शिकणं मुलांचं आणि शिक्षकांचंही...


असं म्हणतात, ‘ज्ञान दिल्यानं वाढतं’. स्वज्ञानात दिवसागणिक भर पाडणारी व्यक्ती कोण असेलतर ती म्हणजे शिक्षककारण ते नेहमीच विद्यार्थ्यांना शिकवत असतात. विद्यार्थ्यांना शिकवता-शिकवता प्रत्येक संकल्पना नव्याने समजून घेत असतात. मुलांच्या विश्वात डोकावताना स्वअध्ययन करतस्वतःला नव्याने पैलू पाडत असतात. असाच काहीसा अनुभव सांगतायत गोरेगाव येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सानिका सावंत.
‘रविवार माझ्या आवडीचा’ हे गाणं आपण ऐकलं असेलच. या गाण्यात म्हटल्याप्रमाणे सर्व मुलं सुट्टीची वाट बघत असतात; पण आमच्या शाळेत नेमकं याच्या उलट चित्र दिसतं. मुलं सांगतात की, ‘ताई आम्हांला सुट्टी देऊ नका, रोज शाळेत बोलवा.’ याचं मुख्य कारण म्हणजे, शाळेतील वातावरण आणि मुलांना मिळणारा मोकळेपणा.
आपल्या घरानंतर मुलं सगळ्यात जास्त वेळ घालवतात ती जागा म्हणजे शाळा. शाळेतलं वातावरण आनंद देणारं असेल तरच मुलांना शाळा हवीहवीशी वाटते आणि मुलांचं शिकणं घडतं. मुंबईतील गोरेगाव येथील आमच्या डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत पदाधिकाऱ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत आम्ही सर्वजण शाळा मुलांना हवीहवीशी वाटण्यासाठी प्रयत्नशील असतो. मुलांचं शिकणं घडण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतो. आनंददायी, गुणवत्तापूर्ण आणि सर्व मुलांना समान संधी देणाऱ्या शिक्षणाचा मुलांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण वाटा असतो, यावर आमचा ठाम विश्वास आहे.
शाळेत घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक कृतीतून मुलांना आनंद कसा मिळेल हे आम्ही आवर्जून पाहतो. ताई (शिक्षिका) आणि मुलं गप्पा करत-करत, हाताने काही करून बघून, चित्रे, व्हिडीओज् बघून, वेगवेगळ्या संकल्पना समजून घेतात. गप्पांमध्ये त्यांना आलेले घरातील अनुभव, पाहिलेल्या घटना यांचा समावेश असतो. आपलं म्हणणं ऐकून घेणारं कोणीतरी आहे, हा अनुभवच त्यांच्यासाठी खूप सुखद असतो. मुलं कधी एकत्र गप्पा मारतात, कधी गटात, कधी वर्गातील कोपऱ्यांमध्ये काम करतात, कधी मैदानावर, तर कधी वाचनालयात जातात.
मुलांसाठी वर्गात वेगवेगळे कोपरे असतात. तिथं कातरकाम, चित्र काढणं, रचना करणं, मणी ओवणं यांसारख्या कला-कार्यानुभवाच्या कृतींसोबत वाचन-लेखन, बेरीज-वजाबाकी करणं, अशा कृतीदेखील असतात. छोट्या-छोट्या गटात या कृती करत-करत मुलं अनेक गोष्टी शिकतात. इथं शिक्षकाला मुलांचं निरीक्षण, नोंदी आणि वैयक्तिक मार्गदर्शन करण्यासाठीही थोडा वेळ मिळतो. ताईंसोबत केलेल्या कृतींची उजळणी या कोपऱ्यांमध्ये होते. तिथं शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही भूमिका मुलांकडे असतात आणि ताई असतात निरीक्षक. असं म्हणतात की, मुलं आपल्या वयाच्या मुलांकडून लवकर शिकतात आणि ते खरंच आहे. इथं अनावश्यक ताणही नसतो. मोठ्या गटात बावरणारी मुलंसुद्धा इथे छोटा गट असल्याने खुलतात आणि मोकळेपणाने बोलतात, आपल्या अडचणी मिळून सोडवतात. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत या कृती करताना आनंदही मिळतो. एकाच विषयातील एका घटकासाठी सुद्धा कोपरे मांडता येतात. वेगवेगळ्या पातळीवर असणाऱ्या मुलांना आपापल्या गतीनं शिकत पुढे जाण्यासाठी या पद्धतीची मदत होऊ शकते. जसं की, बेरीज-वजाबाकीच्या उदाहरणांची कार्ड्स कोपऱ्यांमध्ये ठेवल्यास, एखादे मूल दहा उदाहरणं सोडवेल; तर त्याच वेळेत दुसरं मूल २५-३० उदाहरणं  सोडवेल. इथं संकल्पनेचा सरावही होतो, स्वतःच्या क्षमतांचा वापरही होतो व  वेग जास्त असणाऱ्या मुलांच्या मेंदूलाही खाद्य मिळतं. काही वेळेस एकमेकांचं बघूनही मुलं शिकतात. ती कॉपी नसते, तर ते असतं एकमेकांसोबत, एकमेकांकडून शिकणं. मुलांना एकमेकांच्या चांगल्या गोष्टी जितक्या माहीत असतात, तितक्याच उणिवाही माहीत असतात. ते बरोबर आपल्या मित्रांना समजावून सांगतात. जोवर संकल्पना स्पष्ट होत नाही, तोवरच ती मदत लागते; नंतर मुलं आपापलं करू लागतात. पूर्ण वर्गासोबत किती वेळ काम करायचं, गटात शिकण्याची संधी किती वेळा द्यायची आणि वैयक्तिक मार्गदर्शन कोणाला, किती वेळ द्यायचं, हे शिक्षकाला आपल्या वर्गातील मुलांच्या क्षमता, कौशल्यं लक्षात घेऊन ठरवावं लागतं.
मुलांना बोलतं करण्यासाठी प्रत्येक विषयात काही जागा असतात, त्या आम्ही शोधत असतो. जसं की, शब्द सांगणं - प्रत्येक मूल एकतरी शब्द सांगतं. मुलं एखाद्या शब्दाच्या होडीत बसून भाषाविहार करतात. म्हणजेच एखाद्या शब्दाच्या विविध छटा उलगडत संदर्भाने बदलत जाणारे शब्दाचे अनेक अर्थ शोधतात. आता 'सोड' हा शब्दच बघा ना!  ताईचा हात सोड (सोबत सोडणे),  माझा रस्ता सोड (जागा देणे), मला शाळेत सोड (पोहोचवणे), केस सोड (मोकळे करणे), त्याचा नाद सोड (संगत सोडणे), नळ सोड (सुरू करणे), पट्टा सोड (उतरवणे), होडी पाण्यात सोड (ठेवणे).  अशा अनेक छटा असणारे शब्द मुलांच्या शब्दसंपत्तीत भर घालतात. हळूहळू मुलंही असे शब्द शोधू लागतात. मराठी भाषेतील सौंदर्य पाहण्याची त्यांना सवय लागते. विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, क्रियापदे शोधण्याचे भाषिक खेळ पहिलीपासूनच घेतो. जसं की -  झाड कसं? फळा कसा? ते सांगा, लिहा, दिलेल्या चित्रातील क्रिया शोधा, म्हणींची यादी करा आणि त्या म्हणी वापरून एक परिच्छेद लिहा, शब्दातील अक्षरांचा क्रम बदलून नवीन शब्द तयार करा व वाक्यात वापरा.  उदा.  गरम भजी खाताना माझी जीभ भाजली.


वेगवेगळ्या भाषिक खेळांमधून मिळालेल्या शब्दसंपत्तीचा वापर मुलं स्वतंत्र लेखनातही करतात. आम्ही निबंध हा शब्द मुद्दाम वापरत नाही;  कारण निबंध म्हटलं की त्यात 'माझी आई' या विषयावर लिहिताना सर्व मुलांची आई एकसारखीच दिसते, सारख्याच स्वभावाची असते.  (कारण पुस्तकातील निबंध असतो.) आमची मुलं 'मी मस्ती केली की माझी आई मला खूप ओरडते, पण कधी-कधी ती प्रेमपण करते' किंवा 'आमच्या ताई जाड्या आहेत.' हेही अगदी बिनधास्तपणे लिहितात. (कुठल्या निबंधाच्या पुस्तकात शिक्षकाचं असं वर्णन सापडेल?) हीच मुलं चौथीत गेल्यावर 'आमच्या ताई साडी नेसल्यावर सुंदर दिसतात, ताई आम्हांला आमची चूक समजावून सांगतात.' असं लिहितात तेव्हा ती मोठी झालीत, याची जाणीव होते.
मराठीसोबत इंग्रजीच्या पाठातही प्रत्येकाला बोलण्याची संधी असते. मराठी उत्तम प्रकारे आली पाहिजेच, त्यासोबत इंग्रजीतही मुलं मागे राहता कामा नयेत. त्यासाठी शब्दसंपत्ती वाढवणारे अनेक खेळ वर्गात घेतले जातात. इंग्रजीची विशिष्ट वाक्यरचना समजून घेऊन, त्यासारखी वाक्ये तयार करण्याच्या कृती घेतल्या जातात. जसं की, I am playing, She is playing, A girl is playing, A student is playing, Suman is Playing, He is playing, They are playing. इथे नाम (noun) बदलले की नवीन वाक्य तयार होते. तसेच काही इतर शब्दही बदलतात. अशा वाक्य तयार करण्याच्या कृती घेतल्यामुळे  प्रत्येकाला वाक्य तयार केल्याचा आनंद मिळतो, मला इंग्रजी बोलता येते हा विश्वास निर्माण होतो, इतरांची वाक्ये कानावर पडल्यामुळे शब्दसंपत्ती वाढते, सरावही होतो आणि मजाही येते. विशेष म्हणजे, दुसऱ्या भाषेतील वाक्याची ठेवण, रचना लक्षात घेता येते, त्यातून वाक्यरचनेचे नियम मुलंच शोधतात आणि विविध प्रकारची वाक्ये तयार करतात. पहिलीत शब्दापासून सुरू झालेला हा प्रवास चौथीत परिच्छेदापर्यंत जाऊन पोहोचतो. चौथीत दिलेल्या विषयावर बोलताना, लिहिताना मुलं योग्य वाक्यरचना करतात. इथे भाषा-शिबिराचाही उल्लेख करावा लागेल. पहिल्या व दुसऱ्या सत्रात एकेक, अशी दोन शिबिरं आम्ही घेतो. त्यात मुलांना जास्तीत-जास्त इंग्रजीत बोलण्याची संधी मिळेल, अशा कृतींचे नियोजन करतो. या कृती खेळाच्या रूपात घेता येतील असा प्रयत्न करतो. दुसऱ्या सत्रात चौथीचे प्रत्येक मूल स्वतःचे एक रेसिपी बुक तयार करतं. शब्दकोडीही निकषांसकट तयार करतात.   
मराठीप्रमाणे इंग्रजी भाषेतील (काही अनुवादित गोष्टीसुद्धा)  गोष्टीसुद्धा नियमित वाचून घेतल्या जातात. वाचनामुळे मुलांना जगातील विविध भाषांतील साहित्याचा आस्वाद घेता येतो, शब्दसंपत्ती तर वाढतेच, त्यासोबत मुलांचे कुतूहल जागृत होते, कल्पनाशक्तीचा, एकाग्रतेचा विकास होतो. सामाजिक भानही हळूहळू तयार होत जाते. कोणतीही भाषा जेवढी जास्त ऐकू तेवढी चांगली बोलता येते, त्यामुळे इंग्रजी ऐकण्याच्या संधी देण्यासाठी काही अमराठी ताई शाळेत येतात, मुलांशी इंग्रजीत गप्पा करतात, खेळ घेतात. त्यामुळे अनोळखी व्यक्तींशी बोलण्याची भीड चेपते, आत्मविश्वास वाढतो, बोलण्यातील सहजता लक्षात घेता येते.


गणितातील संकल्पना घेताना, प्रत्येक मुलाला किंवा दोघात एक असे साहित्य असते. पिस्ते, काड्या, दशक पेट्या, गोळे, संख्यापत्ते, वर्तुळाचे गुणधर्म समजून घेण्यासाठी वर्तुळाकार खिळे लावून तयार केलेले लाकडी बोर्ड यासारखे शैक्षणिक साहित्य मुलं वापरतात. दुसरीत नोटांची मोड मुलं करतात, तेव्हा प्रत्येकजण वेगवेगळी मोड करतं.  जसं की, २४ रुपये तयार करताना कुणी २० रुपयाची एक नोट व १ रुपयांच्या चार नोटा घेईल, कुणी  ५ रुपयांच्या चार नोटा व २ रुपयांच्या दोन नोटा घेईल, तर कुणी १० रुपयांच्या दोन नोटा व १ रुपयांच्या चार नोटा घेईल. या ठिकाणी एकाच पाठात अनेक गोष्टी साध्य होतात. जसं की, संख्या दिसणे, संख्याफोड, नोटांची ओळख, तोंडी बेरीज, दशक-एकक इ. मुलांनी केलेली मोड ताईंनी फळ्यावर दाखवली की मुलांनाही संख्येची ही विविध रूपं समजतात. विशेष म्हणजे, नोटा हाताळायला मुलांना खूप मजा येते. चौथीत दिलेले आकृतिबंध पूर्ण करणे एवढ्यावर न थांबता, मुलं ताईंनी दिलेले आकृतिबंध ओळखतात व स्वतःचेही आकृतिबंध तयार करतात. तिसरीत लांबी मोजायला शिकल्यावर शाळेतील सर्व जागांमध्ये गटागटात फिरून मुलं तेथील वस्तूंची लांबी-रुंदी मोजतात. जसं की, डिस्प्लेबोर्ड, फळे,  दरवाजे, खिडक्या, टेबल इ. तसेच ताईंसोबत मोठ्या मैदानावर जाऊन मैदानाचीही लांबी-रुंदी मोजतात. दुसरीत अप्रमाणित एककाने वजन केल्यामुळे (उदा. एका वहीचे वजन १५ गोट्यांएवढे भरते) तिसरीत प्रमाणित एकके वापरून मोजमाप करताना वजनाची संकल्पना स्पष्ट होण्यात मदत होते. हाताने कृती करून, प्रत्यक्ष अनुभव घेऊन, नियम बांधत-बांधत गणित शिकताना मूलभूत संकल्पना पक्क्या होत जातात. आकडेमोडीच्या पलीकडे जाऊन दैनंदिन जीवनात गणित किती आवश्यक आणि महत्त्वाचं आहे, हेही मुलांना समजत जातं. अमूर्ताकडून मूर्ताकडे जाणारा हा प्रवास सहज, सोपा आणि हसतखेळत घडवण्याच्या, तसेच या विषयात गोडी निर्माण करण्याच्या प्रयत्नांत साहित्याचा खूप मोठा वाटा असतो.
एखाद्या पाठाच्या निमित्ताने धोबीघाट, भाजीमंडई, बँक, पोस्ट ऑफिस, सिग्नल, लाडू कारखाना अशा ठिकाणी भेट देऊन; मुलं शिंपीकाका, धोबीकाका, भाजीवाल्या काकू, डॉक्टर, बँक मॅनेजर, शाळेतील पदाधिकारी, शिक्षक, शिपाई दादा, वॉचमन काका, अशा व्यक्तींसोबत गप्पा करतात, त्यांना प्रश्न विचारतात आणि माहिती मिळवतात. यामुळे वेगवेगळया ठिकाणी असलेलं वातावरण अनुभवतात. मनातील प्रश्न, शंका मोकळेपणाने योग्य शब्दांत विचारणे, सार्वजनिक ठिकाणी नियम पाळणे, समाजातील प्रत्येकाच्या कामाचा आदर करणे, अशा गोष्टीही शिकतात. शाळेपासून काही किलोमीटरवर असणाऱ्या डोंगरात, जंगलात भटकंती करतात, त्यामुळे निसर्गाबद्दलची जाणीव निर्माण होण्यासही सुरुवात होते.
वर्गातील नेहमीचे पाठ अधिक चांगले होण्यासाठी भेटी आणि मुलाखतीसोबतच छोटी-छोटी प्रदर्शने मुलं मांडतात.  पहिलीत स्वयंपाकघरातील वस्तूंचे,  खेळण्यांचे तर चौथीत घरून आणलेल्या पदार्थांचे प्रदर्शन मांडतात. मधल्या सुट्टीत मित्रमैत्रिणींसोबत ते पदार्थ वाटून खातात आणि महाराष्ट्रातील अन्नपदार्थांच्या विविधतेचा आस्वादही घेतात. स्थानिक कारभार समजण्यासाठी वर्गात निवडणूक घेतली जाते. शिवरायांचे सैन्यदल यासोबत आताचे भारताचे वायुदल, नौसेना, भूदल ( आर्मी), पोलिस खाते यांची माहिती दिली जाते.


मुंबईच्या नकाशाच्या ओळखीने तिसरीत नकाशा वाचनाला सुरुवात होते. पण, आम्ही सुरुवात करतो रस्त्याच्या नकाशावाचनाने. रस्त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला, अलीकडे-पलीकडे काय-काय आहे, अशा प्रश्नांची उत्तरं मुलं शोधतात.  मग वर्गाचा नकाशा, स्वतःच्या घरापासून शाळेपर्यंतच्या रस्त्याचा नकाशा काढतात. डावं-उजवं, पुढे-मागे तसेच सूची, सर्व दिशा पक्क्या झाल्या की मग मुंबई, महाराष्ट्र, भारत, जग असे सर्व नकाशे गटागटात बघतात, त्यात वेगवेगळ्या गोष्टी शोधतात. उलगडलेली गोल पृथ्वी म्हणजेच जगाचा नकाशा ही संकल्पना समजून घेतात. दिशा समजणे, नकाशावरून एखादे ठिकाण समजणे या अतिशय जीवनावश्यक गोष्टी आहेत. त्याची ओळख अशी दिल्याने पुढे कोणताही नकाशा समजून घेण्यास मुलांना मदत होते. पाठ्यपुस्तकातील माहितीसोबतच संदर्भाने येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींचा परिचय करून दिल्यामुळे मुलांना शिकताना मजाही येते आणि लक्षातही राहते.
नियमित वर्ग सुरू असतानाच येणारे उपक्रम हेही मुलांना खूप काही देऊन जातात. बोलण्याच्या संधीप्रमाणेच प्रत्येक उपक्रमात सर्व मुलांचा सहभाग असतो. प्रदर्शन, स्नेहसंमेलन, दुकानजत्रा, खेळदिन, रात्रशिबिर अशी उपक्रमांची रेलचेल वर्षभर असते. प्रत्येक मूल आपापल्या क्षमतेनुसार सहभागी होतं. संमेलनात कोणी निवेदन करतं, कोणी नाच करतं, तर कोणी अभिनय करतं. दुकानजत्रेच्या निमित्तानं  वस्तू ठरवणं, कच्चा माल खरेदी करणं, वस्तू तयार करणं, जाहिराती लिहिणं, दुकानं सजवणं, प्रत्यक्ष वस्तू विकणं, हिशेब करणं, अशी अनेक कौशल्यं  मुलं शिकतात. पहिलीपासून शिकलेल्या सर्व संकल्पना, कौशल्यं यांचे उपयोजन करण्याची संधी या निमित्ताने मुलांना मिळते.  सर्व मुलांना सर्वच गोष्टी शंभर टक्के चांगल्या जमतात असं नाही, पण मी काहीतरी केलं हा आनंद मात्र प्रत्येकाला मिळतो.
मोकळ्या वातावरणामुळे आणि प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळाल्यामुळे मनात येणारे प्रश्न, शंका न घाबरता विचारण्याची सवय मुलांमध्ये निर्माण होते. हसल्यामुळे शरीरात चांगले रस तयार होतात, आपलं आयुष्य वाढतं असं सांगितल्यावर एका मुलाने विचारलं, “ताई रडल्यावर शरीरात काय होतं?” एकदा कपडे या घटकावर सुरू झालेल्या गप्पा अश्मयुगापर्यंत जाऊन पोहोचल्या, तेव्हा एका मुलीने विचारलं, “आपला जन्म आईच्या पोटातून होतो, जन्माला आलं तेव्हा माकडच होतं ना! मग माकडाचा माणूस कसा काय झाला?” काळाचा आवाका लक्षात येणं ही साधी गोष्ट नाही, पण त्यामुळे काय-काय प्रश्न मनात निर्माण होऊ शकतात, ते या मुलीच्या प्रश्नामुळे आपल्याला समजतं. ताईंना मग योग्य माहिती शोधून त्यांच्या शंकांचं समाधान करावं लागतं किंवा कधी-कधी इतर मुलंच त्यांचं उत्तर देतात. प्रश्न पडणं ही मुलांमधील स्वाभाविक ऊर्मी आहे, ती खोडून न काढल्यामुळे टिकून राहते आणि प्रश्न पडतच राहतात.
आमच्या शाळेत आम्ही मुलांना शिकवतो असं म्हणण्यापेक्षा; हळूहळू समजून घेत, चुकतमाकत, सोबत्यांच्या मदतीने, परिसरातील झाडे प्राणी, पक्षी, माणसे यांच्याकडून मुलं शिकत जातात. त्यासाठी संधी, वातावरण मात्र आम्ही निर्माण करतो. मुलांचं शिकणं घडण्यासाठी आम्हीसुद्धा मुलांसारखंच शिकतोय वेगवेगळ्या माध्यमातून. कारण, मुलांचं हे शिकणंसुद्धा त्याच्यासारखंच असायला हवं आहे … आनंदी आणि हसरं...!!
सानिका जगदीश सावंत
​(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील डोसीबीई जीजीभॉय प्राथमिक शाळेत सहशिक्षिका आहेत.)

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रयोगशील शिक्षण , मराठी शाळा , सानिका सावंत , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Abhay Dhopawkar

      3 वर्षांपूर्वी

    वा फारच महान कार्य चालू आहे। फार फार धन्यवाद । असे शिक्षक आणि पदाधिकारी अधिक लाभले त्या मुलांचं आणि पालकांचं भाग्यच आहे।



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen