संवेदनशील वाचक घडण्यासाठी...


“पुस्तक विकत घेऊन वाचण्याची अंगभूत सवय लागण्यासाठी शासन निर्णयाची गरज नाही. शक्य होतील तेवढी पुस्तकं आवर्जून घरी आणली पाहिजेत; कारण घरात पुस्तकं दिसली तर ती उघडून बघण्याची, वाचण्याची प्रेरणा मुलांना मिळेल. जिज्ञासेपोटी मोकळ्या वेळेचा, सुट्टीचा त्यांचा काळ पुस्तकांच्या सानिध्यात जाईल. त्यासाठी घराची एक भिंत, एक कोपरा समृद्ध अशा ग्रंथांनी व्यापलेला असावा. जेथे काही आनंदाचे क्षण आपल्याला नक्कीच अनुभवता येतील. आपल्याच घरातील या ग्रंथालयात ‘अक्षरांची ही सुमने’ सर्वांनाच जगण्याचा सुगंध देत राहतील.” आपल्या जीवनातील पुस्तकांचं विविधांगी महत्त्व सांगतायत खोपोलीच्या के. एम. सी. महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक डॉ. भाऊसाहेब नन्नवरे -
भारताचे माजी राष्ट्रपती व ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या निर्देशानुसार शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा जागृत व्हावी, त्यांच्यात वाचनाची आवड वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो. शाळा-महाविद्यालये यांच्याबरोबरच सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शासकीय संस्था, मंडळे, सार्वजनिक संस्था या कार्यालयांनी देखील या दिनाला विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबतच्या सूचना शासनातर्फे दिल्या जातात. या निमित्ताने सध्याचा वाचनव्यवहार, काय वाचावं, वाचनाचं महत्त्व आणि वाचन चळवळ रुजविण्यासाठी सर्वांनी मिळून स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रयत्न याबाबतची गरज व्यक्त होते.
वाचनातून होणारे संस्कार व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचे ठरतात. शालेय जीवनापासून ही वाचन प्रेरणा विद्यार्थी-विद्यार्थीनींना मिळाली, तर भविष्यात सशक्त व सक्षम अशी नवी पिढी घडण्यास नक्कीच मदत होईल. प्रत्येकाला वाचनाचे महत्त्व मान्य असते, पण कृती करताना अनेक कारणे पुढे येतात. नेमकी सुरुवात कशी करावी, काय वाचावं? असे अनेक प्रश्न असतात. ‘वाचायचं तर आहे, पण जमत नाही, वेळ मिळत नाही’, असं म्हणणारे आपण टी.व्ही. आणि आता मोबाइल यात मात्र तासन्-तास वेळ वाया घालवतो. आजच्या धावपळीच्या युगात थोड्या प्रयत्नांनी, वेळेचं नियोजन करून आपण पुस्तकांशी असलेलं नातं अधिक घट्ट करू शकतो. काय आणि कसं वाचावं? या प्रश्नाचं साधं-सोपं उत्तर आपल्या आवडीनुसार सहज उपलब्ध होईल ते वाचावं, असं देता येईल. वाचनाला सुरुवात होणं महत्त्वाचं! वाचनाची आवड हवी, हळूहळू ती जोपासता येईल आणि आवडीने चांगलं वाचलंही जाईल. मन, बुद्धी, भावना व विचार यांचं भरणपोषण होईल, असं प्रयत्नपूर्वक वाचता येईल. वाचनानं माणसाचं जीवन समृद्ध होतं. नव्या जगाची ओळख, आव्हानं स्वीकारण्याची प्रेरणा, असं बरंच काही पुस्तकं आपल्याला देत असतात. त्यासाठी वाचनाची आवड मात्र हवी. कारण, आवड लागलीच नाही, जाणीवपूर्वक लावली गेली नाही, तर सारं काही उपलब्ध असूनही आपण पुस्तकांपासून दूरच राहू. म्हणून वाचन हे दैनंदिन जीवनाचा भाग होणं आवश्यक आहे.
आणखी एक म्हणजे, काय-काय वाचायचं आहे, याची एक यादी मनात किवा लिखित स्वरूपात करता येईल. हातातलं पुस्तक संपण्याआधी दुसरं पुस्तक तयार असलं पाहिजे. असं जर केलं नाही तर तुमची वाचनाची सवय मोडू शकते. पुस्तकांची निवड ही जशी उत्सुकतेतून होईल, तशीच ती इतरांशी केलेल्या चर्चेतूनही करता येईल. सध्या वर्तमानपत्रातील रविवार पुरवण्यांतून येणारी ग्रंथपरीक्षणे, ई-बुकच्या स्वरूपात मोबाइल आणि इंटरनेटद्वारे सहज उपलब्ध होणारी पुस्तके आपल्याला वाचनासाठी निवडता येतील. वाचण्यासाठी घेतलेले पुस्तक वेळेतच पूर्ण करणे म्हणजे त्या पुस्तकाला योग्य न्याय देण्यासारखे आहे. नाहीतर कितीतरी दिवस, महिने पुस्तक घरात पडून असतं, पण ते वाचून पूर्ण होत नाही. त्यासाठी पुस्तक वाचून पूर्ण करण्याची ‘डेडलाइन’ ठरवावी लागेल.  मी या वर्षी किती पुस्तके वाचली, आणखी किती वाचायची आहेत, याचा आढावा अधूनमधून घ्यायला हवा.
आपल्याकडे आजही ग्रंथव्यवहाराला नगण्य स्थान दिलं जातं. पुस्तकं विकत घेऊन वाचण्याचा व्यवहार, छंद आजही आपल्या अंगवळणी पडलेला दिसत नाही. त्यासाठी केवळ एका दिवसापूरता हा उपक्रम मर्यादित न राहता सातत्याने सर्वांनीच हा ‘वाचनाचा मूल्यसंस्कार’ अव्याहतपणे स्वीकारायला हवा. आजच्या काळात नवी पिढी ग्रंथांपासून, वाचनापासून काहीशी दूर जाताना दिसते आहे. दूरचित्रवाणी व समूह माध्यमांच्या प्रभावातून शाळा-कॉलेजमधले विद्यार्थी व मोठी माणसंही वाचनापासून फटकून राहताहेत, हे वास्तव सर्वत्र दिसते. अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन काही वाचायचं नसतं (ते तरी कुठे व्यवस्थित समजून वाचलं जातं), असं मानणारी नवी संस्कृती उदयाला येऊ लागली आहे. त्यातूनच केवळ कागदोपत्री उच्चशिक्षित झालेली पिढी घडू नये, यासाठी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व आहेच. त्यासाठी कारणं न सांगता, पळवाट न शोधता अखंडपणे ही ‘वाचन चळवळ’ व्यापक स्तरावर वृद्धिंगत व्हायला हवी.
कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, संतसाहित्य, तत्त्वज्ञानपर, विज्ञान, कला यांतील आपल्या आवडीचे वाचत गेलो, तर मनोविश्रांती तर मिळतेच; शिवाय, सकारात्मक दृष्टी विकसित होऊन जीवनाचा योग्य मार्ग सापडत जातो. म्हणून केवळ वाचायचं म्हणून न वाचता त्या वाचनात चिकित्सकपणा हवा. चिकित्सक वाचन हा चिकित्सक विचाराकडे घेऊन जाणारा प्रवास आहे. वाचन ही जशी एक कला आहे, आवडीने जोपासण्याचा छंद आहे, तसेच वाचनाचे शास्त्र आहे. प्रशिक्षणातून वाचनशास्त्र अभ्यासणे व नव्या पिढीत ते रुजविणे गरजेचे आहे. ग्रंथ हेच गुरू आणि ते आपल्या जवळचे मित्र आहेत. जीवनाबद्दलची एक सजग दृष्टी देणारा तो वाटाड्या आहे. जिवलग सखा आहे, याची जाणीव जवळीकतेने ग्रंथ वाचणाऱ्याला नक्कीच होते.
वाचनाचा मूल्यसंस्कार करण्यात महत्त्वाची भूमिका आहे ती पालक व शिक्षकांची! हल्ली मुलं वाचतच नाहीत, अशी केवळ तक्रार न करता त्यांना वाचनासाठी वातावरण निर्माण करून देण्याचं आव्हान  आपल्यासमोर आहे. ‘आधी केले मग सांगितले’ याप्रमाणे शिक्षक व पालकांनी आपल्या चौफेर वाचनातून हा आदर्श नव्या पिढीसमोर ठेवायला हवा. त्यासाठी शाळा-महाविद्यालयातील कपाटात बंदिस्त असलेली ग्रंथांची दालने मुलांना खुली करून द्यायला हवीत. बालवयातच झालेले वाचनाचे संस्कार त्यांना आयुष्यभर प्रेरणा देत राहतील. शाळेची फी भरली, वह्या-पुस्तके घेऊन दिली, म्हणजे आपली जबाबदारी पूर्ण होत नाही. मोबाइल, टीव्हीच्या आहारी मुलं जाणार नाहीत यासाठी अभ्यासक्रमाच्या बाहेरची पूरक वाचण्यासाठीची पुस्तके खरेदी केली पाहिजेत. इतर सर्व गोष्टींवर प्रचंड खर्च करणारी आम्ही मंडळी पुस्तकं विकत घेऊन वाचायला मात्र आजही तयार होत नाही. खरंतर पूर्वीच्या तुलनेत आज मोठ्या प्रमाणात सर्व प्रकारची पुस्तकं सहज उपलब्ध होतात. ई-बुकच्या स्वरूपात ती सहज मिळतात, ऑनलाइन खरेदी करता येतात. गरज आहे ती त्याबद्दलच्या सजग जाणिवेची व सकारात्मक दृष्टिकोनाची. वाचनाचा योग्य आणि परिपूर्ण असा संस्कार घराघरातूनच होऊ शकतो. आधुनिकीकरणाच्या प्रभावातून सर्व प्रकारच्या उंची वस्तू आपल्या घरात सहज दिसतात. परंतु, फारसं खर्चिक नसूनही पुस्तकांचं कपाट मात्र आपल्या घरात नसतं. त्यासाठी वैयक्तिक व सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.
वाचनाच्या तऱ्हा व आवडीनिवडी व्यक्तीनुसार भिन्न-भिन्न असू शकतात. म्हणून स्वत:चा विचारविवेक  जागृत करण्यासाठी वाचनाचा अनुभव आपल्याला नेहमीच समृद्ध करतो. त्यातून मन व बुद्धी यांचा विकास जसा घडतो, तशीच भाषिक, वैचारिक, भावनिक क्षमताही वाढीस लागते. आयुष्यात येणाऱ्या सर्वच अनुभवांना समर्थपणे सामोरं जाणं आणि प्रत्येक क्षण अर्थपूर्ण जगणं म्हणजे काय ते वाचनातूनच कळतं. ‘असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर’ या विंदांच्या दृष्टिकोनाप्रमाणे जीवनावरील आसक्ती, सकारात्मक दृष्टी महान ग्रंथांच्या, पुस्तकांच्या वाचनातूनच विकसित होत जाते. वाचनाचा हा ‘अमृतानुभव’ आपल्याला निखळ आनंद देतोच. त्याचबरोबर रसिकाच्या मनाची श्रीमंती वाढवितो. दु:ख पचवून आशावादी कसं जगावं, ते योग्य पद्धतीने शिकवितो. विचारांचे सामर्थ्य आपल्याला ग्रंथच देऊ शकतात. मराठी सारस्वताचं समृद्ध दालन आपल्याला सतत खुणावत राहतं. संत साहित्यापासून ते आधुनिक साहित्यातील विविध प्रवाह व प्रकारातील वाङ्‍मयाने संपन्न असलेला हा ‘अमृतानुभव’ आपण घ्यायला हवा. मातृभाषेबरोबरच अन्य भाषेतील सकस व वैश्विक विचारधन वाचनातून आपल्यापर्यंत येत असतं. ते सारं काही जाणून घेण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती मात्र हवी असते.
गाव तेथे ग्रंथालय, ग्रंथ चळवळ घरोघरी, फिरती वाचनालये, ग्रंथ महोत्सव, वाचू आंनदे, इथपासून ते पुस्तकांचं गाव - भिलार असे अनेक उपक्रम ग्रंथ चळवळ रुजविण्यासाठी शासनस्तरावर राबविले जात आहेत. तरीही वाचनाची ही चळवळ फक्त कागदोपत्रीच विकसित होते की काय, अशी शंका वाटत राहते. भिलार हे गाव महाराष्ट्रातील पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्धीस आले आहे. ह्या गावात महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने ‘पुस्तकांचं गाव’ हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. आज या पुस्तकाच्या गावामध्ये २५ घरांमध्ये वेगवेगळ्या साहित्य प्रकाराची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. वाचन चळवळ वाढावी, येणाऱ्या पर्यटकांना मराठी भाषेची समृद्धी कळावी म्हणून मराठी भाषेतील नवे-जुने लेखन, संतसाहित्य, कथा कादंबरी, कविता, ललित, चरित्रे-आत्मचरित्रे, स्त्रीसाहित्य, क्रीडा व बालसाहित्य आणि इतिहास या विषयांची प्रत्येक घरात काही दालनं उभी केली आहेत. वाचन चळवळीला गती देऊन ती सामाजिक दृष्टीने विकसित करायची असतील, तर एक ‘भिलार’ गाव पुरेसे नाही. महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अशा प्रकारची गावे व त्यातून वाचन संस्कृतीची चळवळ वाढवत न्यावी लागेल. तिथे केवळ शासकीय मदतीची, नेतृत्वाची वाट न पाहता, त्यासाठी वाचन-कार्यकर्ते गावागावातूनच तयार होणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचे ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त उल्लेखनीय असे पुस्तकांविषयीचे पुस्तक (बुक ऑन बुक्स) या प्रकारातील आहे. त्यांचा ग्रंथसंग्रह व पुस्तकांविषयीचा प्रेमभाव सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अनेक प्रतिभावंत लेखकांच्या पुस्तकांची ओळख करून देतानाच, रसिक वाचक म्हणून आपण कसे घडलो ते या रोजनिशीतून त्यांनी सहजपणे मांडले आहे. आजची शासकीय व  सार्वजनिक ग्रंथालये, शाळा महाविद्यालयांची ग्रंथालये अजूनही अत्याधुनिक झालेली दिसत नाहीत. त्यांना शासनाकडून वेळेवर न मिळणारे अनुदान, रोडावलेली सभासद संख्या, कर्मचारी वर्गाची उदासीनता, त्यांचे अनेक वर्षातील प्रलंबित प्रश्न, अशा अडचणीत हा ग्रंथव्यवहार अडकलेला आहे.  रिकामी वाचनालये व उदास वाचकवर्ग असे चित्र सर्वत्र दिसते आहे. ग्रंथ चळवळ हा एक सामाजिक जबाबदारीचा भाग आहे, पण त्याला आता उतरती कळा लागली आहे, असे खेदाने म्हणावे लागते. याबाबत ग्रंथालयांचे आर्थिक सबलीकरण करणे, ग्रंथालयशास्त्रातील नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करणे, वाचनासाठी पोषक वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे ठरेल. शासनस्तरावर काही प्रयत्न होतच आहेत, त्याला लोकसहभागाचे, तुमचे-माझे, सर्वांचे सहकार्य मिळत नाही, तोपर्यंत ‘वाचन प्रेरणा दिन’ हा केवळ एका दिवसापुरताचा उत्सव ठरेल.
ग्रंथचळवळ जतन व वृद्धिंगत करण्यात अशी अनेक आव्हाने व अडचणी असल्या तरी वैयक्तिक पातळीवर वाचनाची ही संस्कृती जतन करण्यासाठी आपण कटिबद्ध होऊ या. प्रत्येक वाचकाचा ग्रंथाशी घडणारा हा भावसंवाद त्याला समृद्ध करणारा ठरेल. वाचन ही गरजेचीच नाही, तर अपरिहार्य अशी गोष्ट आहे. वृत्तपत्र-नियतकालिकांच्या वाचनातून वर्तमान जाणून घेत ‘अपडेट’ राहू या. विनोदी साहित्यातून मनाचं रंजन करून घेऊ. चरित्र-आत्मचरित्रातून प्रेरणा-प्रोत्साहन घेऊ. विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाचनातून ज्ञान मिळवू. काव्यात्म वाचनातून सौंदर्यदृष्टी शोधू. शोकनाट्यातून दु:ख पचविण्याची क्षमता आत्मसात करू. आधुनिक व समकालीन साहित्यातून आजचं जग अनुभवत नव्या दिशेचा शोध घेऊ. एकूणच मनातला अंधार दूर करून अंतरीचा दीप लावण्यासाठी ‘टेकवा टेकवा ग्रंथाशीच माथा’ असा भाव मनी बाळगून ही वाचन प्रेरणा समाजातील सर्व घटकांना  समृद्ध करेल. त्यासाठी मात्र व्यक्ती, समूह व चळवळी या माध्यमातून आलेले व्यापक स्वरूपच ग्रंथ चळवळीला नवी दिशा देऊ शकते.
डॉ.भाऊसाहेब नन्नवरे
संपर्क – ९८२२५९०५९८, [email protected]
(लेखक खोपोलीच्या के. एम. सी. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.) 

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


वाचक वर्ग , संवेदनशील वाचक , पुस्तकवेड , डॉ.भाऊसाहेब नन्नवरे , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen