शाळा सुरू कराव्यात, कारण...


कोरोनाकाळात बंद झालेल्या शाळा दीड वर्ष होऊनही सुरू व्हायची कोणतीही शक्यता दिसत नाहीये.  त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आणि आदिवासी पाड्यांवर काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसमोर अनेक आव्हाने उभी ठाकली आहेत. शहरी भागात ऑनलाइन शाळा सुरू असल्यामुळे मुलांचे होणारे नुकसान काही प्रमाणात भरून काढता येतेपरंतु ज्या भागांत ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी मूलभूत सुविधांचा अभाव आहेअशा भागांतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानामुळे चिंतित झाले आहेत.  अशाच अस्वस्थतेतून ढोमाचीवाडीसिन्नरनाशिक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका अर्चना अरविंद पगडाल या त्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांची आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून केलेल्या उपाययोजनाची नोंद अत्यंत तळमळीने या लेखातून करतायत.
‘शाळा’ हा शब्द उच्चारला तरी लगेच आपल्याला खडू-फळा, शिक्षक, शाळेत बागडणारी मुले, अशा अनेक गोष्टी डोळ्यांसमोर येत असत. पण, आज  कोरोना महामारीने सगळं समीकरण बदलवून टाकले आहे.
आम्हा शिक्षकांसाठी शाळा सुरू असताना, मुलांना शिकवणे, त्यांना लिहिता-वाचता यावे यासाठी विविध प्रयोग करणे, गणिती क्रिया समजण्यासाठी विविध युक्त्यांचा अवलंब करणे, कृतीतून अध्यापन करणे, मुलांचा सराव करून घेणे, उपक्रम राबविणे, मुलांच्या सुप्त गुणांचा विकास करणे, या सगळ्यांमध्ये एक आनंद होता. मुलांना समजल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून, आत्मविश्वास पाहून प्रत्येक प्रामाणिक शिक्षकाला एक आत्मिक समाधान मिळत होते. पण, कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागले व शाळाच बंद झाल्या आणि आम्हा शिक्षकांपुढे एक नवीन आव्हान निर्माण झाले. जर मुले शाळेत आली नाहीत तर त्यांना शिकवणार  कसे? मुलांना समजणार कसे? प्राथमिक शाळेत मुलांचा पाया कच्चा राहिला तर पुढे जाऊन त्यांना कसे वाचता-लिहिता येईल? असे अनेक प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाले. आणि मुलांना शिकवता येत नाही याची खंत मनात सलू लागली.
शहरातल्या शाळेतील शिक्षकांपेक्षा खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांवर शिकवणाऱ्या आम्हा जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांपुढे वेगळे आव्हान निर्माण झाले. वाड्यावस्त्यांवरील आदिवासी पालकांची शिक्षणाविषयी असलेली उदासीनता, भौतिक सुविधांचा अभाव, अशिक्षितपणा, बिकट आर्थिक परिस्थिती या सर्वांमुळे मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे, हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
माझ्यासारख्या जिल्हा परिषद शाळेत शिकवणार्‍या अनेक शिक्षकांना 'जी मुले केवळ शाळेत आल्यावरच दप्तर उघडतात, अशा मुलांना शाळा बंद असताना शिकवायचे कसे?' हा प्रश्न सतावू लागला. मी ज्या भागात शिकवते, तेथील पालक आदिवासी समाजातील, मोलमजुरी करणारे, शेती वाट्याने करून उदरनिर्वाह करणारे, बहुतांश पालक लिहिता-वाचता न येणारे आहेत. ते शाळा बंद असल्याने मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देईनासे  झाले आणि मुलांचे अधिकच शैक्षणिक नुकसान होऊ लागले.
या काळात आधुनिक तंत्रज्ञान शिक्षकांच्या मदतीला धावून आले. माझ्यासारख्या अनेक शिक्षकांनी  तंत्रस्नेही बनून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यास सुरुवात केली. गूगल फॉर्मवर प्रश्नपत्रिका तयार करणे, काईन मास्टरमध्ये व्हिडिओ बनवणे, गूगल मीट, झूम, व्हिडिओ कॉलिंग यांद्वारे अध्यापन करणे, असे अनेक मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली. आणि काही अंशी का होईना मुलांच्या शिक्षणाला सुरुवात झाली. यासाठी आम्ही पालकांच्या भेटी घेतल्या, पालकांचे व्हॉट्सअॅप नंबर मिळवले, शाळेचे  व्हॉट्सअॅप ग्रूप बनवले. परंतु, काही पालकांकडे अँड्रॉइड फोन नव्हते, अशा मुलांचे शेजारीपाजारी राहणाऱ्या मुलांसह गट बनवले. तसेच, शक्य होईल तसे ‘डोनेट अ डिवाइस’ मोहिमेअंतर्गत त्यांना अँड्रॉइड फोन मिळवून देण्यास मदत केली. पालकांना सध्याची परिस्थिती, शिक्षणाचे महत्त्व आणि आमचा नाइलाज, अशा अनेक गोष्टी समजावून सांगितल्या आणि मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना सहकार्य करण्याची विनंती केली. मुलांना दररोज अध्ययनासाठी  स्वयंअध्ययन कार्डांचे  वाटप केले. दैनंदिन कार्डे कशी सोडवायची हे समजावे म्हणून ऑडिओ रेकॉर्डिंग करून प्रश्न समजावून सांगितले. त्या संदर्भातील यूट्युब, दीक्षा ॲप, झेडपी लाइव्ह एज्युकेशन, या लिंक्स मुलांना पाठवल्या. मुलांशी झूम मीटिंग, व्हिडिओ कॉलिंग यांद्वारे संपर्क साधला. सतत पाठपुरावा केल्यानंतर मुले केलेल्या अभ्यासाचे फोटो काढून व्हॉट्सअॅपवर पाठवू लागली व व्हॉट्सअॅपवरच आम्ही अभ्यास तपासून पुन्हा अभिप्राय देऊ  लागलो. परंतु, यात अनेक अडचणी येत होत्या. पालक दिवसभर घरी  नसल्याने सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सहानंतर संपर्क साधावा लागत असे. त्यातही या ऑनलाइन शिक्षणात अनेक मर्यादा येत आहेत‌‌. पालकांकडे कधी नेट कनेक्टिव्हिटी तर कधी नेट पॅक नसतो.  शिक्षक प्रत्यक्ष समोर नसल्याने मुले  पूर्णपणे शिकण्याकडे लक्ष देत नाहीत, काही वेळेस मोठ्या भावा-बहिणींकडून घरचा अभ्यास पूर्ण करून घेतात. त्यामुळे मुलांना कितपत समजले, हे शिक्षकांना समजणेही कठीणच होते. आता लॉकडाऊन संपला तरीसुद्धा शाळा बंदच असल्याने, ऑनलाइन अध्यापनाबरोबरच मुलांच्या गृहभेटी घेऊन मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे.शासनाने सुरू केलेले ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’, स्वाध्याय उपक्रम’मुलांकडून करून घेण्याचा प्रयत्न केला.


असे अनेक प्रयत्न करूनही मुलं ज्या गतीने शिकली पाहिजेत. त्या गतीने शिकत नाहीयेत. कारण, कोणतीही नवीन गोष्ट आत्मसात करण्यासाठी तशी वातावरणनिर्मिती आवश्यक असते, ती वातावरणनिर्मिती घरी उपलब्ध होऊ शकत नाही. कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त नुकसान पहिलीला प्रवेश घेतलेल्या नवीन मुलांचे झाले. वाड्या-वस्त्यांवरील नव्याने पहिलीला दाखल झालेल्या मुलांना हात धरून गिरवायला शिकवायला लागते, वाचन-लेखनाचा खूप सराव करून घ्यावा लागतो, तेव्हा कुठे ती मुले तयार होतात. तसेच, इयत्ता  दुसरीच्या पुढील मुलेही सराव न राहिल्याने शिकलेला अभ्यास विसरू लागली आहेत आणि मुलांचे खूप शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत मनाला सतावतेय. त्यामुळे सन २०२१ -२२ च्या शैक्षणिक वर्षात शाळा जरी बंद असल्या तरी मुलांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मी व माझ्या जिल्हा परिषद शाळांतील अनेक शिक्षक बंधू-भगिनींनी ऑनलाइन, गृहभेटी मार्गदर्शनाबरोबरच, स्थानिक परिसरात कोरोनाचे रुग्ण नसल्याची खात्री करून, पालकांची परवानगी घेऊन ओट्यावरील शाळा, शेतातील शाळा, मंदिरातील शाळा  सुरू केल्या आहेत. मुलांचे गट करून मास्क-सॅनिटायझर देऊन, सामाजिक आंतर पाळून रोज दोन-तीन तास शिकवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मुले शिकायला लागल्याचे काहीएक समाधान वाटू लागले आहे. शासनानेही आता सर्वच शाळा सुरू करायला पाहिजेत, नाहीतर मुलांचे अधिक नुकसान होत जाईल. आणि ते होऊ नये अशी आम्हा शिक्षकांची मनस्वी इच्छा आहे.
अर्चना अरविंद पगडाल
(लेखिका ढोमाचीवाडी, सिन्नर, नाशिक येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिक आहेत.)

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी शाळा , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , कोरोना काळातील शिक्षण , आर्चना पगडाल , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Shreekrushna Manohar

      4 वर्षांपूर्वी

    व्वा छान

  2. SHAKEEL BAGWAN

      4 वर्षांपूर्वी

    खूपच प्रेरणादायी

  3. Sudam Kumbhar

      4 वर्षांपूर्वी

    अर्चना पगडाल यांना सलाम💐💐



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen