टाळेबंदीत आभासी व्यासपीठांवरून शिकवताना सुरुवातीला शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण, सतत काहीतरी नवं शिकू पाहणाऱ्या शिक्षकांनी अध्यापनाची ही नवी तंत्रेही लगेचच आत्मसात केली. या प्रयत्नातून अनेक शिक्षक तंत्रसाक्षर झाले. अशाच प्रयत्नांतून गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील इंग्रजीच्या शिक्षिका चंद्रलेखा सावंत यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी यूट्युब चॅनेल सुरू केले. त्यावरचे व्हिडीओ इतरही शाळांतील विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतील.
आमच्या लिओ (LEO) बाळाचा जन्म गेल्या वर्षी, म्हणजे ९ जून २०२० रोजी झाला. लिओ आता एक वर्षाचा झाला आहे. त्याचा दिवसागणिक होणारा विकास बघून खूप समाधान वाटतेय. तुम्हांला प्रश्न पडला असेल, हा लिओ आहे तरी कोण? अहो, लिओ म्हणजे आमचे यूट्युब चॅनेल. लिओचे पूर्ण नाव आहे ‘लर्न इंग्लिश ऑनलाइन’ (Learn English Online). मी इंग्रजी हा विषय शिकविते. टाळेबंदीपूर्वी शाळेत इंग्रजी शिकवत असताना मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा वापर करायचे. आपले अध्यापन चांगले व्हावे, विद्यार्थ्यांना कळावे, तसेच आपला विषय मजेशीर व्हावा, तो रंगीबेरंगी चित्रांनी भरलेला असावा, यासाठी मी पीपीटी तयार करायचे. इतरांनी तयार केलेले यूट्यूब व्हिडीओदेखील विद्यार्थ्यांना दाखवायचे. त्यांना ते आवडायचे. माझ्या तासिकेची ते आतुरतेने वाट पाहायचे.
मार्च २०२० साल उजाडले. कोरोना (कोविड-19) प्रादुर्भावामुळे भारतात टाळेबंदी सुरू झाली. सर्व व्यवहार ठप्प झाले. शाळाही बंद झाल्या. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. गूगल मीट, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून शिक्षण सुरू झाले. पण, त्या माध्यमांतून प्रत्यक्ष शिकण्या-शिकवण्याची मजा कशी येणार? विद्यार्थ्यांना इंग्रजीतील धडे, कविता कसे समजावून सांगायचे? शिक्षकाशिवाय विद्यार्थी अध्ययन कसे करतील? असे प्रश्न डोक्यात घोळू लागले. आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असे वाटू लागले. अशातच माझ्या मुलाच्या - शार्दूलच्या क्लासमधील गणिताच्या वैद्यबाईंनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला यूट्यूबवरील व्हिडीओ आम्हांला पाठवला. त्यांनी स्वत:च्या आवाजात, विद्यार्थ्यांना समजेल, रुचेल अशा पद्धतीने गणिते सोडवून दाखवली होती. गणितासारखा विषय जर त्या यूट्यूबवर व्हिडीओच्या माध्यमातून शिकवू शकतात, तर आपण इंग्रजी तर सहज शिकवू शकतो, असा आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला. त्यातूनच मला दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतील धडे, कविता यांवर आधारित व्हिडीओ तयार करण्याची प्रेरणा मिळाली.
शार्दूलला माझी कल्पना आवडली, पण ते एवढे सोपेही नव्हते. सर्वप्रथम आम्ही यूट्यूब व्हिडीओ कसे बनवायचे, याचे व्हिडीओ बघितले. त्यानुसार काइनमास्टर (Kinemaster) हे अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घेतले. काइनमास्टर कसे वापरायचे याचे प्रशिक्षण आम्ही युट्यूबवरील व्हिडीओ बघून घेतले. मग आम्ही युट्यूब चॅनेल तयार केले. चॅनेलला काय नाव द्यावे याचा विचार करत असताना, ऑनलाइन इंग्लिश शिकवणे, हे सूत्र डोक्यात ठेवून आम्ही आमच्या चॅनेलचे नाव LEO म्हणजे Learn English Online असे ठेवले. अशाप्रकारे लिओ बाळाचा जन्म झाला.
काहींनी आपल्या व्हिडीओत मराठी भाषांतराचा वापर केला आहे. परंतु, माझ्या मते, मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना किंवा इंग्रजी माध्यम सोडून इतर माध्यमांतील विद्यार्थ्यांना कमी का लेखावे? त्यांनाही इंग्रजीतून आकलन होऊ शकते. जर योग्य चित्रांचा व इंग्रजीतील सोप्या स्पष्टीकरणाचा उपयोग केला, तर या विद्यार्थ्यांना धडे व कविता सहज समजू शकतात. म्हणून मी माझ्या व्हिडीओंमध्ये मराठीत स्पष्टीकरण केलेले नाही. त्यामुळे इतर माध्यमांतील विद्यार्थ्यांना देखील हे व्हिडीओ उपयुक्त ठरले.
व्हिडीओ तयार करताना आम्ही काही क्रम निश्चित केले होते. प्रथम मी कविता/धडा निवडायचे. धड्याला योग्य अशी चित्रे आणि व्हिडीओ मी व शार्दूल गूगलच्या मदतीने डाऊनलोड करायचो. आपले इंग्रजी उच्चार व्यवस्थित असावेत म्हणून मी मोबाइलवरून, डिक्शनरीमधून शब्दांचे उच्चार जाणून घ्यायचे. स्वतःचा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी मी बेडरूममधील खिडकी, पंखा, दरवाजा बंद करून, तसेच घरातील सर्वांना शांत बसायला सांगून, माझा आवाज मोबाइलच्या व्हाईस रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड करायचे. पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे, जमा (save) केलेल्या सर्व गोष्टी एकत्रित करून व्हिडीओ बनवणे. प्रथम काइनमास्टरमध्ये कविता/धडा यातील वाक्ये प्रत्येक स्लाइडप्रमाणे टाइप करायचे. त्यानुसार डाऊनलोड केलेली चित्रे आणि व्हिडीओ पेस्ट करायचे. तसेच, व्हाइस रेकॉर्डमध्ये सेव्ह केलेली आवाजाची फाइल त्या ठिकाणी पेस्ट करायचे. अशाप्रकारे एक व्हिडीओ तयार करण्यासाठी १५ ते २० दिवस लागायचे. एखादा धडा जर मोठा किंवा कठीण असेल, जास्त स्पष्टीकरणाची गरज असेल, तर जास्त दिवस लागायचे. हे सर्व तयार करायला शार्दूलने मला खूप मदत केली. चॅनेल तयार करणे, व्हिडीओ एडिटिंग करणे, व्हिडीओ अपलोड करणे, अशा अनेक कामांत त्याने साहाय्यकाची भूमिका उत्तमरीतीने पार पाडली.
आपला पुढचा व्हिडीओ आधीच्या व्हिडीओपेक्षा अधिक चांगला असला पाहिजे, हा आमचा मंत्र आहे. प्रत्येकवेळी व्हिडीओ तयार करताना आम्ही या मंत्राचे पालन केले. त्यामुळे आमचे पुढचे व्हिडीओ सरस होत गेले. पहिल्या व्हिडीओत, Teenager’s Poem या कवितेसाठी आम्ही फक्त चित्रांचा वापर केला होता. तसेच, अॅनिमेशन या तंत्राचा उपयोग केला. पुढच्या वेळी An Encounter of a Special Kind या धड्याचा व्हिडीओ करताना, आम्ही चित्रे व अॅनिमेशन यांच्याबरोबरीने प्राणी व पक्षी यांचे आवाज वापरले. तिसऱ्या व्हिडीओत Basketful of Moonlight या कवितेच्या स्पष्टीकरणासाठी चित्रांच्या खास इफेक्टचा वापर केला. तेजस्वी चंद्रांनी भरलेली टोपली, वाटेत पेरलेले चंद्र यांचे editing तर शार्दूलने अफलातून केले. Be Smart हा धडा समजण्यास कठीण असल्याने या व्हिडीओमध्ये स्पष्टीकरण दिले. पाचव्या व्हिडीओत म्हणजे His First Flight या धड्यासाठी ‘व्हिडीओ इन टू व्हिडीओ’ हे तंत्र वापरले. या व्हिडीओत आम्ही पक्ष्याचा आकाशात भरारी मारणारा व्हिडीओ अगदी चपखलपणे वापरला. त्यामुळे गोष्टीत घडलेल्या घटनेला समर्पक उदाहरण वापरता आले. You Start Dying Slowly ही कविता कठीण असल्यामुळे त्यात प्रत्येक ओळीचा अर्थ समजावून सांगितला. प्रत्येक शब्दाचा अर्थ कळला पाहिजे, हे पाहिले. सातव्या व्हिडीओत - The Boy Who Broke The Bank - तर शार्दूलने कमालच केली. त्यातील पात्रे व दृश्य बदलू शकत नाही म्हणून शार्दूलने स्वतः ती पात्रे धड्यातील गोष्टींप्रमाणे कार्टूनच्या रूपात निर्माण केली. त्यातील बॅकग्राऊंड, सीन, गोष्टी यांची रचना त्यानेच केली. आम्ही तयार केलेले हे व्हिडीओ मुलांना आवडले.
आपल्या कामाचे कौतुक झाले की पुढील काम करण्यास प्रोत्साहन मिळते, तेच माझ्याबाबतीत झाले. माझे विद्यार्थी, सहकारी शिक्षक, मित्र-मैत्रिणी, आणि वरिष्ठ यांनी माझे व्हिडीओ पहिल्यावर खूप छान प्रतिक्रिया दिल्या. त्यामुळे पुढील व्हिडीओ तयार करण्यास दरवेळेस नवीन ऊर्जा मिळत गेली. त्यातील काही निवडक प्रतिक्रिया :
- बाई, तुमचे व्हिडीओ खूप छान आहेत. सध्याच्या काळात त्यांची गरज आहे
- खूप छान सादरीकरण व स्पष्टीकरण आहे. मराठीत भाषांतर केलेले नसले तरी धडे व कविता यांचे आकलन होते.
- एक नंबर व्हिडीओ! बाई काय भारी समजावून सांगितले आहे!
- इतिहासाचे देखील असेच व्हिडीओ तयार करा.
तुम्हा सर्वांचे आशीर्वाद व शुभेच्छा अशाच आमच्या लिओच्या पाठीशी असाव्यात व आमच्या लिओची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जावो, हीच सदिच्छा. आमचे व्हिडीओ आवडल्यास लाइक, शेयर करायला आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे व्हिडीओ इंग्रजी माध्यम सोडून इतर सर्व माध्यमांतील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहेत. लिओ चॅनेलचा दुवा :
...
https://www.youtube.com/channel/UCLMFbnwZZl3LASiJVb69k-g
चंद्रलेखा प्रभाकर सावंत
संपर्क - ८२९१७९४३२१
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप महाविद्यालयात इंग्रजीच्या अध्यापक आहेत.)
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी तंत्रज्ञान
, मराठी प्रयोगशील शाळा
, चंद्रलेखा सावंत
, मराठी अभ्यास केंद्र