विद्यार्थ्यांचा भाषिक विकास घडवून आणण्यासाठी मराठी शाळांचे शिक्षक वेळोवेळी नवनवीन प्रयोग करताना दिसून येतात. हे प्रयोग करताना शिक्षकांनाही विविध पातळ्यांवर स्वतःला प्रशिक्षित करावे लागते. आणि जेव्हा या शिक्षकांच्या प्रशिक्षणामागे संस्थाचालक, शाळेचं पाठबळ असतं, तेव्हा त्यातून साकारणाऱ्या प्रयोगांनी मुलांचं शिकणं आणखीनच उत्साहपूर्ण झालेलं दिसतं. अशाच प्रशिक्षणातून स्वतःला अद्ययावत करत, मुलांना भाषेची गोडी लावण्याच्या प्रयोगांबद्दल सांगतायत गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका सुचित्रा वावेकर –
‘जुने ते सोने’ या उक्तीप्रमाणे माणूस सतत जुन्याची कास धरत असतो. ही कास धरत असताना, त्याला येणाऱ्या नवीन अनुभवांतून सुद्धा तो काही ना काही शिकत असतो. घडून गेलेल्या गोष्टींतील अनुभव व नवीन काहीतरी करत असताना नावीन्याने शिकण्याची ओढ, यातून सतत मानवाचे शिक्षण होत असते. हा प्रवास असाच होत राहिला तर शिकण्याची उर्मी प्रफुल्लित राहते.
असेच बरेचसे शिक्षकांच्या बाबतीतही होते. आणि आमच्या डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या मनात ‘कंटाळा’ हा शब्द येण्यासाठी वेळदेखील नसतो. कारण, स्वत: संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक सतत काही ना काही नवीन शिकत असतात, मुलांसोबत करून पाहत असतात. त्यातूनच आपण अजून काय वेगळे करू शकतो? काय करून पाहू शकतो? यात शिक्षकांचा मेंदू गुंतलेला असतो. आणि हो, याला खाद्य म्हणून संस्थेतर्फे वेगवेगळ्या विषयांवरील प्रशिक्षणे घेण्याची संधी आम्हांला मिळते. मराठी, गणित, इतिहास, भूगोल (आताच्या ‘परिसर अभ्यास’ या विषयात समाविष्ट असलेले विषय), शारीरिक शिक्षण, कला, कार्यानुभव, इंग्रजी या सर्व विषयांचे शिक्षकांचे ज्ञान अधिकाअधिक सखोल कसे होईल, यासाठी संस्था प्रयत्नशील असते.
सन २०२०-२१ या पूर्ण वर्षभरात संपूर्ण जग एका महाभयंकर अशा संकटाला तोंड देत होते. त्यातूनही शाळा बंद असल्या तरी शिक्षण मात्र थांबले नव्हते. ऑनलाइन वर्गात मुले काम करत होती. आम्ही शिक्षकही मुलांसोबत काम करत असताना, ऑनलाइन वर्गातील सर्व गोष्टी नव्यानेच शिकत गेलो. याच काळात ‘सीखें’ या संस्थेसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. ‘सीखें’ CEQUE (CENTER FOR EQUALITY IN UNIVERSAL EDUCATION) या संस्थेसोबतचे आमच्या संस्थेचे संबंध हे खूप जुने आहेत. शाळेत केल्या जाणाऱ्या वेगळ्या प्रयोगांची देवाणघेवाण त्यांच्यासोबत सतत होत असते. त्यात आमच्या संस्थेच्या सहकार्यवाह श्रीमती शलाका देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे.
२१ व्या शतकातील विद्यार्थ्यांमध्ये चौकसवृत्ती, गंभीर विचार, तर्क, सहकार्य आणि संप्रेषण, ही कौशल्ये विकसित करण्यासाठी सर्वोत्तम शिक्षण पद्धती महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे भाषा आणि गणित या विषयांची शिक्षण पद्धती विकसित करण्यासाठी ती संस्था सखोल संशोधन करते. ही संस्था भाषा व गणित यांतील अनेक कौशल्ये अधिक चांगल्या पद्धतीने मुलांपर्यंत कशी पोहोचवता येतील, त्या विषयांतील गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांपर्यंत कसे पोहोचेल, यासाठी काम करते. याच संस्थेतर्फे शिक्षकांचे विविध घटकांवर आधारित छोटे व्हिडिओ शूट केले जातात. हे व्हिडिओ ‘टिचर पेजेस’ या यू-ट्युब चॅनेलवर महाराष्ट्रभरातील सर्व शिक्षकांना व पालकांना बघण्यासाठी प्रदर्शित केले जातात.
कोव्हिड-१९च्या काळात या संस्थेतर्फे ‘टिचर इनोव्हेटर प्रोग्राम’ आयोजित करण्यात आला होता. यात भाषेतील ‘समजपूर्वक वाचन’ या घटकांतर्गत काम होणार होते. ‘दि शिक्षण मंडळ गोरेगाव’ या आमच्या संस्थेतर्फे या प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याची संधी आम्हा तीन शिक्षकांना मिळाली. माध्यमिक विभागातर्फे श्रीमती मेघना वेरलकर, श्रीमती पल्लवी गोडे व प्राथमिक विभागातर्फे मला ही संधी मिळाली. प्रशिक्षणासाठी आपण इच्छुक आहोत, अशा अर्थाचा एक अर्ज भरल्यानंतर फोनवर मुलाखत घेण्यात आली. ही मुलाखत या संस्थेच्या भाषा विषयाच्या प्रशिक्षक श्रीमती अर्चना शिंदे या मॅडमकडून घेण्यात आली. जवळजवळ १५ मिनिटे आम्ही बोलत होतो. त्यात त्यांनी विचारलेला एक प्रश्न मला अगदी अनोखा वाटला. त्यांनी विचारले, तुमच्या शाळेत भाषेवर खूप चांगल्या पद्धतीने काम होते, तर तुम्ही या प्रशिक्षणासाठी का इच्छुक आहात? या प्रश्नावर आम्ही खूप चर्चा केली. तेव्हा त्या म्हणाल्या की, शिक्षक हे सतत नवीन काहीतरी शिकत असतात. त्याचा प्रत्यय आज तुमच्यासोबत बोलत असताना मला आला. ती मुलाखत हा एक वेगळाच अनुभव होता.
जुलै २०२० पासून प्रशिक्षणाला सुरुवात झाली. अर्थात, हे प्रशिक्षण ऑनलाइनच सुरू होते. त्यात संस्थेच्या भाषाविषयक प्रमुख श्रीमती उमा कोरगावकर यांच्याकडून उत्तम प्रकारे प्रशिक्षण देण्यात आले. आठवड्यातून एक दिवस, असे महिनाभर चालू असलेल्या या प्रशिक्षणात महाराष्ट्रभरातील शिक्षक सहभागी झाले होते. त्यावेळी आम्ही शिक्षक नसून विद्यार्थीच झालो होतो. घड्याळी दोन तासांचा एक वेबसंवाद, असे एकूण चार वेबसंवाद झाले. त्यात समजपूर्वक वाचन होण्यासाठी कोणकोणती धोरणे (strategies) वापरून काम करायला हवे, ते प्रत्यक्ष आमच्यासोबत घेण्यात आले. त्यात अनुक्रमे चार धोरणे आहेत, १) अनोळखी शब्द , २) तर्कावर आधारित प्रश्न ३) सहसंबंध लावणे, ४) सारांश लेखन. कोणताही उतारा, पाठ्यपुस्तकातील धडा, गोष्ट किंवा कविता, यांचे समजपूर्वक वाचन होण्यासाठी वरील चारही गोष्टीतून विचार होणे खूप महत्त्वाचे आहे. हे सर्व आम्ही समजून घेतल्यानंतर, ऑगस्ट महिन्यापासून मुलांसोबत या पद्धतीने काम करायला सुरुवात केली.
१) अनोळखी शब्द - कोणताही अपरिचित मजकूर वाचत असताना त्यात अनेक शब्द नवीन असतात. नवीन शब्द म्हणजेच अनोळखी शब्द. त्याचा अर्थ काय असेल याचा विचार करणे, तो अर्थ लावत असताना मेंदूने कशाचा संदर्भ घेतला, म्हणजे अर्थ कशावरून लावला ते सांगणे. अशा प्रकारे विचार केल्यामुळे शब्दांच्या अर्थापर्यंत पोहोचता तर येतेच. तसेच, अर्थ लावण्यासाठी आपल्या अनुभवातील किंवा पाहिलेल्या गोष्टीतील कशाचा संदर्भ मेंदूने घेतला, हे पाहणे शिक्षणात खूपच महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे, काहीवेळेला त्या शब्दाच्या अर्थापर्यंत पोहोचण्यासाठी घ्याव्या लागणाऱ्या संदर्भ साहित्याचा (शब्दकोशाचा, विश्वकोशाचा, गूगलवरील शब्दशोधाचा) आधारही खूप गरजेचा असतो, याची जाणीव होते. आपले आपण शोधायचे असते, याची सवय नकळत लागत जाते.
हा सराव मुलांसोबत घेत असताना, एका मुलीने दिलेली प्रतिक्रियाच पाहा ना! तिसरीच्या पुस्तकातील एका धड्यातील पुढील वाक्य मी वाचले.
उंचउंच झाडाच्या शेंड्यावर हिरवीगार टोकदार पानं.
अनोळखी शब्द - शेंडा
अर्थ - टोक
अर्थ कसा लावला - मला एखादी गोष्ट आईने दिली नाही, तर मी रागावते. त्यावेऴी आई म्हणते, ‘हिचा राग ना बाई, नाकाच्या शेंड्यावरच आहे.’
या वाक्यातील ‘शेंडा’ या शब्दाचा अर्थ लावताना तिला लगेचच आपला घरातील अनुभव आठवला.
अनोळखी शब्दावर आधारित कार्यपत्रिका
२) तर्कावर आधारित प्रश्न - अपरिचित मजकूर वाचत असताना वाचक म्हणून काही प्रश्न आपल्या मनात उपस्थित राहतात. ते प्रश्न दोन प्रकारचे असतात : १) असे प्रश्न की, ज्याची उत्तरे मजकुरातून सहज मिळतात. २) असे प्रश्न की, ज्याची उत्तरे थेट मजकुरातून मिळत नाहीत, तर मोकळेपणाने विचार करून त्याच्या उत्तरापर्यंत पोहोचावे लागते. दुसऱ्या प्रकारच्या प्रश्नांना तर्कावर आधारित प्रश्न असे म्हटले जाते. हल्ली अनेक जणांना प्रश्नच पडत नाहीत, त्यामुळे डोळे झाकून कृती केल्या जातात. अशा प्रकारचे प्रश्न मनात येणे अतिशय गरजेचे आहे, तरच त्याच्या बहुपर्यायी उत्तरांचा विचार केला जाईल. वरील प्रकारे विचार केल्यामुळे मुलांकडून तर्कावर आधारित प्रश्न येतील. त्याची उत्तरे मोकळेपणाने विचार करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असतात. यामुळे मोकळेपणाने विचार करण्याची वृत्ती अंगी बाणवली जाईल, हे प्रकर्षाने दिसून आले.
चला तर मग आपण प्रत्यक्षच बघू या, मुले कसा विचार करतात ते. तिसरीच्या पुस्तकातील एका धड्यातील पुढील वाक्यावर मुलांनी विचारलेले प्रश्न बघा.
‘हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर!
राही - पतंग तिला कुठपर्यंत नेऊ शकतो?
आयुष - पतंगाने तिला उचलून नेले तर ती काय-काय बघू शकेल?
सानवी - पतंग कसा बरं तिला उचलू शकतो?
पतंग तिला उचलून नेतो आहे, हे पाहून जमिनीवरील लोकांना काय वाटेल?
तन्वेश - त्या धड्यातील मनुलीच्या मनात का बरे असे आले असेल की, पतंग मला उचलून घेऊन गेला तर?
दिव्या - पतंगाने मनुलीला नेल्यावर तिथेच ठेवले तर काय होईल?
अर्णवी - पतंगाने तिला उचलून नेले, तर ती पतंगाच्या अंगावर बसेल की त्याची शेपूट धरेल?
तर्कावर आधारित कार्यपत्रिका
![]()
३) सहसंबंध लावणे - अपरिचित मजकूर वाचत असताना त्याचा सहसंबंध वाचकाने स्वत:शी म्हणजे स्वानुभवाशी लावणे, मजकूराचा मजकुराशी म्हणजे वाचलेल्या पुस्तकाशी लावणे व सभोवतालच्या जगाशी लावणे. अशा प्रकारे सहसंबंध लावल्यामुळे स्वानुभव जागृत होतात. वाचलेले पुस्तक आणि त्यातील त्या संदर्भातील मजकूर आठवला जातो. तसेच, आजूबाजूच्या जगात घडणाऱ्या घटनांकडे लक्ष वेधून त्याची नोंद मेंदूकडून नकळत घेतली जाते.
चटकन मला एक उदाहरण आठवले, ते तुम्हांला सांगावेसे वाटते. तिसरीच्या पुस्तकातील ‘शेरास सव्वाशेर’ या धड्याच्या संदर्भात गप्पा करत असताना, त्या धड्यातील वाक्यांचा किंवा शब्दांचा सहसंबंध लावत असताना, एक मुलगी म्हणाली की, या धड्यात ज्याप्रमाणे उंदराने करामत केली आहे. तशीच एक मांजरीची गोष्ट दुसरीच्या वर्गात असताना सानिकाताईंनी वाचून दाखवली होती, ते मला आठवले. अशा प्रकारे कधीतरी, कोणीतरी वाचून दाखवलेल्या व स्वत: वाचलेल्या गोष्टीसुद्धा मुलांना आठवत असतात. त्याचा संदर्भ मुले लावत असतात.
सहसंबंध लावणे - कार्यपत्रिका
४) सारांश सांगणे/ लिहिणे - सारांश लेखन म्हणजे एखाद्या कथेची वा परिच्छेदाची मध्यवर्ती कल्पना समजून घेऊन, स्वत:च्या शब्दात मांडणे. हमहत्त्वाच्या वाक्यांशावर भर, स्वत:च्या शब्दात मांडणी, क्रमबद्धता हे सारांश लेखनात महत्त्वाचे घटक आहेत. या प्रशिक्षणात दोन पद्धतीने सारांश लेखनापर्यंत पोहोचणे कसे सोपे आहे, हे पाहता आले. पद्धत एक : सुरुवात – मग – नंतर – शेवटी. या पद्धतीत मजकुरातील महत्त्वपूर्ण वाक्यांची क्रमवार मांडणी स्वत:च्या शब्दांत करणे अतिशय सोपे झाले. पद्धत दोन : कोकापम्हत्या ´कोणीतरी होतं , काहीतरी हवं होतं, पण, म्हणून मग, त्यानंतर आता. या पद्धतीत नेमकेपणाने सारांश स्वत:च्या शब्दात मांडता येईल, इतपत वाचकाची समज तयार होते. सारांश लेखनाच्या या दोन कार्यपत्रिका पाहिल्या की ते आपल्या लक्षात येईल.
पद्धत एक : सुरुवात – मग – नंतर - शेवटी
पद्धत दोन : कोकापम्हत्या ´कोणीतरी होतं , काहीतरी हवं होतं, पण, म्हणून मग, त्यानंतर आता
ही चार धोरणे (strategies) वापरून कोणत्याही अपरिचित मजकुराचे समजपूर्वक वाचन होते हे अनुभवले.माझ्याकडे तेव्हा इयत्ता तिसरीचा वर्ग होता. नव्याने घेत असलेल्या प्रशिक्षणातील सर्व महत्त्वपूर्ण गोष्टी मी आमच्या शिक्षक सभेत सांगत होते. आमच्या शाळेत मुलांना मोकळेपणाने विचार करण्याची व मांडण्याची सवय आहे. त्यामुळे मुले या पद्धतीने काम कसे करतात, हे उत्सुकतेने पाहण्याच्या दृष्टीने ऑनलाइन पाठाला शाळेतील सर्व ताई व आमच्या मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी शिरोडकर असायच्या. काही वेळेला आमच्या प्रशिक्षक अर्चना मॅडमसुद्धा असायच्या. वेगळ्या पद्धतीने भाषेचे धडे व कविता समजून घेणे हे एक निमित्त असले तरी, पाठ बघितल्यानंतर आमच्यात होणाऱ्या चर्चेत मुलांनी कसा प्रतिसाद दिला, मुले कसा विचार करू शकतात, तसेच एखाद्या मुलाने कसे वेगळे प्रश्न विचारले, शिक्षक म्हणून आपला प्रतिसाद तेव्हा कसा महत्त्वपूर्ण आहे, हे मुद्दे यायचे. हीच विचारांची देवाणघेवाण शिक्षकांमध्ये झाल्यामुळे आपण जे काम करतो आहोत, त्याची अधिकाधिक स्पष्टता शिक्षक म्हणून आपल्याला यायला लागते.
...
हे प्रशिक्षण घेत असताना, किंबहुना मुलांसोबत काम करत असताना, यात शिक्षक म्हणून आपल्याला काय नवीन समजून घ्यायला मिळाले, मुलांना या सर्व प्रक्रियेतून काय मिळणार आहे, याचा सतत मनात विचार येत होता. खरंच एक अमूल्य असा विचार यातून पोहोचवला गेला की, भाषेतील कोणतेही साहित्य हे फक्त प्रश्नांची उत्तरे लिहिण्याइतपत मर्यादित नाही, तर आपल्या जीवनातील भाषेचे स्थान हे त्यातील आशयाचा संदर्भ व आपले अनुभव यांच्याशी खूप जोडले गेलेले आहे. आमच्या शाळेत सुद्धा यातील पहिल्या दोन धोरणांचा (strategies) वापर आम्ही करत होतो. परंतु, समजपूर्वक वाचन होण्यासाठी ही चारही धोरणे किती आवश्यक व महत्त्वाची आहेत, हे लक्षात आले. वर्गात त्यानुसार शिकवताना अतिशय छान वाटत होते. मुलांचे वेगवेगळे प्रतिसाद येत होते. मुले अधिकाधिक विचार करू लागली आहेत, हे कळत होते.
फेब्रुवारी महिन्यापर्यंत मुलांसोबत असे काम झाले. दिवाळीच्या सुट्टीआधी ‘सीखें’ या संस्थेकडून मुलांना सोडवण्यासाठी कार्यपुस्तिकासुद्धा देण्यात आली. भाषेच्या पाठांचे असे काम मार्च महिन्यापर्यंत झाल्यानंतर, त्याचे ‘सीखें’ या संस्थेतर्फे ऑनलाइन प्रदर्शनसुद्धा भरवण्यात आले. त्यात मुलांच्या कामाचे नमुने प्रदर्शित करण्यात आले. मुलांनी अशा प्रकारे काम करत असताना काय-काय समजून घेतले, त्याची मांडणी करण्याची संधीसुद्धा मुलांना मिळाली.
ती मुले आता चौथीत आहेत. मीच त्यांची वर्गशिक्षिका असल्यामुळे मुलांमध्ये वरील पद्धत किती झिरपली आहे, समजपूर्वक वाचन त्यांना कितपत जमू लागले आहे, ते त्याचा कसा वापर करत आहेत, हे पाहायला मिळते आहे. समजपूर्वक वाचन हे आपल्याला फक्त भाषेतच करावे लागते असे नाही, तर परिसर अभ्यासातील आशय वाचत असताना देखील करावे लागते. त्याची खूप चांगली मदत मुलांना होते आहे, किंबहुना त्यांना त्याची सवयच लागली आहे, असे म्हटले तरी चालेल. त्यामुळे या प्रशिक्षणातून शिक्षक म्हणून मला व मुलांना खूप काही शिकायला मिळाले आहे.
‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे वाचन करण्याची एक खूप मोठी ताकद मिळाल्यानंतर व अशा पद्धतीने समजपूर्वक वाचन झाल्यानंतर वाचनाची गोडी तर अधिकाधिक लागेलच. तसेच, ते वाचन खूप अर्थपूर्ण होईल यात शंकाच नाही. जीवनाची हीच खरीखुरी ताकद प्रवाहातून नावेप्रमाणे पुढे जाण्यासाठी उपयोगी ठरेल.
सुचित्रा जीवन वावेकर
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत सहशिक्षिका आहेत.)
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
प्रयोगशील शिक्षण
, मराठी शाळा
, भाषा प्रयोग
, सुचित्रा वावेकर
, डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळा
, मराठी अभ्यास केंद्र
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच उपयुक्त पदधतीचे विवेचन लेखात आले आहे . शिक्षकांना मार्गदर्शन होईल .