समूह प्रकल्पातून आनंददायी शिक्षण


शिक्षक प्रयोगशील असेल तर जगात शिक्षणाएवढं आनंददायी काहीच असू शकणार नाही. पण, याच्या उलट झालं, तर मात्र शिक्षण म्हणजे मुलांना शिक्षा वाटायला लागते. याची पुरेपूर जाणीव असणाऱ्या गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप महाविद्यालयातील शंकर बळी यांनी, आपला मराठी विषय अधिक रंजक कसा करता येईल, मुलांना भाषेची गोडी कशी लावता येईल, याचा विचार करून प्रकल्प पद्धत निवडली. प्रकल्पांच्या नियोजनापासून ते त्यांच्या अंमलबजावणीपर्यंतचे बळी सरांचे हे कथन इतर शिक्षकांनाही मार्गदर्शनपर ठरेल असे आहे.
मनुष्यप्राण्याला जीवनात तोचतोचपणा नको असतो. बदल हवा असतो; ज्यामुळे जीवन सुसह्य होईल, कंटाळा जाईल, तरतरीतपणा-ताजेपणा येईल, असा. बदलामुळे आनंद द्विगुणित होतो. जीवनाचं अविभाज्य अंग असलेल्या शिक्षणाचंही तसंच आहे. शिक्षकानं अध्यापन पद्धतीत बदल केला की अध्ययनाची प्रक्रियाही अधिक जोमाने घडून येते.
खरं तर शिक्षणात अध्ययन-अध्यापनाचे अनेक प्रकार/प्रवाह आहेत : वर्गातलं शिक्षण, सहलीतून शिक्षण, क्षेत्रभेटीतून शिक्षण, खेळातून शिक्षण आणि प्रकल्पातून शिक्षण इ. या काही पद्धतींचं निरीक्षण केलं, तर आणखी काही प्रकार करता येतील. त्यामध्ये शाळेच्या आवारात दिलं जाणारं शिक्षण आणि आवाराबाहेर दिलं जाणारं शिक्षण अशी एक वर्गवारी करता येईल. शाळेच्या बाहेर दिल्या जाणार्‍या शिक्षणाला अनेक मर्यादा आहेत. त्यामध्ये वेळ व पैसा या अतिशय महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यामुळे भारतात शाळेच्या आवारात दिल्या जाणार्‍या शिक्षणाला अधिक महत्त्व आहे.
एकूणच, शिक्षण पद्धतींत वर्गातल्या शिक्षणाला तसं वरचं स्थान आहे. विद्यार्थ्यांना मात्र वर्गाबाहेरचं शिक्षण अतिशय प्रिय असतं. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून, त्याला प्राप्त शासकीय पाठ्यक्रमाची जोड देऊन आणि शाळाप्रमुखांच्या आज्ञेत राहून, काही प्रकल्प माझ्या विद्यार्थ्यांनी पूर्णत्वास नेले.
विद्यार्थ्यांसोबत नि विद्यार्थ्यांसाठी काही प्रकल्प राबवताना, ते व्यक्तिगत प्रकल्पांकडून समूह प्रकल्प असा प्रवास करणारे ठरले. प्रत्येक प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन आणि ९० टक्के जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारणे, हे दोन महत्त्वाचे घटक होते.
विद्यार्थ्यांचे समान संख्येचे गट तयार करून प्रत्येक गटासाठी एक गटप्रमुख नेमणं आणि हा प्रमुख त्या गटानं निवडला, तर पुढचं कार्य 'सुफल-संपन्न' होणं, अतिशय सोपं जातं. प्रकल्पासाठी सर्वात पहिली तयारी म्हणजे, सर्व गटप्रमुखांचं प्रशिक्षण. गटप्रमुखांना प्रकल्प समजला की शिक्षकांची जबाबदारी आणखी कमी होते. परत वर्गासमोर प्रकल्पाची मांडणी करताना, हेच गटप्रमुख त्यात भर घालणार्‍या कल्पना/युक्त्या यांची तोरणं बांधत जातात. इतर विद्यार्थीही त्यांना हातभार लावतात. मग काय अध्यापनकर्ता कधी अध्ययनकर्मी बनतो, हे कळतही नाही. शिक्षकाने विद्यार्थी बनणं याची मजा काही औरच असते.
बर्‍याचदा मी केलेल्या कल्पनेपेक्षा विद्यार्थ्यांच्या कल्पना भन्नाट असायच्या. सहभागी विद्यार्थ्यांचे गट > गटप्रमुख विद्यार्थी > गटप्रमुख विद्यार्थ्यांमधून दोन प्रकल्पप्रमुख विद्यार्थी (ज्यात एक मुलगा व एक मुलगी अशी समानता) > आणि शेवटी शिक्षक. हा झाला प्रकल्पाचा मनोरारूपी स्तंभालेख.
या रचनेतून एकप्रकारे नागरिकशास्त्राचं वा राज्यशास्त्राचं पर्यायाने लोकशाहीचंही शिक्षण होत असतं. विचार करा, ग्रामपंचायत वा नगर परिषदेपासून ते संसदेपर्यंत अशीच रचना आहे ना! जबाबदार्‍याचं वाटपही असंच.
खरं तर शाळाशिक्षकांना वर्गातल्या भूमिकेबरोबरच शिपायापासून ते कारकुनी कामांचीही जबाबदारी असते. शाळेबाहेरची शासकीय कर्तव्येही असतात. कशालाही नाही म्हणणं कठीण असतं. प्रकल्पातली जबाबदारी शिक्षकाने कमी केली तर वरची कामं करता येतात.  दुसरीकडे विद्यार्थ्यांवर थोडी जरी जबाबदारी सोपवली, तर त्यांचा आनंद गगनात मावत नाही. जबाबदारी सोपवण्याचा दुसरा अर्थ त्यांच्यावर विश्वास टाकणं, असाही होतो. हीच जबाबदारी, हाच विश्वास, म्हणजे त्यांच्यासाठी आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग असू शकतो. प्रकल्पाचं नियोजन मनातून कागदावर उतरवणं, हेच माझ्या प्रकल्पांचं गमक आहे, असं मला वाटतं.
मोहोर : कवितासंग्रह (२०१०-११)
२०१० - २०११ साली नुकतंच नवीन शैक्षणिक धोरण लागू झालं होतं. समजण्यात गफलत झाल्यामुळे सरसकट पास करण्याचं धोरण, अशी प्रसिद्धी या धोरणाची झाली होती. आकारिक आणि संकलित मूल्यमापन असे या सर्व शिक्षा अभियानाचे दोन भाग आहेत. मराठी विषयांतर्गत आकारिक मूल्यमापनाचा आधार घेऊन विद्यार्थ्यांच्या स्वरचित व संकलित कवितांचा संग्रह तयार करण्याची कल्पना विद्यार्थ्यांसमोर मांडली. त्यासाठी ८ गुण मिळतील असंही सांगितलं. दिवाळीच्या आधी पहिल्या सत्रात प्रकल्पाला सुरुवात झाली. वर्गातील एकूण ६० विद्यार्थ्यांचे ६ गट तयार केले. मानसी कुबडे, रुद्राणी दळवी, जाई रेडीज, सिद्धिका सावंत, साईप्रसाद कदम आणि गौरव राजे यांनी गटप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली. प्रकल्पाचा खर्च सर्व शिक्षा अभियानांतर्गत करण्याला मुख्याध्यापिका श्रीमती स्मिता गोसावी यांनी परवानगी दिली.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी गटप्रमुखाकडे कविता जमा केल्या.  त्यावर मांडणी, व्याकरणिक सोपस्कार करून कविता एकत्रित केल्या. गद्य व पद्य यातला फरक विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिला. कवितासंग्रहाचं हस्तलिखित पुस्तक कसं तयार करायचं, याविषयी चर्चा केली. प्रत्येकाला पुस्तकासाठी एक पासपोर्ट साइजचा फोटो आणायला सांगितला. फुलस्केप पेपर देऊन त्यावर कविता सुवाच्य अक्षरात लिहून घेतल्या.  लिहिण्यासाठी वर्गमित्र-मैत्रिणींची मदत घेण्याचीही मुभा होती.
शनिवारी दुपारी चार वाजता शाळा सुटायची, म्हणून पुस्तकाच्या सजावटीसाठी एक शनिवार निवडला. त्या दिवशी सर्वांना कात्री, गोंद, स्केचपेन्स इ. साहित्य आणण्याची सूचना आधीच दिली होती. सर्वांना कवितांच्या संख्येप्रमाणे १/४ आकाराचे जाड रंगीत कागद दिले. त्या कागदावर कोणत्या बाजूला किती जागा सोडायची, याचा आराखडा फळ्यावर काढून दाखवला. आधीच फुलस्केपवर लिहिलेल्या कविता विद्यार्थ्यांनी कवितेच्या आकाराप्रमाणे कापून, त्या रंगीत कागदावर चिकटवल्या. कवितेच्या आशयाप्रमाणे त्यावर चित्रं काढली. पहिल्या पानावर  विद्यार्थ्याचा फोटो, संपूर्ण नाव, हजेरी क्रमांक व जन्म दिनांक लिहिला. हे काम विद्यार्थी रममाण होऊन करत होते. एकमेकांना मदत करत होते. एकमेकांचं पाहून शिकत होते. गटप्रमुख स्वतःचं काम करत गटाला मार्गदर्शन करत होते. माझ्याकडे खूपच कमी काम होतं. हात बांधून, वाट काढत, शाबासकीच्या शब्दांची पेरणी करत निरीक्षण करणं, एवढंच काय ते मुख्य काम होतं.
गटप्रमुखांनी आपापल्या गटाची पानं जमा करून फोल्डरमध्ये ठेवताना, अर्धं जग जिंकल्याचा आनंद मी अनुभवत होतो.
कवितासंग्रहाची डमी रंगीत प्रत तयार करण्याची कल्पनाही विद्यार्थ्यांचीच. प्रस्तावना मी लिहिली आणि मलपृष्ठावर संग्रहाची पाठराखण ज्येष्ठ मराठी शिक्षक आणि विद्यमान मुख्याध्यापक श्री अर्जुन जगधने यांनी केली. त्यांच्याच शब्दांत – “मोहोराचे पुढे फळांत रूपांतर होते, जी फळे खवय्यांना तृप्त करतात. आपल्याही 'मोहोरा'चे भविष्यात वेगवेगळ्या कवितासंग्रहांमध्ये रूपांतर होऊन रसिकजनांच्या हृदयसिंहासनावर अधिराज्य गाजवावे, हीच सदिच्छा."

कवितासंग्रहासाठी देखणं मुखपृष्ठ गौरव राजे या विद्यार्थ्यांनं तयार केलं आणि सुलेखन कला शिक्षिका श्रीमती चित्रा तावडे यांनी केलं. ११९ पानांच्या या संग्रहात, ६० कवींच्या स्वरचित आणि संकलित अशा एकूण ११० कविता आहेत.
कविता रचताना/लिहिताना कविता कशी सुचली, याविषयी विद्यार्थ्यांना लिहायला सांगितलं होतं. याविषयी काही विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. त्यांची मनोगते इथे देत आहे :
गौतमी जगधने : सरांनी वर्गात घोषणा केली, ‘आपल्या वर्गाचा एक कवितासंग्रह बनवायचा आहे. त्यासाठी सर्वांनी कविता लिहण्यास सुरुवात करावी. ‘नुकतीच दिवाळी संपल्याने दिवाळीची मजा मनात ताजी होती. त्यामुळे मी 'दिवाळी' या विषयावर कविता लिहिण्यास सुरुवात केली. ही कविता लिहिण्यास माझी मैत्रीण रूपाली गांगण आणि आमच्या गणिताच्या शिक्षिका दीपा कदम यांनी मदत केली.
दिवाळी
आली आली दिवाळी
बहीण भावा ओवाळी
किती ही गोजिरी
सुखाने करू साजरी
उज्ज्वला भांगरे : आपल्या जवळपास भरपूर गोष्टी घडत असतात. काही छंद असे असतात, जे आपण जोपासतच नाही. मला कविता लिहिण्याचा छंद लागला. कविता लिहिताना त्यात सुख-दुःख असते. या कविता लिहिताना मला माझे जीवन कसे जगावे, ते समजले. त्यात 'मैत्री' या कवितेला मी पायांची उपमा दिली. 'नाती' ही कविता लिहिताना मी निसर्गाची उपमा दिली. मला या कविता करताना खूप आनंद झाला. मला या वेगळ्या छंदाची आवड लावल्याबद्दल धन्यवाद!
आई
दुःखात हसवी, सुखात सुलवी
गाऊनी गोड अंगाई
जगात असे काहीही नाही
जशी माझी प्रिय आई
विद्यार्थ्यांची मनोगतं बरीच आहेत, पण जागेची मर्यादा पाळणंही गरजेचं आहे. विविध विषयांवरच्या स्वरचित व संकलित कवितांचा समावेश असलेल्या या 'मोहोर' काव्यसंग्रहाचे प्रकाशन  दि. १६ फेब्रुवारी, २०११ रोजी मराठी दिनी झाले.
शब्दसमूह कोश (२०११-१२) :-
सन २०११ - १२ या शैक्षणिक वर्षी माझ्याकडे इयत्ता आठवीचा मराठी विषय अध्यापनासाठी दिला होता. आमच्या शाळेतील विद्यार्थी सर्वच स्तरातले नि विभागातले. भाषेत बोलणं हे मुख्य नि लिहिणं त्यानंतर. जे बोलतो ते लिहायला वाचायला येणं, भाषेतल्या कलाकृतींचा आस्वाद घेता येणं, आकलन करून व्यक्त होता येणं, याला भाषा शिक्षण म्हणता येईल. पण ,बोलण्याची भाषा, शब्दोच्चार नि लिहिण्यातली भाषा यांत तफावत असेल तर...?  मुंबईतील इतर विविधतेप्रमाणे इथली भाषाही अत्यंत सरमिसळीची आहे, जी इतरत्र कुठेही नसेल. घरातली भाषा, समाजातली भाषा नि शाळेतली भाषा... विद्यार्थ्यांनी काय-काय ध्यानात ठेवायचं? कोकण, खानदेश, विदर्भ वा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागांतून मुंबईत आलेली विद्यार्थ्यांची कुटुंबे. त्यात मुंबईत त्यांच्या भाषेत परप्रांतियांशी होणाऱ्या संवादाचीही भर पडते. यातच अभ्यासाची, उत्तर लिहिण्याची भाषाही ध्यानात ठेवायची. हे सगळं ध्यानात घेऊन प्रकल्प तयार करायचं ठरवलं.
तसंही अभ्यास करा म्हटलं, तर मोठ्यांनाही कंटाळा येतोच की. मग अभ्यासाचं नाव न काढता शब्दकोश दाखवून, ‘असा शब्दकोश तुम्हीही बनवू शकता’, असं सांगितलं. प्रथम सत्रात ८ गुण आणि द्वितीय सत्रात ८ गुण मिळतील, हेही सांगितलं. विद्यार्थ्यांना भाषा शिकवणं वगैरे असं काही भव्य-दिव्य न सांगता, हे तुम्हांला करता येईल, असा आत्मविश्वास जागवत प्रकल्पाला सुरुवात झाली.
वर्गातीत ६१ विद्यार्थ्यींची ९ गटांत विभागणी केली. ऋतुजा कांडरकर, संजना वाघ, नम्रता मुळे, निनाद पटवर्धन, सुजय भोसले, शिरीष भोसले, सर्वेश भावे, प्रणव खानोलकर आणि कुणाल भोर या विद्यार्थ्यांची गटप्रमुख म्हणून निवड झाली.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी शब्दांचं संकलन केलं. ते कसं करायचं हे विद्यार्थ्यांना समजावून दिलं. विद्यार्थ्यांनी शब्द संकलन घरातून, समाजातून वा शब्दकोशांतूनही करायला मुभा होती. त्यासाठी शब्दांचे पाच प्रकार केले होते. हे पाच गट पुढीलप्रमाणे :
१) हमखास चुकणारे शब्द-
उदा. दिन = दिवस || दीन = गरीब
अर्भक = तान्हं बाळ || अभ्रक = धातू
उपहार = नजराणा || उपाहार = नाष्टा
२) एक शब्द दोन वेळा येणारे शब्द-
उदा - मारामारी, दिवसेंदिवस, गरमागरम
३) दोन्ही समान अर्थाचे शब्द-
उदा. मूल+बाळ = मूलबाळ, दगड+गोटे = दगडगोटे, पांढरे+शुभ्र = पांढरेशुभ्र
४) एका शब्दाचे अनेक अर्थ
उदा. हार = माळ, पराभव,
पान = झाडाचे पान, वहीचे पान, जेवणाचे ताट
फोड = तुकडा, विभागणी, अंगावरील पुळी
५) द्विभाषिक शब्द-
रोप = छोटे झाड || Rope = दोरी
नेम = निशाणा || Name = नाव
सन = साल || Sun = सूर्य || Son = मुलगा
विद्यार्थ्यांचे शब्द संकलनाचे कागद वाचल्यानंतर शब्द परत-परत आल्याचे लक्षात आले. त्यामुळे गटप्रमुखांनी गटातील विद्यार्थ्यांच्या मदतीने शब्दांची पुनरावृत्ती टाळून प्रत्येक गटाची एक यादी तयार केली. त्यानंतर सर्व गटप्रमुखांना आपापल्या याद्या घेऊन एकत्र बसवून वर्गाचा 'शब्दसमूह कोश' तयार झाला. मराठी शब्दांचे र्‍हस्व-दीर्घ, अर्थ आणि इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग, या सर्व बाबतीत अचूकपणा यावा म्हणून विद्यार्थ्यांनी ते शब्दकोशांतून तपासले.
आता पुस्तक तयार करण्याचं आव्हान होतं. संगणकावर टायपिंगचं काम निनाद पटवर्धन, प्रणव खानोलकर, सर्वेश भावे, कुणाल भोर आणि शिरीष भोसले या विद्यार्थ्यांनी पूर्ण केलं.
३२ पानांच्या या शब्दसमूहकोशात एकूण ११६ शब्दसमूह असून, ३१४ शब्द आहेत. आमच्या अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचं हीरक महोत्सवी वर्ष होतं. त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या  शिक्षण महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध विषयांतर्गत तयार केलेलं शैक्षणिक साहित्य विक्रीला ठेवलं होतं. १५ रुपये किंमत असलेल्या या पुस्तकाच्या १०० प्रती तेव्हा विकल्या गेल्या होत्या.
ओळख व्यवसायांची (२०१७-१८) :-
नुकताच 'स्व-विकास व कलारसास्वाद' हा विषय इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता. मुख्य सहा विषयांव्यतिरिक्त असलेल्या विषयांना श्रेणी विषयांचा दर्जा असतो. अशा विषयांना ‘आईऐवजी मावशीचं प्रेम’ मिळतं, हे वेगळं सांगायला नको. 

'स्व-विकास व कलारसास्वाद' या विषयाची मांडणी, आशय व उद्देश उत्कृष्टच! या विषयावर आधारित एखादा प्रकल्प विद्यार्थ्यांकडून करवून घेता येता येईल का, याविषयी विचारचक्र फिरत असताना लक्ष आठव्या प्रकरणावर गेलं. प्रकरणाचं नाव करिअर. कल्पना विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थी तर एका पायावर तयार. लगेच नियोजनाचा आराखडा तयार केला. इयत्ता नववीच्या वर्गात ४८ विद्यार्थी होते. एका गटात ४ विद्यार्थी याप्रमाणे १२ गट तयार केले. रुची करंजेकर, नेहा देवकर, विशाखा राऊळ, सिया बुरुटे, पृथ्वी गांगण, ओम देसाई, हर्षाली गायकर, अतुल चिकणे, राजीप मनवी, राहुल धुलप, तेजस कदम आणि सुरज गाढवे ह्यांनी गटप्रमुख म्हणून; तर मयुरी कदम व विघ्नेश धुरी ह्यांनी प्रकल्पप्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारली.
प्रत्येक गटासाठी व्यवसायानुरूप मुख्य विषय निवडले, ज्यात प्रत्येक विद्यार्थ्याला एक याप्रमाणे ४ विषय होते.
१) प्रशासकीय सेवा- भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC), केंद्रीय लोकसेवा आयोग(UPSC), तहसीलदार.
२) कृषी व पशुपालन- जैवतंत्र विज्ञान, दुग्धशाळा तंत्रज्ञान, फुड टेक्नोलॉजी, मत्स्यपालन, पशुपालन.
३) व्यवस्थापन क्षेत्र- व्यवस्थापन, हॉस्पिटल मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, एम.बी.ए.
४) माहिती तंत्रज्ञान- ॲनालिस्ट प्रोग्रामर, सॉफ्टवेअर इंजिनीअर, सिस्टीम प्रोग्रामर, कंम्प्युटर इंजिनीअर.
५) फॅशन- फॅशन डिझायनिंग, फॅशन मर्चेंडाइज, फोटोग्राफीतून व्यवसाय व नोकरी, सौंदर्यतज्ज्ञ.
६) बँकिंग- चार्टर्ड अकाऊंटंट, कॉस्ट अँड वर्क्स अकाऊंटंट, टायपिंग, स्वयंरोजगारासाठी शासकीय कर्ज.
७) चित्रपट- राष्ट्रीय नाट्य विद्यालय- दिल्ली(NSD), चित्रपट - कलाक्षेत्रातील पदवी, व्हिसलिंग वूड्स(मुंबई) कोर्सेस, भारतीय चित्रपट व दूरदर्शन संस्था-पुणे(FTII).
८) वैद्यकीय क्षेत्र- जैवतंत्रज्ञान (बायो टेक्नोलॉजी), पॅरामेडिकल सायन्स, एम.बी.बी.एस., दंतवैद्य.
१०) पोलीस- भारतीय पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस भरती, केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्था.
११) सैन्य दल- कोस्ट गार्ड, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी-पुणे(NDA), सीमा सुरक्षा बल(BSP), केंद्रीय राखीव पोलीस बल(CRPF)
१२) इंजिनीअरिंग- यांत्रिक अभियांत्रिकी, इस्रोत ज्युनिअर रीसर्च फेलोशिप, आय.आय.टी. इंजिनीअर, सिव्हिल इंजिनिअर.
या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकं उपलब्ध करून दिली होती. त्यांनी इतर ग्रंथालयातून पुस्तकं घेऊन किंवा इंटरनेटमधून माहिती मिळवली तरी चालणार होतं. एखाद्या व्यवसायाच्या शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी ज्या-ज्या गोष्टी आवश्यक असतात, त्यासाठी लागणारे सर्व मुद्दे विद्यार्थ्यांना दिले होते. या व्यतिरिक्त इतर बाबीही ते समाविष्ट करू शकणार होते. फक्त मिळवलेली माहिती ज्या  पुस्तकातून वा इंटरनेटमधून घेतली असेल, त्याचा संदर्भ वा शक्य असल्यास झेरॉक्स माहितीसोबत देणं बंधनकारक होतं; जेणेकरून गटप्रमुख, प्रकल्पप्रमुख आणि स्वतः मला माहितीचा पडताळा घेता येईल.
दोन विद्यार्थ्यांनी प्रत्येकी दोन विषय निवडल्यामुळे ४८ विद्यार्थ्यांची एकूण ५० व्यवसायांची माहिती संकलित झाली. वरीलप्रमाणे ती तपासली. सर्वांना हवे तेवढे १/४ आकाराचे प्रकल्प कागद देऊन त्यावर सुधारित माहिती लिहून, सजावट करून नि त्यावर चित्रं चिटकवून, विद्यार्थ्यांचं पुस्तक तयार झालं. प्रत्येक गटानं आपल्या विषयासाठी पिवळ्या रंगाच्या जाड कागदावर गटाचं मुखपृष्ठ, तर पुस्तकासाठीही विद्यार्थ्यांनीच मुखपृष्ठ तयार केलं. अशा तर्‍हेनं अर्धा प्रकल्प तयार झाला होता.
कागदावरच्या प्रकल्पाचे पोस्टर बनवण्याआधी समान आकाराची चौकट, मुद्द्यांची नावे व इतर माहिती वेगळ्या रंगात लिहिणं, याविषयी सर्वांना माहिती दिली. सर्व पोस्टर समान आकाराचे असावेत, तसंच खर्च कमी व्हावा म्हणून पांढर्‍या रंगाच्या हार्डबोर्डची एकगठ्ठा खरेदी केली. विद्यार्थ्यांनी पोस्टर घरी किंवा शाळेत तयार करण्याचा पर्याय त्यांच्याकडे होता.
पोस्टरचं काम सुरू असताना प्रदर्शनाविषयीही विचार चालू होता. शाळेच्या आवारात इमारतीसमोर मोकळ्या जागेची निवड केली. शाळेच्या सभागृहात सुतार काम सुरू होतं. त्यामुळे मांडणीसाठी साहित्याला कमतरता नव्हती. मंचावरील निळ्या पडद्यांच्या लाकडी चौकटी नि बॅनर भंगारात भरपूर होते. जुने बाकही भरपूर होते. त्या सर्व साहित्याचा उपयोग झाला. बाकांना आडव्या, उभ्या फळ्या ठोकून/बांधून प्रदर्शनाची व्यवस्था पूर्ण केली. आडव्या लाकडांना  खिळे ठोकल्याने आणि पोस्टरांना पंचिंग मशीनने छिद्र पाडल्यानं  पोस्टर लावणं व काढणं सोयीचं झालं होतं. प्रदर्शनाचं उद्घाटन हटके पद्धतीनं झालं पाहिजे, याकडेही अधिक लक्ष दिलं. नेहमीच्या पद्धतीने दरवाजाला बांधलेली फीत कापून उद्घाटन करण्यापेक्षा, प्रदर्शनाच्यामध्ये उद्घाटनासाठी छोटासा देखावा तयार केला.
४८ विद्यार्थी, दोन महिने, ५० पोस्टर आणि दि. १६ फेब्रुवारी २०१८  रोजी उद्घाटन. शाळेत शिवजयंती उत्सवाचा आणि इयत्ता दहावीचा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. हीच वेळ उद्घाटनासाठी निवडली. आमच्या अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. प्रा. चंद्रकांत केळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मुख्यापिका श्रीमती नयना थोरात, पर्यवेक्षक श्री अर्जुन जगधने, अधिक्षक श्री जयसिंग राजगे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झाला. प्रकल्प-प्रमुख विद्यार्थिनी मेघा कदम हिने उपस्थितांना प्रकल्पाची माहिती दिली. पुढचे तीन दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं होतं. विद्यार्थ्यांनी स्वतःच नियोजन करून, तीन दिवस दोन अधिवेशनांत प्रदर्शनाची जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडली. दररोज उपस्थितांना प्रकल्पाची माहिती देणं, उपस्थितांना अभिप्राय लिहायची विनंती करणं, फोटो काढणं आणि नाचत-नाचत दररोज अहवाल तोंडी सांगणं, ही कामं विद्यार्थी आनंदाने पार पाडत होते. आपला प्रकल्प सारे पाहतात, याचा कोण आनंद त्यांना झाला होता!
बालवर्ग ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, हॉलतिकीट हातात घेऊन परीक्षेचं केंद्र पाहायला येणारे इतर शाळांमधले विद्यार्थी, अशा सार्‍यांनी प्रदर्शन पाहिलं. आणि या सार्‍याचा आनंद प्रकल्प बनवणार्‍या विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहताना मी पाहिला.
विद्यार्थी संधीच्या शोधात असतात... काहीतरी करून दाखवण्याच्या. त्यांना वर्गाबाहेर पडायचं असतं... चौकट मोडण्यासाठी. नाहीतर मग शाळा सुटल्याच्या आनंदात टाळ्या वाजवतात... व्यवस्थेकडे वाकुल्या दाखवत. असं होऊ नये म्हणून हे प्रयत्न.
शंकर बळी
संपर्क - ९८६९९११२०४
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात मराठीचे अध्यापक आहेत.)

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रयोगशील शिक्षण , मराठीशाळा , शंकर बळी , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    खूपच छान प्रकल्प आणि सादरीकरण - प्रेरणा मिळाली

  2. Dr Gajanan Jadhav

      3 वर्षांपूर्वी

    खुप छान सर.. आपल्या अभिनव कल्पनेतून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास करण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे... अभिनंदन आणि नवनिर्मितीसाठी शुभेच्छा.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen