स्त्रियांच्या शिक्षणासाठी सबंध आयुष्य ज्यांनी वाहून घेतले, त्या भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री मुक्ती चळवळीच्या प्रणेत्या, प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, अनाथांची माता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतुलनीय आहे. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून ३ जानेवारी १९९५ पासून सावित्रीबाईंचा जन्मदिन हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्मदिन हा महिलादिन म्हणूनही साजरा केला जातो. सावित्रीबाईंच्या कार्याचा आढावा घेणारा गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील इंग्रजीचे अध्यापक मच्छिंद्र बोऱ्हाडे यांचा हा लेख -
सावित्रीबाईंचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी, सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील हे इनामदार होते. सावित्रीबाई लहानपणापासूनच अत्यंत जिद्दी, धाडसी, अन्याय-शोषणाविरुद्ध बंड करणाऱ्या आणि स्वाभिमानी होत्या. शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या अशा निरक्षर कुटुंबात त्या वाढल्या. तत्कालीन समाजात बालविवाहाची प्रथा रूढ होती. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षी सावित्रीबाई यांचा विवाह जोतीराव फुले यांच्याशी झाला. विवाहाच्या वेळी जोतीराव तेरा वर्षांचे होते. त्या काळी स्त्रियांच्या शिक्षणास मनाई होती. मात्र विवाहानंतर जोतीराव फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला आणि वाचायला शिकवले. त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण केली. पुढे स्त्री शिक्षणाच्या कार्यात सावित्रीबाईंची मदत व्हावी म्हणून जोतीरावांनी सावित्रीबाईंना मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल स्कूलमध्ये दाखल केले. तिथे त्यांनी अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले होते. प्रशिक्षणानंतर त्या आधी शिक्षिका आणि नंतर मुख्याध्यापिका झाल्या.
आज मुलींना आपण शाळा, महाविद्यालयांत शिक्षण घेण्याबरोबरच जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या बरोबरीने काम करताना पाहतो. सावित्रीबाईंच्या काळात ही परिस्थिती नव्हती. स्त्रिया आणि दलित-बहुजन वर्गास शिक्षणाचा अधिकार नव्हता. उच्च पदांवर काम करायला त्यांना परवानगी नव्हती. अत्यंत हलाखीचे जीवन त्यांच्या वाटयाला आले होते. हा एक प्रकारचा सामाजिक अन्याय होता. या अन्याय आणि भेदभावाविरुद्ध समाजसुधारकांना तत्कालीन व्यवस्थेविरूद्ध लढा द्यावा लागला होता. या सर्व समाजसुधारकांत जोतीराव आणि सावित्रीबाई अग्रस्थानी होते.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ या दिवशी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. मुली शिकल्या तर समाजाची प्रगती होईल, अशी या दांपत्याची धारणा होती. या शाळेच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थाने उभयतांचे शैक्षणिक कार्य सुरू झाले. स्त्री शिक्षणाशिवाय देशाची प्रगती होणार नाही, हे महात्मा फुले यांनी ओळखले होते. तत्कालीन समाजातील सनातनी मंडळीचा मोठ्या प्रमाणात रोष पत्करूनही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ ते १८५२ या पाच वर्षांच्या कालावधीत मुलींसाठी अठरा शाळा काढल्या. फुल्यांच्या या कार्याला त्या काळात अनेकांचा विरोध होता. अगदी त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले होते.
शाळा सुरू केल्यावर शाळेतील मुलींना शिकवण्याची जबाबदारी जेव्हा जोतीरावांनी सावित्रीबाईंवर सोपवली, तेव्हा सनातनी मंडळींना हे आवडले नाही. मुलींना शिकवण्यासाठी सावित्रीबाई जेव्हा शाळेत जात, तेव्हा हे लोक त्यांच्या अंगावर शेणगोळे आणि दगडगोटे फेकत. मात्र विचलित न होता, अत्यंत धीराने आणि अतिशय शांतपणे अनंत अडचणींना तोंड देत, जोतीराव आणि सावित्रीबाईंनी या शाळा चालवल्या. या मुलांना शिकवण्यासाठी जेव्हा शिक्षक मिळेनात, तेव्हा जोतीरावांनी स्वतः सावित्रीबाईंवर मुलांना शिकवण्याची जबाबदारी सोपवली. असंख्य अडचणी आल्या तरी त्या त्यांच्या ध्येयापासून दूर गेल्या नाहीत. शिकवण्याबरोबर त्या मुलांना गोष्टी सांगत, कविता वाचून दाखवत, त्यांचे खेळ घेत. या काळात त्यांच्याबरोबर फातिमा शेख या त्यांच्या सहकारी शिक्षिका होत्या. स्वतः जोतीराव फुले हेही मुलींच्या शाळेत रोज चार तास शिकवायचे.
शाळा सुरू केल्यानंतर या शाळांसाठी योग्य असा अभ्यासक्रमही त्यांनी तयार केला. या शाळांत पहिलीपासून इंग्रजी, शेती शिक्षण आणि औद्योगिक प्रशिक्षण दिले जात असे. याशिवाय वाचन, व्याकरणाची मूलतत्त्वे, अंकगणित, इतिहास, भूगोल, मोडी हे विषय शिकवले जात असत. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी पहिलं ग्रंथालय काढले. स्त्रियांप्रमाणेच अस्पृश्यांनाही त्या काळी शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. अस्पृश्यांसाठी १८५१ मध्ये फुल्यांनीच प्रथम पुढाकार घेऊन शाळा सुरू केली. शाळेतील मुलांना पाणी पिण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरचा हौद खुला केला. मुलामुलींबरोबर त्यांच्या पालकांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी देशातील प्रौढांची पहिली रात्र शाळा १८५४ साली सावित्रीबाईंनी स्त्रियांसाठी, तर जोतीरावांनी पुरुषांकरिता सुरू केली. शाळांतील मुलामुलींचा गळतीचा प्रश्न हा त्या काळीही होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी गरीब मुलामुलींना पगार देण्याची व्यवस्था केली. याशिवाय ही मुले शाळेत टिकून राहण्याच्या दृष्टीने त्यांना आवडेल असा अभ्यासक्रम तयार करण्यावर त्यांनी भर दिला. फुले दांपत्याचे शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहून ब्रिटिश सरकारने त्यांचा गौरव केला. १६ नोव्हेंबर १८५२ रोजी पुण्यातल्या विश्राम वाड्यातील भव्य समारंभात मेजर कॅन्डी यांच्या हस्ते शालजोडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही फुले दांपत्याचे योगदान महत्त्वाचे आहे. १८६३ साली जोतीरावांनी आणि सावित्रीबाईंनी विधवांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. हे सुरू करण्यात सावित्रीबाईंचा पुढाकार होता. १८७३ मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहोचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. या समाजाच्या माध्यमातून हुंड्याशिवायच्या कमी खर्चातील साध्या पद्धतीच्या सत्यशोधक विवाहांची प्रथा त्यांनी सुरू केली. पती जोतीराव फुले यांना त्यांच्या शैक्षणिक आणि समाज परिवर्तनाच्या कार्यात सावित्रीबाईंनी शेवटपर्यंत साथ दिली. महिलांच्या सक्षमीकरणात पती जोतीराव यांच्याबरोबरीने सावित्रीबाईंनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
जुलै १८८७ मध्ये जोतीराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. या काळात सावित्रीबाईंनी त्यांची अहोरात्र सेवा केली. पुढे आजार बळावल्याने २८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतीरावांचे निधन झाले. त्यानंतरही सावित्रीबाईंनी सामाजिक कार्य सुरू ठेवले होते. जोतीबांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सावित्रीबाईंनी शेवटपर्यंत वाहिली. १८९७ साली पुणे आणि परिसरात प्लेगची साथ आली. खूप मोठ्या संख्येनं माणसं दगावली. या काळात शेकडो रुग्णांपर्यंत उपचार पोहोचवण्याचे काम सावित्रीबाईंनी धडाडीने केले. अनेक रुग्णांना उपचार केंद्रापर्यंत त्यांनी स्वत: वाहून नेले. त्यातच सावित्रीबाईंनाही प्लेगची बाधा झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाईंच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची ओळख त्यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रहातून, त्यांच्या भाषणांतून आणि जोतीरावांना लिहीलेल्या पत्रांतून होते. त्या उत्तम कवयित्री होत्या. ‘काव्यफुलेट आणि ‘बावनकशी सुधाकर रत्नाकर’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. शिक्षणाच्या माध्यमातूनच समाज परिवर्तन होऊ शकते, हा विश्वास त्यांना होता. ‘काव्यफुले’ या काव्यसंग्रहातील ‘शूद्रांचे दुखणे’ या काव्य रचनेत त्या म्हणतात,
‘शूद्रांना सांगण्याजोगा I आहे शिक्षण मार्ग हा
शिक्षणाने मनुष्यत्व I पशुत्व हाटते पहा’
मनुष्यत्वासाठी शिक्षण हा विचार कवितेतून मांडणाऱ्या सावित्रीबाई या थोर शिक्षणतज्ज्ञ होत्या. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले होते. ‘श्रेष्ठ धन’ या रचनेत त्यांनी ते विशद केले आहे. त्या म्हणतात,
‘विद्या हे धन आहे रे I श्रेष्ठ साऱ्या धनाहून
तिचा साठा जयापाशी I ज्ञानी तो जन मानती’
‘शिकणेसाठी जागे व्हा’ या त्यांच्या काव्य रचनेत त्यांनी बहुजन समाजाला जागे होण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणतात,
उठा बंधूंनो अतिशूद्रांनो जागे होऊनि उठा
परंपरेची गुलामगिरी ही तोडणेसाठी उठा
बंधूंनो शिकणेसाठी उठा I
‘इंग्रजी शिका’ या अभंगात त्यांनी इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. त्या म्हणतात,
शूद्र अतिशूद्र I दु:ख निवाराया
इंग्रजी शिकाया I संधी आली II
इंग्रजी शिकूनी I जातीभेद मोडा
भटजी भारुडा I फेकुनिया II
सावित्रीबाईंनी त्यांच्या सामाजिक कवितांच्या माध्यमातून बहुजन समाजाला जागृत करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. स्त्री मुक्ती चळवळीच्या आद्य प्रणेत्या अशी त्यांची ओळख आहे. ‘सामुदायिक पद्य संवाद’ यात त्या लिहितात -
सरस्वतीच्या दरबारात शिक्षण घेणेस जाऊ चला
विद्यादेवीस प्रसन्न करूनि वर मागू तिजला चला
अज्ञानाची दारिद्र्याची गुलामगिरीही तोडू चला
युगायुगाचे जीवन आपले फेकून देऊ चला चला
नकोच इच्छा आरामाची
ईर्षा धरुनि शिक्षणाची
संधी घ्या तुम्ही छान आजचि
अनुकुलता बघ कालगतीची
न कुरकुरता न आळसता शाळेत जाऊ शिकू चला
गुलामगिरीची युगायुगाची बेडी तोडू चला चला
पुण्यात १ जानेवारी १८४८ रोजी मुलींच्या पहिल्या शाळेची घंटा वाजली. या घंटानादाने खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
‘सावित्री जोतीबा विरचित अथ - बावन्नकशी सुबोध रत्नाकर’ या संग्रहात त्यांनी जोतीरावांचे चरित्र काव्य स्वरूपात लिहिले आहे. जोतीराव हे सावित्रीबाईंचे आदर्श पती, मार्गदर्शक आणि गुरूही होते. या काव्यसंग्रहात त्यांनी देशाचा इतिहास काव्यरूपाने सांगितला आहे. तसेच, जोतीरावांच्या कार्याचे चित्रणही केले आहे. उपोद्घातमध्ये त्या म्हणतात -
जयाचे मुळे मी कविता रचिते II
जयाचे कृपे ब्रह्म आनंद चित्ते II
जयाने दिली बुद्धीही सावित्रीला II
प्रणामा करी मी यती जोतीबाला II
काव्यसंग्रहांशिवाय ‘जोतीबांची भाषणे’ हे पुस्तक त्यांनी संपादित केले असून ते २५ डिसेंबर १८५६ रोजी प्रसिद्ध झाले आहे. यात जोतीरावांची चार भाषणे आहेत. सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेल्या पत्रांची संख्या तीन आहे. यातील दोन पत्रे मोडी लिपीत आहेत. सावित्रीबाईंना जाणून घेण्यासाठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास आवश्यक आहे.
सावित्रीबाईंनी १८४८ ते १८९७ अशी सलग ५० वर्षे लोकांची सेवा केली. फुले दांपत्यानी स्त्रियांच्या आणि बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी केलेले कार्य अभूतपूर्व आहे. त्यांचे विचार आजही दिशादर्शक आहेत. सरकारी अनुदान आणि मदत यांशिवाय अतिशय उत्तमरीत्या त्यांनी शाळा चालवून दाखवल्या. महिला सबलीकरण, वंचितांचे शिक्षण, मुलींचे शिक्षण, स्त्री मुक्ती आंदोलन, जातीभेद निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, शेतीसुधारणा यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी असंख्य संकटाना सामोरे जात केलेले काम अतुलनीय आहे. मात्र अजूनही महिला सबलीकरण, जात निर्मूलन, स्त्री शिक्षण, वंचितांचे शिक्षण, अशा अनेक पातळ्यांवर काम करण्याची गरज आहे. अनेक प्रश्न सोडवणे अद्यापही बाकी आहे. त्यासाठी आपल्याला नव्याने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना समजून घ्यावे लागेल.
संदर्भ ग्रंथ
- सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय : मुख्य संपादक, प्रा. हरी नरके
- महात्मा फुले साहित्य आणि चळवळ : संपादक, प्रा. हरी नरके
- क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले : डॉ. मा.गो. माळी
- सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तिमत्त्व : प्रा. ना. ग. पवार.
- भारतीय साहित्याचे निर्माते महात्मा जोतीराव फुले : भास्कर लक्ष्मण भोळे
- जोतिचरित्र : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
मच्छिंद्र बोऱ्हाडे
...
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात इंग्रजीचे अध्यापक आहेत.)
संपर्क : ९८९२८३०६६०, [email protected]
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
सावित्रीबाई फुले
, बालिका दिन
, मराठी अभ्यास केंद्र
, मच्छिंद्र बोऱ्हाडे