टाळेबंदीत बहरलेली ‘पालवी’


टाळेबंदीच्या काळात मुलांपर्यंत शिक्षण, अभ्यासक्रम पोहोचवण्यासाठी अनेक शाळांनी आणि शिक्षकांनी विविध क्लृप्त्या लढवल्यानवनवीन प्रयोग केले. अभ्यासक्रमेतर उपक्रम मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या आपल्या एका यशस्वी प्रयोगाविषयी सांगतायत, गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप शाळेतील शिक्षिका राजश्री गायकवाड-साळगे 
अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ ही गोरेगाव, मुंबई येथील मराठी माध्यमासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आग्रही व नेहमी  प्रयत्नरत प्रयोगशील शैक्षणिक संस्था. या संस्थेच्या माध्यमिक शाळेचा - नंदादीप  विद्यालयाचा -  एक 'उपक्रमशील शाळा' म्हणून मुंबई उपनगरात  नावलौकिक आहे.  क्रमिक अभ्यासाबरोबरच  विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही  वाव मिळावा यासाठी शाळेत अभ्यासपूरक विविध उपक्रम राबविले जातात. त्यापैकी  एक म्हणजे  'पालवी... अंकुरलेल्या नवकल्पनांची' हे भित्तिपत्रक.
विद्यार्थ्यांना  लिहिण्यास  प्रेरित  करून त्यांच्या  स्वरचित  कविता, कथा, चारोळ्या,  लेख इत्यादी साहित्य 'पालवी'वर प्रकाशित  केले  जाते. वर्षभराचे विद्यार्थ्यांचे साहित्य, त्यांच्या नावासह, त्यांच्या हस्ताक्षरात व त्यांच्याच कल्पनेतून मुखपृष्ठ व मलपृष्ठ साकारलेल्या वार्षिक अंकात प्रसिद्धही केले जाते. यावर्षी  कोविड -१९ च्या काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे, त्यात खंड पडू नये यासाठी शाळा 'ऑनलाइन' सुरू झाल्या. ऑनलाइनच्या माध्यमातून इतर शाळांप्रमाणे आमच्याही शाळेत पाठ्यक्रम शिकवला जात होता, पण शाळेचे मुख्य वैशिष्ट्य असलेल्या, अभ्यासपूरक उपक्रमांचे आयोजन व अंमलबजावणी यांबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले  होते. त्यात अर्थातच 'पालवी' बाबतही.
'पालवी' या भित्तिपत्रकाचे काम गेली पाच-सहा वर्षं मी नेटाने व नावीन्यपूर्णतेने करत आले आहे. पण, आता या  'ऑनलाइन'  शाळेत  हे भित्तिपत्रक कसे चालवावे, याचा विचार करताना 'पालवी'चाही व्हॉट्सअॅप समूह तयार करण्याची कल्पना सुचून तोडगा निघाला. मग इतर वर्गांच्या व्हॉट्सअॅप समूहाप्रमाणे 'पालवी'चाही व्हॉट्सअॅप समूह तयार झाला. या समूहावर इयत्ता पाचवी ते नववी या वर्गातील लेखन करू इच्छिणाऱ्या मुलांना सामावून घेतले गेले. हा समूह कशासाठी व आपण समूहामध्ये नेमके काय करायचे, हे सुरुवातीला संबंधित विद्यार्थ्यांना कळत नव्हते. या विशेष समूहाला  प्रतिसाद मिळेल की नाही, याबाबत मीही साशंक  होते. त्याला कारणेही तशीच  होती. नव्यानेच उद्भवलेल्या विषाणूजन्य आजाराच्या भीतीने व सरकारने लागू केलेल्या टाळेबंदीमुळे बेरोजगार झाल्याने अनेक पालक गावी गेले होते, जे मुंबईत होते, त्यांचेही जीवन विस्कळीत झाले होते. रोजच्या जगण्यासंदर्भातले अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते. अशा अस्वस्थ  पालकांच्या छत्रछायेतील  पाल्यांची अवस्था  वेगळी ती काय असणार? शिवाय, शिक्षक आणि विद्यार्थी असे सगळेच या 'ऑनलाइन'  प्रकाराला नवखे होतो. अशा वेळेस आपण नेमके या भित्तिपत्रकासंदर्भात  कसे काम करायचे आणि आपल्यापासून  लांब असणाऱ्या विद्यार्थ्यांशी या नव्या कल्पनेसह कसे जुळवून घ्यायचे, हे लक्षात येत नव्हते. 
त्या काळात शाळेच्या वेळात्रकानुसार, विद्यार्थ्यांना विषयानुसार लेखी अभ्यास करून तो व्हॉट्सअॅपवर पाठवणे आणि ऑनलाइन लेक्चरला उपस्थित राहणे, ह्या दोन्ही बाबी अनिवार्य होत्या. अशा परिस्थितीत त्यांच्याकडील मोबाइलची उपलब्धता, मोबाइल डेटा व पालकांचे सहकार्य या सर्व गोष्टी लक्षात घेता, 'पालवी' सारख्या अभ्यासपूरक उपक्रमाला विद्यार्थी व पालक प्रतिसाद देतील की नाही, ही भीती मनात होती. 'पालवी'चा समूह तयार केल्यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना समूह तयार करण्यामागचा हेतू सांगितला. वर्गांच्या इतर व्हॉट्सअॅप समूहापेक्षा या समूहाचे वेगळेपण, उद्दिष्टे व विद्यार्थ्यांच्या निवड प्रकियेचे निकष, त्यांना  समजावून सांगितले. गुणी विद्यार्थ्यांत आपली गणना केल्यामुळे आणि मुळात या समूहावर 'अभ्यास' येणार नाही, या कल्पनेनेच मुले खूश झाली. इथे आपण स्वतः काहीही लिहिलेले शेअर करू शकतो, ही गोष्टच त्यांच्यासाठी आनंददायी होती. त्यामुळे उपक्रमाच्या सुरुवातीलाच स्वरचित कवितांना इतका प्रतिसाद मिळाला की, मला सुरुवातीला  वाटणारी  भीती निरर्थक  ठरली. 'तुम्ही स्वतः लिहिलेल्या कविता पाठवा', असा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताच समूहावर त्यांच्या स्वरचित कवितांचा इतका पाऊस पडला की, आम्ही सर्व काव्यप्रेमी त्यात शब्दशः न्हाऊन निघालो. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविताही इतक्या  अर्थपूर्ण  व दर्जेदार होत्या की, काही कवितांच्या बाबतीत तर त्या नक्की  या दहा-बारा वर्षांच्या मुलांनीच लिहिल्या असतील ना, अशी किंचितशी शंकाही मनात आली. 'असेच का नि तसेच का?', 'माझी मराठी', 'बुद्धिबळ', 'प्लास्टिक बंद', 'सारे म्हणतात ...मी कविता करते', 'पावसाळ्यातील गंमत' यांसारख्या विषयांवरील कविता वाचून आम्ही वाचनप्रेमींनी 'जावे कवितांच्या गावा....' असाच काहीसा अनुभव घेतला. मुळातच विद्यार्थ्यांची काव्य प्रतिभा इतकी बहरून आली होती की,  काय लिहू नि  किती लिहू, असेच त्यांना झाले होते.
विद्यार्थ्यांचा  उदंड  प्रतिसाद पाहून लवकरच एक ' ऑनलाइन कवी संमेलन' आयोजित करायचे, असे मी व माझे  सहकारी  मित्र  श्री. बळी सर यांनी शाळेचे पर्यवेक्षक श्री. जगधने सर यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवले. लिहिताना भरभरून लिहिणाऱ्या मुलांनी कवी संमेलनात कविता सादर करायची म्हटल्यावर माघार घेतली. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुरुवातीला पाच-सहा विद्यार्थ्यांनीच तयारी दर्शवली. बऱ्याच जणांनी स्वतः कविता तर लिहिल्या होत्या, पण त्या ऑनलाइन  सादर कशा करायच्या, याबाबत त्यांच्या मनात अनेक  प्रश्न  होते. मी, बळी सर व जगधने सर यांनी 'चूक झाली तरी घाबरू नका, आम्ही  तुमच्यासोबत आहोत. तशीच तांत्रिक  अडचण उद्भवल्यास तुम्ही पुन्हा कविता सादर करू शकता.' असे त्यांना  आश्वस्त  केल्यावर  मात्र, ती संख्या अठरापर्यंत  गेली! शिवाय मंडळाचे पदाधिकारी व  शिक्षक-कवी, कवयित्री  हे होतेच. आम्ही  प्रथमच असा ऑनलाइन  कार्यक्रम आयोजित  करत होतो; त्यामुळे  त्याची नेमकी तयारी कशी नि काय करावी हे कळत  नव्हते. मग जसजसे सुचत गेले, तसतसे एक-एक टप्पा आम्ही  पार  पाडत गेलो. सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून  त्यांच्या कविता गायनाचे व्हिडीओज मागवले, मग 'गूगल मीट'वर  त्यांची ऑनलाइन तयारी करून घेतली आणि शेवटी रंगीत तालीमही घेतली. त्यामुळे एकूण ऑनलाइन कार्यक्रमाबाबत आम्ही  निश्चिंत झालो. पण, प्रत्यक्षात 'ऑनलाइन कवी संमेलन'  कसे होईल, आयत्या वेळेच्या तांत्रिक अडचणींना कसे सामोरे जायचे, हा आमच्यासारख्या तंत्रज्ञानाला नवखे असणार्‍यांसमोर प्रश्न होताच. पण, तोही नंतर आपसूकच सुटला. आमच्या या पहिल्या ऑनलाइन कविसंमेलनाला 'उलगुलान' साहित्य चळवळीतील कार्यकर्ते, कविवर्य, प्राध्यापक डॉ.  सखाराम  डाखोरे  प्रमुख  पाहुणे  म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या  वैविध्यपूर्ण  कविता व त्यांचे अप्रतिम  सादरीकरण  पाहून उपस्थित रसिकांसह पाहुणेही  चकित झाले. बाल साहित्यिकांच्या काव्यप्रतिभेची  'याची  देही, याची डोळा'  प्रचिती काव्यरसिकांना आली. आमच्या नंदादीप विद्यालयाचा हा पहिलावहिला ऑनलाइन कार्यक्रम अशा प्रकारे धडाक्यात पार पडला! आणि पहिल्यांदाच आमच्या लाडक्या  मुलांसह मंडळाचे  पदाधिकारी व आम्ही सर्व शिक्षक आभासी माध्यमातून का होईना, पण एकत्र भेटलो. साधारणतः चार महिन्यानंतरची ती ऑनलाइन भेट आम्हा सगळ्यांसाठी ऑफलाइनपेक्षा (प्रत्यक्ष भेटीपेक्षा) तसूभरही कमी नव्हती! विशेष बाब म्हणजे, या कवी संमेलनाची 'लोकसत्ता' व 'महाराष्ट्र टाइम्स' या प्रसिद्ध  दैनिकांनी दखल घेऊन बालकवींचे भरभरून कौतुक केले. 'महाराष्ट्र टाइम्स' या वृत्तपत्रात तर विद्यार्थी व त्यांनी सादर केलेल्या कवितांच्या शीर्षकासह बातमी आलेली पाहून, त्यांचा उत्साह आणखी दुणावला. आमचा पहिलाच ऑनलाइन  कार्यक्रम  यशस्वीरीत्या पार   पडला! पहिल्या कार्यक्रमाची यशस्विता विद्यार्थ्यांना इतकी प्रफुल्लित करून गेली की, 'पुढील कार्यक्रम कधी?', असे सगळेजण विचारू लागले. 
गंमत  म्हणजे, ऑनलाइन  कवी संमेलनानंतर  'पालवी' ग्रूपमध्ये  सहभागी करून  घेण्यासाठी इतर विद्यार्थ्यांचेही विनंतीवजा फोन आणि व्हॉट्सअॅप संदेश मला सतत येऊ लागले आणि सुरुवातीला पंचवीस विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या समूहाने पुढे पन्नाशीचा आकडा गाठला!  त्यामुळे  दुसरा ऑनलाइन कार्यक्रम 'माझे अभिवाचन' घेण्याचे ठरले, तेव्हा त्यात बऱ्याच मुलांनी सहभाग  नोंदवला. इतक्या  उत्साहाने  ती मुले  तयारी करत होती की, एक शिक्षक  म्हणून  मी त्यांच्या पुढे कमी पडेन की काय, अशी शंका माझ्या मनात येऊ लागली. या कार्यक्रमातही विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेतून साकारलेले संवादलेखन, पत्रलेखन व निबंधांचे वाचिक अभिनयासह प्रकट वाचन केले. इतक्या लहान मुलांचे आरोह-अवरोहासहित प्रकट वाचन, शब्दोच्चार व वाचन करत असतानाचे वेळेचे नियोजन, ह्या सर्व गोष्टी वाखाणण्याजोग्या होत्या. त्यामुळे आमचा  दुसरा 'ऑनलाइन अभिवाचना'चा कार्यक्रमही छान रंगला. नियोजित एका तासाच्या कार्यक्रमाने तब्बल दोन तास घेतले! कारण, ऐनवेळेस सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मुलांनाही अभिवाचन सादर करण्याची संधी दिली गेली. 'उत्तम सादरीकरण' हेच याही कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. कार्यक्रमाच्या नियोजनापेक्षा विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला प्राधान्य देणे, हेच तर नंदादीपच्या यशाचे गमक आहे!
'पालवी' समूहावर आमचे बाल साहित्यिक आता अधिक सक्रिय झाले होते. या समूहावर त्यांनी लिहिलेल्या कोणत्याही गोष्टी ते शेअर करू शकत होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये सतत काहीतरी वेगळे  लिहिण्याची जणू  स्पर्धाच लागलेली असायची. लिहिण्याविषयीचा त्यांचा आत्मविश्वास वाढत होता, नवीन शब्दांची जुळवाजुळव करण्यात त्यांना मजा येत होती. महत्त्वाचे म्हणजे, हळूहळू शब्दांशी
खेळणे त्यांना जमू लागले होते! कोणताही विषय द्या, त्या विषयावर अगदी नियोजित वेळेपूर्वी त्यांचे लिखाण तयार असायचे. पावसाळ्यात 'पाऊस व छत्री' यांच्यामधील संवाद असो, टाळेबंदीच्या काळात शाळा बंद असताना, शाळा व शाळेचे मैदान विद्यार्थ्यांची आठवण काढत आहेत अशी कल्पना  करून शाळा  व मैदान यांच्यातील संवाद’  असो वा  विद्यार्थ्यांच्या आगमनाच्या आतुरतेतून शाळेने विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद असो, आमच्या मुलांचे संवादलेखन तय्यार!! ज्या  कोविड -१९ ने त्यांना आपल्या शाळेपासून दूर केले, त्या कोविड-१९ला लिहिलेले  खरमरीत पत्र असू देत किंवा जिच्याशिवाय ह्या चिमुकल्यांना अजिबात  करमत नाही, अशा प्रिय शाळेला लिहिलेले गोड पत्र असो, आमच्या बाल साहित्यिकांना आता थांबवणे कठीण होते. 'शाळा सुरू झाली तर...' या विषयावरील लेख वाचताना तर वाचणार्‍यांच्या डोळ्यांत टचकन पाणी यावे, इतक्या हृदयस्पर्शी आठवणी त्या लेखांत समाविष्ट केल्या गेल्या होत्या. 'माझ्या ऑनलाइन क्लासमधील गमती’ लिहिताना या टाळेबंदीच्या काळातला 'हाच काय तो दिलासा!' अशाच त्यांच्या भावना दिसून आल्या. 'मराठी भाषा दिन', 'वैज्ञानिक दृष्टिकोन', 'अंधश्रद्धा निर्मूलन' अशा विविध विषयांवरील घोषवाक्यांनाही या मुलांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. शब्दकोडे तर फक्त  समूहावर टाकायचाच अवकाश, की त्या कोड्याच्या उत्तरांची जणू  रांग लागलेली असायची. कोणतीही गोष्ट पोस्ट केली  की त्याला प्रतिसाद ठरलेलाच. 
दिवाळी सुट्टीतही  विद्यार्थ्यांनी 'फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी', असे आवाहन करून शाळेच्या प्रथेप्रमाणे सर्व शिक्षकांनी त्यांना 'साधना बालकुमार' दिवाळी अंक व मी स्वतः  'पालवी'च्या  छोट्या  साहित्यिक मित्रांना 'किशोर'  दिवाळी अंक 'दिवाळी  भेट' म्हणून  दिला होता. हे अंक दिल्यानंतर फक्त आठच दिवसांनी, 'तुम्हांला दिवाळी अंक  कसा वाटला?' असे विचारल्यावर, या दोन्ही अंकांतील आवडलेल्या गोष्टी, कविता व इतर साहित्य याविषयी मुलांनी खूप मनापासून व छान अभिप्राय लिहिले. या विद्यार्थ्यांचे  विविध विषयांवरील आशयपूर्ण  लेखन  वाचून 'गुरूसे शिष्य सवाई ' असेच काहीसे मी त्या काळात अनुभवले. ...आणि माझी त्यांच्याशी असलेली नाळ अधिक घट्ट होत गेली.
टाळेबंदीच्या काळात आम्ही  एक तत्त्व पाळले, ते म्हणजे  'शालेय  पोषण आहारां'तर्गत आलेले धान्य वितरित करताना,  ग्रंथालयातील मुलांसाठी असलेली पुस्तकेही पालकांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली. घरात कोंडलेल्या मुलांना त्यांच्या भावविश्वात रमण्याची संधी या पुस्तकांतून मिळावी हा एकमेव  हेतू! 'पालवी'च्या मुलांना एकापेक्षा अधिक पुस्तके देण्यात आली. या बाल साहित्यिकांनी खूप-खूप वाचावे आणि लिहिते व्हावे या उद्देशाने दिलेल्या पुस्तकांचे, मिळालेल्या संधीचे त्यांनी  सोने केले. वाचलेल्या पुस्तकांविषयीच्या भावना शब्दबद्ध  करण्यास सांगितल्यावर  या पुस्तकांचा परिचय व अभिप्राय त्यांनी  इतक्या अचूक  व समर्पक  शब्दांत  करून  दिला की,  अनुभवी लेखनाचा प्रत्यय त्यांच्या लेखांतून येत होता. पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, मुखपृष्ठ, प्रकाशन वर्ष, प्रकाशन संस्था, किंमत, आतील चित्रे, मजकूर, मलपृष्ठ ते पुस्तक लिहिण्यामागचा लेखकाचा हेतू व  वाचकांनी ते पुस्तक का वाचावे याचा खुलासा,  इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टींची दखल या चिमुकल्यांनी घेतली होती!!
गेल्या पाच वर्षांतील 'पालवी' वरील विद्यार्थ्यांच्या लिखित साहित्याची नोंद  घेताना, माझ्या असे लक्षात आले की, त्या पाच वर्षांतील एकूण साहित्यापेक्षा या एका वर्षातील साहित्य संख्येने व दर्जात्मकदृष्ट्या अधिक आहे! वर्षाच्या शेवटी जेव्हा शाळेने ठरवले की, 'पालवी' समूहाच्या विद्यार्थ्यांचे साहित्य व ऑनलाइन काळात शाळा बंद असूनही शाळेने राबवलेल्या अनेक ऑनलाइन उपक्रमांची नोंद घेण्यासाठी 'नंदादीप'  हे वार्षिक प्रकाशित करायचे, त्यावेळेस 'पालवी'च्याच विद्यार्थ्यांचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याचे लक्षात आले. अर्थात,  ही बाब माझ्यासाठी  नक्कीच स्पृहणीय होती. कोणत्याही संकटाला न घाबरता त्याच्याकडे एक संधी म्हणून पाहिल्यास मिळणारे फळ केवळ गोडच नाही, तर  सुंदर व 'वाचनीय'ही असते, हेच आम्ही या काळात अनुभवले. आमची 'पालवी' इतकी बहरली होती, की तिच्या साहित्यरूपी गंधाने आमचा व्हॉट्सअॅपरूपी, ऑनलाइनरूपी नंदादीप परिसर दरवळला नसता तरच नवल!!!
पूर्वप्रसिद्धी – शिक्षण संक्रमण
राजश्री गायकवाड-साळगे
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात मराठीच्या शिक्षक आहेत.)

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


टाळेबंदीतील उपक्रम , प्रयोगशील शिक्षण , राजश्री साळगे , मराठी अभ्यास केंद्र , मैत्री पुस्तकांशी

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen