सत्य आणि अहिंसेची शिकवण सर्व जगाला देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती आहे. या निमित्ताने महात्मा गांधीजींचे शिक्षणविषयक विचार मांडतायत गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मच्छिंद्र बोऱ्हाडे-
...
‘जे मुक्त करते ते ज्ञान’ - ज्ञानामुळे माणूस आयुष्याच्या चौकट आणि विचारांच्या पलीकडे जाऊन आयुष्याकडे मोकळेपणानं बघु शकतो. ते ज्ञान ज्यातून मिळतं अशी कोणतीही गोष्ट हे एक प्रकारचं शिक्षण असतं. म्हणूनच शिक्षणाचा संबंध हा अभ्यासक्रम किंवा पाठ्यपुस्तकांशी नसून जीवंत अनुभवांशी असतो. अशा अनुभवाधारीत शिक्षणपध्दतीचा मुलगामी विचार करणाऱ्या निवडक विचारवंतांपैकी महात्मा गांधी हे प्रमुख नाव.
महात्मा गांधींनी विविध शैक्षणिक प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी दक्षिण आफ्रिकेत फिनिक्स आश्रम, टॉलस्टॉय फार्म आणि भारतात परतल्यानंतर शांतिनिकेतन, कोचरब आश्रम आणि साबरमती आश्रम या ठिकाणी केले. या प्रयोगांतूनच पुढे १९३७ मध्ये नई तालीम ही महात्मा गांधी प्रणित शिक्षणपद्धती उदयास आली. या पध्दतीला वर्धा शिक्षण, बुनियादी शिक्षण, बेसिक एज्युकेशन अशा विविध नावांनी ओळखलं जातं. नई तालीममध्ये त्यांनी हस्तकला, कला, आरोग्य आणि शिक्षण या चार गोष्टींचा अतिशय सुरेख मेळ घातला आहे. व्यक्तिच्या सबंध आयुष्यभराच्या शिक्षणाचा विचार महात्मा गांधींनी या पद्धतीत केला आहे. केवळ पुस्तकी, पारंपरिक आणि पोपटपंची शिक्षणाऐवजी शारीरिक आणि बौद्धीक अशा दोन्ही श्रमांची जोड घालून शिक्षण द्यावं, असा विचार या पद्धतीत त्यांनी केला होता. हे शिक्षण हस्तोद्योगाच्या माध्यमातून दिलं पाहिजे असं त्याचं मत होतं. गांधी प्रणीत शिक्षण पध्दती ही कृती शिक्षणावर भर देणारी पध्दती होती. हात, पाय, कान, नाक आणि डोळे यांच्या योग्य वापरानं आणि प्रशिक्षणानं बुध्दीचं खरं शिक्षण होतं, अशी महात्मा गांधीजींची पक्की धारणा होती.
महात्मा गांधीजींनी प्राथमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, प्रौढ शिक्षण, महिलांचं शिक्षण, व्यावसायाधिष्ठित शिक्षण अशा वेगवेगळया पातळयांवर शिक्षणाचा विचार केला आहे. प्राथमिक शिक्षण हे मोफत आणि सक्तीचं असावं. ते मातृभाषेतून देण्यात यावं, त्याचा संबंध सभोवतालच्या परिसराशी असावा. या शिक्षणपध्दतीत सूतकताई, विणकाम, शेती, पुस्तक बांधणी, मातीकाम, हस्तकला, बागकाम यांसारख्या कृतीयुक्त उपक्रमांचा समावेश केला होता. याशिवाय गणित आणि समाजशास्त्राच्या बरोबरीनं चित्रकला आणि संगित या विषयांनाही अभ्यासक्रमात आवश्यक ते स्थान दिलं होतं. परीसर स्वच्छता, शरीर स्वच्छता, शाळेची स्वच्छता हे ही महत्त्वाचे उपक्रम अभ्यासक्रमात समाविष्ट होते. प्रार्थनेलाही वेळापत्रकात महत्त्वाचं स्थान होतं. गांधी प्रणित शिक्षणात आश्रमात राहणाऱ्या मुलांना पाणी आणणं, कपडे धुणं, धान्य निवडणं, खोल्यांची सफाई, शौचालयं स्वच्छ करणं, झाडांना पाणी घालणं, सभागृह स्वच्छ ठेवणं, जेवण तयार करणं, यांसारखी अनेक कामं करावी लागत. यातून आपोआपच त्यांच्यात स्वावलंबन, सहकार्याची भावना, नम्रता, प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेचं नियोजन, चांगले वर्तन यांसारखी मूल्ये विकसीत होत असत. शिक्षण आनंददायी आणि हसत खेळत व्हावं यासाठी नई तालीमध्ये मुलांना आवडतील असेच उपक्रम समाविष्ट केले होते.
महात्मा गांधीजींनी स्थापन केलेले आश्रम खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या प्रयोगशाळा होत्या. या आश्रमांत सामुदायिक जीवनाचे धडे देखील दिले जात. स्वतः महात्मा गांधी त्यांच्या अनुयायांबरोबर आश्रमाची साफसफाई करणं, शेतात काम करणं, लाकडं फोडणं, जेवण तयार करणं आणि ते पंगतीत वाढणं अशी कामं करीत असत. आश्रमांतल्या मुलांना शिकवणं, त्यांच्या परीक्षा घेणं ही शैक्षणिक कामंही ते त्यांच्या सहकार्यांच्या मदतीनं करीत. त्यांना मुलं फार आवडत असंत. मुलांची संगत म्हणजे परमेश्वराचीच संगत असं ते मानत. मुलांबरोबर ते निरनिराळे खेळ खेळायचे. त्यांना गोष्टी सांगायचे. महात्मा गांधीजींनी त्यांच्या स्वत:च्या आयुष्यात शारीरिक श्रमाला महत्त्वाचं स्थान दिलं होतं. नाभिकापासून ते न्यायाधिशापर्यंत सर्वांच्या श्रमाचं मूल्य सारखंच असल्याचं ते आश्रमातील विद्यार्थ्यांना सांगत. मुलांना लहानपणापासूनच श्रमाची प्रतिष्ठा शिकवली पाहिजे. कोणतही काम कमी प्रतीचं नसतं. मुलांना श्रमाबद्दल तिटकारा वाटता कामा नये, हे सगळं ते स्वतःच्या कृतीतून दाखवून देत.
महाविद्यालयीन शिक्षणाचा संबंध राष्ट्राच्या गरजांशी असावा. शिक्षण विविध उद्योगांशी जोडलेलं असावं. उद्योगांनी त्यांना हवे असलेले पदवीधर निर्माण करण्यासाठी महाविद्यालयं चालवावीत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च उद्योगांनी करावा मात्र त्यावर सरकारचं नियंत्रण असावं. विद्यापीठातील शिक्षणातून लोकसेवक निर्माण झाले पाहिजेत. या शिक्षणाचा संबंध जीवन शिक्षणपध्दतीशी जोडलेला असावा. महात्मा गांधीजींच्या नई तालीम पध्दतीत हस्तोद्योगाच्या माध्यमातून शाळेत वस्तू तयार होतील. त्यांच्या विक्रीतून शाळांना उत्पन्न मिळेल. शाळा-महाविद्यालयं स्वयंनिर्भर होतील हा हेतू या विचारांमागे होता. प्रौढांना साक्षर केलं तर ते त्यांना येणाऱ्या अडचणींना समर्थपणे तोंड देऊ शकतील. शिक्षणानं त्यांचा आत्मविश्वास वाढायला मदत होईल. प्रौढ शिक्षणाचा ठरावीक अभ्यासक्रम असावा आणि तो अतिशय काळजीपूर्वक निवडक शिक्षकांच्या मदतीनं पूर्ण करण्यात यावा. हे काम करण्यासाठी मुलांची मदत घ्यावी. इथे केवळ अक्षरज्ञान अपेक्षित नाही तर त्याबरोबर प्रौढांना उपयुक्त आणि व्यावहारीक ज्ञान देखील द्यावं, असं जीवन शिक्षणपध्दतीत अपेक्षित होतं.
पुरूष आणि स्त्री हे दोघेही समान आहेत आणि ते परस्परांना पुरक आहेत. त्यामुळे दोघांनाही ज्ञानाची, शिक्षणाची आणि विकासाची संधी समान असली पाहिजे. कामाच्या बाबतीत स्त्री आणि पुरूष अशी विभागणी असता कामा नये असं या शिक्षणपध्दतीत अपेक्षित होतं.
गांधी प्रणीत शिक्षण पध्दती ही विद्यार्थी केंद्रीत शिक्षण पध्दती होती. शिक्षकाची भूमिका केवळ मार्गदर्शकाची होती. मुलांतील सुप्त गुणांचा शोध घेऊन त्यांच्या आवडी निवडी, कल, अभिरूचीचा विचार करून शिक्षकांनी शिकवणं या पध्दतीत अपेक्षित होतं. विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवणं हे शाळा आणि शिक्षकांचं मुख्य ध्येय असावं. चारित्र्य घडवणारे शिक्षक स्वतः चारित्र्य संपन्न असले पाहिजेत, अशा विचारांचे महात्मा गांधी होते. शिक्षक हेच विद्यार्थ्यांचे पाठ्यपुस्तक असल्याचं त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केलं आहे. शिक्षकांनी पुस्तकातून शिकवलेलं फारच थोडं त्यांच्या स्मरणात राहिलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हरिजनमध्ये ते लिहितात, ‘गुरूकुल पध्दतीत ऋषी पाठ्यपुस्तकांशिवाय शिकवत होते. त्यांनी त्यांच्या शिष्यांना अध्ययन तंत्र शिकवली. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकांबाहेर जाऊन शिक्षण द्यावं. शिक्षकांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या पालकांची भूमिका बजावल्यास त्यांना नेमकं काय हवं आहे किंवा त्यांच्या गरजा काय आहेत हे समजायला मदत होईल आणि त्याचप्रमाणे त्यांना नियोजन करता येईल. पाठ्यपुस्तकांची खरी गरज विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांनाच अधिक आहे. विद्यार्थ्यांना पूर्ण न्याय द्यायचा असेल तर शिक्षकांनी दररोज पाठ नियोजन करावं. असं नियोजन करताना विद्यार्थ्यांच्या विशेष गरजा शिक्षकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. शैक्षणिक साधनं परिसरातील उपलब्ध वस्तूंच्या सहाय्यानं तयार करावीत आणि ती शिक्षकांनीच तयार करावीत असं गांधीजींना अपेक्षित होतं.
मुलांना शारीरिक शिक्षा द्यायला महात्मा गांधीजींचा नेहमीच विरोध असायचा. विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाच्या अनेक घटना आश्रमात अधुनमधून घडत. मात्र अशा विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याऐवजी त्यांना सुधारण्याबाबत दरवेळी अधिक चांगली पध्दत ते शोधून काढीत. मुलांच्या वाईट वर्तनाबद्दल ते स्वतःला दोषी मानत. अशावेळी प्रायश्चित्त म्हणून ते उपवास करीत. शाळांतील विद्यार्थ्यांच्या गैरवर्तनाबाबत काही अंशी शिक्षक जबाबदार असतात. त्यासाठी काही प्रसंगी शिक्षकांनी प्रायश्चित्तादाखल उपवास करण्याबाबत ते सुचवतात.
विद्यार्थ्यांबद्दल ते लिहितात, ‘आजचे विद्यार्थी हे उद्याचे भावी नागरीक आहेत. त्यामुळे त्यांनी अतिशय जबाबदारीनं वागलं पाहिजे. त्यांचे आदर्श त्यांनीच निवडून त्यांच्यातले चांगले गुण आचरणात आणावेत. विद्यार्थ्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता मानू नये. त्यांनी गरजू व्यक्तिंना मदत करावी. रूग्णांची सेवा सुश्रृषा करावी. ग्राम स्वच्छता आणि साक्षरता प्रसार इत्यादी विधायक आणि समाजोपयोगी कामात त्यांनी स्वतःला गुंतवून ठेवाव. सतत त्यांनी शिकत रहावं. नवनवीन ज्ञान मिळवावं. प्राप्त केलेलं ज्ञान समाजबांधवांपर्यंत पोचवावं. त्यांनी संयमी जीवन जगावं. गोरगरीबांचं रक्षण करावं. धार्मिक तेढ अधवा दंगधोपे झाल्यास अहिंसात्मक पध्दतीनं ते शमवण्याचा प्रयत्न त्यांनी करावा. महिलांशी त्यांचं वागणं सौजन्यपूर्ण असावं. धुम्रपान आणि इतरही वाईट व्यसनांपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवावं. त्यांच्या वागण्यात नम्रपणा असावा. विद्यार्थीदशेत असेपर्यंत संन्याशासारखं त्यांचं वर्तन असावं.’
गांधी प्रणित शिक्षण पद्धतीत आदर्शवाद, निसर्गवाद आणि कार्यवाद यांचा सुंदर मिलाफ आपल्याला दिसून येतो. विद्यार्थ्यांच्या समग्र विकासाचा विचार गांधीजींनी त्यांच्या शिक्षण पद्धतीत केला आहे. या शिक्षण प्रणालीतील मुल्य शिक्षण ते व्यवसाय शिक्षण अशा अनेक बाबींचा समावेश देशाच्या सर्व शैक्षणिक धोरणात झाल्याचे आपल्याला दिसून येते.
आजच्या जागतिकीकरणानं आणि चंगळवादानं ग्रासलेल्या काळात महात्मा गांधींची एकूणच जीवनदृष्टी अधिक नैसर्गिक आणि सहज अशा शिक्षणपध्दतीकडे नेऊ शकते. या जीवनाधारीत शिक्षण पध्दतीची रूजूवात होण्याची आज खरी गरज आहे. शिक्षणाचं क्रयवस्तूमध्ये रूपांतर होण्याच्या आजच्या काळात महात्मा गांधीची ही केंद्रीय शिक्षणदृष्टी शिक्षणाच्या नव्या दिशा आणि नवे मार्ग यांच्याकडे नक्कीच नेऊ शकेल.
मच्छिंद्र बोऱ्हाडे,
नंदादीप विद्यालय, गोरेगाव, मुंबई
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
महात्मा गांधी
, शैक्षणिक प्रयोग
, मच्छिंद्र बोऱ्हाडे
, मराठी अभ्यास केंद्र
शिक्षण