्या घरातून व्हावी, या हेतूने पहिल्या वर्षी मुहूर्ताची खरेदी दादांच्या हस्ते झाली. विशेष म्हणजे, आज दादांच्या तिसऱ्या पिढीतही ही प्रथा सुरू आहे. गेली ७५ वर्षं दिवाळी पाडव्याची मुहूर्ताची पहिली खरेदी एकाच कुटुंबातील सदस्यांकडून मोठ्या आपुलकीनं केली जाते, ही आमची परंपरासुद्धा वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे.
कोणत्याही व्यवसायासाठी विशेषतः रिटेल दुकानासाठी ग्राहक ही सर्वात महत्त्वाची बाब असते. म्हणून हे दोन उल्लेख आवर्जून करावेसे वाटले. यापुढे या लेखात शक्यतो नामोल्लेख टाळले आहेत, कारण तसं लिखाण म्हणजे आभारप्रदर्शनाचा उपचार होऊन बसेल.
माझे आजोबा हे खरे द्रष्टे म्हटले पाहिजेत. १९४०च्या दशकात पोस्टमास्तर म्हणून सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी आपल्या प्रत्येक कर्त्या मुलाला व्यवसाय सुरू करायला प्रोत्साहन दिलं. एका मध्यमवर्गीय मराठी माणसानं चाळीसच्या दशकात असा विचार करणं, हे खरोखरच धाडसाचं आणि दूरदर्शीपणाचं म्हणायला हवं. हे दुकान सुरू झालं आमच्या पोलिओने काहीसं अपंगत्व आलेल्या माधवकाकांसाठी. पण, त्यांनंतर दोन वर्षांतच त्यांचं निधन झालं. दुसरे काका निळूभाऊ, ते रेल्वेतली नोकरी सांभाळून सुरुवातीपासून माधवकाकांना मदत करत होतेच. त्यांनी मग नोकरी सोडून दुकानाची पूर्ण जबाबदारी घेतली आणि ती २००८ मध्ये निधन होण्याच्या दिवसापर्यंत, सलग बासष्ट वर्षं उत्तम प्रकारे निभावली. यात माझ्या वडिलांनी त्यांना १९५० ते १९९५ अशी पंचेचाळीस वर्षं खंबीर साथ दिली. या दोघा गद्रे बंधूंच्या अपार कष्टांनी हा व्यवसाय जोम धरून वाढला, बहरला आणि सुस्थितीत आला.
एक व्यवसाय म्हटला की संपूर्ण कुटुंब त्याभोवती फिरत असतं. काका-काकू, माझे आई-वडील आणि आता मी आणि स्मिता (माझी पत्नी) हे तर दुकानाच्या व्यवस्थेशी कायम जोडलेलेच आहोत. पण, माझ्या बहिणी, त्यांच्या सासरची मंडळी, चुलतभाऊ, आई-काकूंच्या माहेरची मंडळी, एवढंच कशाला, आता स्मिताच्या माहेरची मंडळी हीसुद्धा या प्रवासातले सहप्रवासी आहेत. यातल्या प्रत्येक व्यक्तीचं या व्यवसायात योगदान आहे.
या पाऊणशे वर्षांत अनेक कर्मचाऱ्यांनी आमच्याकडे काम केलं. काही जण कामाला असतानाच शिक्षण घेऊन पुढे वेगळ्या ठिकाणी नोकरीला लागले; पण आजही यातल्या अनेकांशी आमचे घरगुती संबंध आहेत. त्यांच्या अडीअडचणीला, सुखदुःखाच्या प्रसंगात आम्ही सगळे एकत्र असतो. काही जण वयोमानानुसार गावी राहायला गेले. पण, आजही डोंबिवलीत आल्यावर त्यांची पावलं दुकानाकडे आपोआप वळतात, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, यातच खरी मजा आहे.
जयराम सदन या इमारतीत असलेले आमचे सख्खे शेजारी ही तर आमची मोठी जमेची बाजू आहे. दुपारी आम्ही हक्काची वामकुक्षी घेतो, तेव्हा आमची पार्सलं आली तर ती सांभाळून ठेवण्याचं काम ही मंडळी विनासायास करतात. पावसाळ्यात कधी दुकानात पाणी शिरलं तर रात्री-अपरात्री सुद्धा मदतीला धावून येतात. सहवासातून आलेली ही आपुलकीची भावना आज दुर्मीळ आहे. गेली दोन वर्षं आम्ही एकमेकांना दुरावलो आहोत, पण लवकरच नवीन वास्तूमध्ये आम्ही एकत्र येण्याची वाट बघत आहोत.
आज डोंबिवली शहरात स्टेशनरी आणि पुस्तकं यांची शंभरेक दुकानं आहेत. या सगळ्यात आमचं वेगळंपण काय? असं कुणी विचारलं तर आम्ही करत असलेले वेगवेगळे उपक्रम, असं त्याचं उत्तर देता येईल. गणपतीसाठी पर्यावरण-स्नेही मखरं, दिवाळीतले असंख्य प्रकारचे पूर्णतः कागदी आकाशकंदील, अशी धडपड सुरू असते. इतरही अनेक समविचारी संस्था यात जोडल्या गेल्या. त्यांचे कार्यकर्ते मदतीला येत गेले. रोटरीमधल्या माझ्या सहकाऱ्यांनी सुद्धा याला पाठबळ दिलं आणि हे उपक्रम हळूहळू मोठे झाले.
चित्रकारांसाठी होणारा रंगरेषा महोत्सव, बच्चेकंपनीसाठी होणारी बालपुस्तक-जत्रा यासाठी अनेक कंपन्या, प्रकाशक यांनी आपणहून मदतीचा हात पुढे केला. हे असं जोडलं जाणं मला खूप महत्त्वाचं वाटलं. या ठिकाणी एका वेगळ्या प्रयोगाचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. आमच्याच व्यवसायतले चारजण मिळून २००१ पासून मखरांचं प्रदर्शन आयोजित करतोय. एकाच गावातले, एकाच व्यवसायतले चार जण एकत्र येऊन १५ दिवस एकत्र व्यवसाय करतात ही सोपी गोष्ट नाहीये! तेही सलग वीस वर्षे!
आमचे सीए, तसंच जीएसटी सल्लागार, अकाऊंटंट या प्रत्येकाचं महत्त्व आहेच. शिवाय अडीअडचणीत मदत करणारे बँकर्स, तिथले अधिकारी, कर्मचारी यांचासुद्धा यात वेगळा रोल असतो. व्यवसाय चालवताना फ्रंट-लेव्हलला आम्ही दिसत असलो तरी, या प्रत्येकाची भूमिका योग्य प्रकारे पार पाडली तरच ती भट्टी जमून येते.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आमचे पुरवठादार! महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर असलेले अनेक प्रकाशक आणि डोंबिवली आणि मुंबई परिसरातील विविध कंपन्यांचे वितरक ही आमची लाइफलाइन आहे. त्याचबरोबर, रोज मुंबईत जाऊन आमच्यासाठी पुस्तकं आणि इतर सामान घेऊन येणारे सप्लायर यांचा सक्रिय पाठिंबा असल्यामुळेच आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. या सर्वांना वेळेत पेमेंट करण्याबाबत वडिलांनी आणि काकांनी घालून दिलेली मर्यादा आजही कसोशीने पाळली जाते. त्यामुळेच वस्तूंच्या पुरवठ्यात आजपर्यंत कधीही अडचण आलेली नाही.
आज ऑनलाइन खरेदी, मॉल-संस्कृती, झटपट व्यवहार, या सगळ्या चक्रीवादळात संपूर्ण रिटेल व्यवसाय हेलकावे खात आहे; तरीही आम्ही टिकाव धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. व्हॉट्सअॅपवरून ऑर्डर येणं आता सवयीचं झालंय. (अगदी रात्री दोन-तीन वाजतासुद्धा ग्राहक मागणी नोंदवत असतात.) यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त लवकरच आम्ही फेसबुक पेज आणि इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करत आहोत.
गद्रे बंधू परिवाराचाच भाग असलेले तुमच्यासारखे असंख्य हितचिंतक, माझे सर्व मित्र-मैत्रिणी आणि दुकानातले सर्व सहकारी यांच्या मदतीने हा जगन्नाथाचा रथ ओढत आहे. आई-वडिलांचे संस्कार आणि वडील-काकांची पुण्याई, ही या रथाची दोन चाकं आहेत. कुटुंबातील अनेकांची साथ आहे.
तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद या पुढेही पाठीशी असावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना...!
मयूरेश गद्रे
(लेखक डोंबिवलीतील ‘गद्रे बंधू’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या दुकानाचे मालक आणि चोखंदळ वाचक आहेत.)
संपर्क - ९९३०९७७७४६
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी व्यवसाय
, गद्रे बंधू
, मयूरेश गद्रे
, मराठी अभ्यास केंद्र