भाषा परिक्रमा


मराठी अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते तुषार पवार यांच्या भाषा परिक्रमा या पुस्तकाला नुकताच मराठी अभ्यास परिषदेचा प्रा. ना. गो. कालेलकर पुरस्कार जाहीर झाला आहे. तुषार पवार यांनी भारतातल्या प्रत्येक राज्याला भेट देऊन ही भाषा परिक्रमा लिहिली आहे. या परिक्रमेतून प्रत्येक राज्याची प्रशासन, शिक्षण, प्रसारमाध्यमे, न्यायव्यवस्था, तंत्रज्ञान या क्षेत्रांतील भाषिक सद्यःस्थिती समोर येते. भाषेसाठी वाहून घेतलेल्या व्यक्ती, संघटना यांची माहिती मिळते. या पुस्तकाची ही प्रस्तावना -
सामान्यतः कोणत्याही पुस्तकाच्या सुरुवातीला लेखकाचं मनोगत असतंच. पण हा नियम पाळायलाच हवा म्हणून काही मी हे मनोगत लिहिलेलं नाही. खरं तर रुढार्थानं मी लेखकच नाही. हा मराठी अभ्यास केंद्रानं हाती घेतलेल्या एका प्रकल्पाचा अहवाल आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी माझी होती, म्हणून तो मी मांडतोय इतकंच. हा अहवाल कोणत्याही सांख्यिकीऐवजी अनुभव, वक्तव्य आणि वैचारिक मतं यावर आधारलेला आहे. त्यामुळेच मला हा अहवाल टक्केवारीच्या किंवा कोणत्याही पद्धतीनं प्रमाण मांडू शकेल, अशा स्वरूपात मांडता येणं शक्यच नव्हतं. या अपरिहार्यतेमुळे कदाचित नेहमीच्या अहवालांच्या चौकटीपलीकडचं असं हे पुस्तक आहे. साहजिकच पुस्तक आहे म्हणून मी त्याचा लेखक आहे. पण, त्याही पलीकडे या अहवालवजा पुस्तकाच्या निर्मितीचीही काहीएक गोष्ट आहे, या गोष्टीचाही एक प्रवास आहे, जो माझ्यासारख्या सामान्य मुलाला रोचक-रंजक वाटतो. या प्रवासाला भावनिक, विचारविश्व समृद्ध करणाऱ्या, सुन्न करणाऱ्या आठवणींची किनार आहे. हे पुस्तक समोर येत असताना हे सगळं मला आठवतंय, म्हणून ते मला मांडावंसं वाटतंय. या पुस्तकातल्या मजकुराला आणि आशयाला तुम्ही अनेक कसोटींवर नक्कीच तपासून पाहाल; पण पुस्तक येण्यापर्यंतचा प्रवास हा ‘मी भारत फिरलो आणि अमुक तमुक अनुभवलं’ हे जितकं सहज लिहिलं तितका सहज नक्कीच नव्हता. मग तो कसा होता, हे मी सांगितल्याशिवाय नक्कीच कळणार नाही, समजणार नाही. तो खरंच मी म्हणतोय तसा रोचक-रंजक आहे का, हेही ठरवता येणार नाही. म्हणून हा प्रवास कसा होता हे सांगणं ही माझीच जबाबदारी, आणि त्यासाठीच हा मनोगतचा प्रपंच.
खरं तर मराठी भाषेसाठी काहीतरी करण्याची इच्छा असलेला मी एक सामान्य मराठी भाषक माणूस. माझ्या या इच्छेवरच्या निष्ठेनं आणि मराठी भाषेच्या विकासासाठी काय करायला हवं याबाबत मराठी अभ्यास केंद्राकडे असेलेल्या वैचारिक भूमिकेतल्या स्पष्टतेनंच, माझ्यासारख्या सामान्य मराठी भाषकाला मराठीच्या चळवळीतला एक कार्यकर्ता केलं. आता चळवळीला कार्यकर्ता तर मिळाला, पण आपल्या कार्यकर्त्याकडून आपल्याला काय हवंय, ज्यामुळे चळवळ ठोसपणे पुढे जात राहील, याची समज असणारं नेतृत्व गरजेचं असतं. डॉ. दीपक पवारांच्या रूपात मराठी अभ्यास केंद्राला ते लाभलंय. आणि असं नेतृत्व तुमच्याकडे असलं की काय होतं ते म्हणजे मराठी अभ्यास केंद्रानं आजवर हाती घेतलेले वेगवेगळे प्रकल्प. हा प्रकल्पही त्यापैकीच एक. संस्थेसाठी काम करणारा कार्यकर्ता संस्थेचं कार्यालय सांभाळण्यापुरता राहू नये आणि अशा कार्यकर्त्यांना टिकवण्यासाठी इतरांनी केलेली आर्थिक मदतही काहीएका ठोस कामासाठी उपयोगात आणायला हवी, हीच मराठी अभ्यास केंद्राची भूमिका राहिली आहे. त्यामुळेच दीपक सर या प्रकल्पासाठी दिवंगत शशिकलाताई काकोडकरांकडून आर्थिक सहकार्य मिळवू शकले.
या प्रकल्पाला सुरुवात केल्यानंतर तो कशा रीतीनं पूर्ण करणार आहोत याबद्दलची ढोबळ रूपरेषा आम्ही ठरवली होतीच. मात्र प्रत्यक्ष प्रकल्प पूर्ण करताना विचार करणं जेवढं सोपं होतं, तेवढाच तो तडीस नेणं आव्हानात्मक होतं. कारण भारताच्या नकाशावर ओळखीच्या वाटणाऱ्या, मात्र प्रत्यक्षात अनोळखी असलेल्या राज्यांचा प्रवास करायचा होता. या प्रवासाचं, तिथे राहण्या-खाण्याचं नियोजन आम्हांला, पर्यायानं स्वतःला करायचं होतं, ओळख नसलेल्या माणसांची भेट घ्यायची होती. मुळात ज्यांच्याकडून माहिती मिळू शकेल अशा माणसांचा शोध घेण्यापासूनच सुरुवात करायची होती. आणि प्रत्यक्षात हे सगळं मला पार पाडायचं होतं. साहजिकच त्याचं दडपण आणि ताण होताच. कारण, मी जसं वर म्हटलं, तसा मी सामान्य मराठी भाषक. माझी मराठी भाषेच्या विकासाबाबत स्वतःची अशी काही भूमिकाच नव्हती. होतं ते केवळ मराठी भाषेवरचं प्रेम. मराठी अभ्यास केंद्राशी जोडला गेल्यानंतरच, केवळ मराठीच्याच नाही तर, एकूणच भाषाविकासाच्या प्रक्रियेबद्दलचं माझं आकलन वाढत गेलं आणि त्यातूनच माझी याबद्दलची भूमिकाही आकाराला येत गेली. साहजिकच, मी या संपूर्ण प्रक्रियेतला नवा माणूस, ज्याचा यापूर्वी कोणत्याही प्रकारच्या संशोधनाशी काहीही संबंध आला नव्हता. त्यामुळेच हा इतका मोठा प्रकल्प तडीस नेण्याचं दडपण माझ्यावर आलं होतं, हे मी नाकारूच शकत नाही. पण अशाच प्रकारचं काहीतरी करण्यासाठी मी नोकरी सोडून अभ्यास केंद्रात आलो होतो. आणि हा प्रकल्प त्या दृष्टीनं मिळालेली मोठी संधी होती, हे मला मान्य करावं लागेल. त्याच विश्वासानं या प्रकल्पाकडे मी पाहिलं आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटी ते आज आलेलं पुस्तक अशा टप्प्याटप्प्यानं तो पूर्ण करू शकलो.
प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्यानंतर लगेचच क्षेत्रभेटी सुरू केल्या नाहीत. देशातल्या प्रत्येक राज्यांमधल्या राजभाषा, त्यासाठी तिथे केलेले राजभाषा कायदे, तिथल्या भाषिक चळवळी आणि कार्यकर्ते, तिथल्या भाषांच्या स्थितिगतीविषयी काहीएक परिस्थिती मांडणारा काहीएक मजकूर इंटरनेटवरून मिळवता येतो का, हे सुरुवातीला पाहिलं. जेणेकरून प्रत्यक्ष क्षेत्रभेटींत काय करायचं याबद्दल काहीतरी ठरवता येईल, असं वाटलं होतं. पण काही राज्यांतले राजभाषा कायदे सोडले तर इंटरनेटवरून हाती फारसं काही गवसलंच नाही.  प्रत्येक राज्यात मला किमान एक माणूस किंवा एक संस्था अशी शोधायची होती, जी त्या राज्यातल्या माझ्या दौऱ्याची दिशा ठरवण्यात मदत करू शकेल. मग त्यासाठी पत्रकार, लेखक, साहित्यिक संस्था, विद्यापीठांतले भाषेचे शिक्षक, असा एक गाळणी लावलेला शोध मला सुरू करावा लागला. पण तोही प्रत्येक ठिकाणी लागू पडला नाही. मुंबईत बसून अशा प्रकारची माहिती केवळ दक्षिणेकडच्या राज्यांबद्दल उपलब्ध होत होती. मात्र इतर राज्यांमधलं फारसं काही हाती लागलं नाही. त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रभेटींनंतरच ठोस माहिती  मिळू शकेल आणि त्या-त्या राज्यात जाऊन काय करायचंय, हे प्रत्यक्ष तिथेच जाऊन ठरवावं लागेल, याची आम्हा सगळ्यांनाच स्पष्टता आली. आणि हेच माझ्यासाठी मोठं आव्हान होतं.
क्षेत्रभेटींना सुरुवात करताना, आधी कोणत्या राज्यापासून सुरुवात करावी हा आमच्या समोरचा मोठा प्रश्न होता. कारण, सगळीच राज्यं अनोळखी आणि मला कोणाच्याही सोबतीशिवाय एकट्याला प्रवास करायचा होता. दक्षिण भारत, ईशान्य भारत, उत्तर भारत आणि गुजरातसह मध्य आणि पूर्वेकडची राज्ये, अशी दौऱ्यासाठी राज्यांची विभागणी करायचं निश्चित झालं. यातली सोपी आणि खडतर राज्यं कोणती, याबद्दलही आमच्यामध्ये चर्चा होत होती आणि खरं सांगायचं तर, या चर्चांमुळेच भारतातल्या इतर राज्यांमधल्या सामाजिक परिस्थितीचं मला पहिल्यांदाच काहीएक आकलनही होत होतं. पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या माझ्यासारख्या मुलाला, भारत हा त्याचा देश आहे हे माहीत आहे, पण तो कसा आहे हे अजिबात माहीत नाही, हे मला पहिल्यांदा कळत होतं. त्यातूनच भारतीय भाषा हा या दौऱ्याचा मुख्य विषय असला, तरी या दौऱ्यामुळे माझ्या जगण्यातल्या समृद्धतेत भर टाकू शकेल, अशी भारताची विविधताही मला काहीएक प्रमाणात अनुभवायला मिळणार आहे, हेही मला पहिल्यांदाच समजू लागलं होतं. या चर्चांनी या प्रकल्पाबद्दल माझ्या मनात असलेल्या दडपणाला आता उत्सुकता आणि आनंदाचीही जोड दिली होती, हेही तितकंच खरं. अखेर याबद्दलच्या चर्चेच्या प्रक्रियेतून ईशान्य भारताचा दौरा सर्वात आधी करावा असं ठरलं. तो का हे महत्वाचं आहे. मुळात ईशान्य भारतातल्या राज्यांबाबत आपल्याकडे फारशी माहिती नसते. शिवाय, ईशान्य भारतातल्या राज्यांना हिंसक वांशिक संघर्षाची पार्श्वभूमी आहे. एका अर्थानं एकट्यानं प्रवास करण्याच्या दृष्टीनं हा तसा कठीण प्रदेश. सुरुवातीलाच आपण प्रकल्पातला खडतर वाटणारा प्रदेश करून मोकळं व्हावं, म्हणजे नंतर प्रकल्पात तसा काही अडथळा राहणार नाही, या विचारानं दौऱ्याची सुरुवात ईशान्य भारतानं करावी असं ठरलं होतं. एक योजना म्हणून हे सगळं ठीक वाटत होतं. पण त्यानं माझ्या मनातली भीती मात्र वाढली होती, हे इथं मान्य करावं लागेल, कारण ईशान्य भारताचा प्रदेश कसा आहे हे समजून घेण्यासाठी मी तिथे काम केलेल्या काही लोकांशी बोलून घेतलं होतं. काही लोकांशी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाच एक भाग असलेल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या लोकांशी. कारण त्यांचं बरंचसं काम तिथे आहे आणि हे काम करणाऱ्यांमध्ये अनेक मराठी माणसं आहेत. त्यांनी मला ईशान्य भारतातल्या हिंसंक घटनाबद्दल जे-जे काही सांगितलं होतं, ते ऐकून मी एकटा जातोय पण परत येईन ना, अशी भीती वाटलीच होती; पण ही भीती मी आता जितक्या सहजतेनं मांडतोय तितक्या सहजतेनं त्यावेळी कोणाकडेही बोलून दाखवली नव्हती, विशेषतः माझ्या घरतल्या कोणालाही. मी जिथे जातोय, तो प्रदेश कसा आहे याबद्दल मी फक्त ऐकलं होतं, अनुभवलं मात्र नव्हतं. त्यामुळे माझ्या मनात शंका आल्या असल्या, तरीही तशा प्रकारच्या शंकांमुळे दौरा सुरू करण्याआधीच माझी काळजी करणाऱ्या कोणाच्याही मनात भीती निर्माण होऊ नये, एवढंच मला त्यावेळी वाटत होतं.
क्षेत्रभेटींचा उद्देश हा त्या-त्या राज्यात प्रत्यक्ष जाऊन, तिथे वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांना प्रत्यक्ष भेटून, माहिती मिळवणं हा होता. पण, ही माहिती कशा-कशा बाबतची असावी हे ठरवणंही महत्त्वाचं होतं म्हणूनच त्यासाठीची प्रश्नावली मी तयार केली. सुरुवातीला प्रश्नच तर काढायचे आहेत, त्यात काय एवढं? असं मला स्वतःला वाटत होतं; पण ते तसं नव्हतं. मला वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांना प्रश्न विचारायचे होते आणि ते प्रश्न त्यांना स्वतःसाठी आहेत असं वाटायला लावणारे हवे होते. एखाद्या प्राध्यापकासाठी किंवा स्वतःच्या आवडीचा विषय ठरवून संशोधन करणाऱ्या व्यक्तीसाठी हे त्या अर्थानं नक्कीच सोपं होतं. पण, माझ्यासाठी मात्र तशी परिस्थिती नव्हती. जर मी समाजशास्त्राच्या प्राध्यापकाला भेटलो तर त्याला भाषा विकासाविषयी काय प्रश्न विचारायला हवेत, इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकानं प्रादेशिक भाषा विकासासाठी काय करता याचं उत्तर द्यायचं असेल तर त्यासाठी काय विचारायला हवं, राजकीय व्यक्तीला प्रश्न विचारण्यासाठी प्रतिक्रियात्मक आणि धोरणात्मक पातळीवरचे प्रश्न विचारायला हवेत, साहित्यिकांना साहित्यापलीकडे जाऊन त्यांची भूमिका तपासून घेता येईल असं काहीतरी विचारायला हवं, माध्यमांच्या प्रभावाला समजून घेणारे प्रश्न तयार करायला हवेत... हे मला प्रश्न काढायला लागल्यानंतर सुचायला लागलं होतं. त्याआधी नाही. मला यात माझा दोष वाटत नाही, पण यामुळे माझ्या चिकित्सक वृत्तीला चालना मिळाली, एवढं मात्र नक्की. या प्रकल्पाच्या तयारी दरम्यानच मला जे काही शिकायला मिळालं होतं, हे त्यापैकी एक होतं. अर्थात, अभ्यास केंद्रामुळे भाषा विकासासाठी काय-काय करायला हवं हे समजून घेता आलं. त्यामुळेच मी वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांकडून त्यांचं काय योगदान आहे, हे समजून घेता येईल अशा प्रकारची प्रश्नावली तयार करू शकलो होतो. जवळपास १९० प्रश्नांची ही प्रश्नावली या पुस्तकाच्या परिशिष्टात दिली आहे. तुम्ही ती आवर्जून पाहा. ती योग्य होती की नाही हेही कळवा. योग्य असेल तर हे प्रश्न तुमच्यासाठीही आहेत असं समजून, तुम्ही स्वतः आपल्या मराठी भाषेच्या विकासासाठी काही करत आहात की नाही हे तपासून पाहा. आणि ते आम्हांलाही कळवा.
या प्रकल्पासाठी मी केलेला प्रवास हा खरंतर या अहवालातलं एक प्रकरण असायला हवं होतं; कारण, हा प्रवासही या प्रकल्पाचाच एक भाग आहे. मात्र या प्रवासातला अनुभव भाषेच्या स्थितिगतीबद्दल काही सांगू शकेल का? हा मलाच पडलेला प्रश्न आहे. त्यामुळेच प्रवासाच्या अनुभवांना मी मनोगतातच मांडावं, असं मला वाटलं. माझ्या या प्रवासाला संघर्षाची किनार होती का, या प्रवासात काही नाट्य होतं का, या प्रवासानं मला काय शिकवलं, हे प्रश्न तुम्हांला नक्कीच पडले असतील. आणि त्या अनुषंगानं मला हा प्रवास आजही आठवतोच. पण, तरीही या प्रश्नांच्या पोटात जी उत्तरं दडली आहेत, ती मला जशीच्या तशी देता येत नाहीयेत. कारण, या संपूर्ण प्रकल्पावर काम करत असताना, मी कसा प्रवास करतोय यापेक्षा मी त्या-त्या ठिकाणी पोहोचल्यावर कोणाकोणाला भेटतोय, यावरच माझं जास्त लक्ष होतं. तरीही या प्रवासाच्या काही आठवणी आहेत हे नक्की, अगदी ईशान्य भारताच्या पहिल्या दौऱ्यापासूनच.
१९ मार्च २०१२ रोजी मी क्षेत्रभेटींसाठी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या बाहेर पडलो. खरंतर त्यावेळेस मला दौरा सुरू करायचा नव्हता, पण मला तसं का वाटलं, हे मी तेव्हा कोणाशीही बोलू शकत नव्हतो. कारण, प्रकल्पासाठी पाठ्यवृत्ती मिळाल्यापासून प्रत्यक्ष क्षेत्रभेटी सुरू करायला उशीर झाला होता. त्यामुळे मार्च महिन्यात काहीही करून पहिल्या दौऱ्याला सुरुवात करावी, असा निर्णय अभ्यास केंद्रानं घेतला होता. त्यानुसार दौऱ्याला सुरुवात करणं मला बंधनकारक होतं. पण, तरीही तो का सुरू करू नये असं तेव्हा वाटलं ते मांडतोय. नेमकं त्याच काळात माझ्या घराच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. कच्च्या झोपडीवजा घराला पक्क्या घराचं नवं रूप देण्याचं काम. मुंबईतल्या कुणालाही स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न म्हणजे काय हे नक्कीच सांगायला नको. त्यामागे प्रत्येक मुंबईकराच्या भावना या एकाच पातळीवर आहेत. माझ्या बाबांनी कमावलेलं हे घर, झोपडीच्या पलीकडे घराचा आकार घेतंय आणि तो आकार द्यायला माझा मोठा हातभार लागतोय, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती आणि आजही आहे. अगदी थोड्याच दिवसांमध्ये नव्या घरात गृहप्रवेशाचा विधी होणार आणि मी दौऱ्याला जात असल्यामुळे त्यावेळी हजर नसणार, याचं मला तर वाईट वाटत होतंच, त्याहीपेक्षा जास्त माझ्या आईबाबांना, माझ्या होणाऱ्या बायकोला, आणि हे घर उभं राहावं म्हणून मदत करणाऱ्या सनी आणि समीर या माझ्या दोन मित्रांना, जास्त वाईट वाटत होतं. या भावनिक गोंधळात मी तेव्हा अडकलो होतो. पण, फार न अकडता मी ठरल्या दिवसाला दौऱ्याची सुरुवात केली.
प्रवासात मी आणि माझ्यासोबत नेलेलं सामान सुरक्षित राहावं म्हणून शक्यतो किमान रेल्वेच्या वातानुकुलित तिसऱ्या श्रेणीनं प्रवास करायचा, असं आम्ही ठरवलं होतं. काही अपवाद वगळता मी तो तसाच केला. त्यात मला फार काही अडचण आली नाही, पण ती येऊ नये म्हणून मला काही जणांनी मदतही केली होती. इथे मला माझा मित्र सनीचा उल्लेख करावाच लागेल. कारण, केवळ मुंबईतून दौरा सुरू करण्याचीच तारीख ठरलेली असायची, नंतरच्या प्रवासाच्या तारखा मात्र त्या-त्या राज्यातल्या कामावरच ठरायच्या. त्यामुळे मला ऐनवेळेला आरक्षणासाठी प्रयत्न करावे लागायचे. ते मला सहज करता यावं म्हणून सनीनं मला संपूर्ण भारत दौऱ्यात त्याचं क्रेडिट कार्ड ऑनलाइन वापरायला दिलं होतं. त्यासाठी मी कितीही वाजता केलेला फोन त्यानं उचलला होता. या संपूर्ण दौऱ्यात माझ्याकडे असलेला लॅपटॉपही त्याचाच. त्याकरता, त्याला आवडलं नाही तरी, इथे त्याचे औपचारीक आभार मानावेच लागतील. दोनतीन वेळा असे प्रसंग आले की, मला रेल्वेच्या तिकिटाचं आरक्षण मिळालंच नाही. तेव्हा मला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या खाजगी सचिवांनी, छत्तीसगढच्या राज्यपालांच्या सचिवांनी आणि दिल्लीतले पत्रकार सुरेश बाफना यांनी व्ही.आय.पी. कोट्यातून आरक्षण व्हावं, यासाठी मदत केली होती. त्यावरनं एक गोष्ट मी नक्कीच सांगू शकतो की, आपल्या राज्यात कोणीतरी बाहेरून आलं आहे आणि त्याला जमेल ती मदत करणं आपलं काम आहे, अशी भावना मला देशभरात अनेकदा अनुभवाला आली. या रेल्वे प्रवासानं माझी भारताच्या भौगोलिक विविधतेशी जितकी ओळख करून दिली, तितकीच वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांशीही. अलिगढ ते उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊचा प्रवास, हा माझ्यासाठी जीवघेणा प्रवास होता. कारण, तेव्हा माझ्याकडे आरक्षण तर नव्हतंच, पण मरणाच्या गर्दीत एकमेकांशी मिळेल त्या कारणावरून भांडणाऱ्या, जीवघेण्या कृती करणाऱ्या प्रवाशांसोबत मला तो करावा लागला होता. त्यावेळी मी कोणत्याही भांडणाला कारणीभूत ठरू नये, याची प्रचंड काळजी मला घ्यावी लागली होती. कारण, नेमकं त्याच आसपासच्या काळात महाराष्ट्रात उत्तर भारतीयांविरुद्ध झालेला संघर्ष आणि त्यावरनं उठलेल्या प्रतिक्रियांच्या आठवणी ताज्या होत्या. माझ्याशी कोणाचं भांडण झालं आणि मी त्या गर्दीतला महाराष्ट्रातला एकमेव मराठी माणूस आहे असं कोणाला कळलं, समजा त्याचा त्याला राग आला आणि त्याला काही करावंसं वाटलं तर माझं काय होईल, हा एकच प्रश्न माझ्या मनात घोळत होता. शक्य तितकं शांत बसावं, काहीही बोलू नये, अगदी लघवीला जाण्यासाठीही कोणाला त्रास देऊ नये, माझा चुकूनही कोणत्या स्त्रीला स्पर्श होऊ नये, अशी काळजी घेत न झोपता मी तो प्रवास केला. लखनऊला उतरल्यानंतरच मी सुटलो, असं मला वाटलं होतं. ही अतिशयोक्ती नाही तर त्या प्रवासानं, डब्यातल्या वातावरणानं माझ्या मनात निर्माण केलेली खरीखुरी भीती होती. प्रांतवादाच्या संघर्षात आपण दुसऱ्या प्रांतात एकटे सापडलो तर आपल्यावरही काय बेतू शकतं, या कल्पनेनं काय होतं ते मी तेव्हा अनुभवलं. माझा हा अनुभव तुम्हांला काय सांगतो, काय सुचवतो याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण, त्या एका प्रवासानं माझ्यातल्या जाणिवांची बंद झापडं उघडायला सुरुवात केली होती हे खरं! रेल्वे प्रवासाच्या अशाच दोन आठवणी आहेत. त्यातली एक चांगली, तर एक गमतीदार संघर्षाची आहे.
चेन्नईतून पुढचा प्रवास करत असताना, नेमकं त्याच दिवशी वादळामुळे रेल्वेचे मार्ग बदलले होते. चेन्नई सेंट्रल स्थानकातून सुटणाऱ्या गाड्या चेन्नई एग्मोरहून सोडल्या होत्या. मात्र ही बातमी मला कळलीच नव्हती. चेन्नई सेंट्रल स्थानकात पोहोचल्यावर मला ते कळलं. तिथून चेन्नई एग्मोरला मी पोहोचलो; पण मी पोहोचलो तेवढ्यातच, मला जी गाडी पकडायची होती तिचा हॉर्न वाजला. मी चौकशी करेपर्यंत ती गाडी स्थानकातून हलली. मात्र मला ती गाडी पकडता यावी म्हणून तिथल्या स्टेशन मास्तरनं मोटरमनशी कसा संपर्क साधला ते माहीत नाही, पण काही डबे पुढे सरकलेली ती गाडी थांबली. मला रूळ पार करून गाडीत चढू दिलं आणि त्या नंतर गाडी पुढे सोडली. घाईत मी त्यांचं नाव विचारू शकलो नाही, पण त्यांच्या संवेदनशीलतेनं किंवा मदत करण्याच्या वृत्तीनं म्हणा मी पुढचा प्रवास करू शकलो. तर दुसरी घटना हम्पी ते कारवार या रेल्वेप्रवासाची. कारवारला पोहोचल्यावर मला तिथून गोव्यासाठीची दुसरी ट्रेन पकडायची होती. या दोन्ही गाड्यांमध्ये जवळपास तीनेक तासांचं अंतर होतं; त्यामुळे तशी काळजी नव्हतीच. मात्र हम्पीवरून निघालेली पॅसेंजर प्रत्येक स्थानकात जवळपास दहा-पंधरा मिनिटं रखडू लागली. त्यानंतर मध्येच एका स्थानकात ती दीडेक तास रखडली. तेव्हा मात्र माझी पुढची ट्रेन चुकली असंच वाटलं. वेळापत्रकाप्रमाणे गेलं तर ती चुकणारच होती. ट्रेनच्या रखडण्यानं प्रवाशांचा पारा चढला आणि त्यांनी स्टेशन मास्तरच्या कार्यालयावर हल्लाच केला. तेव्हा घाबरून स्टेशनमास्तरनं खरं कारण सांगितलं. कारवारच्या दिशेनं येणाऱ्या एका ट्रेनमध्ये रेल्वेचा कोणी बडा अधिकारी प्रवास करत होता. त्याची गाडी कुठेही रखडू नये म्हणून आमची गाडी मुद्दाम थांबवली जात असल्याचं त्यानं सांगितलं. हे ऐकून मलाही राग आला होताच. माझी चूक नसताना, रेल्वेच्या मनमानीमुळे माझी गाडी का चुकावी? या रागातच मी कारवार स्थानकाचा फोन नंबर मिळवून फोन केला. त्यांनी ही गाडी स्थानकात पोहोचेपर्यंत गोव्याला जाणारी किंवा या गाडीला जोडून असणाऱ्या पुढच्या सगळ्या गाड्या थांबवाव्यात अशी आधी विनंती केली. पण, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा मात्र डोकं सणकल्याप्रमाणे मी भांडलो. आमची गाडी कोणत्या स्थानकात किती वेळ रखडली, ती कशी पुढे जाऊ शकली असती, आणि हे सगळं तुमच्या मनमानीमुळे कसं घडलं, याचा सगळा तपशील माझ्याकडे आहे. हे सगळं ग्राहक न्यायालयात नेईन आणि नुकसान भरपाई तर मिळवेन, पण संबंध असेलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याची किमान एक तरी बढती थांबेल अशी कारवाई होईल इथपर्यंत पाठपुरावा करेन, असं मी कुठल्या आत्मविश्वासानं बोललो ते आज मला आठवत नाही, पण हे मी बोललो हे खरं! त्यावर त्यांनी माझ्याकडून मी खरंच प्रवासी आहे का, माझं त्या गाडीतलं आरक्षण या विषयीचे तपशील घेतले. कारवारला आमची गाडी ठरलेल्या वेळेपेक्षा जवळपास चारेएक तासांपेक्षा उशिरा पोहोचली. तेव्हा आश्चर्य असं की, गोव्याला जाणारी माझी पुढची गाडी स्थानकात थांबली होती. आणि ती थांबवून ठेवली होती अशा उद्घोषणाही होत होत्या. गंमत म्हणजे, मी जेव्हा माझ्या आसनावर गेलो, तेव्हा तिकीट तपासनीस आणि एक रेल्वे पोलिसांचा जवान तिथे हजर होता. त्यांनी झालेल्या घटनेबद्दल माझी माफी मागितली. पण, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मला जे भाव दिसले, ते मात्र चमत्कारिक होते. माझं फोनवर भडकणं हे त्यांना उंचपुऱ्या शरीरयष्टीच्या माणसाचं वाटलं होतं. पण, प्रत्यक्ष मी भेटलो तेव्हा हा इतक्या छोट्या चणीचा, आणि या पोरानं आपल्याला थांबवलं, हे त्यांच्या चेहऱ्यावर मी स्पष्ट वाचू शकत होतो. त्यांनी मला फुकटात पाणी आणि जेवण देऊ केलं. अर्थात, मी ते फुकटात घेतलं नाही. पण, मी माझी चुकणारी गाडी थांबवण्यात यशस्वी ठरलो होतो. ईशान्य भारतातल्या अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, आणि मिझोराम या राज्यांतला बहुतेक प्रवास मला खाजगी बसनं करावा लागला होता. त्यावेळी मेघालयातनं त्रिपुराला जाताना झालेली जीवघेणी फसवणूक पुन्हा होऊ नये, यासाठी मी आजही दक्ष राहतो. प्रवासी गाडी सांगून बस गाड्यांचं आरक्षण करणाऱ्यानं आम्हाला तस्करीचं सामान वाटावं, अशा रीतीनं माल वाहतूक करणाऱ्या बसमध्ये बसवलं होतं. प्रवास रात्रीचा आणि बसमध्ये दिवेही नव्हते. आतल्या सामानामुळे पसरलेला दुर्गंध, दारू पिणाऱ्या प्रवाशांची सोबत. मध्येच कुठे बस सोडावी तर पुढचा प्रवास कसा करावा याबद्दलची अजिबात माहिती नाही. त्यामुळे जीव मुठीत धरून जवळपास दहा तासांपेक्षा अधिक काळ मी त्या बसमध्ये होतो. मिझोराममधल्या डोंगराळ भागांत केवळ खाजगी जीपचाच पर्याय उपलब्ध होता. तिथून परतत असताना, घाटात एका वळणार, मी जीपमध्ये ज्या बाजूला बसलो होतो, त्या बाजूचा दरवाजा अचानक उघडला, कारण मीच तो व्यवस्थित बंद केला नव्हता. त्यावेळेस जर मी समोरच्या सीटला असलेलं हँडल पकडलं नसतं, तर मी खाली दरीत कोसळलो असतो, याची शहारा आणणारी आठवण आजही मला येते. नशिबाने वाचलो अन् दौराही पुढे सरकू शकला.
असाच जीवघेणा वाटावा असा प्रसंग नागालँडमध्ये घडला. दिमापूरला उतरल्यानंतर कोहिमात प्रवेश करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मी तिथल्या न्यायालयात गेलो होतो. अर्ज दिल्यानंतर थोडा वेळ थांबावं लागणार होतं, म्हणून जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये गेलो. तिथं अचानक एक व्यक्ती आली. माझी चौकशी करू लागली. मी कुठून आलो, कशासाठी आलो, मी कोणासाठी काम करतो, माझ्याकडे काय सामान आहे, असे प्रश्न विचारले. माझं ओळखपत्र तपासलं. आणि अचानक स्वतःचं टी-शर्ट वर करून त्याने त्याच्या जीन्समध्ये खोचलेली बंदूक बाहेर काढली. माझ्या दिशेने रोखली आणि विचारलं 'ऐसा कुछ सामान तो आपके बॅग मे नहीं है ना?' आता मी घाबरलो होतो हे वेगळं सांगायला नको. मी त्याला माझं सगळं सामान दाखवलं. त्यानंतर मात्र तो माझ्याशी एखाद्या मित्रासारखा वागला. रात्रीचा बाहेर पडू नकोस, काम संपल्यावर शांतीनं निघून जा, असे प्रेमळ सल्लेही दिले. एकच सांगेन, सिनेमात किंवा पोलिसांच्या कंबरेला खोचलेली बंदूक पाहणं आणि प्रत्यक्ष तुमच्यावर रोखलेली बंदूक पाहणं, हे दोन्ही सारखं नाही. पहिल्यात थरार असू शकेल, पण दुसरं जीवघेणं भीतीदायक आहे. हा प्रसंग मी लागलीच दीपक पवारांना फोनवरून कळवला होता. आणि नेमकं त्यानंतरच माझं नेटवर्क काही काळासाठी गेलं होतं. ते जसं आलं, तसा पहिला फोन दीपक पवारांचाच होता, मी सुखरूप होतो की नाही हे समजून घेण्यासाठी! माझं नेटवर्क जाणं ते परत येणं या काळात त्यांना काय वाटलं असावं, हे खरंच त्यांनाच ठाऊक! मी माझ्या घरातल्या कोणालाही हा प्रसंग सांगितला नव्हता. फक्त सनीला फोन करून कळवलं. ‘दादा मी आज घोडा पाहिला.’ त्यानं विचारलं, ‘पांढरा होता का?’ मी एवढंच म्हटलं, ‘चार पायांचा घोडा नाही, घोडा म्हणजे चाप असलेली बंदूक.’
या दौऱ्यातली आणखी महत्त्वाची आणि आव्हानात्मक बाब म्हणजे माझी निवासाची सोय. ती माझी मलाच करायची होती आणि दौऱ्याचा खर्च आटोक्यात राहावा म्हणून परवडेल अशीच. ईशान्य भारताच्या दौऱ्यात मी अरुणाचलप्रदेश, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा इथे तिथल्या वनवासी कल्याण आश्रमाच्याच शाखांमध्ये राहिलो. तिथल्या अनुभवानं मला स्वावलंबी बनवलं हे नक्की, कारण त्यामुळेच मी स्वतःचं जेवण घेणं, आपली भांडी घासणं, स्वतःच्या आंघोळीची सोय करणं, कपडे धुणं शिकू शकलो. माझ्या निवासाची सोय करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाच्या सर्व व्यवस्थापनाचे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार. दिल्ली, पश्चिम बंगाल, हैद्राबाद आणि चेन्नई इथे मी बृहन्महाराष्ट्र मंडळांनी उभ्या केलेल्या निवासी ठिकाणांवर राहिलो होतो. राहण्याच्या बाबतीत मला वाईट अनुभव आला तो मध्यप्रदेशात. तिथे मी युथ हॉस्टेलला राहिलो होतो. पण ते इतकं भन्नाट होतं की, पलंगावर झोपल्यावर वर तुटलेलं सिलिंग दिसायचं आणि त्या सिलिंगवर लटकणारी, कोणीतरी लपवलेली अंतर्वस्त्रं. मी ते दोनच दिवसात सोडलं.
शेवटचं आणि महत्त्वाचं, माझ्यातल्या माणसाला या दौऱ्यात दिसलेला भारत कसा होता? तो चांगलाही होता आणि क्रूरही होता. माझ्या डोळ्यांवरची झापडं दूर करणारा होता, मला माणूस म्हणून वागलं पाहिजे, हे शिकवणारा होता. काही पूर्वग्रहांतून बाहेर काढणारा होता आणि ते इथे मांडायला हवं. त्यातले महत्त्वाचे अनुभवच इथे मांडतो. बांग्लादेशी मुस्लिमांबद्दल देशात काय वातावरण आहे ते आपल्याला ठाऊकच आहे. मी पश्चिम बंगालमध्ये होतो तेव्हा त्याबद्दल अनेक हिंदूंनी मला प्रश्न केला की, तुम्ही बांग्लादेशी मुस्लीम असं का म्हणता? ते बांग्लादेशी नाहीत. ते बंगाली भाषक आहेत, असं तिथल्या अनेक हिंदूंनी मला सांगतिलं. यातलं खरं काय किंवा खोटं काय मला माहीत नाही. पण, भाषेत धर्म आडवा येत नाही, तो आपण आणलाय हे मला पश्चिम बंगालनं शिकवलं. तिथले हिंदू काय किंवा मुस्लीम काय, ते स्वतःला आधी बंगाली म्हणतात आणि स्वतःचा धर्म नंतर लावतात. माझ्या मनावरचं धर्माचं गारूड पश्चिम बंगालनं उतरवलं. दुसरं उदाहरण उत्तरप्रदेशातलं. तिथे लखनऊला असताना, मी जेव्हा-जेव्हा जवळच्या हॉटेलात आणि खाणावळीत गेलो, तेव्हा-तेव्हा माझ्या डोळ्यांत आसवं आलीच, कारण तिथल्या बालमजुरांची अवस्था. तिथे जवळपास प्रत्येक हॉटेलात बालमजूर आहेत आणि त्यांना त्यांचे मालक खूप निष्ठूरपणे वागवतात. तिथले ग्राहकही त्यांच्याशी तसेच निष्ठूरपणे वागतात. दहा-बारा वर्षांच्या मुलाचा जातीवरून उल्लेख करून, त्याला हडतूड करणारी व्यवस्था मी तिथल्या हॉटेलांत पाहिली. या व्यवस्थेनं मला पुरतं हेलावलं होतं. हे पाहूही शकत नव्हतो, ताटातले दोन घास घशाखाली ढकलूही शकत नव्हतो आणि तिथल्या व्यवस्थेत त्याचा विरोधही करू शकत नव्हतो. दोनेक दिवसांनी तर मी हॉटेलात जाण्याऐवजी जेवण मागवण्याचा पर्याय निवडला. हे केवळ तिथल्या गरिबीचं प्रतिक नव्हतं, तर त्याही पलीकडे तिथल्या जात आणि वर्ण व्यवस्थेतून आलेल्या गरिबीचं आणि त्यांना दडपणाऱ्या व्यवस्थेचं प्रतीक होतं. या घटनेनं माझ्याही मनातली जात व्यवस्था गळून पडायला मदत केली. शिवाय, प्रांतवादाबाबतचं माझं मत काही प्रमाणात बदललं, ते नेमकं काय ते बिहारचं उदाहरण देऊन सांगतो. उत्तर भारतातल्या विशेषतः बिहारच्या नागरिकांवर प्रांतवादातून देशभरात व्यक्त होणारा रोष आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. तसा तो माझाही होता किंवा आता काही बाबींपुरता आहे. पण मी बिहारला पटणात असताना, मला तिथली माणसं आवडली, भावली हे खरं आहे. तिथली गरिबी आणि श्रीमंती ही दोन टोकं. पण दोन्ही टोकाची माणसं आनंदी. अगदी दुःखातही हसतमुख. म्हणजे तिथे जीव घेणारा माणूसही हलक्या-फुलक्या खेळकर वातावरणातच तुमचा जीव घेईल, असं तिथलं एकूण वातावरण. हे हलकंफुलकंपण कसं आलं असेल, हे समजण्यासाठी तिथल्या लोकांशी बोलत राहायला हवं. गरिबीशी लढायचं तर आपण जिथे जाऊ तिथे टिकायचं हे तिथल्या गरीब वर्गानं स्वतःला समजावून टाकलंय, कारण त्यांना पर्याय नाही. ते तिथे जगू शकत नाहीत म्हणून बाहेर पडतात. जिथे जातात तिथे टिकण्याचा प्रयत्न करतात. या प्रयत्नात जे बरंवाईट घडतं त्याला स्वीकारतात. त्याला प्रतिक्रिया दिली तर ती क्रूर असली तरी खेळकर वाटावी हे तत्त्व जपतात.
या अनुभवानं मला काय शिकवलं? तर देशात गरिबी आहे, जी माणसाला जगण्यासाठी त्याच्या घराबाहेर पडायला भाग पाडते. या देशात वेगवेगळी राज्ये आहेत आणि ही राज्ये एकाच देशातली असल्यामुळे अशा बाहेर पडणाऱ्या प्रत्येक माणसाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला, म्हणजे मराठी माणसालाही. म्हणूनच मी इथे बिहारी का आला, हा प्रश्न भारत नावाच्या देशात विचारणं चुकीचं आहे. तो इथं कसा वागतो, हा प्रश्न मी नक्कीच विचारावा. तो इथे का, या प्रश्नाला देशाची घटना आणि देशातल्या परिस्थितीनं मात्र बाद केलंय,  हे माझं या दौऱ्यातलं आकलन.
हे पुस्तक दिवंगत शशिकलाताई काकोडकर यांच्या पाठबळाशिवाय प्रकाशित होऊ शकलं नसतं, किंबहुना हा प्रकल्पच आकाराला आला नसता. म्हणूनच हे पुस्तक आम्ही त्यांना अर्पण केलं आहे. या दौऱ्याच्या प्रत्येक टप्प्यावर अनेकांनी मला वेगवेगळे संपर्क मिळवून देण्यासाठी मदत केली. ज्यामुळे या प्रकल्पाचा प्रवास कायम राहू शकला. त्या सर्व हितचिंतकांचे आभार! या दौऱ्यात मला भेटून माहिती देणाऱ्या, कधी माझ्याशी भांडणाऱ्या अशा मी भेट घेतलेल्या सगळ्या व्यक्तींमुळेच या पुस्तकाला आशय मिळाला आहे, त्या सर्वांचे आभार! पुस्तक प्रकाशित व्हावं म्हणून वीणा सानेकरांनी संपादनासाठी घेतलेली मेहनत, प्रकाश परब सरांनी वेळोवेळी केलेल्या सूचना, दिवंगत जयवंत चुनेकर सर आणि ग्रंथालीच्या दिनकर गांगल सरांनी केलेलं मार्गदर्शन, या सर्वांचा मी आभारी आहे. संतोष आग्रे, आनंद भंडारे, साधना गोरे, शरद गोखले, नयन म्हात्रे आणि विक्रम जाधव या माझ्या सहकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी सहकार्याचा हात पुढे करणाऱ्या ग्रंथालीच्या सुदेश हिंगलासपूरकर सरांचेही मी मनापासून आभार मानतो. माझ्या या प्रकल्पातल्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक घडामोडीत माझ्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका वठवणारे आणि प्रकल्पासाठी माझ्यावर विश्वास टाकणाऱ्या दीपक सरांचे मनःपूर्वक आभार. आता आभारातलं शेवटचं पण महत्त्वाचं, जिच्यामुळे मी कॉर्पोरेटमधली नोकरी सोडून मराठी अभ्यास केंद्रासोबत स्वतःला जोडून घेऊ शकलो, ती माझी पत्नी सोनाली. तिनं मला मोकळा श्वास घ्यायला लावला नसता, या काळात मला येणाऱ्या अडचणींमध्ये मदत करण्यासाठी सनीसारखा मित्र मिळाला नसता, तर हा प्रकल्प माझ्या जगण्याच्या परिघाच्या आसपासही नसता हे खरंच. त्यासाठी या दोघांचेही मनापासून आभार...
तुषार रघुनाथ वैशाली पवार
(लेखक मराठी अभ्यास केंद्राचे सदस्य आहेत.)
संपर्क - ९९८७९७५५५३
(पुस्तकाचे नाव - भाषा परिक्रमा, प्रकाशन – मराठी अभ्यास केंद्र, मूल्य – ४०० रु.)

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषा , व्यवहार भाषा , ज्ञान भाषा , राजभाषा , तुषार पवार , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen