कोरोना काळातील अमेरिकेतील शालेय शिक्षण


२०२० मध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील शाळा-महाविद्यालये बंद झाली, अगदी अमेरिकेतसुद्धा! या काळात अमेरिकेतील शाळा कधी ऑनलाइन, तर कधी ऑफलाइन पद्धतीने मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवत होत्या. आता ऑगस्ट २०२१ मध्ये तेथील शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे यांनी अमेरिकेत स्थायिक आपल्या मराठी बांधवांशी संपर्क साधून तेथील कोरोना काळातील शिक्षणाचा घेतलेला हा आढावा  -
कोरोना महामारीच्या वैश्विक संकटाने गेल्या दीड वर्षात जगभरातील जवळपास सर्वच क्षेत्रांचे अपरिमित नुकसान झाले आहे. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद ठरले नाही. सुरुवातीच्या काळात शाळा-महाविद्यालयांतील आणि विद्यापीठांतील प्रत्यक्ष अध्यापनाचे कार्य जवळपास बंद होते. अमेरिकेत गेल्या वर्षी मार्च ते सप्टेंबर या काळात कोरोना संसर्गाचे प्रमाण प्रचंड होते. मोठ्या प्रमाणावर नागरिक मृत्युमुखी पडत होते. कोरोना महामारीबद्दल जनमानसात प्रचंड भीती होती. महामारी पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अमेरिकेसह बहुतेक देशांनी आपापल्या देशांच्या सीमा बंद केल्या होत्या. देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रवासावर निर्बंध लादण्यात आले होते. अनेक देशांनी टाळेबंदीचे धोरण अवलंबले होते. प्रवासास मनाई आणि सुरक्षित अंतराच्या नियमांमुळे ‘वर्क फ्रॉम होम’ची नवी कार्यप्रणाली या काळात उदयास आली. शाळा-महाविद्यालयांतील शिक्षण सुरू राहावे यासाठी देशांनी पर्यायी व्यवस्था उभी केली. महामारीच्या संकटामुळे नवीन अध्यापन पद्धतींची गरज निर्माण झाली. अमेरिकेत एप्रिल २०२० मध्ये हायब्रीड लर्निंगचा पॅटर्न बहुतेक राज्यांत रूढ झाला. शालेय शिक्षणाच्या बाबतीत  राज्याराज्यांतील जिल्हा शिक्षण मंडळांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयांतही वेगळेपणा होता. शिक्षण ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी देण्याबाबतचे निर्णय जिल्हा शिक्षण मंडळांनी घेतले. ऑफलाइन प्रकारातील शिक्षण मोकळ्या आणि बंदिस्त अशा दोन्ही प्रकारच्या जागेत सुरू होते, तर हायब्रीड लर्निंग प्रकारात आठवड्यातील काही दिवस विद्यार्थी घरी राहून, तर काही दिवस प्रत्यक्ष शाळेत उपस्थित राहून शिक्षण प्रक्रियेत सहभागी झाले होते.
कोरोना काळातील ऑनलाइन शिक्षण हे शिक्षक, विद्यार्थी, पालक, शिक्षण संस्था या सर्वांसाठी एक मोठे आव्हान होते. अमेरिकेतील शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भाग यांच्या समस्या वेगवेगळ्या होत्या. ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक अशा पुरेशा डिजिटल साधन-सुविधांची कमतरता ही समस्या या भागांतील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना भेडसावत होती. गरीब आणि दुर्गम भागांतील  विद्यार्थ्यांकडे लॅपटॉप, आयपॅड, अँड्रॉइड  मोबाइल, हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी, या ऑनलाइन शिक्षणासाठीच्या आवश्यक गोष्टी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे या मुलांपर्यंत कसे पोहोचायचे आणि त्यांचे शिक्षण कसे सुरू ठेवायचे, हा अत्यंत कठीण प्रश्न प्रशासनासमोर होता. कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर लोकांचे रोजगार गेले होते. त्याचा परिणाम पालक आणि मुले यांच्या संबंधांवर निश्चितच झाला होता. मुलांच्या मानसिक आरोग्याच्या संदर्भात खूपसे प्रश्न याच काळात निर्माण झाले. मुले घरी असल्यामुळे नोकरी करणाऱ्या पालकांनाही मुलांना सांभाळणे, त्यांचा अभ्यास घेणे आणि घरून काम करणे, अतिशय अवघड झाले होते.
शिक्षकांच्या समस्या तर खूपच वेगळ्या होत्या. सर्वच शिक्षक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत पारंगत नव्हते. अशा शिक्षकांना वर्ग अध्यापनाऐवजी अचानकपणे ऑनलाइन माध्यमातून शिकवायला लागणे, हे सर्वात मोठे आव्हान होते. अचानक उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेऊन, शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण मंडळे यांनी तातडीने शिक्षकांसाठी वेबसंवाद आयोजित केले होते. ऑनलाइन शिक्षण ते मुलांचे  मानसिक आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर शिक्षकांना प्रशिक्षण दिले. त्याचा फायदा शिक्षकांना ऑनलाइन अध्यापन करताना झाला. शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापन करताना पारंपरिक अध्यापन पद्धतींऐवजी वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग केला. ऑनलाइन क्लासमध्ये शिक्षकांनी गूगल क्लासरूम, गूगल मीट, झूम मीटिंग, मायक्रोसॉफ्ट टीम मीटिंग, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग यांसारख्या व्यासपीठांचा उपयोग करण्याबरोबर; ते रंजक होण्यासाठी  व्हिडिओ, ऑडिओ, आणि दृक साधनांचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात केला. काही शिक्षकांनी नेहमीच्या शाळेच्या वेळेत यूटयुब लाइव्हद्वारे अध्यापन केले, तर काहींनी अध्यापन घटकाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते यूटयुबवर अपलोड केले. इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या असलेल्या भागांत शैक्षणिक साहित्याचे नियमितपणे वाटप करून मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शाळांनी केला. अनेक शाळांनी आणि संस्थांनी विद्यार्थ्यांना या काळात मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली होती. अल्प उत्पन्न गटातील मुलांसाठी आणि अन्य गरजू मुलांसाठी शाळांनी ‘फूड प्रोग्राम योजना’ राबवली. या योजनेला समाजातील दानशूर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला.
अमेरिकेत शाळा-महाविद्यालयांतील  विद्यार्थी संख्येत अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांचे प्रमाण साधारणतः १४ टक्के आहे. जिल्हा शिक्षण मंडळांनी त्यांच्यासाठी या काळात कृतींवर आधारित अभ्यासक्रम तयार केला होता. अभ्यासाबरोबरच अशा मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी प्रामुख्याने घेतली गेली. या मुलांना शिकवणाऱ्या विशेष शिक्षकांनी दर आठवड्यातून एकदा पालकांबरोबर झूम मीटिंग आयोजित करून त्यांच्याशी संवाद साधला. अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा लक्षात घेऊन, शिक्षकांनी कधी प्रत्यक्ष मुलांच्या घरी जाऊन, तर कधी फोनच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला. नेहमीच्या वेळेपेक्षा अधिकचा वेळ शिक्षकांनी या काळात मुलांसाठी दिला. काही शाळांनी या मुलांसाठी खास व्हिडीओ तयार करून, त्याद्वारे काही सूचना आणि उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवले, तर काही शाळांनी मुलांची नेहमीच्या वापरात असलेली खेळणी त्यांच्या घरी पाठवली. 
मुलांचे मानसिक आरोग्य उत्तम राहावे यासाठी शाळांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या. काही शाळांनी मुलांकडून ऑनलाइन सर्व्हे भरून घेतले. त्यातून मिळालेल्या माहितीतून त्यांना मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत झाली. महामारीच्या काळात सोशल वर्कर्स आणि कौन्सिलर्स शाळांत येत होते. ते चर्चेच्या माध्यमातून मुलांच्या भावनिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक समस्या सोडवत होते. ‘केअर अँड कनेक्ट प्रोग्राम’सारख्या उपक्रमातून मुले शाळांत येऊन त्यांच्या ओळखीच्या शिक्षकांबरोबर आणि शाळेतील कर्मचारी वर्गाबरोबर प्रत्यक्ष संवाद साधत होती. मुले त्यांच्या अभ्यासविषयक आणि त्यांना भेडसावणाऱ्या इतर समस्यांबाबत मोकळेपणाने बोलत होती. विद्यार्थी सतत प्रेरित राहावेत यासाठी शाळांनी काही विशिष्ट अ‍ॅप्सचा उपयोग केला. स्क्रिन टाइम कमी राहण्याच्या दृष्टीने शाळांनी  प्रकल्पावर आधरित उपक्रम घेण्यावर भर दिला होता. काही जिल्हा शिक्षण मंडळांनी, शाळा तसेच कम्युनिटी मेंबर्सच्या सहकार्याने मुलांना लॅपटॉप आणि मोफत वाय-फायची सुविधा उपलब्ध करून दिली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरक्षितपणे सुरू करण्यासंदर्भात अमेरिकेत २४ मार्च २०२१ रोजी शिक्षण विभागाने  नॅशनल सेफ स्कूल रिओपनिंग समिट आयोजित केली होती. या ऑनलाइन परिषदेला शिक्षण क्षेत्राशी संबंधित विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण विभागातील उच्चपदस्थ अधिकारी, अशा सर्व घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परिषदेत शाळा सुरक्षितपणे उघडण्याबाबत तसेच महामारीच्या काळातील शिक्षण यावर प्रामुख्याने मंथन झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, उपराष्ट्रपती कमला हॅरीस, फर्स्ट लेडी डॉ. जिल बायडन, शिक्षण विभागाचे सेक्रेटरी डॉ. मिगेल कार्डोना आणि  सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल वेलंस्काय यांनीही या परिषदेत शाळांतील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी, पालक आणि  विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. शाळांनी पालकांशी सततचा संपर्क साधणे, शाळेतील कर्मचारी आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणे, कोरोना प्रतिबंधाच्या बाबतीत शाळांत कशाप्रकारे नियम पाळले जातील, यांबाबत संबंधिताना प्रशिक्षण देणे, यावर भर देण्यात आला होता.
अमेरिकेच्या सर्व राज्यांत, नव्या शैक्षणिक वर्षात आता ऑगस्टपासून शाळा सुरू झाल्या आहेत. कोविड-१९ आणि डेल्टा यांचा सामना करण्यासाठी ‘सेंटर फॉर डिसीझ कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन’ (सीडीसी) या संस्थेनं शिशुवर्ग ते बारावी (के-१२) पर्यंतच्या शाळांसाठी कोरोना प्रतिबंधाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे शाळांसाठी बंधनकारक आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे पुढीलप्रमाणे आहेत :
विद्यार्थी, शिक्षक, शाळेतील कर्मचारी, मुलांचे पालक आणि मुलांशी संबंधित सर्व घटक यांनी लवकरात लवकर लसीकरण करावे.
शाळेत मास्कचा योग्य आणि नियमितपणे वापर करावा.
शाळेत असताना सुरक्षित अंतर राखावे; ज्या व्यक्तींचे लसीकरण झाले नाही, अशा व्यक्तींनी ६ फूट अंतर ठेवावे.
हवा खेळती राहावी यासाठी वर्गांच्या खिडक्या आणि दरवाजे उघड्या ठेवाव्यात.
हातांची स्वच्छता ठेवावी.
खोकला अथवा शिंक आल्यास रुमालाचा वापर करावा.
कोविड-१९ ची लक्षणे दिसत असतील, तर विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी घरीच विलगीकरणात राहावे.
दिवसभरातून किमान एकदा शाळा आणि शाळेचा परिसर निर्जंतुक करावा.
महत्त्वाच्या कामाशिवाय इतर व्यक्तींना शाळेत अथवा  शाळेच्या परिसरात येण्यास मनाई करावी.
गेल्या दीड वर्षाच्या काळात, अमेरिकेत शिक्षण नेमके कशा पद्धतीने सुरू होते आणि आता ते कशा प्रकारे दिले जात आहे, हे आपल्याला समजण्यासाठी अमेरिकेत स्थायिक असलेल्या आपल्या मराठी बांधवांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया या लेखासाठी घेतल्या आहेत. त्यातून तेथील वास्तव समजायला आपल्याला मदत होईल. शाळा सुरू झाल्या तरी राज्यांनी आणि जिल्हा शिक्षण मंडळांनी तेथील परिस्थितीनुसार निर्णय घेतले आहेत. त्यामुळे त्यांत भिन्नता आहे.
“अमेरिकेत मागच्या वर्षी, म्हणजे वर्ष २०२०च्या सुरुवातीला कोरोना महामारीमुळे शाळा काही काळ बंद होत्या. नंतर प्रतिबंधात्मक नियम पाळून एप्रिलमध्ये शाळांत हायब्रीड लर्निंग सुरू झाले. त्या काळात, शाळा काही दिवस प्रत्यक्ष, तर काही दिवस ऑनलाइन स्वरूपात सुरू होत्या. मुलाचं शिक्षण सुरू होतं, मात्र वर्गात प्रत्यक्ष शिकण्यातील अनुभव आणि ऑनलाइन वर्गातील शिकण्यातील अनुभव यांत खूप फरक होता. मुले त्यांचे शाळेतील मित्र, खेळ, मजा-मस्ती यांपासून दूर गेली होती. खेळ आणि त्यांच्या आवडीच्या इतर गोष्टी करायला त्यांना फारसे मोकळे वातावरणही नव्हते. बराच काळ मुले घरीच असल्याने चिडचिडी झाली होती. शाळांनी नेहमीप्रमाणे मुलांच्या शैक्षणिक कामांचे मूल्यमापन वर्षभर आणि नियमितपणे केले होते. आपल्याकडे भारतात जशा वेगळ्या प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात, तशा परीक्षा किमान प्राथमिक स्तरावर तरी अमेरिकेत घेतल्या जात नाहीत. येथील शिक्षक मुलांच्या वर्षभराच्या कामांच्या आणि निरीक्षणांच्या नोंदी वेळोवेळी ठेवतात. प्रत्येक मुलास स्वतःचे शाळेतील काम ठेवण्यासाठी शाळांत फाइल्स दिल्या जातात. या फाइल ठेवण्यासाठी त्यांना ड्रॉवर्स दिले आहेत. विद्यार्थी त्यांच्या फाइल्स ड्रॉवरमध्ये ठेवतात. वर्षभराच्या त्यांनी केलेल्या सर्व कामाचे फोटो आणि माहिती फाइलमध्ये असते. वर्षाच्या शेवटी या फाइल्स मुलांना शिक्षकांकडे  जमा कराव्या लागतात. हायब्रीड लर्निंगच्या काळात शाळेतील कामाचे बरचसे सबमिशन ऑनलाइन झाले.अमेरिकेत १६ ऑगस्ट २०२१ पासून शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या असून, कोणताही खंड न पडता त्या सुरू आहेत. कोरोनापूर्व काळात जशा शाळा ऑफलाइन भरायच्या, तशाच आताही सुरू आहेत. अमेरिकेत साधारणतः ९० टक्के सरकारी शाळा असून, १० टक्के खासगी शाळा आहेत. या सर्व शाळा आता सुरू आहेत. कोरोना प्रतिबंधाचे नियम या सर्व शाळांत काटेकोरपणे पाळले जात आहेत. कोरोनाचे रुग्ण इतरत्र जसे सापडत आहेत, तसे जर या शाळांत सापडले, तर  संबंधित विद्यार्थ्यांना काही काळ विलगीकरणात ठेवून, बाकीचे वर्ग आहेत तसे सुरू ठेवले जातात. शाळा नियमितपणे सुरू झाल्यामुळे मुले खूश आहेत. त्यांना वर्गातील मित्रांबरोबर आता गप्पा-गोष्टी करायला आणि खेळायला मिळत आहे. शिक्षकांबरोबर त्यांना थेट संवाद साधता येत आहे. मुलांना वर्गातील चर्चांत सहभागी होता येत आहे. शाळा नियमितपणे सुरू झाल्यामुळे आम्ही सर्व पालक समाधानी आहोत.” विवेक काळपांडे, ग्रुप व्हाइस प्रेसिडेंट, अल्बर्टसन्स कंपनीज, डब्लिन, कॅलिफोर्निया.
“कोरोना संसर्गाच्या काळात गेल्या वर्षी वर्षभर शिक्षक ऑनलाइन माध्यमातून शिकवत होते. या माध्यमाशी जुळवून घेणे शिक्षकांना सुरुवातीच्या काळात काहीसे अवघड गेले. शिक्षणाचा दर्जाही काही प्रमाणात खालावला होता. या काळात मुलांनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. ऑनलाइन लेक्चर व्यवस्थित ऐकू न येणे, इंटरनेट स्पीडची समस्या, ऑनलाइन सबमिशन, यांसारख्या काही अडचणी होत्या. मुलांना इंटरनेट स्पीडची सुविधा सुरळीत मिळेल आणि ते त्यांच्या अभ्यासाशी संबंधित प्रोजेक्टस्, असाइनमेंट्स, इत्यादी गोष्टी वेळेवर आणि  योग्यरीतीने शिक्षकांपर्यंत पोहोचवू शकतील, यांबाबत आम्ही सर्व पालक लक्ष देत होतो. परीक्षा काळातील आणि एकूणच वर्षभरातील मूल्यमापन करताना, शिक्षकांनी मूल्यमापनाच्या पूर्वीच्या पद्धती न वापरता काहीसा उदार दृष्टिकोन ठेवला होता आणि मुलांना सबमिशनसाठीही पुरेसा वेळ दिला होता.वॉशिंग्टनमध्ये नव्या वर्षात, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या आहेत. अमेरिकेत बारा वर्षांवरील मुलांसाठीची लसीकरण प्रक्रिया सुरू आहे; मात्र सर्वांचेच लसीकरण झालेले नाही. बारा वर्षांखालील लहान मुलांना लस देण्याबाबत अजून तरी धोरणात्मक निर्णय झालेला नाही. प्राथमिक शाळांतील जे विद्यार्थी कोरोना संसर्गामुळे आजारी आहेत, अशाच विद्यार्थ्यांसाठी  फक्त ऑनलाइन वर्ग सुरू आहेत.” मृणाली चाफेकर, सीनियर प्रोग्राम मॅनेजर, सियटेल, वॉशिंग्टन
“माझी मुलगी वॉशिंग्टन डीसी येथे पाचवीत शिकत आहे. मागील वर्षी तेथील शाळा कोरोनामुळे सुरुवातीस मार्चपर्यंत पूर्णतः बंद होत्या. नंतर १ एप्रिल २०२० ते १५ जून २०२० या काळात  शाळा हायब्रीड लर्निंग स्वरूपात सुरू होत्या. त्यानंतर समर ब्रेक १५ ऑगस्टपर्यंत होता आणि नंतर पुढचे सबंध वर्ष ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शाळा सुरू होत्या. शाळा आठवड्यातून ४ दिवस प्रत्यक्ष, तर १ दिवस ऑनलाइन अशा वर्षभर सुरू राहिल्या. या काळात शाळांत मास्कचा वापर अनिवार्य होता. मुले शाळेत जायची तेव्हा वर्गातील अध्यापन हे डिजिटल माध्यमातून होत असे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे शाळेत मुलांच्या मोकळेपणाने वावरण्यावर निर्बंध होते. प्रत्येक ठिकाणी पुरेसे अंतर ठेवले जाईल, याची काळजी शिक्षक घेत असायचे. प्रत्येक शुक्रवारी मुले त्यांच्या असाइनमेंट आणि प्रोजेक्ट शाळेत जमा करायची. शिक्षकांनी मुलांच्या काही चाचणी परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेतल्या होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांची विशेष काळजी घेतली गेली. शिक्षकांना मदत करण्यासाठी शाळांत पुरेसा कर्मचारी वर्ग असतो.आता नव्या वर्षात ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापासून शाळा पूर्ववत सुरू झाल्या असून, हायब्रीड लर्निंग पूर्णपणे बंद झाले आहे. शाळा नेहमीप्रमाणे आठवड्यातील पाचही दिवस सुरू आहेत. शाळेत मास्कचा वापर विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोघांनाही अनिवार्य आहे. मुले शाळेत आल्याबरोबर  त्यांचे तापमान तपासले जाते. महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवण्यावर भर दिला जात आहे.” मोनिका महाबरे, डिरेक्टरएबीसी लर्निग सेंटर (प्रि-स्कूल)सिल्वर स्प्रिंग, मेरीलँड.
“आम्ही न्यू हॅम्पशायर राज्यातील नॅशूआ शहरात राहतो. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे इथे साधारणतः १ मे २०२० ते १५ जून २०२१ पर्यंत हायब्रीड पद्धतीने शाळा चालू होत्या. मुलांना दोन दिवस प्रत्यक्ष शाळा आणि तीन दिवस घरी राहून ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग असायचे. ऑनलाइन अभ्यास वर्ग जेव्हा सुरू झाले, तेव्हा सुरुवातीस हे माध्यम आम्हांला फारसे परिचयाचे नव्हते. घरातील लहान मुलांना ऑनलाइन क्लासमध्ये अभ्यासाला बसवण्यापासून ते त्यांचा अभ्यास ऑनलाइन पाठवण्याच्या बाबतीत खूप अडचणी जाणवल्या. अभ्यास पाठवताना नेमका कशाप्रकारे पाठवायचा, याची सुरुवातीस काही कल्पना नव्हती. मात्र नंतर शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि सरावाने गोष्टी जमू लागल्या. मुलांच्या सर्व असाइनमेंट्स आणि प्रोजेक्ट्स गूगल क्लासरूमच्या माध्यमातून शाळेने मागवल्या होत्या.नव्या वर्षात १६ ऑगस्टपासून शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत. पालक शाळेच्या गेटपर्यंत मुलांना सोडतात. नंतर शिक्षक मुलांना वर्गात घेऊन जातात. शाळा रोजच्या रोज सॅनिटाइझ केल्या जात आहेत. मुले आणि शिक्षक यांना मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून वर्गात सहा फूट इतके अंतर ठेवले जात आहे. मुलांचे तापमान किती आहे, याबाबत पालकांना रोज शाळेला कळवावे लागते. आता मुलांना मास्क वापरून का होईना शाळेत रोज जाता येते, त्यामुळे ती मजेत आहेत.” उदय न्याहारकर, प्रोडक्ट मॅनेजर - श्नाइडर, नॅशूआ, न्यू हॅम्पशायर.
कोरोना महामारीचे संकट अद्याप असतानाही, अमेरिकन प्रशासनाने शाळा प्रत्यक्ष सुरू करण्याबाबतचा घेतलेला निर्णय हा खऱ्या अर्थाने धाडसी म्हणायला पाहिजे. हा निर्णय घेताना, अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थी, अध्ययन अक्षम विद्यार्थी, एलजीबीटीक्यू समूहातील विद्यार्थी, अमेरिकन, इंडियन आणि अलास्का नेटिव्ह जमातीतील विद्यार्थी, स्थलांतरित विद्यार्थी, आफ्रिकन-अमेरिकन, हिस्पॅनिक, बेघर, अशा लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार प्रशासनाने केला आहे. महामारीमुळे लाखो विद्यार्थी शिक्षणापासून दूर राहिले होते. नियमित शाळा सुरू झाल्याने हे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येऊन सुरक्षित वातावरणात शिक्षण घेऊ शकतील. अमेरिकेने ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष  शाळा सुरू करून जगभरातील देशांसाठी ‘कोरोनाबरोबर जगायचं’ हा संदेश आपल्या कृतीतून दिला आहे. प्रशासनाच्या मार्गात खूपशा अडचणी आहेत, मात्र त्याही परिस्थितीत शिक्षणास त्यांनी दिलेला प्राधान्यक्रम, ही खरोखर विचारात घेण्यासारखी बाब आहे.

मच्छिंद्र बोऱ्हाडे
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत.)

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अमेरिकन शिक्षण , जीवनकेंद्री शिक्षण , मच्छिंद्र बोऱ्हाडे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    अमेरिकेतील पालकांनी मांडलेले विचार वाचताना भारतातील पालकांचे विचार वाचत असल्याचा भास होत होता. एकंदरीत असंच आपल्या कडेही सुरू होते. फरक एवढाच होता की आपल्या कडे निर्णय क्षमतेचा अभाव जाणवतो आहे कारण आपले प्रशासन खूपच सुस्त आहे.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen