गेले वर्ष-दीड वर्ष ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. सुरुवातीला या पद्धतीने शिकवण्याबाबत साशंक असलेल्या शिक्षकांनी नवं तंत्रज्ञान शिकून घेतलं. मुलं आणि पालकही या नव्या पद्धतीला सरावली. नवं तंत्रज्ञान शिकण्याचे अनुभव, मुलांचं ऑनलाइन वर्गातलं शिकणं, त्यातल्या गमती सांगतायत गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेतील शिक्षिका प्राची पानसरे -
...
सांग ना गं आई हा कोरोना कधी जाणार?
माझी खरी शाळा पुन्हा कधी सुरू होणार?
आता सर्व मुलांना हाच प्रश्न पडला आहे. मुले ऑनलाइन ताईंना भेटतात तेव्हा विचारतात, ‘ताई आपली शाळा कधी सुरू होणार?’ सर्व जण आता फक्त शाळा सुरू होण्याचीच वाट पाहत आहेत.
मार्च २०१९ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या, तेव्हापासून आपल्याला ऑनलाइन शिक्षण हा पर्याय स्वीकारावा लागला. सुरुवातीला थोडीशी धाकधूक होती की, हे कसे होईल? आपल्याला जमेल का हे सगळे? ऑनलाइन शिक्षण म्हणजे नक्की कशी आणि कुठून सुरुवात करायची? जो मोबाइल वापरू नका, असे आम्ही मुलांना सांगत होतो, तोच मोबाइल आता मुलांना वापरावा लागणार होता. खूप सारे प्रश्न, शंका मनात येऊन गेल्या. पण, हळुहळू उत्तरे सापडत गेली. मुलांनी कमीतकमी मोबाइल वापरावा म्हणून काय-काय करता येईल, यासाठी ऑनलाइन शाळा सुरू होण्यापूर्वी आमच्या दि शिक्षण मंडळ, गोरेगाव या संस्थेने आमच्यासोबत वेळोवेळी सभा घेतल्या. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मंडळाचे अभ्यासक्रमविषयक धोरण ठरवले आणि आम्हांला मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे आम्ही पुढील अभ्यासक्रमाचे नियोजन केले. पहिली-दुसरीचे ऑनलाइन वर्ग न घेता, मुलांना व्हॉट्सॲपवर गृहपाठासाठी विविध कृती द्याव्यात असे ठरवले. अभ्यासाचा ताण न येता मुले घरच्या घरी हसत-खेळत शिकावीत यासाठी वैविध्यपूर्ण कृती निवडल्या. त्यासाठी आम्ही ‘घरच्या घरी’ या वेबसाइटवरील कृती मुलांना दिल्या. (पुण्याच्या शिक्षणतज्ज्ञ वर्षाताई सहस्रबुद्धे यांनी https://www.gharchyagharee.com/ ही वेबसाइट तयार केली आहे. यात आमच्या शाळेतील ताईंच्याही काही कृती आहेत.) या कृतींमुळे फार वेळ मोबाइल न वापरता मुले शिकू लागली. तसेच, तिसरी-चौथीचे ऑनलाइन वर्ग व त्याची वेळ किती असावी, हेही आम्ही ठरवले. मुलांचा स्क्रीन टाइम कमीतकमी असावा अशाप्रकारे नियोजन केले.
आमच्या डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत आम्ही सर्व ताईंनी वेगवेगळे प्रयोग करून पाहिले. एकमेकांचे पाठ बघणे, एकमेकांना काही गोष्टी सुचवणे, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन तयार करणे, व्हिडीओ तयार करणे, गूगल फॉर्म तयार करणे, या गोष्टी आम्ही या माध्यमाची गरज लक्षात घेऊन शिकून घेतल्या. त्यानंतर आपण ऑनलाइन वर्ग घेऊ शकतो, असा आत्मविश्वास आमच्यात निर्माण झाला.
जून महिना उजाडला. मुलांची शाळा सुरू झाली, ती ऑनलाइन. सुरुवातीला ऑनलाइन शिक्षण हे सर्वांसाठीच नवीन होते. त्यामुळे विद्यार्थी, पालक, ताई सर्वांमध्ये भीती, दडपण आणि उत्साह अशा संमिश्र भावना होत्या. पालक तर आता शिक्षक झाले होते. पालकांना पालक व शिक्षक अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. मुलांना शिकवण्याची बरीचशी जबाबदारी आता पालकांवर होती. सुरुवातीला पालक अगदी मुलांच्या बाजूला बसून ऑनलाइन वर्गात काय चालते ते बघत होते. मुलांना सर्व मदत करत होते. काही मदत ही मुलांसाठी आवश्यक होती, तर काही अनावश्यकही होती. एकदा ‘बाबाच्या मिश्या’ ही गोष्ट मुलांना वाचून दाखवली आणि बाबांच्या/काकांच्या/आजोबांच्या मिश्या या विषयावर मुलांना लिहायला सांगितले. मुलांचे लेखन वाचताना असे लक्षात आले की, काही मुलांना पालकांनी सांगितले व मुलांनी लिहिले. त्यामुळे मुलांच्या लेखनात एक गोडवा आणि मजा असते, ती कुठेतरी हरवल्यासारखी वाटत होती. या ठिकाणी मुलांनी निरीक्षण करून लिहिणे अपेक्षित होते, पण ती प्रक्रिया घडलीच नाही. तीच गोष्ट गणिताची. मुलांना शाब्दिक उदाहरण सोडवायला दिले असता, ते वाचून, विचार करून सोडवणे अपेक्षित असते. पण, उदाहरण दिल्यानंतर काही पालकांनी लगेचच मुलांना उत्तर सांगितले. त्यामुळे मुलांना विचार करायला अवधीच मिळाला नाही. मुलांना अध्ययनात नेमकी कुठे, किती आणि कशी मदत करावी याबद्दल आम्ही पालकसभा घेऊन पालकांना माहिती दिली. तेव्हा पालकांना हळूहळू आपली भूमिका स्पष्ट होत गेली. काही पालक खूप जबाबदारीने सर्व समजून घेत होते. पालक आणि मुले यांना मिळून करता येतील अशा कृती आम्ही गृहपाठात दिल्या. तसेच, घरातील उपलब्ध साहित्य वापरून करता येतील, अशा काही कृती दिल्या. यामुळे मुलांसोबत नक्की काय आणि कसे करायचे, हे पालकांना समजत गेले.
पहिलीचा पहिलाच ऑनलाइन वर्ग, आसावरी ताईंनी मुलांना ‘एकशे सदतिसावा पाय’ ही गोष्ट वाचून दाखवली. पुस्तकाची पीपीटी बनवली होती. मुलांना गोष्ट आणि गोष्टीतील चित्रे फारच आवडली. मुले एकदम खूश झाली. “ताई मला गोष्ट खूप आवडली.” - असा सर्व मुलांचा एकाच वेळी गोंधळ सुरू झाला. बरं सर्वांचे माईक सुरूच होते, आता कुठे जरा आपण वर्गात आहोत असे वाटायला लागले.
एकदा तर गंमतच झाली! ताई वर्गात शिकवत होत्या. वर्गाची वेळ संपली. ताईंनी एका मुलाला सांगितले, “तू वर्गातून बाहेर जा.” मग काय तो तिथून उठून दुसरीकडे निघून गेला. मोबाइलचा कॅमेरा सुरू, ताईनी ऑनलाइन वर्ग बंद केला नव्हता. ताई इकडून मोठ्याने सांगत होत्या “अरे मयूर, मीटिंग बंद कर’. पण, मयूर तर हे ऐकायला तिथे हजरच नव्हता, तो केव्हाच जागेवरून उठून गेला होता. वर्गातून जाणे म्हणजे मीटिंगमधून लेफ्ट होणे, हे अजून त्याला कळले नव्हते.
ऑनलाइनमुळे मुले एकमेकांना भेटत होती, पण ती स्वत:च्या घरातूनच. खेळायला, मजा करायला, एकत्र डबा खायला, मस्ती करायला त्यांचे मित्र सोबत नव्हते. या गोष्टीचे आम्हांलाही खूपच वाईट वाटत होते. एक मुलगा तर फक्त आपल्या लाडक्या मित्राला बघायला वर्गात यायचा. त्याचा मित्र वर्गात दिसला की त्याला खूप आनंद व्हायचा. त्यानंतर मग तो वर्गातील सर्व कृती व्यवस्थित करायचा. ज्या दिवशी मित्र नसेल, त्या दिवशी तो जरासा नाराजच असायचा. मुलांची शाळा घरात आणि मुलांचे घर शाळेत सहभागी झाले होते. प्राथमिक शाळेत सर्व संकल्पना मुलांना साहित्य वापरूनच शिकवल्या जातात. त्यामुळे मुलांच्या घरात असलेल्या साहित्याचा विचार करून पाठ घ्यावे लागले. घरातील खूप वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य मुले वर्गात वापरत होती. गणिताच्या पाठाला मोजणीचे साहित्य म्हणून मुलांनी घरातील चमचे, वाट्या, हिरवे वाटाणे, इअर बड्स, कांदे असे साहित्य वापरले. मुलांना नेहमी खूप काही बोलायचे आणि दाखवायचे असते. ऑनलाइन वर्गातही मुले खूप बोलत होती, आपले अनुभव सांगत होती. मुलांचे बोलणे व अनुभव ऐकून ताईंनाही छान वाटत होते. शाळेत वर्गामध्ये आपल्या ताई नसतील, तर प्राथमिकची मुले अस्वस्थ होतात. ऑनलाइन वर्गातही हा अनुभव आम्हांला आला. थोडावेळ जरी ताईंनी व्हिडिओ बंद ठेवला तरी मुलांची चलबिचल सुरू होते, ते आपापसात बोलतात, “ताई कुठे गेल्या? ताई दिसत का नाहीत?” “अरे, वर्ग सुरू झालाय तो ताईंनीच सुरू केला असेल ना? ताईंच नेटवर्क गेलं असेल!” शेवटी ताई दिसल्या की त्यांना हायसे वाटते.
नवीन संकल्पना मुलांना कशा समजतील यासाठी सर्व ताई नेहमी प्रयत्नशील असतातच. ऑनलाइन वर्गातही सर्व ताईंनी काही गोष्टी नव्याने करून पाहिल्या. वर्गात एका जागी पूर्णवेळ मुलांना गुंतवून ठेवणे हे एक आव्हानच होते. हे लक्षात घेऊन आम्ही पहिली-दुसरीच्या वर्गांसाठी रंगीत, आकर्षक व हलणाऱ्या पीपीटी बनवल्या. वर्गात काही शारीरिक हालचाली, छोटे खेळ घेतले. काही कृती साहित्य वापरून करायला दिल्या. काही साहित्य मुलांनीच तयार केले. मुलांना विविध गोष्टी वाचून दाखवल्या, गाणी ऐकवली. आमच्या शाळेतील मुलांनी ऑनलाइन वर्गातही चांगल्या प्रकारे शिकावे असे आम्हांला वाटते. त्यासाठी कृतींमध्ये वैविध्य आणण्याचा आमचा प्रयत्न असतो
तसेच ऑनलाइन वर्गात सर्व मुले उपस्थित राहावीत यासाठीसुद्धा सर्व ताई अगदी सुरुवातीपासूनच पालकांच्या संपर्कात होत्या. वेळोवेळी पालकसभा घेणे, मुलांना शाळेतून सरावपत्रिका व कलेचे साहित्य; जसे की - रंगीत कागद, माती देणे, मुलांबद्दल काही अडचणी असतील तर पालकांसोबत चर्चा करून किंवा वेळप्रसंगी मुलांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटून त्या सोडवणे - यामुळे ताई व मुले प्रत्यक्ष भेटत नसली, तरीही मुले व पालकही ताईंसोबत जोडलेले आहेत.
पूर्ण एक वर्ष मुलांची शाळा ऑनलाइन होती, त्यामुळे ऑनलाइन वर्ग व मोबाइल या माध्यमाला मुले आता चांगलीच सरावली आहेत. आता तर मुलांना काही साहित्य दाखवायचे असेल, तर ताई तुमचा कॅमेरा असा धरा, ताई तुम्ही व्हिडीओ स्पॉटलाइट करा, ताई तुम्ही सेटिंग अशी बदला - त्यामुळे असे होईल, अशा गोष्टी मुलेच ताईंना सुचवतात. मुलेही शिकतात आणि ताईही…
मुले आता ऑनलाइन वर्गातील कृती स्वतंत्रपणे करतात. आता खूप कमी वेळा पालकांची मदत घ्यावी लागते. ऑनलाइनच्या निमित्ताने मुले नवीन तंत्रज्ञान शिकली आहेत, या सर्वांचा उपयोग ते भविष्यात नक्कीच करतील. लॉकडाऊनच्या काळात संपर्काचे माध्यम म्हणून ऑनलाइन शिक्षणाची मुलांच्या शिक्षणात फारच मदत झाली. पण, जसे या पद्धतीचे फायदे तसे तोटेही आहेतच.
आता मुलांचा स्क्रीनटाइम खूप वाढला आहे. मुले सतत मोबाइल घेऊन बसलेली असतात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होतच आहे. ऑनलाइन वर्गात नेटवर्कची अडचण, मोबाइल उपलब्ध नसणे, या सर्व गोष्टींमुळे मुलांच्या शिक्षणावर निश्चितच परिणाम होत आहे. तसेच, ऑनलाइन वर्गाची वेळ आणि प्रत्यक्ष शाळेची वेळ यामध्ये खूपच तफावत आहे. शाळेत मुले पाच तास ताईंसोबत असतात. ऑनलाइन वर्ग दोन तासांपेक्षा जास्त घेऊ शकत नाही. शाळेत शिकवण्याची पद्धत आणि ऑनलाइन वर्गात शिकवण्याची पद्धत यातही फरक आहेच. प्रत्यक्ष शाळेत लेखन, वाचन तसेच मूर्त पद्धतीने संकल्पना शिकवून त्याचा विविध पद्धतीने सराव घेतला जातो. त्यामुळे ती संकल्पना मुलांच्या अगदी पक्की लक्षात राहते. परंतु ऑनलाइन वर्गात वेळेअभावी तेवढा सराव घेता येत नाही किंवा पालकांनाही सरावाच्या वेगवेगळ्या पद्धतींची पुरेशी माहिती नसते. तसेच, पालकांची विषयाची समज, कामाच्या वेळा, घरातील शैक्षणिक वातावरण, या सर्व ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा आहेत. त्या लक्षात घेता, ऑनलाइन शिक्षण हे लहान मुलांसाठी फार उपयुक्त ठरत नाही.
सलग दीड वर्ष मुले घरी आहेत, शाळेत गेलेली नाहीत, मोकळेपणाने खेळलेली नाहीत, त्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर निश्चितच परिणाम झालेला आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू होईल, तेव्हा मुलांचे मानसिक व शारीरिक आरोग्य यांचा विचार करून शिक्षकांनी पुढील नियोजन करणे आवश्यक आहे. पण सध्यातरी मुले घरीच आहेत. खेळणे ही त्यांची गरज आहे, पण आपण त्यांना मोकळेपणाने खेळायला देऊ शकत नाही. तेव्हा घरच्या घरी मुलांना मोकळे करण्यासाठी, घरात खेळण्यासाठी काय करता येईल, याचा विचार पालकांनी करायला हवा. मुलांनी मोबाइल किती वेळ हाताळायचा, टी.व्ही किती वेळ बघायचा, याचे नियम घालून द्यायला हवेत. सध्या काही पालकांचे कार्यालयीन कामकाज घरूनच सुरू आहे. तरीही मुलांसाठी पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. मुलांसोबत त्यांच्या आवडीचे खेळ खेळणे, विविध विषयांवर गप्पा करणे, एकत्र जेवणे, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, योग्य ती काळजी घेऊन जवळच्या ठिकाणी फिरायला जाणे, या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे मुले आनंदी राहतील आणि त्यांचे शिकणे आनंददायी होईल.
प्राची सचिन पानसरे
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत सहशिक्षिका आहेत.)
संपर्क क्र. - ९६१९७२३८५४
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
ऑनलाइन शाळा
, मराठी शाळा
, प्रयोगशील शिक्षण
, प्राची पानसरे
, मराठी अभ्यास केंद्र
Machhindra Borhade
4 वर्षांपूर्वीअप्रतिम मांडणी. खूप छान लेख आहे. तुम्ही घेतलेले उपक्रम वेगळे आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही सर्वजण मिळून काम करता. या पुढे हे फार महत्वाचे असेल. अनेक जण असतील तर भरपूर कल्पना सूचतात आणि त्यात नाविन्य राहते. अभिनंदन.