कला आणि मुलं


“मनुष्याच्या मनात अनेक भावना असतात. या भावनांची मनात गर्दी झाली की त्यांना प्रत्यक्ष रूप देणे  गरजेचे असते, तेव्हा या भावना प्रत्येकाच्या आवडीनुसार मूर्त स्वरूपात येतात. मग आपण आपल्या भावना चित्र, शिल्प, गायन, वादन, कविता, नृत्य, अभिनय यातून मूर्त रूपात आणतो. मूल जन्माला येते, तेव्हा मुळात त्याच्याकडे कला असतातच. फक्त त्याला मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शनाचे काम कुटुंबात, परिसरात आणि पुढे शाळेत होत असते. हे मार्गदर्शन करत असताना विविध संधी उपलब्ध करून देण्याचे काम आमच्या डोसीबाई बालविहार आणि प्राथमिक शाळेत  सुरू होते.” मुलांमधील कलेची आवड जपतानाचे अनुभव सांगतायत गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेतील कला शिक्षक  प्रमिला जगताप -
‘कला’मधील ‘कल’ हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ प्रकट करणे, आवाज करणे, एखाद्या पूर्ण भागातील काही अंश उलगडून दाखवणे इत्यादी. पूर्ण चंद्राच्या वाढत जाणाऱ्या अविष्काराला चंद्रकला म्हणतात. जसा चंद्र कलेकलेने वाढत जातो आणि शेवटी पूर्ण चंद्र होतो;  तशीच कोणतीही कला, जसे की, नृत्य, नाटक, चित्रकला या कला सरावाने हळूहळू  यथावकाश वृद्धिंगत होतात.
मनुष्याच्या मनात अनेक भावना असतात. या भावनांची मनात गर्दी झाली की त्यांना प्रत्यक्ष रूप देणे  गरजेचे असते, तेव्हा या भावना प्रत्येकाच्या आवडीनुसार मूर्त स्वरूपात येतात. मग आपण आपल्या भावना चित्र, शिल्प, गायन, वादन, कविता, नृत्य, अभिनय यातून मूर्त रूपात आणतो. मूल जन्माला येते, तेव्हा मुळात त्याच्याकडे कला असतातच. फक्त त्याला मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शनाचे काम कुटुंबात, परिसरात आणि पुढे शाळेत होत असते. हे मार्गदर्शन करत असताना विविध संधी उपलब्ध करून देण्याचे काम आमच्या डोसीबाई बालविहार आणि प्राथमिक शाळेत  सुरू होते.
आमची शाळा सन २००० पासून सुरू झाली. दि शिक्षण मंडळ गोरेगावच्या सर्व सदस्यांनी मिळून शैक्षणिक धोरण तयार केले.  कला-ज्ञान-क्रीडा हे बोधवाक्य समोर ठेवूनच शाळेचा पाया घातला गेला आहे. ज्ञान आणि क्रीडा याप्रमाणेच कलेला प्राधान्य देत आजतागायत काम सुरू आहे. आमच्या शाळेत प्रत्येक मुलाला त्याचे कौशल्य आणि कल्पनाशक्ती वापरून आपली कला प्रकट करण्याची मुभा असते.  स्वतः  करून पाहिल्याने  त्यातून मिळालेले निष्कर्ष  मुलांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतात. लहान मुलांना रंगांबद्दल कुतुहल असतेच. रंगांबरोबर आकाराची जाण, पोताची जाण आणि त्या अनुषंगाने स्पर्शज्ञान वाढविणे व ते दृढ करणे, सौंदर्य दृष्टी विकसित करणे आणि कोणत्याही कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता निर्माण करणे, त्यासाठी योग्य संधी देण्याचे काम आमच्या शाळेत केले जाते.

आमच्या शाळेतील सर्व ताईंचे पुण्याच्या शिक्षणतज्ज्ञ वर्षाताई सहस्रबुद्धे यांच्याकडून सर्व विषयांबरोबरच कलेचेही प्रशिक्षण झाले आहे. मुलांमध्ये उपजतच असलेले कलागुण कसे ओळखायचे, त्यांना कसे प्रोत्साहन द्यायचे, त्याला  दिशा कशी द्यायची, त्यासाठी कोणकोणत्या कृती घ्यायच्या, याविषयी वर्षाताईंनी आम्हांला मार्गदर्शन केले. तसेच मुलांबरोबर पाठ घेऊन दाखवले. आम्ही वर्गात पाठ घेतल्यानंतर आलेल्या अनुभवांबद्दल वर्षाताईंसोबत वारंवार चर्चा केल्या. चार-पाच वर्षे  त्यांच्याकडे प्रशिक्षण घेतल्यानंतर पुढे आम्ही सर्व ताई  या गोष्टी समजून घेऊन स्वत:ला समृद्ध करत गेलो.
मुलांना कलेच्या कृती करायला किती आवडतात, याचे एक उदाहरण मला आठवले. रोज एक तास अशा प्रकारे माझे कलेचे तास वेगवेगळ्या वर्गांत असतात. आमच्या तळमजल्यावरील दोन वर्गांच्या मध्ये एक मोठे पार्टिशन केले आहे. एका वर्गात कलेचा तास घेत असताना, बाजूच्या वर्गातून एक मुलगी पार्टिशनच्या फटीतून या वर्गात मी कलेचे काय शिकवते आहे, ते पाहत होती.  मी एका मुलाचे काम पाहण्यासाठी त्याच्याजवळ गेली, तेव्हा त्या फटीतून त्या मुलीने मला विचारले, " ताई, आमच्या वर्गात कधी येणार आहात? आम्हांला काय शिकवणार आहात? किती वाजता येणार आहात?”
शिशुगट ते चौथीपर्यंत आत्मसात केलेली अभ्यास व कलेतील काही कौशल्ये वापरण्याची संधी मुलांना मिळावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शाळेत स्नेहसंमेलन, दुकानजत्रा, प्रदर्शन असे उपक्रम दरवर्षी साजरे केले जातात. सर्व उपक्रमांत सर्व मुलांचा सक्रिय सहभाग असतो. जसं की, स्नेहसंमेलनाचा विषय ठरवण्यापासून संपूर्ण स्नेहसंमेलन साजरे होईपर्यंतच्या प्रक्रियेत इयत्ता पहिली ते चौथीची सर्व मुले सहभागी होतात. मग यातील सजावटीसाठी लागणाऱ्या रंगीत पताका बनवणे असू दे की नेपथ्यासाठी लागणारे साहित्य असू दे, हे  सर्व कलेच्या तासांना मुलांकडूनच बनवून घेतले जाते. हाच विचार समोर ठेवून वर्षभरातील सर्व कार्यक्रम, सण-उत्सव साजरे केले जातात.

मुलांना जास्तीत-जास्त कसे समृद्ध करता येईल, यासाठी आमच्या  मंडळातील पदाधिकारी सतत प्रयत्नशील असतात. आम्हांला वेगवेगळ्या प्रशिक्षणात सहभागी होण्याची संधी देतात, तसेच वेगवेगळी प्रशिक्षणे घेण्यासाठी प्रोत्साहित करतात. कलेसंदर्भातील छोटे-छोटे प्रयोग मंडळाच्या सदस्या शलाकाताई, क्षमाताई आमच्यासोबत तसेच मुलांसोबत करत असतात.
दर दहा वर्षांनी पिढी बदलताना दिसते, त्यामुळे आम्ही सतत बदलत्या पिढीबरोबर गुणवत्तापूर्ण काम कसे करता येईल, याचा सतत विचार करत असतो. यात आमच्या मुख्याध्यापिका सुजाताताई तेवढ्याच ताकतीने आमच्यासोबत काम करत असतात. मुलांना योग्य वेळी  योग्य त्या ठिकाणी दिशा दाखवण्याचे (स्कॅफोल्डिंग) काम आम्ही सर्व ताई करत असतो.
मुलांसोबत काम करताना वेगवेगळे अनुभव येतात. त्यातील काही अनुभव सांगावेसे वाटतात. पहिलीतील एक मुलगी घरी तिच्या आई व ताई यांच्यासोबत कलेचं खूप काम करते. शाळेत कलेचा तास सुरू असताना ती म्हणाली, “ताई, तुम्ही काही छान शिकवत नाही. तुमच्यापेक्षा माझी ताई किती छान शिकवते.” मी म्हणाले, “हो का? मलापण शिकवायला सांगशील का तिला?” यावर अतिशय उत्साहाने ती ‘हो’ म्हणाली. तीच मुलगी दुसरीत आल्यावर एकदा कलेचा तास सुरू असताना मला म्हणाली, " ताई, तुम्ही किती छान शिकवता, माझ्या ताईला पण शिकवाल का तुम्ही?” मला वाटते की, मी वर्षभर  घेतलेल्या कृतींवरून तिने मला चांगलेच पारखले आणि तिचे माझ्याबद्दलचे मत बदलले.
पहिलीत आलेली मुक्ता म्हणाली, “ताई मला चित्र काढायला येत नाही.” मी तिला समजावून सांगितले, "अगं तुला चांगलं जमेल, तू काढ." त्याच मुक्ताने चौथीत आल्यावर शिवणकामातून तयार केलेल्या कापडी पाऊचवर फॅब्रिक कलरने अतिशय सुंदर पेंटिंग केले. मला वाटते, मुलांचा आत्मविश्वास कधी-कधी कमी असू शकतो. परंतु, मुले जसजशी मोठी होत जातात, कलेचे वेगवेगळे अनुभव घेतात, तसतशी ती कलेत समृद्ध होतात आणि चांगले काम करायला लागतात.
जेव्हा वर्गात कार्यानुभवाची वस्तू शिकवायची असते, त्याच्या आधी मला स्वत:ला नमुना करून पाहावा लागतो. हा नमुना जेव्हा वर्गात घेऊन जाते, तेव्हा वर्गातील दोन-तीन मुले मला विचारतात, “ताई तुम्हांला कोणी शिकवले हे? तुम्ही कुठे शिकलात? तेव्हा काही मुले म्हणतात, “ताई, मला माहीत आहे, तुम्ही हे कंप्युटरवरून शिकता नं? अशा वेळी मला त्यांचे कौतुक वाटते की, मुलांना शाळेतील ताईंच्या कामाबद्दल किती उत्सुकता असते.
ज्या वेळी एखाद्या शब्दाचा अर्थ शब्दांत सांगता येत नाही, तेव्हा चित्र काढून दाखवले तर पटकन लक्षात येते. एकदा पहिलीच्या वर्गात झाडांबद्दल गप्पा सुरू होत्या. मी आमच्या घरासमोरील ‘झाड छाटले’ असे सांगितले. मुलांनी मला विचारले, “ताई, छाटले म्हणजे काय?”  मग मी त्यांना फळ्यावर झाडाचे चित्र काढून दाखवले आणि त्याच्या फांद्या एक-एक करून पुसल्या. इथे पुसल्या म्हणजे कुऱ्हाडीने फांद्या कापल्या, हे दाखवले. माझी चित्रकला इथे मुलांना भाषेतील एका शब्दाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी कामी आली, याचे मला खूप समाधान वाटले.
कलेचे काम करताना प्रत्येक मुलाला असे वाटते की, मला खूप छान आले पाहिजे. ज्या मुलांना जमत नाही, ती मुले काहीही न बोलता ताईंच्या जवळ येतात. मग त्यांना थोडे सांगितले की मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि ती मुले आपले काम पूर्ण करतात.

वय वर्षे ३ ते ९ या गटातील मुलांना एखादी सुंदर कलाकृती बघायला शिकवणे, निसर्ग सौंदर्य अनुभवण्याची दृष्टी तयार करणे, त्या विषयी आपले मत मांडणे, एखाद्याने केलेल्या चांगल्या कलाकृतीचे कौतुक करणे, त्रुटी असल्यास ती दाखवण्याची क्षमता तयार करण्यासाठी आमच्या शाळेतील सर्व ताई नेहमी सजगपणे काम करत असतात. कला शिक्षणाचा मूळ हेतूच हा आहे की, लहान मुलांच्या मनात दडून बसलेल्या भावनांना योग्य मार्ग मिळण्यासाठीच्या विविध संधी उपलब्ध  करून देणे.  मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे ,हे शालेय कला शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे मला वाटते.
प्रमिला विलास जगताप
(लेखिका गोरेगाव, मुंबई येथील डोसीबाई जीजीभॉय प्राथमिक शाळेत कला शिक्षक आहेत.)
संपर्क - [email protected]

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


कला , प्रयोगशिल शिक्षण , मराठी शाळा , प्रमिला जगताप , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Santosh Waykos

      3 वर्षांपूर्वी

    फार छान लेख आहे ,

  2. Santosh Waykos

      3 वर्षांपूर्वी

    फार छान लेख आहे ,

  3. Yogesh Bhavsar

      3 वर्षांपूर्वी

    लेख खुपच छान आहे

  4. Machhindra Borhade

      3 वर्षांपूर्वी

    अनुभवावर आधारित खूप छान लेख



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen