भाषा शिक्षण आणि शिक्षणाची भाषा


“भाषा आपले औपचारिक शिक्षण सुरू होण्याच्या आधीपासून आपल्या आयुष्यात असते आणि शिक्षण संपल्यानंतरही असते, हे जसे खरे आहे; तसेच आपल्या एकंदर शैक्षणिक यशापयशातही ती महत्त्वाची भूमिका बजावत असते. Educational failure is basically linguistic failure - शैक्षणिक अपयश हे मूलत:  भाषिक अपयश आहे, असे जे म्हटले जाते, त्यात तथ्य आहे. ह्या अर्थाने भूगोलाचा किंवा इतिहासाचा शिक्षक हाही भाषेचा शिक्षक असतो. तो केवळ एका विषयाचा शिक्षक नसतो. त्या-त्या विषयाची एक भाषा, परिभाषा असते. तिची ओळख नीट झाली नाही तर विद्यार्थ्यांच्या आकलनावर आणि अभिव्यक्तीवरही परिणाम होतो.” सांगतायत ज्येष्ठ भाषा-अभ्यासक डॉ. प्रकाश परब.
शिक्षणाच्या पूर्व प्राथमिक स्तरापासून भाषा शिक्षणाला एक विषय म्हणून स्थान दिले जात असले तरी, भाषा ही शिक्षणाला व्यापून उरणारी गोष्ट आहे. औपचारिक शिक्षण संपले तरी शाळेबाहेरच्या जगातील भाषाशिक्षण संपत नाही, ते  निरंतर चालूच असते. घरात, कार्यालयात, प्रवासात आपले भाषाशिक्षण चालूच असते. भाषा ही वर्धिष्णू, प्रवाही व परिवर्तनशील असल्यामुळे अमुक एक भाषा संपूर्ण आत्मसात करून झाली, असे तर मुळीच संभवत नाही. सभोवतालाशी जोडून राहाण्यासाठी व त्याचे आकलन करून घेण्यासाठी भाषाव्यवहारात नव्याने प्रविष्ट होणारे शब्दप्रयोग, रूढ शब्दांचे अर्थविस्तार, अर्थबदल यांच्याशी स्वत:ला अद्ययावत ठेवावेच लागते. मुद्रणाची, संवादाची नवी साधने आली तरी मानवी भाषा कालबाह्य झालेली नाही किंवा तिची जागा माहिती-तंत्रज्ञानाने घेतलेली नाही, हे विशेष आहे. भाषेच्या वापराला तंत्रज्ञानाने अधिक सुकर केले व नवीन आयाम दिले असले तरी भाषेचे महत्त्व अबाधित आहे. मानवी भाषेचे हे महत्त्व केवळ संवादासाठी नाही, तर ते अनेकपदरी आहे. भाषा ही आपली सामाजिक ओळख आहे. भाषा ही आपल्या ज्ञानार्जनाचे साधन आणि ज्ञाननिर्मितीचे माध्यम आहे. मानवी सर्जनशीलतेला भाषा आकार देते. व्यक्तीच्या आणि समाजाच्या जडणघडणीमध्ये, तसेच त्यांच्या भौतिक प्रगतीमध्ये भाषेचे मोठे योगदान आहे. असे म्हटले जाते की, अस्तित्वात असलेली प्रत्येक भाषा आपल्याला जगाकडे पाहण्याची वैशिष्ट्यपूर्ण दृष्टी देते. म्हणजे, जितक्या भाषा तितकी जगाची आकलने.
जगातील कोणत्याही शिक्षणव्यवस्थेमध्ये भाषा आणि गणित हे दोन विषय मूलभूत व अनिवार्य समजले जातात. पैकी भाषा ही संवादाचे, जगाची ओळख करून घेण्याचे, ज्ञानार्जनाचे माध्यम असते; तर गणित म्हणजे विज्ञानाची भाषा असते. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया पक्का असायला हवा; पण इतर विद्यार्थ्यांना कधी तरी गणितापासून फारकत घेता येते व ती मोठ्या प्रमाणात घेतलीही जाते. मात्र आपल्या नेहमीच्या बोलल्या जाणाऱ्या भाषेपासून आपल्याला दूर जाता येत नाही, कारण भाषा ही आपल्या जगण्याचे, विचार करण्याचे, स्वत:ला व्यक्त करण्याचे माध्यम असते. त्यामुळे भाषेची आपणास निरंतर गरज आणि सोबत लागते.
अलीकडेच झालेल्या एका पाहणीनुसार, राज्यातील ३३ टक्के प्राथमिक शाळांतील विद्यार्थी भाषा आणि गणित विषयांत कच्चे असल्याचे आढळून आले आहे. गळती होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अशाच विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असते. लिहिलेले वाचता येत नाही, बोललेले समजत नाही, ऐकलेले लिहिता येत नाही, साधी बेरीज-वजाबाकी करता येत नाही. याचा अर्थ, अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पायाच डळमळीत आहे. शिक्षण ही जर जग समजून घेण्याची, स्वत:ला अर्थपूर्ण रीतीने अभिव्यक्त करण्याची प्रक्रिया असेल, तर भाषेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
भाषा आपले औपचारिक शिक्षण सुरू होण्याच्या आधीपासून आपल्या आयुष्यात असते आणि शिक्षण संपल्यानंतरही असते, हे जसे खरे आहे; तसेच आपल्या एकंदर शैक्षणिक यशापयशातही ती महत्त्वाची भूमिका बजावत असते. Educational failure is basically linguistic failure - शैक्षणिक अपयश हे मूलत:  भाषिक अपयश आहे, असे जे म्हटले जाते, त्यात तथ्य आहे. ह्या अर्थाने भूगोलाचा किंवा इतिहासाचा शिक्षक हाही भाषेचा शिक्षक असतो. तो केवळ एका विषयाचा शिक्षक नसतो. त्या-त्या विषयाची एक भाषा, परिभाषा असते. तिची ओळख नीट झाली नाही तर विद्यार्थ्यांच्या आकलनावर आणि अभिव्यक्तीवरही परिणाम होतो. विषयात हुशार असलेली मुले भाषेतही हुशार असतात आणि विषयात मागे पडलेली मुले खरे तर त्या विषयाच्या भाषेत कमी पडतात. त्यामुळेच शिक्षणातील विविध विषयांच्या अध्यापनात भाषेचा विचार महत्त्वाचा ठरतो.
सर्वसाधारणपणे, आपल्याकडचे विषय-शिक्षक विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतेची जबाबदारी घेताना दिसत नाहीत. ते काम भाषाशिक्षकांचे आहे, असे त्यांना वाटत असावे. परंतु, वर म्हटल्याप्रमाणे विषय आणि भाषा यांना परस्परांपासून अलग करता येत नाही. साहित्य, संस्कृती, व्याकरण, शुद्धलेखन आदींचा भाषा विषयाच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव असला तरी, तेवढ्या शिदोरीवर विद्यार्थी अन्य विषयांचे आकलन करून घेण्यास सक्षम झाला, असे गृहीत धरता येणार नाही. विशेषत: श्रवणाकलन व लेखन ही कौशल्ये आत्मसात करायला विद्यार्थ्यांना वेळ लागतो. मातृभाषेतर माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक गंभीर स्वरूपात उद्भवते. येथे विषय आणि भाषा दोन्ही सारखेच अपरिचित असल्यामुळे विद्यार्थी हतबल होतात. प्राथमिक स्तरावर सर्व विषय इंग्रजीतून समजून घेणे सर्वच विद्यार्थ्यांच्या आवाक्यातील नसते. याची कारणे वेगवेगळी असू शकतात. पण, मुख्य कारण म्हणजे इंग्रजी ही त्यांच्या परिसराची व सवयीची भाषा नसते. अशा अनैसर्गिक वातावरणात विद्यार्थ्यांचे भाषा आणि विषयज्ञान दोन्ही कच्चे राहिले तर नवल नव्हे. तरीही प्राथमिक शिक्षणात माध्यमभाषा म्हणून प्रथम भाषेऐवजी द्वितीय भाषेचाच पालक आग्रह धरतात, हे फार विलक्षण आहे.
मातृभाषा ही प्राथमिक शिक्षणाची स्वाभाविक माध्यमभाषा असली तरी व्यवहारात विपरीत घडताना दिसते. राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मागणी वाढत आहे. बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ ह्या तुलनेने मागासलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षाही इंग्रजी शाळांची मागणी अधिक असल्याचे दिसते. हे शिक्षणशास्त्राच्या विरोधी असले तरी शासन आणि समाज ह्या दोन्हींकडून त्याचे स्वागत होताना दिसत आहे. खासगीच नव्हे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळाही  इंग्रजी  किंवा सेमी-इंग्रजी माध्यमात रूपांतरित करण्यात येत आहेत. त्याला विरोध करणारे लोकच प्रवाहपतितांच्या टीकेचे लक्ष्य बनत असल्यामुळे इंग्रजीकरणाची ही लाट थोपवणे कोणाच्याच हातात राहिलेले नाही. एके काळी मराठी माध्यमातील शिक्षण हे प्रतिष्ठेचे व मुख्य प्रवाहातले शिक्षण मानले जात होते. आता ते अस्तंगत होईल की काय अशी भीती वाटावी, इतके उपेक्षित व निराधार बनले आहे. हे मराठी भाषेकरिता आणि एकूणच निकोप शिक्षणाकरिता चांगले नाही. याचे भाषिक, सामाजिक, सांस्कृतिक दुष्परिणाम लवकरच दिसू लागतील. दिसू लागलेही आहेत.   
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांत इंग्रजी भाषेचे कितीही महत्त्व असले तरी, तिने मातृभाषा किंवा प्रथम भाषा मराठीची जागा घ्यावी, इतके ते खचितच नाही. इंग्रजी ही आपल्यासाठी द्वितीय भाषाच राहावी हेच व्यक्तिगत व सामाजिक हिताचे आहे. मानवी प्रज्ञेचा व प्रतिभेचा कमाल आविष्कार हा ज्याच्या त्याच्या प्रथम भाषेतच होऊ शकतो; द्वितीय किंवा परभाषेत नाही. मातृभाषा ही सर्वोत्कृष्टाची भाषा आहे. मात्र इंग्रजी ही आपल्या दुय्यम अभिव्यक्तीला व कामगिरीलाही अधिक पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देत असल्यामुळे तिला मातृभाषा मराठीपेक्षा अधिक पसंती मिळते. भाषा आणि समाज या दोन्हींचेही यात दीर्घकालिक नुकसान आहे, हे आपल्या लक्षात येत नाही.
डॉ. प्रकाश परब
संपर्क –  ९८९२८१६२४०  
(लेखक ज्येष्ठ भाषाभ्यासक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत.)

 

 

 

  

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


भाषा शिक्षण , ज्ञानभाषा , डॉ. प्रकाश परब , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      2 महिन्यांपूर्वी

    अभासपूर्णवाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen