मुलाला इंग्रजीतून मराठीत घातलं, कारण...


मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवणारे शिक्षक स्वतःच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची निवड करतात, यात आपल्या समाजाला काही विसंगती दिसत नाही, इतकी ही बाब आता सामान्य झाली आहे. अशाच एका मराठी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने हौसेने आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमात घातलं खरं. पण, परक्या भाषेत मूल शिकत असताना त्याचं दिवसेंदिवस कोमेजणं शिक्षक बापाच्या वेळीच लक्षात आलं आणि मग मातृभाषेतील शिक्षणाचा निर्णय घेतला गेला. आपल्या माध्यमबदलाच्या या निर्णयाविषयी आणि मुलाच्या आनंददायी शिक्षणाविषयी सांगतायत सुधीर कदम –
 मी माध्यमिक शाळेतील शिक्षक आहे. माझा मुलगा श्रेयश एकुलता असल्याने  इतर पालकांप्रमाणेच मीसुद्धा त्याच्या शिक्षणाबाबत खूप गंभीर होतो. तो तीन वर्षांचा झाल्यानंतर त्याला नर्सरीत दाखल केलं, तशी त्याच्या आईची खूप इच्छा होती. समाजातील इंग्लिश स्कूलचे फॅड पाहून आम्ही त्याला इंग्लिश माध्यात घातलं. सकाळी लवकर उठून त्याला आंघोळ घालण्यापासून ते कपडे घालून गाडीत बसवेपर्यंत सारे सोपस्कर मीच करत होतो. सकाळी आठ वाजता तो शाळेत जायचा, ते घरी यायला दुपारचा दीड वाजायचा. शाळेतून घरी येताना बहुतेकदा तो गाडीत झोपलेला असायचा, त्याला हलवून उठवावं लागायचं. ज्या वयात आपण बालवाडीतपण जात नव्हतो, त्या वयात  कोवळ्या जीवाला सकाळी लवकर उठून, घरापासून तेरा-चौदा किलोमीटरवर जावं लागत होतं. याचं आज खूप वाईट वाटतं. शाळेतून आल्यावर तो अर्थातच तो खूप दमलेला असायचा.
मुलाची रोजची ही दमणूक पाहून नर्सरी आणि ज्युनिअर-सीनियर केजी अशी तीन वर्षे गेल्यानंतर मला ते माध्यम नकोसं वाटू लागलं. त्याचा बराचसा वेळ प्रवासात जायचा. त्याहीपेक्षा त्या वातावरणात गेल्यावर कळत-नकळत त्याच्यावर अभ्यासाचा दबाव येत असावा. इंग्रजी माध्यमातील मुलांच्या पालकांना मुलांचा बराचसा अभ्यास घरीच करून घ्यावा लागतो, तसा तो आम्हीही घेत होतो. पण, या सगळ्यात तो हसणं विसरत चालला होता. ज्या-ज्या वेळेस आम्ही पालक सभेसाठी, निकालासाठी शाळेत जात होतो, त्या-त्या वेळी शिक्षकांच्या त्याच्या अभ्यासाबाबत तक्रारी असायच्या. तो अभ्यासात मागे पडतोय याची कल्पना मला येत होती. लहान वयात सगळीच मुलं खूप चंचल असतात, तसा आमचा मुलगाही चंचल होता. तर कधी एखाद्या गोष्टीकडे एकटक पाहत बसला की, बराच वेळ त्याच गोष्टीकडे पाहत बसायचा. शिकवताना लक्ष नसतं ही शिक्षकांची त्याच्याबद्दलची सततची तक्रार होती. तिथलं वातावरण त्याला मानवत नव्हतं की भाषेमुळे त्याला व्यक्त होता येत नव्हतं, हे आम्हांला कळत नव्हतं. घरी आम्ही सर्वजण मराठीतच बोलायचो. ग्रामीण भागात राहत असल्यामुळे आजूबाजूची मुलंही मराठीतच बोलायची. शाळेत इंग्रजी आणि घरी मराठी या सगळ्यामुळे त्याच्या मनात गोंधळ निर्माण व्हायचा. तो शांत-शांत राहायला लागला. मग मी निर्णय घेतला, त्याला जिल्हा परिषद शाळेत घालण्याचा. पण, तरी मनात कुठेतरी तयार होत नव्हती. जसजसा  जून महिना जवळ येऊ लागला, तसंतसं मन अस्वस्थ व्हायला लागलं. खूप तज्ज्ञ लोकांना विचारलं,  शिक्षणासाठी मराठी माध्यम चांगलं की इंग्रजी? यूट्युबवर यावर अनेक व्हिडीओ पाहिले. सगळ्यांचा एकच सूर, मराठी माध्यमच शिक्षणासाठी योग्य. याबाबत श्री. अनिल गोरे (मराठी काका) यांचं खूप छान मार्गदर्शन मला मिळालं. गोरे काकांबरोबर मी खूप वेळा या विषयाबाबत बोललो. भाऊसाहेब चासकर यांचे खूप प्रेरणादायी लेख वाचले. त्यांच्याशी बोलणं झालं. त्यातच फेसबुकवर  प्रसाद गोखले यांच्या ‘मराठी शाळा टिकल्या पाहिजेत’ या फेसबुक समूहावर, मातृभाषेतील शिक्षणाचे फायदे, मराठी शाळांतील बदलत चाललेली आधुनिक शिक्षण पद्धती, चांगलं शिक्षण याबद्दल खूप प्रेरणादायी पोस्ट्स वाचल्या. एक लाखापेक्षा जास्त पालक-शिक्षकांचा हा समूह, त्यावर येत असलेल्या पालक-शिक्षकांच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी ठरल्या. या सर्वांचा परिणाम माझ्यावर होत गेला. मी ठरवलं,  झेडपी शाळेतच मुलाला टाकायचं. पण, एक मन सारखं म्हणत होतं, सध्या इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा ओढा वाढत असताना आपण मात्र ऐपत असताना मुलाला मराठी माध्यमात घालतोय. हा आपला निर्णय चुकला तर? रात्रभर झोप लागायची नाही. मध्येच उठायचो, मन खूप बेचैन व्हायचं. अशा वेळी गोरे काका आणि प्रसाद गोखले यांच्या फेसबुक पेजवरील पोस्ट्सचा खूप आधार वाटायचा. हा निर्णय माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा निर्णय होता. एवढा विचार तर मी स्वतःच्या करिअरबाबत सुद्धा कधी केला नव्हता. आणि निर्णय पक्का झाला, मातृभाषेतील शिक्षणाचा.
मी ज्या गावामध्ये माध्यमिक शिक्षक म्हणून काम करतो, त्याच  गावामध्ये मी मुलाला पहिलीला जिल्हा परिषद शाळेत टाकलं. माझ्याबरोबरच गाडीवर बसून तो शाळेत यायचा. माझ्या मागे गाडीवर बसून शाळेत जाताना, जो आनंद त्याच्या चेहऱ्यावर असायचा, त्याचं वर्णन मी शब्दांत करू शकत नाही. शाळेत सोडल्यानंतर मला मात्र करमायचं नाही, कारण इंग्लिश स्कूलच्या मोठ्या झगमगीत इमारतीत, वातावरणात शिकलेला आपला मुलगा, आता झेडपीच्या दोन खोल्यांमध्ये शिकणार, हे मन मान्य करत नव्हतं. परंतु, आता निर्णय घेतला होता.
मुळाक्षरं, एक ते शंभर अंक या सगळ्याची मराठीतून शाळेबरोबरच घरीपण त्याच्याकडून तयारी करून घ्यायला सुरुवात केली. हळूहळू चांगल्या पद्धतीने तो लिहू-वाचू लागला. इंग्रजी शाळेत पुढे जाऊन बोलायला घाबरणारा मुलगा १५ ऑगस्टला  पहिलीतच  सर्व लोकांसमोर आत्मविश्वासाने भाषण करू लागला. हे माझ्यासाठी खूप आनंददायी आणि त्याच्यासाठी आत्मविश्वास वाढवणारं होतं. मला हळूहळू त्याच्यात खूप छान बदल जाणवू लागला. तो आता त्याचा अभ्यासही स्वतःच मन लावून करत असतो. त्याच्या शिक्षिका त्याच्याकडून खूप चांगली तयारी करून घेत आहेत. दुसरीत असताना ‘मंथन टॅलेंट सर्च’ परीक्षेत १५० पैकी ११८ गुण मिळवून तो राज्यात सोळावा आला. त्यामुळे त्याचं आणि शाळेचंही परिसरात खूप नाव झालं. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व क्रिया तो आज उत्तम करतो. शिवाय, मी त्याला दुसरीत एबॅक्स चा क्लास लावला होता. तो आज सहाव्या लेव्हलला आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त वेगाने तो स्पीड रायटिंग करतो. तसेच, बोटांवर गणितं सोडवण्याच्या क्रिया तो आता सफाईदारपणे करतो. त्याचं इंग्रजीही चांगलं आहे. या सर्वात त्याच्या शिक्षिका श्रीमती ज्योती धावणे मॅडम यांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे.

मला आज समाधान वाटतं की, मी तीन वर्षांपूर्वी जिल्हा परिषद शाळेचा म्हणजेच मातृभाषेतून शिक्षणाचा जो निर्णय घेतला, तो योग्य होता. आज तो चौथ्या इयत्तेत आहे. शाळा कोरोनामुळे एक-दीड वर्षं बंद असल्या तरी त्याच्या अभ्यासात कुठेही खंड पडलेला नाही. या वर्षीही मंथन, प्रज्ञाशोध परीक्षेसाठी आत्तापासूनच तयारी सुरू झालेली आहे. त्याचं हस्ताक्षर तर अगदी मोत्यासारखं आहे.
मीच माझ्या मुलाची इतकी प्रशंसा करणं फार बरं दिसत नाही. परंतु, एकमेकांचं पाहून आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालणारे पालक आपल्या मुलांच्या सहज शिक्षणाला कसे मुकतात, हेच मला यातून सांगायचं आहे. इंग्रजी शाळेसाठी तीन वर्षांत लाख-सव्वालाख खर्च झाल्याचं मला दुःख वाटत नाही; परंतु ज्या शिक्षणातून मुलाला आनंद मिळत नाही, असं शिक्षण त्याच्यावर लादणं, हे मला योग्य वाटत नाही. मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी, त्याच्या अभिव्यक्तीसाठी मातृभाषेतून शिक्षण हा त्याचा हक्क आहे. आणि त्याला त्याचा हा हक्क मिळवून देणं पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे, याची मला जाणीव झाली. तशी ती इतरही पालकांना व्हावी, एवढ्याचसाठी हा लेख लिहिण्याचा खटाटोप केला आहे.


सुधीर कदम
(लेखक पुणे जिल्ह्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय, कुरवली, इंदापूर  या माध्यमिक शाळेत शिक्षक आहेत.)
संपर्क - ९९७५९५३९४३

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मातृभाषेतून शिक्षण , मराठी शाळा , प्रयोगशील शिक्षण

प्रतिक्रिया

  1. NIRANJAN TINAIKAR

      3 वर्षांपूर्वी

    कदम सरांनी अगदी मनमोकळं असं हितगुज केलं आहे. मुलांनी मातृभाषेतच शिक्षण घ्यायला पाहिजे हे स्वतः च्या उदाहरणातून दाखवताना हा निर्णय घेताना किती मानसिक आंदोलनं निर्माण होतात हेही उलगडून दाखवले आहे. या खूपच वाचनीय लेख आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen