मातृभाषा आणि सर्जनशीलता


“इंग्रजीतून अस्खलित बोलता येणे, ही आजकाल ज्ञानाची परमावधी मानली जाते. परंतु, आपण इंग्रजी भाषेतून निर्माण काय करतो? जगाच्या ज्ञानात कोणती नवी भर टाकतो?  याचा विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की, जे लोक आपल्या शिक्षणात प्रथम भाषा, द्वितीय भाषा यांची गल्लत करीत नाहीत आणि दोन्ही भाषांवर यथोचित प्रभुत्व मिळवतात, तेच आपल्यातील सर्वोत्कृष्ट जगाला देऊ शकतात.”  मातृभाषेतूनच व्यक्तीची सृजनात्मक वाढ होते. त्याच्या कल्पनांना नवे आयाम मिळतात, सृजनशीलता वाढीस लागते, याबाबत सांगतायत   भाषा-अभ्यासक डॉ. प्रकाश परब -
मातृभाषेला मूल्य समजून तिच्याशी एकनिष्ठ राहाण्याचा, तिचे संवर्धन करण्याचा काळ आता मागे पडला असला, तरी ‘मातृभाषेतून शिक्षण’ हे एक तत्त्व म्हणून कालबाह्य झालेले नाही. समाज आणि व्यक्तिविकासातील तिचे महत्त्व आजही अबाधित आहे; कारण तिचे सर्जनशीलतेशी, कल्पनाशक्तीशी असलेले अतुट नाते!
कोणतेही मूल आपल्या मातृभाषेतून अथवा परिसरभाषेतून सभोवतालाचे चांगले आकलन करून घेऊ शकते. विचार आणि कल्पना सहज करू शकते. आकलन आणि अभिव्यक्ती प्रभावी होण्यासाठी मातृभाषेएवढे प्रभावी माध्यम नाही. द्वितीय भाषा आपण कितीही अवगत केली, तरी ती आकलन आणि अभिव्यक्ती यांबाबतीत प्रथम भाषेची बरोबरी करू शकणार नाही. नवनिर्मितीच्या, सर्जनशीलतेच्या बाबतीत तर हे अंतर अधिक लक्षणीय असते. डावखुरी व्यक्ती जे काम डाव्या हाताने सहजपणे व प्रभावीपणे करू शकते, ते काम उजव्या हाताने करू शकणार नाही. केवळ इतर लोक उजव्या हाताने आपली कामे करतात म्हणून तिने आपल्या सहजधर्माविरुद्ध जाऊन उजव्या हाताचाच वापर करण्यात वेळ व शक्ती का वाया घालवावी? दोन्ही हातांकडून त्यांच्या शक्तीप्रमाणे कामे करू घेणे हेच शहाणपणाचे नाही का? प्रथम आणि द्वितीय भाषांनाही हे लागू आहे. दोन्ही भाषांना व्यवहारात महत्त्व आणि भूमिका आहे; मात्र त्यांच्या भूमिकांची अदलाबदल करता कामा नये.
माहितीच्या पातळीवरील भाषाव्यवहार द्वितीय भाषेतून सहज करता येईल. इंग्रजीच्याबाबतीत आपला भाषाव्यवहार हा बव्हंशी याच प्रकारचा असतो, त्यालाच आपण ज्ञान समजतो. इंग्रजीतून अस्खलित बोलता येणे, ही आजकाल ज्ञानाची परमावधी मानली जाते. परंतु, आपण इंग्रजी भाषेतून निर्माण काय करतो? जगाच्या ज्ञानात कोणती नवी भर टाकतो?  याचा विचार केला तर आपल्या असे लक्षात येईल की, जे लोक आपल्या शिक्षणात प्रथम भाषा, द्वितीय भाषा यांची गल्लत करीत नाहीत आणि दोन्ही भाषांवर यथोचित प्रभुत्व मिळवतात, तेच आपल्यातील सर्वोत्कृष्ट जगाला देऊ शकतात. नवीन विचार आणि कल्पना जगासमोर मांडू शकतात. म्हणूनच मातृभाषेतून शिक्षण ही संकल्पना तत्त्व म्हणून आजही टिकून आहे.
शिक्षणाचे फलित हे जर व्यक्तीच्या सर्वोत्कृष्टाचे सर्वोत्कृष्ट प्रकटीकरण असेल, तर मातृभाषेला पर्याय नाही. मातृभाषा हा ज्ञानार्जनाचा आणि ज्ञाननिर्मितीचा सहजधर्म आहे, तो सांभाळला पाहिजे.पण, असे असूनही मातृभाषेसारख्या नैसर्गिक माध्यमातून आपल्या पाल्यांनी शिक्षण घ्यावे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला विकास व्हावा, असे आजच्या पालकांना का वाटत नाही? की त्यांना परवडत नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे शिक्षणाच्या बदललेल्या संकल्पनेत शोधावी लागतील. शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आज ज्ञानार्जन राहिलेले नाही. त्याची जागा आता अर्थार्जनाने घेतलेली आहे. पूर्वीच्या काळी ज्ञानार्जन हे शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट होते आणि अर्थार्जन हा त्याचा आनुषंगिक लाभ होता.आता चित्र उलटे झाले आहे. आजच्या आपल्या एकूण शिक्षणव्यवहारात ज्ञानार्जन हे दुय्यम ठरले असून, अर्थार्जनाला प्रथम स्थान प्राप्त झाले आहे. शिशुवर्गांपासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत शिक्षणाकडे भौतिक स्वास्थ्य, आर्थिक स्थैर्य आणि तदानुषंगिक सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देणारे साधन म्हणून पाहिले जाते. शिक्षणाच्या ह्या उद्दिष्टबदलाचा परिणाम मातृभाषेतून शिक्षण ह्या संकल्पनेवर होणे अगदी अपरिहार्य होते. अर्थार्जनाचे उद्दिष्ट साध्य करायचे, तर जी भाषा अर्थार्जनासाठी उपयोगी पडणार नाही किंवा फार उपयोगी पडणार नाही तिच्यातून शिक्षण कशासाठी घ्यायचे, असा प्रश्न आजच्या पाल्यांना व पालकांना पडलेला आहे. शिक्षणाचा हा उद्दिष्टबदल अंतिमत: ना शिक्षणाच्या हिताचा आहे, ना समाजाच्या हिताचा. मात्र हा उद्दिष्टबदल सरळ केल्याशिवाय जसा खरा समाज घडणार नाही, तसेच माध्यमभाषेच्या निवडीचे हे उलटे फिरलेले चक्रही सरळ होणार नाही. अर्थार्जनाशी जोडल्या न गेलेल्या भाषेची  सक्ती केली तर लोक बिथरतील, न्यायालयात दाद मागतील. आपल्या शेजारच्या कर्नाटकात हे घडलेले आहे. शालेय शिक्षणातील कन्नड माध्यमाच्या सक्तीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आणि न्यायालयाला मातृभाषेची सक्ती करता येणार नाही, असा निवाडा करून हस्तक्षेप करावा लागला. म्हणून मातृभाषेच्या सक्तीबरोबर ती संधींची भाषा कशी होईल, हेही पाहिले पाहिजे. सक्ती आणि संधी यांच्या समन्वयातूनच प्रादेशिक भाषांचा इंग्रजीसारख्या प्रबळ भाषेपुढे टिकाव लागेल. त्यासाठी भाषाधोरणाची आणि भाषानियोजनाची गरज आहे. पण, ह्या मर्गाचा अवलंब न करता बहुतेक सरकारे प्रबळ भाषेपुढे लोटांगण घालतात आणि समाजही असह्यपणे तिचा स्वीकार करतो. असे करताना मातृभाषेपासून आपण तुटतो आहोत, याची काही एक खंत मनात असली, तरी प्रबळ भाषाच आपले भवितव्य घडवेल असा आत्मविश्वासही असतो. आपल्याकडे इंग्रजीबाबत हेच घडताना दिसत आहे.
अर्थात, इंग्रजी ही रोजगाराची, आर्थिक संधींची भाषा असल्यामुळे मुलांची भौतिक प्रगती अवश्य होईल. तशी उदाहरणेही आपल्याला दिसतात. याबाबत झालेल्या अनेक सर्वेक्षणांतून समाजातील वंचित, दुर्बल घटकांचा इंग्रजी शिक्षणामुळे आर्थिक उद्धार झाल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. भारतातील बिहार, झारखंड यांसारख्या मागास राज्यांतील इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाला मिळणारी सर्वाधिक पसंती हेच दर्शवते. पण, मुळात पैसे मिळवणे, खूप पैसे मिळवणे ह्यासाठी शिक्षण आहे काय?  कोणतेही मूल स्वभाषेतून करू शकेल, एवढी कामगिरी परभाषेतून करू शकेल काय? याचे उत्तर नाही असे आहे. परंतु, प्रगतीच्या, विकासाच्या संकुचित व केवळ अर्थकेंद्री कल्पनांमुळे आपण इंग्रजीचा द्वितीय भाषेऐवजी प्रथम भाषा म्हणून स्वीकार करू लागलो आहोत. त्याचे व्यक्तिगत, सामाजिक, तात्कालिक, दूरगामी परिणाम आपण अजिबात लक्षात घेत नाही. इंग्रजी माध्यमात शिकून परदेशांत मोठ्या पदावर काम करणारा युवावर्ग आपल्याला दिसतो; पण हजारो, लाखो मुलांना हे अनैसर्गिक माध्यमांतर न पेलल्यामुळे शिक्षणाला कायमचा रामराम करावा लागतो, ह्याकडे कोणाचेच लक्ष नसते. जी मुले सामाजिक व पालकांच्या दबाबवामुळे हे माध्यमांतर तसेच पुढे रेटतात, ते अंतिमत: आपल्या वास्तविक क्षमतेपेक्षा सुमार कामगिरी करतात. अलीकडे इंग्रजी माध्यम न पेलल्यामुळे पुन्हा मराठी माध्यमाच्या शाळांकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र मराठी माध्यमाकडून इंग्रजी माध्यमाकडे जाण्याला जी समाजिक प्रतिष्ठा आहे, ती इंग्रजी माध्यमाकडून पुन्हा स्वगृही परतण्याला नसल्यामुळे अनेक मुलांना ही माध्यमकोंडी सहन करावी लागते.
‘सर्जनशीलता’ ही मानवी जीवनातील आणि पर्यायाने शिक्षणव्यवहारातील सर्वांत किमती गोष्ट आहे. Ideas rule the world. इंग्रजी माध्यमातून शिकलेल्या मुलांच्या स्मार्टनेसचे, प्रगतीचे दाखले दिल्याने त्यांचे सर्जनशीलतेच्या संदर्भात झालेले नुकसान झाकले जाणार नाही. इंग्रजी ही आजही आपल्या समाजासाठी ‘द्वितीय’/परकी भाषा आहे. तिच्यावर प्रभुत्व संपादन केले म्हणजे मुलांचा विकास झाला, असे समजणे भाबडेपणाचे ठरेल. ती आपल्याकरिता द्वितीय भाषा आहे आणि ती द्वितीय भाषा म्हणून राहाण्यातच आपले हित आहे.
डॉ. प्रकाश परब
संपर्क –  ९८९२८१६२४०  
(लेखक ज्येष्ठ भाषाभ्यासक आणि मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आहेत.)

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी भाषा , मातृभाषा , कल्पनाशक्ती , डॉ. प्रकाश परब , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Sanjay Ratnaparkhi

      3 वर्षांपूर्वी

    डॉ. परब यांनी लेखात यथोचित मांडणी केली आहे. इंग्रजी भाषेतील संवादकौशल्य म्हणजे विषयज्ञान हा प्रभाव वाढतो आहे. याउलट विषयज्ञान असूनही इंग्रजी येत नाही म्हणून तुच्छतेने पाहिले जाते. आपल्या स्वभाषेतून व्यक्त होणं आणि दुसऱ्या कोणत्याही भाषेतून मांडणी करणे,यात अंतर राहणारच. विषयज्ञान की अर्थार्जन या शैक्षणिक द्वंदात भाषा विकास मारला जात आहे. मराठी, इंग्रजी वा हिंदी कोणत्याही भाषेचे मूळ अध्ययन आणि आकलन महत्त्वाचे ठरेल.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen