मानसीचा चित्रकार


आपल्या समाजामध्ये चित्रकलेला दुय्यम स्थान दिले जाते आणि याचे मूळ आपल्या शालेय शिक्षणात आहे. शालेय शिक्षणात चित्रकलेला इतर विषयांसारखे महत्त्व दिले जात नाही. याविषयी स्वअनुभवातली उदाहरणे देत, आपल्या रोजच्या जगण्यातल्या चित्रकलेविषयी विचार करायला लावणारा मयूरेश गद्रे यांचा लेख...
आज दुपारी दुकान उघडायला गेलो तर बाहेर एक शाळकरी मुलगा आणि त्याचे बाबा उभे होते. चित्रकलेचं साहित्य घ्यायला आले होते. मुलगा असेल नववी-दहावीत. दुकान उघडून त्यांना हव्या त्या वस्तू काढून दिल्या. बाबांनी खूप कौतुकाने मोबाइलमधले मुलाच्या चित्रांचे फोटो काढून दाखवले. खरोखरच वयाच्या मानाने त्याची चित्रकलेची जाण आणि रेषांवरचं प्रभुत्व उत्तम होतं. मलाही कौतुक वाटलं आणि त्याची  चौकशी करावीशी वाटली. बोलण्याच्या ओघात बाबांनी एक गोष्ट मात्र आवर्जून सांगितली, ‘अभ्यासात पण खूप हुशार आहे तो, शाळेत कायम टॉप रँकर्स मध्ये असतो!!’
त्याच्या अभ्यासातल्या हुशारीचा उल्लेख त्यांना करानासा वाटला यात काही गैर नाही. पण, त्यातला थोडा चढा स्वर लक्षात येऊन मी काहीसा विचारात पडलो. एखादा मुलगा किंवा मुलगी केवळ चित्रकार असून नाही का भागणार? त्याने अभ्यासात हुशार असणं हे तितकंच, किंबहुना त्यापेक्षा जास्त आवश्यक आहे का?
मध्यप्रदेशातली भीमबेटकामधली गुहाचित्रं असोत किंवा अजिंठ्याची भित्तिचित्रं असोत,  त्यांचा ‘जागतिक वारसा’ म्हणून आपण अभिमानानं उल्लेख करतो. पण मग चित्रकलेला आज आपण तेवढं महत्त्व, तेवढा मान देतो का? रोजच्या जगण्यात ठायी ठायी चित्रकला आपल्या सोबत असते. फ़क्त ‘त्या’ नजरेनं आपण तिचा आस्वाद घेत नाही, इतकं आपण त्या कलेला गृहीत धरून चालतो. सकाळी उठल्यावर वापरायच्या टूथपेस्टच्या पॅकपासून रात्री झोपताना घ्यायच्या औषधांच्या वेष्टनापर्यंत, दिवसभर असंख्य वस्तू, ठिकाणं, कपडे, वाहनं... ही न संपणारी यादी आहे! चित्रकला अशी सर्वव्यापी बनून आपल्या आसपास असतेच. दुर्दैवाने अनेकांना रूढार्थाने ‘दृष्टी’ असूनही तशी ‘नजर’ मात्र नसते. होतं काय की, आपल्याकडे बालवाडीपासून आठवीपर्यंत चित्रकला हा ‘विषय’ म्हणून शिकावा लागतो. पण म्हणून त्याची गोडी प्रत्येकालाच वाटते असं नाही. खरंतर मराठीच्या पुस्तकातल्या कितीतरी कविता त्यातल्या चित्रांसकट मला आणि माझ्यासारख्या अनेकांना आजही आठवतात. 'लाडकी बाहुली होती माझी एक' या कवितेत त्या बाहुलीला तुडवून गेलेली गाय अजून डोळ्यांसमोर आहे, ते सोडून द्या. मोठया भावंडांनी किंवा इतर कुणीतरी आधी वापरलेलं इतिहासाचं पुस्तक आठवून बघा. थोर राष्ट्रपुरुषांना दाढी-मिश्या काढणं, हा तर अनेकांचा जन्मसिद्ध हक्क होता. असो. पण, एकंदरीत ही पुस्तकं, त्यातली चित्रं आपल्या भावविश्वाचा भाग बनून जातात. मात्र आपल्या शिक्षणपद्धतीमुळे अनेकांचा आठवीनंतर चित्रकलेशी असलेला सांधा सुटतो तो थेट मुलं-बाळं होईपर्यंत. मग पुढच्या पिढीला वॅक्स क्रेयोन्स किंवा कलरिंग बुक्स घेण्याच्या निमित्तानं हा संबंध कसाबसा जोडला जातो.
या सगळ्या गडबडीत  चित्रकलेला आणि पर्यायानं चित्रकारांना प्रतिष्ठा वगैरे द्यायच्या फंदात कुणीच पडत नाही. आपल्या घराच्या एखाद्या भिंतीवर किंवा रोज आपण जिथे आठ-दहा तास घालवतो, त्या ऑफिसमध्ये, आवर्जून एखादं सुंदर पेंटिंग विकत घेऊन लावणारी मंडळी किती असतील? दोन प्रोफेशन्सची तुलना करू नये हे मान्य, पण इंजिनीअरिंग करताना जशी चार-पाच वर्षं घालवावी लागतात, तशी फाईन आर्टची पदवी घेतानाही चार-पाच वर्षं मेहनत करावीच लागते. पण, जेवढा मान त्या इंजिनीयरला मिळतो, तेवढा फाईन आर्टची पदवी घेतलेल्या आर्टिस्टला मिळतो का? दुर्दैवाने त्याच्या मेहनतीची कदर करण्याच्या फूटपट्ट्या आपल्याला शिकवल्याच गेल्या नाहीयेत.
चित्रकाराच्या चित्राला मिळणारी किंमत हा तर फारच मोठा आणि तितकाच नाजूक विषय आहे. अनेकदा तर  किंमत ठरवताना भाजी मंडईत करावी तशी घासाघीस केली जाते. आणि चित्र पूर्ण करून हातात आल्यावर त्यात खोट काढून पैसे बुडवण्याकडे कल असतो, अशी असंख्य उदाहरणं मला माहीत आहेत. याबाबतीत अहमदनगरचे ज्येष्ठ शिल्पकार प्रमोद कांबळे यांचा एक किस्सा मी त्यांच्याच तोंडून ऐकलाय. तसे प्रमोदजी शिल्पकार, पण मुळात ते उत्तम चित्रकारही आहेत. त्यांना एका व्यापाऱ्याने आपल्या वडिलांचं पोर्ट्रेट करायला सांगितलं. त्यांनी किंमत सांगितली. कुरकूर करत ती त्या व्यापाऱ्याने मान्य केली. काही दिवसांनी चित्रं पूर्ण झालं. ठरल्याप्रमाणे तो चित्र घ्यायला आला, पण पैसे द्यायची वेळ आल्यावर ‘बाबांचे डोळे बरोबर नाहीत, कपाळही थोडं मोठं वाटतंय’ अशी न पटणारी कारणं सुरू झाली. एकंदर त्याचा नूर बघून प्रमोदजींनी आपल्या असिस्टंटला बोलावलं आणि सांगितलं, ‘ते चित्र फ्रेमवरून काढ आणि फरशीपुसणं म्हणून दारात टाकून दे’.  हे ऐकल्यावर तो व्यापारी हडबडला. त्यावर प्रमोदजी म्हणाले, ‘अहो, ते जर तुमच्या वडिलांसारखं दिसत नाही असं तुम्हीच आत्ता म्हणत होता, मग माझ्यासाठी तरी ते साधं कापडच आहे!’  यावर तो व्यापारी काही न बोलता मुकाटपणे किंमत चुकती करून चित्र घेऊन गेला. तर सांगायचा मुद्दा हा की, जी प्रतिष्ठा आपण इतर व्यावसायिकांना देतो, ती चित्रकारांना मात्र देत नाही. ही प्रगल्भता आपण कधी दाखवणार?
‘थ्री इडियट्स’ मध्ये इंजिनीयर मुलाला वाइल्ड लाइफ फोटोग्राफीसाठी कॅमेरा घेऊन देणारे वडील आपल्याला भावतात. गेल्या दोन वर्षांत भयंकर असं कोंडलेपण आपण सगळेच जण अनुभवत आहोत. आश्चर्यानं आणि मुद्दाम नमूद करावी अशी गोष्ट म्हणजे, या काळात कलासाहित्याची विशेषतः चित्रकलेच्या सामानाची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यूट्युब, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर असे असंख्य व्हिडिओज उपलब्ध आहेत. ते बघून अनेकांना वेळ घालवण्यासाठी म्हणा किंवा मानसिक ताण कमी करण्यासाठी म्हणा, चित्रकलेचा आधार घ्यावासा वाटला आहे, ही खूपच जमेची बाजू आहे. याच काळात अनेक पालकांनी ‘थ्री इडियट्स’मधल्या अब्बाजानचा कित्ता गिरवलाय, हे मी खात्रीने आणि अनुभवाने सांगू शकतो. आपल्या मुलांना महागडं, परदेशी कलासाहित्य घेऊन देणारे अनेक पालक गेल्या दोन वर्षांत मला जवळून अनुभवायला मिळाले. चित्रकला, कॅलिग्राफी, फॅब्रिक पेंटिंग, मंडला आर्ट, अशा वेगवेगळ्या वाटांवर चालून बघायचा प्रयत्न खूप जणं सजगपणे करत आहेत किंवा त्यासाठी बच्चेकंपनीला प्रोत्साहन देत आहेत, हे बदल खूपच आश्वासक आहेत.
कोरोनाच्या काळ्या ढगांना असलेली ही चंदेरी किनार म्हणजे, वाईटातून काहीतरी चांगलं घडत असल्याची सुखद जाणीव ठरावी, एवढीच अपेक्षा आहे.
मयूरेश गद्रे
(लेखक डोंबिवलीतील ‘गद्रे बंधू’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या दुकानाचे मालक आणि चोखंदळ वाचक आहेत.)
संपर्क - ९९३०९७७७४६

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


चित्रकला , प्राथमिक शिक्षण , गद्रे बंधू , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Umesh Pradhan

      3 वर्षांपूर्वी

    लेखातील आपले विचार मोलाचे आहेत. पाठ्यपुस्तक निर्मिती करणाऱ्यांनी, शिक्षकांनी कलेचं जीवनातील स्थान लक्षात घेतले पाहिजे. कलेचं शिक्षणातील स्थान महत्त्वाचे. प्रत्येक विषयातून कलाविष्कार मोलाचा. लेख आवडला

  2. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    छान लेख .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen