प्रमाण मराठी आणि बोली


एम.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना प्रबंध सादर करायचा होता. विषय होता, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मराठी भाषाविषयक समस्यांचा अभ्यास करणे व त्यावर उपाययोजना सुचविणे. यात 'तुमच्या बोलीभाषेत शिक्षण मिळाले तर आवडेल का?' या प्रश्नाचं उत्तर ११५ विद्यार्थ्यांपैकी ९९ विद्यार्थ्यांनी  होकारार्थी, तर १६ विद्यार्थ्यांनी नकारार्थी दिलं. कुटुंबात बोलीभाषा आणि शाळेत प्रमाणभाषा यामुळे तुमचा गोंधळ उडतो का?’ याही प्रश्नाच्या उत्तरात एकूण ११५ विद्यार्थ्यांपैकी ८२ विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो, तर ३३ विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत नाही, असं आढळून आलं. या विद्यार्थ्यांना असं का वाटतंयाचा विचार व्हायला हवा.” - गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयातील मराठीचे शिक्षक शंकर बळी यांची प्रमाण मराठी आणि बोली याविषयीची विश्लेषणात्मक मांडणी -
चाळीस वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा मी सहावीत वगैरे असेन. माझ्या गावातली बायजाबाई (नाव बदलले आहे) एक कागद घेऊन माझ्याकडे आली. कागद पुढे करून वाचून दाखव म्हणाली. बापरे! इंग्रजीत लिहिलंय. काय वाचणार? कसं वाचणार? मला घाम फुटायचा अवकाश... "कोरटाचा कागुद हाय." बायजाबाईनंच माहिती पुरवली. नवर्‍यानं सोडून दिलेली बायजाबाई. न्यायालयानं काय लिहून दिलंय, ते ना मी वाचून दाखवू शकत होतो, ना तिला काही समजत होतं. सार्‍या गावाची तीच गत. तेच जर मराठीत लिहिलेलं असतं तर...
आज माझ्या गावात जिल्हा परिषदेची सातव्या वर्गापर्यंत शाळा आहे. तालुक्याच्या शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेलं माझं गाव. आपल्या मुलानं तालुक्याच्या शहरातून चांगलं शिक्षण घ्यावं असं आधीपासूनच पालकांना वाटतंय. पूर्वी मराठी शाळांमध्ये नि आता तर इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मुलं जातात, रिक्षानं ये- जा करतात, रोजच्या रोज. असं का घडतंय?
मी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकलो, आदिवासी आश्रम शाळेत. इंग्रजी तसं जेमतेमच, पण त्यामुळे माझं काहीच बिघडलं नाही. तरीही इंग्रजी येत नसल्यामुळे परिणाम करणारे घटक काही कमी नाहीत. मराठी भाषेचा मराठी माध्यमाच्या शाळेत शिक्षक आहे. शाळा बंद होईल, नोकरी वगैरे जाईल म्हणून नव्हे, तर मराठीवर प्रेम करणारा म्हणून काही गोष्टी व्यक्त कराव्याशा वाटतात, म्हणून हा प्रपंच.
मला जे काही मांडायचं आहे, त्याला ऐतिहासिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. तसा मराठी भाषेच्या अस्तित्वाचा संघर्ष हा आजचा आहे, असं मात्र मुळीच नाही. ज्ञानेश्वरांच्या काळात देवा-धर्माच्या बाबतीत संस्कृत भाषेला अधिक महत्त्व होतं. धर्मातल्या गोष्टी आम्हीच इतरांना सांगाव्यात आणि बहुजनांनी त्या ऐकाव्यात असा जो हेका होता, त्यामुळे बहुजनांची प्राकृत(मराठी) भाषा म्हणजे लोकभाषा नि अल्पजनांची संस्कृत भाषा म्हणजे देवभाषा, अशी उभी विभागणी झाली होती. धार्मिक व्यवहाराची भाषा ती महत्त्वाची अशी समजूत होती. याला छेद देण्याचं कार्य अनेक संतांनी केलं. ‘माझा मराठाचि बोलु कवतिके। परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।’ असं संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. संत चक्रधरांनी तर बोलणं-लिहिणं सारं काही लोकभाषेतून म्हणजे प्राकृत(मराठी) भाषेतूनच संवाद साधण्याविषयी आपल्या शिष्यांना दंडकच घालून दिला होता. म्हणून तर आद्य चरित्रकार म्हाइंभट आणि आद्य कवयित्री महदाईसा उर्फ महदंबा मराठी भाषेत मानाचा तुरा खोवणारे ठरले. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभारासाठी लोकभाषा मराठीलाच प्राधान्य दिलं.
महाराष्ट्राच्या भौगोलिक स्थानामुळेही मराठीपणावर बाधा येते. आपण ना उत्तर भारतात ना दक्षिण भारतात. 'आई जेवू घालीना आणि बाप भिक मागू देईना' अशी गत. दक्षिण भारतात प्रांतीय भाषिक चळवळ तशी अजूनही मजबूत; द्राविडी संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारी. उत्तर भारतातील भाषिक चळवळ ही वैदिक भाषिक चळवळीशी नातं जोडणारी. स्वातंत्र्योत्तर भारतात हिंदी भाषेला राष्ट्रभाषा करण्याचे धोरण दक्षिणेकडील द्राविडी भाषा समूहांनी कधीच मान्य केलं नाही. याउलट परिस्थिती महाराष्ट्रात राहिलेली आहे. मराठी आणि हिंदी या देवनागरी लिपी असलेल्या भाषा भगिनी असल्यामुळे मावशीला कसं अंतर द्यायचं, हे आपलं धोरण. येथे कोणत्याही भाषेचा द्वेष करण्याचा मुद्दाच नाही. पण 'तेरेकू, मेरेकू' म्हणणार्‍या आम्हांला हिंदी तरी कुठे अवगत आहे? दुसरीकडे दक्षिणेकडचे आम्हांला 'भीक' घालत नाहीत अन् उत्तरेकडचे 'आपलं' म्हणत नाहीत. तरी आमचं तोंड मात्र हिमालयाकडेच. म्हणून तर महाराष्ट्रात हिंदी चित्रपटांची चलती, तर मराठी चित्रपटांना पडदे शोधावे लागतात.
महाराष्ट्रात प्रादेशिक आणि जाती-जमातींच्या बोलीभाषा खूप आहेत, नव्हे त्या लोप पावण्याच्या मार्गावर आहेत. मालवणी, वर्‍हाडी, खानदेशी, झाडी यांसारख्या प्रादेशिक बोली; तर गोंडी, भिली, आगरी, वडारी यांसारख्या जाती-जमातींच्या बोली. बोली भाषांचा म्हणावा तसा अभ्यास आम्ही केलाच नाही. आमची मराठी भाषा समृद्ध झाली ती अनेक परभाषांमुळे, हे जर वास्तव आम्ही स्वीकारत असू, तर मग आमच्याच बोलीभाषांनी मराठीला सजवण्यात कसली अडचण असावी? पण अडचणी आहेत, हे सत्य आहे.
बोलण्यात बोलीभाषांमधील दोन-तीन शब्द आले तरी 'गावंढळ' असल्याचे शिक्के माथी मारले जातात. बोलण्यातल्या आशयापेक्षा अशा शब्दांची चर्चा जास्त होते. याउलट, एकूण बोलण्यात चाळीस-पन्नास टक्के इंग्रजी शब्द आले तरी त्याला भेसळ म्हटलं जात नाही, तर  'ज्ञानवंताचं बोलणं' समजलं जातं. फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्याला ती भाषा उत्कृष्ट बोलणारा न समजता ‘प्रज्ञावंत’ म्हणून गौरव केला जातो.
वर्गात बोली भाषेत संवाद साधणारा एखादा विद्यार्थी दाखल झाला, तर शिक्षकांसहित सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्याशी जवळीक साधून त्याची भाषा शिकायला पाहिजे. त्यामुळे सर्वांची भाषा समृद्ध होईल नि त्या विद्यार्थ्यालाही स्वतःच्या बोलीभाषेचा अभिमान वाटेल. हे फक्त वर्गातच नाही तर स्टाफ रूममध्ये, कार्यालयात सगळीकडे घडायला हवं. पण घडतं मात्र उलटंच.
खरं तर एखाद्या भाषेत एका शब्दाची अनेक रूपं असू शकतात, नव्हे असावीत. त्यामुळेच तर ती भाषा अधिक समृद्ध होते. उदाहरणार्थ, 'मला' हा मराठीतला प्रमाण शब्द. त्याचे वर्‍हाडी व खानदेशी 'मले', पुणेरी 'माला' नि मालवणी 'माका' हे रूप. पण यांचं आम्ही अप्रमाण, अशुद्ध असं नामकरण केलं. बरं येथेही दुजाभाव केला. 'मले' नि 'माका' गावंढळ तर 'माला' मात्र प्रतिष्ठित. मुंबईत ज्या भाजीला पत्ताकोबी (म्हणजे फूलकोबीची बहीण) म्हणतात, तिला विदर्भात पानकोबी म्हणतात. ‘पान’ हा शुद्ध मराठी शब्द, तर ‘पत्ता’ हा हिंदी शब्द. पण मग पत्ताकोबी शब्द मराठीत चालणार असेल, तर विदर्भातून मुंबईत आलेल्यांचे हिंदी शब्द चालायला हवेत, पण तसं घडत नाही. मुळात विदर्भात मुघलांचं राज्य असणं, हिंदी पट्टा लागून असणं, १९६०च्या आधी मध्यप्रदेशाचा काही भाग व महाराष्ट्रातील विदर्भ मिळून मध्यप्रांत नि त्याची राजधानी नागपूर असणं. या सर्व कारणांमुळे विदर्भातल्या वर्‍हाडीत हिंदी शब्दांचं प्राबल्य आहे. म्हणूनच मुंबईतील विदर्भातल्यांची मराठी भाषा हिंदीयुक्त असते. समाजात हसणार्‍यांची संख्या जास्त असल्यामुळे हे भाषिक समूह आपलं हसं टाळण्यासाठी सरळ मराठीऐवजी हिंदीचाच अधिक आश्रय घेतात. असं असेल तर मराठी वाढणार कशी? असं अनेक नगरा-महानगरांमध्ये अनेक बोली भाषांच्या बाबतीत घडत नसेल कशावरून?
एम.एड.चा (सन २०१२- १४) अभ्यासक्रम पूर्ण करत असताना प्रबंध सादर करायचा होता. विषय होता, आदिवासी विद्यार्थ्यांच्या मराठी भाषाविषयक समस्यांचा अभ्यास करणे व त्यावर उपाययोजना सुचविणे. यात 'तुमच्या बोलीभाषेत शिक्षण मिळाले तर आवडेल का?' या प्रश्नाचं उत्तर ११५ विद्यार्थ्यांपैकी ९९ विद्यार्थ्यांनी  होकारार्थी, तर १६ विद्यार्थ्यांनी नकारार्थी दिलं. ‘कुटुंबात बोलीभाषा आणि शाळेत प्रमाणभाषा यामुळे तुमचा गोंधळ उडतो का?’ याही प्रश्नाच्या उत्तरात एकूण ११५ विद्यार्थ्यांपैकी ८२ विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो, तर ३३ विद्यार्थ्यांचा गोंधळ उडत नाही, असं आढळून आलं. या विद्यार्थ्यांना असं का वाटतं, याचा विचार व्हायला हवा. त्यांचा शाळेत गोंधळ तर होतोच, पण भाषेच्या अडचणीमुळे ही मुलं अभ्यासातही मागे पडतात, शिवाय त्यांच्यावर 'गावंढळ' असल्याचा शिक्का बसतो.
यातून  विद्यार्थ्यांना ना आनंददायी शिक्षण मिळतं, ना मराठी भाषेचं संवर्धन होतं. ते व्हायचं असेल तर बोलीभाषांचा आणि ती बोलणाऱ्यांचा आदर करायला पाहिजे. त्यामुळे वरील दोन समस्या तर सुटतीलच, पण बोलीभाषांमधील साहित्यिक व सांस्कृतिक ठेव्याचेही संवर्धन होईल. आनंदाची बाब म्हणजे, विविध बोली आणि प्रमाणभाषा यांच्यात अनुवादाच्या रूपाने सेतू उभा करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आज गरज आहे अशा प्रयत्नवाद्यांना राजकीय-सामाजिकदृष्ट्या बळ देण्याची, मानसन्मान देण्याची.
कोणत्याही भाषेचे दोन भाग असतात; एक अक्षरे नि दुसरे म्हणजे अंक. भाषेची लिपी या दोन्ही घटकांनी परिपूर्ण होत असते, म्हणून हे दोन्हीही घटक महत्त्वपूर्ण असतात. पण, सध्याच्या मराठी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांचं काय करायचं? मराठी माध्यमाच्या गणित व विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात मराठी अंकांऐवजी इंग्रजी अंक आहेत. या इंग्रजी अंकांचं स्थान मग सदर विषयांपुरतंच सीमित राहत नाही, तर मराठीतही त्यांचं आक्रमण होतं. पत्रलेखनातल्या तारखा असू देत की आणखी काही; सर्व स्थानी इंग्रजी अंक विराजमान होत आहेत.
या सर्व बाबींमुळे मराठी ही लोकभाषा ज्ञानभाषा कशी होणार?  कथनी व करणीत फरक असेल तर मंडळे स्थापन करा की आणखी काही, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? मराठीला ज्ञानभाषा करायचं तर भाषाधोरण आणि त्याची अंमलबजावणी हातात हात घालून चालायला हवेत; एवढीच अपेक्षा आहे!
शंकर बळी
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयात मराठीचे अध्यापक आहेत.)
संपर्क - 
 ९८६९९११२०४

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


प्रमाण भाषा , बोली भाषा , मराठी , शंकर बळी , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Sudam Kumbhar

      3 वर्षांपूर्वी

    थोडक्यात, मातृभाषा किंवा बोलीभाषा हे शिक्षणाचे माध्यम प्रभावी ठरू शकते 👍🏻 महाराष्ट्राच्या विविध वाड्या-वस्त्या आणि आदिवासी भागात मराठी प्रमाण भाषा समजायला कठीणच वाटते. माहितीपूर्ण लेख.

  2. Sudam Kumbhar

      3 वर्षांपूर्वी

    थोडक्यात, मातृभाषा किंवा बोलीभाषा हे शिक्षणाचे माध्यम प्रभावी ठरू शकते 👍🏻 महाराष्ट्राच्या विविध वाड्या-वस्त्या आणि आदिवासी भागात मराठी प्रमाण भाषा समजायला कठीणच वाटते. माहितीपूर्ण लेख. सुदाम कुंभार.

  3. Sudam Kumbhar

      3 वर्षांपूर्वी

    थोडक्यात, मातृभाषा किंवा बोलीभाषा हे शिक्षणाचे माध्यम प्रभावी ठरू शकते 👍🏻 महाराष्ट्राच्या विविध वाड्या-वस्त्या आणि आदिवासी भागात मराठी प्रमाण भाषा समजायला कठीणच वाटते. माहितीपूर्ण लेख. सुदाम कुंभार.

  4. Sudam Kumbhar

      3 वर्षांपूर्वी

    थोडक्यात, मातृभाषा किंवा बोलीभाषा हे शिक्षणाचे माध्यम प्रभावी ठरू शकते 👍🏻 महाराष्ट्राच्या विविध वाड्या-वस्त्या आणि आदिवासी भागात मराठी प्रमाण भाषा समजायला कठीणच वाटते. माहितीपूर्ण लेख. सुदाम कुंभार.

  5. Sudam Kumbhar

      3 वर्षांपूर्वी

    थोडक्यात, मातृभाषा किंवा बोलीभाषा हे शिक्षणाचे माध्यम प्रभावी ठरू शकते 👍🏻 महाराष्ट्राच्या विविध वाड्या-वस्त्या आणि आदिवासी भागात मराठी प्रमाण भाषा समजायला कठीणच वाटते. माहितीपूर्ण लेख. सुदाम कुंभार.

  6. Sudam Kumbhar

      3 वर्षांपूर्वी

    थोडक्यात, मातृभाषा किंवा बोलीभाषा हे शिक्षणाचे माध्यम प्रभावी ठरू शकते 👍🏻 महाराष्ट्राच्या विविध वाड्या-वस्त्या आणि आदिवासी भागात मराठी प्रमाण भाषा समजायला कठीणच वाटते. माहितीपूर्ण लेख. सुदाम कुंभार.

  7. Sudam Kumbhar

      3 वर्षांपूर्वी

    थोडक्यात, मातृभाषा किंवा बोलीभाषा हे शिक्षणाचे माध्यम प्रभावी ठरू शकते 👍🏻 महाराष्ट्राच्या विविध वाड्या-वस्त्या आणि आदिवासी भागात मराठी प्रमाण भाषा समजायला कठीणच वाटते. माहितीपूर्ण लेख.

  8. Sudam Kumbhar

      3 वर्षांपूर्वी

    थोडक्यात, मातृभाषा किंवा बोलीभाषा हे शिक्षणाचे माध्यम प्रभावी ठरू शकते 👍🏻 महाराष्ट्राच्या विविध वाड्या-वस्त्या आणि आदिवासी भागात मराठी प्रमाण भाषा समजायला कठीणच वाटते. माहितीपूर्ण लेख.

  9. Yogesh Bhavsar

      3 वर्षांपूर्वी

    लेख आवडला



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen