“एखाद्या इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग चुकले तर जी अपराधी भावना वाटते अथवा निर्माण केली जाते, ती मराठीबाबत वाटत नाही. मध्यंतरी एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनी इंग्रजीत लिहिलेल्या पत्रात काही शब्द अशुद्ध होते, त्यावर एका इंग्रजी वर्तमानपत्राने पहिल्या पानावरची बातमी केली होती. ह्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या मराठी पत्रव्यवहारातील मराठी शुद्धलेखन कोणी पाहिले, तर निश्चितपणे वर्तमानपत्रांचे विशेषांक काढावे लागतील. जणू उच्चार व लेखनप्रामाण्य हे केवळ इंग्रजीसाठी आहे, मराठीसाठी नाही.” – मराठीच्या शुद्धलेखनाच्या परंपरेची चिकित्सा करणारा ज्येष्ठ भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब यांचा लेख -
...
मराठीच्या आजवरच्या शुद्धलेखनविचारात अनेक मुद्द्यांची अटीतटीने चर्चा झाली. लेख लिहिले गेले. त्यांतील वादांचे-मतभेदांचे जे ठळक मुद्दे आहेत, ते असे : शुद्धलेखनाची व्याप्ती व प्रमाणविवेक, वर्ण-लिपिविचार, अनुस्वार, जोडाक्षरलेखन, ऱ्हस्व-दीर्घ इ. मराठी शुद्धलेखन परंपरेत परंपरावादी आहेत तसेच सुधारणावादी किंवा परिवर्तनवादीही आहेत. एकप्रमाणवादी आहेत तसेच बहुप्रमाणवादी आहेत. शास्त्रवादी आहेत तसेच व्यवहारवादी किंवा तडजोडवादी आहेत. मराठीच्या पारंपरिक शुद्धलेखनात ‘उच्चारण’ हे प्रमाण कमी-अधिक व्याप्तीने अनुसरण्यात आलेले दिसते. त्याची व्याप्ती वाढवून रूढ लेखनात बदल करण्याचा जेव्हा-जेव्हा प्रयत्न झाला, तेव्हा-तेव्हा हे प्रमाण बहुप्रमाणवाद्यांच्या टीकेचे लक्ष्य बनले. मराठीचे शुद्धलेखन ठरवताना उच्चार हे एकमेव प्रमाण असू नये; तर व्याकरण, व्युत्पत्ती, रूढी यांचाही विचार व्हावा, अशी भूमिका घेणारे अभ्यासक आरंभीच्या काळात होते, तसे ते आजही आहेत. सत्त्वशीला सामंत व्याकरणसिद्ध अनुस्वारांचा आग्रह धरताना उच्चारानुसार लेखन ह्या तत्त्वाऐवजी शुद्धलेखनानुसार उच्चार ह्या तत्त्वाचा पुरस्कार करतात. दिवाकर मोहनी व्याकरण आणि परंपरा यांना महत्त्व देऊन जुन्या शुद्धलेखनाचा पक्ष घेतात. द. न. गोखले ह्यांनी आपल्या ‘शुद्धलेखन-विवेक’ (१९९३) ह्या ग्रंथात मराठीच्या शुद्धलेखनाच्या तात्त्विक चर्चेसह महामंडळकृत नियमांची समीक्षा करून परिवर्धित नियम सादर केले. मराठी भाषकांना शुद्धलेखनाचा चांगला परिचय व्हावा याकरिता शुद्धलेखनाच्या कार्यशाळा घेणारे अरुण फडके यांच्याकडे नव्या पिढीचे अभ्यासक म्हणून पाहता येईल. डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तयार केलेला मराठी लेखन-कोश उपयुक्त आहे. प्रचलित शुद्धलेखन समजून सांगण्याचे काम ते करीत असले, तरी मराठीच्या शुद्धलेखनाबाबत त्यांची स्वत:ची एक दृष्टी आहे. ऱ्हस्व-दीर्घाच्या नियमांतील तत्सम-तद्भव भेद मिटावा, असे अरुण फडके यांना वाटते. अलीकडेच जाहीर झालेल्या सांस्कृतिक धोरणातही मराठीच्या लेखनपद्धतीत काळानुरूप बदल करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सरकारकडून दोन आशादायक घटना घडल्या. त्या म्हणजे, राजभाषा मराठी विभागाची स्थापना व राज्याचे भाषाविषयक धोरण ठरवण्यासाठी न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली भाषा सल्लागार समितीची स्थापना. आजवर मराठी साहित्य महामंडळ मराठीच्या शुद्धलेखनाची जबाबदारी सांभाळत होते. आता ही जबाबदारी स्वाभाविकपणे राज्याच्या भाषा सल्लागार समितीकडे व राज्य मराठी विकास संस्थेकडे आली आहे.
मराठी भाषा आणि मराठी शुद्धलेखन - सद्य:स्थिती
शुद्धलेखनाच्या चर्चेकडून आता एका व्यापक विषयाकडे, किंबहुना समस्येकडे वळू या. मराठी भाषा आणि मराठी शुद्धलेखन यांच्या सद्य:स्थितीचा विचार करताना, यांपैकी कोणाची स्थिती अधिक वाईट आहे असा प्रश्न पडावा, अशी परिस्थिती आहे. हे मत कोणाला निराशाजनक किंवा अवास्तवही वाटेल. परंतु, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या आघाड्यांवर प्रत्यक्ष काम करताना जो अनुभव घेतला-घेत आहे, त्यातून बनलेले हे मत आहे, हे नम्रपणे सांगू इच्छितो. कधी तरी मराठी भाषेच्या वास्तवाला सामोरे जावेच लागणार आहे. तेव्हा मराठीची समस्या नाकारण्यापेक्षा तिचा समग्रपणे शोध घेऊन काही कृती करता येते का, ते पाहिले पाहिजे.
आज महाराष्ट्रात मराठी भाषेची स्थिती काय आहे? इंग्रजीच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी शिकण्या-शिकवण्याच्या प्रेरणा क्षीण होत चालल्या आहेत. मराठी ही आपल्या समाजाची भावनिक व सांस्कृतिक गरज असली, तरी ती आर्थिक गरज राहिलेली नाही. मराठी शाळा बंद पडत आहेत. एका बाजूला अनुदानप्राप्त मराठी शाळा पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरत आहेत, तर दुसऱ्या बाजूला खासगी इंग्रजी शाळा व त्यांची पटसंख्या वाढत आहे. समाजाचा इंग्रजी शाळांकडचा हा कल लक्षात घेऊन शासनानेही नवीन मराठी शाळांना स्थगिती, तर इंग्रजी शाळांसाठी पायघड्या, असे धोरण स्वीकारले आहे. जणू मराठी समाजाचा आधी शालेय स्तरावर व मग इतर स्तरांवर मराठीकडून इंग्रजीकडे प्रवास सुरू झाला आहे. हा भाषापालट (Language Shift) अस्वस्थ करणारा आहे.
व्यवहारात सक्ती आणि संधी यांच्या अभावामुळे मराठी भाषेचे सार्वत्रिक अवमूल्यन होत आहे. स्वभाषाविषयक मूल्यभावाची जागा भाषानिरपेक्ष उपयुक्ततावादाने घेतली आहे. परिणामी, मराठीच्या प्रामाण्याविषयी एके काळी असलेले गांभीर्य आज राहिलेले दिसत नाही. उलट, प्रमाण मराठीचे अज्ञान हा इंग्रजी उच्च शिक्षित मराठी अभिजन वर्गासाठी कौतुकाने मिरवण्याचा भाग बनला आहे. शिक्षण, साक्षरता आणि संवादकौशल्य यांच्या व्याख्या आज इंग्रजीधार्जिण्या झालेल्या आहेत. शिक्षण म्हणजे इंग्रजीचे ज्ञान, साक्षरता म्हणजे इंग्रजी लिहिता-वाचता येणे आणि संवादकौशल्य म्हणजे अस्खलित इंग्रजी बोलणे होय, अशी समाजधारणा बनत आहे. मराठी माध्यमातून उच्च शिक्षित, पण इंग्रजी न येणारा मनुष्य भविष्यात अडाणी गणला जाण्याचीही शक्यता आहे. इंग्रजी किंवा मराठी ह्या विषम माध्यमभेदाने सामाजिक व आर्थिक दरी रुंदावण्याचीच शक्यता अधिक आहे. व्यावसायिक शिक्षणाच्या क्षेत्रात सामाईक परीक्षा - सामाईक अभ्यासक्रम आणि सामाईक माध्यम, असा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे भविष्यात मराठीच्या अभ्यासाचे क्षेत्र विस्तारण्याऐवजी आकुंचित पावण्याची शक्यता अधिक वाटते. मराठी माध्यमातील शालेय व महाविद्यालयीन शिक्षण निष्फळ आहे, अशी समाजाची सर्वसाधारण धारणा बनत चालल्यामुळे मराठीला ज्ञानभाषा करण्याची आपली आकांक्षा दिवास्वप्न ठरणार आहे. ज्ञानभाषा म्हणून इंग्रजी आणि मराठी यांच्यातील अंतर वाढतच चालले आहे.
दुसऱ्या बाजूला मराठीच्या शुद्धलेखनाचे सुलभीकरण करण्याची तसेच ते बहुजनसन्मुख करण्याची मागणी होत आहे. असा आग्रह इंग्रजीच्या संदर्भात कोणी धरत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे. मराठी शुद्ध लिहिणे - बोलणे इंग्रजीपेक्षा कठीण आहे, अशा अफवा काही लोक पसरवत असतात. मराठीचे शुद्धलेखन सोपे केले म्हणजे मराठीची स्थिती सुधारेल, असेही काहींना वाटते. खरी गोष्ट अशी आहे की, कोणतीही भाषा खूप सोपी किंवा खूप कठीण नसते. ह्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष व प्रेरणासापेक्ष आहेत. मराठी भाषा व मराठी शुद्धलेखन दोन्हीही व्यवहारात प्रयोजनशून्य होत आहेत, ही खरी समस्या आहे. तरीही मराठी भाषा आणि मराठी शुद्धलेखन यांच्यापैकी आधी काय वाचवायचे हा प्रश्न उरतोच. मराठीच्या प्रमाण वापराविषयीची सार्वत्रिक अनास्था ही मराठी भाषेच्या दुरवस्थेचे लक्षणही आहे आणि परिणामही. तेव्हा बुडणाऱ्या व्यक्तीची टोपी सरळ करण्याआधी तिचा जीव वाचवणे, ही अग्रक्रमाने करण्याची गोष्ट आहे एवढे नक्की!
समाजात भाषेच्या प्रामाण्याविषयी अनास्था असणे, शुद्धलेखनाविषयी विधिनिषेध नसणे हे संबंधित भाषेच्या ढासळत्या स्थानाचे, मरणासन्नतेचे एक लक्षण मानले जाते. भाषेच्या वापरातील सोपेपणा किंवा काठिण्य वर सांगितल्याप्रमाणे ती भाषा वापरण्याच्या व वापरणाऱ्यांच्या प्रेरणांवर अवलंबून असते. भाषा-वापरामागे प्रबळ प्रेरणा नसतील, तर तिच्या उच्चारित अथवा लेखनव्यवहाराकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. मराठी आणि इंग्रजी भाषाव्यवहारांची तुलना केली असता आपल्या हे लक्षात येईल. सरकारी, निमसरकारी कार्यालयांतील माहिती-फलक, सार्वजनिक ठिकाणी असलेल्या पाट्या, जाहिराती, सूचना-फलक यांतील मराठीचा वापर पाहिला, की मराठीत शुद्धलेखन नावाची गोष्ट इतिहासजमा झाली आहे, असे वाटते. एखाद्या इंग्रजी शब्दाचे स्पेलिंग चुकले तर जी अपराधी भावना वाटते अथवा निर्माण केली जाते, ती मराठीबाबत वाटत नाही. मध्यंतरी एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनी इंग्रजीत लिहिलेल्या पत्रात काही शब्द अशुद्ध होते, त्यावर एका इंग्रजी वर्तमानपत्राने पहिल्या पानावरची बातमी केली होती. ह्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांच्या मराठी पत्रव्यवहारातील मराठी शुद्धलेखन कोणी पाहिले, तर निश्चितपणे वर्तमानपत्रांचे विशेषांक काढावे लागतील. जणू उच्चार व लेखनप्रामाण्य हे केवळ इंग्रजीसाठी आहे, मराठीसाठी नाही. शब्दोच्चार, शब्दलेखन आणि वाक्यरचना या तिन्ही आघाड्यांवर मराठीचा स्वैर वापर होताना दिसतो. एके काळी प्रमाण मराठीच्या प्रसारात व नवीन मराठी शब्द घडवून ते रूढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रसारमाध्यमांचे (विशेषत: इलेक्ट्रॉनिक) - आजचे इंग्रजीमिश्रित मराठी, लिहिण्याबोलण्यातील सदोष वाक्यरचना - सुधारणे शब्दलेखनापुरत्या सीमित असलेल्या प्रचलित शुद्धलेखनाच्या कक्षेबाहेरचे आहे. त्यासाठी शुद्धलेखनाऐवजी व्याकरण आणि शुद्धलेखन दोन्हींची गरज आहे.
मराठीच्या शुद्धलेखनाविषयीच्या ह्या वाढत्या अनास्थेला मराठी शिकण्यामागे इंग्रजीप्रमाणे प्रबळ प्रेरणा नाही हे जसे कारण आहे, तसेच शुद्धलेखनाच्या प्रशिक्षणाचा व मार्गदर्शक साधनांचा अभाव हेही आहे. मराठीच्या शुद्धलेखनाच्या तपशिलाबाबत मतभेद असू शकतात. परंतु, एकदा एखादी शुद्धलेखन-नियमावली तज्ज्ञ समितीने तयार केल्यानंतर तिचे समाजाच्या सर्व घटकांकडून यथोचित पालन होण्यासाठी काही यंत्रणा असावी लागते. अभ्यासाची साधने निर्माण करावी लागतात. मराठीचे शुद्धलेखन हे प्राय: उच्चारानुसारी असले, तरी ते समग्रपणे सर्वांपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था केली पाहिजे. मराठीचे प्रचलित शुद्धलेखन हे या दृष्टीने अव्याप्त आहे. मराठीचे सर्व क्षेत्र प्रचलित नियमांनी व्यापलेले नाही. तसे ते होणे अवघडही असते. कारण, भाषाव्यवहारात नियम असतात त्याप्रमाणे त्यांना अपवाद, प्रत्यपवाद व विकल्पही असतात. साहित्य महामंडळाने केलेल्या अठरा नियमांच्या द्वारा मराठीच्या लेखनव्यवहाराचे नियमन करणे, हा उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार आहे. ह्या शुद्धलेखनाच्या जोडीने मराठीमध्ये प्रमाण उच्चार व लेखनकोशांची आवश्यकता आहे. इंग्रजीप्रमाणे अशा कोशांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करून ते घराघरांत पोहोचवण्याची गरज आहे. मराठीचा संगणकावर वापर करताना, इंग्रजीप्रमाणे स्पेल चेकर अर्थात शुद्धलेखन तपासणीसाची/मार्गदर्शकाची सोय उपलब्ध करून देण्याचीही आवश्यकता आहे. प्रमाण भाषा, शुद्धलेखन या गोष्टी समाजाच्या निकोप बौद्धिक व्यवहारासाठी व वाढीसाठी उपयुक्तच नव्हे, तर आवश्यकही असतात. म्हणूनच त्या शिकाव्या लागतात. त्यांची सवय करून घ्यावी लागते. शुद्धलेखनविषयक अनास्था किंवा लेखनविषयक प्रामाण्य ठरवण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य भाषिक अराजकाकडे नेणारे आणि अंतिमत: संप्रेषणाच्याच मुळावर येणारे आहे. परंतु, मराठी शुद्धलेखनाची चाड व प्रतिष्ठा ही शेवटी मराठी समाजाचे मराठी भाषेशी काय नाते आहे, समाजाला मराठी भाषेची कोणकोणत्या व्यवहारांसाठी किती गरज आहे, यांवर अवलंबून आहे. ती नसेल तर शुद्ध काय आणि अशुद्ध काय, दोन्ही एकच.
डॉ. प्रकाश परब
(लेखक ज्येष्ठ भाषाभ्यासक आणि मराठी अभ्यास केंद्राचे संस्थापक सदस्य आहेत.)
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मराठी भाषा
, शुद्धलेखन
, डॉ. प्रकाश परब
, मराठी अभ्यास केंद्र