संशोधनासाठी गगनभरारी


“त्या वेळेस रविवारी चित्रकलेच्या तावडेबाई आमच्या एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग सर्टिफिकेट परीक्षेचे क्सासेस घ्यायच्या. आता अमेरिकेत रिसर्च करताना जसं स्वातंत्र्य आहे, तसं चित्रकलेच्या त्या तासाला आम्हांला पूर्ण मोकळीक मिळायची. एकदा मोबाइल कॅमेऱ्याने आम्ही ग्राऊंडवर फिरून फिरून खूप फोटो काढले. तावडेबाईंना ते एवढे आवडले, की त्यांनी ते फोटो प्रिंट आणि लॅमिनेट करून शाळेमध्ये पहिलं फोटो एक्झिबिशन भरवलं. पुढे पुढे आशाताई गवाणकर प्राथमिक शाळेत आम्ही वॉल पेंटिंगसारखे यशस्वी आणि सुंदर प्रयोग केले.” गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालय या उपक्रमशील शाळेचा विद्यार्थी – सागर कासार - अमेरिकेतील आपल्या शिक्षणाविषयी सांगतोय -
मी नंदादीप शाळेमधील एक सामान्य विद्यार्थी, २०१२ साली शालेय परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर ‘पुढे काय करायचं?’ हा प्रत्येकाच्या मनात असणारा प्रश्न माझ्याही मनात होता. शाळेत असताना विज्ञान विषय माझ्या फार आवडीचा आणि म्हणून त्याच शाखेत जाण्याचा मी निर्णय घेतला. सुरुवातीला केवळ आवड म्हणून निवडलेल्या या क्षेत्रात, पुढे वैज्ञानिक रहस्यांविषयी असणाऱ्या कुतूहलापोटी कायमचे शिकणे झाले. मुंबईमधील रुईया कॉलेजमध्ये मी बायोटेक्नॉलॉजी विषयात बीएससीचे पदवी शिक्षण पूर्ण केले. मूलभूत वैज्ञानिक रिसर्चसाठी भारतामधील मर्यादित संधी लक्षात घेऊन पुढील शिक्षणासाठी मी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तेथील ‘इंडियन युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया’ या संस्थेत ‘डेव्हल्पमेंट बायोलॉजी अँड रीजेनरेटिव्ह मेडिसिन’ म्हणजेच एका पेशीपासून अत्यंत गुंतागुंतीचा अवयव कसा तयार होतो, हा अभ्यास करणाऱ्या शाखेमध्ये एमएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. सध्या मी अमेरिकेतील व्हर्जिनिया युनिव्हर्सिटी या नामांकित संस्थेत न्यूरोबायोलॉजी म्हणजे आपल्या मेंदूचे कार्य कसे चालते हा अभ्यास करणाऱ्या शाखेत पीएचडी करत आहे. परदेशात शिक्षणासाठी जाताना सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो पैशांचा. तिथे संधी जरी अनेक असल्या तरी शिक्षण बऱ्यापैकी महागडं आहे. परंतु परदेशामध्ये शैक्षणिक शिष्यवृत्ती दिल्या जातात. एखाद्या विषयामध्ये विद्यार्थ्यांची आवड आणि गुणवत्ता या आधारावर त्या दिल्या जातात. त्यामुळे आपल्यासारखे सामान्य घरांमधून येणारे विद्यार्थीसुद्धा या शिक्षणापासून वंचित राहत नाहीत. अमेरिकेत शिक्षणासाठी जाण्यापूर्वी इंग्रजी भाषा किती अवगत आहे हे तपासणारी TOEFL आणि सामान्य शैक्षणिक पातळी तपासणारी GRE या परीक्षा द्याव्या लागतात. याशिवाय प्रवेशासाठी विविध विद्यापीठांचे वेगळे निकष असू शकतात आणि त्या विषयीची संपूर्ण माहिती त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असते. विज्ञान म्हणजे माणसाच्या नैसर्गिक कुतूहलाची भाषा आणि ती अगणित प्रश्नांकडे शास्त्रीय पद्धतीने पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याला देते. अमेरिकेमध्ये पीएचडी पूर्ण करण्याचा कोणताही ठरावीक कालावधी नाही, पण साधारणपणे पाच वर्षांमध्ये हे शिक्षण पूर्ण होते. महत्त्वाची बाब म्हणजे हे शिक्षण घेत असताना विद्यार्थी-शिक्षक हे नाते तेथे नसते, तर प्रत्येक जण हा सहकारी वैज्ञानिक म्हणून काम करत असतो. अमेरिकन शिक्षणव्यवस्थेत ‘रिसर्च इंडिपेडन्स’ म्हणजे कुणाच्याही प्रभुत्वाखाली न राहता आपल्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार वैज्ञानिक प्रश्न सोडवण्याचा प्रत्येकाला मोकळेपणा देणे, याला अत्यंत महत्त्व आहे. अनेकदा वैज्ञानिक प्रयोग हे अत्यंत महाग असतात आणि ते यशस्वी होण्याची शाश्वतीही नसते. म्हणून प्रयोगांसाठी सुरक्षित निधी उपलब्ध असावा लागतो. पाश्चात्त्य देशांमध्ये तो मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो, जो पुढे वैज्ञानिक आणि त्यांच्या प्रयोगांसाठी वितरित केला जातो. दरवर्षी विज्ञानाच्या विविध शाखांमध्ये सर्वोच्च कार्य करणाऱ्या वैज्ञानिकांचा नोबेल पारितोषिक देऊन गौरव केला जातो. काही अपवाद वगळता यामध्ये ठरावीक देशातील वैज्ञानिकांचाच दबदबा असतो. विज्ञानाच्या संधी, वातावरण, विज्ञानासाठी उपलब्ध असणारा निधी, वैज्ञानिकांना मिळणारा कामाचा मोबदला आणि गौरव इत्यादी अनेक गोष्टींची काळजी या देशांमध्ये घेतली जाते. या सर्व गोष्टी विचारात घेऊन तसेच शैक्षणिक शिष्यवृत्तीच्या आधारे मी अमेरिकेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. एक महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या भारतानेही या क्षेत्रात प्रगती केली असून आपल्याकडेही आता अनेक संधी उपलब्ध आहेत आणि आपल्या अनेक संस्था आज जागतिक दर्जाच्या आहेत.
गेली तीन वर्षे मी अमेरिकेत राहत आहे. आपण जेव्हा अमेरिकेचा विचार करतो, त्यावेळी काही ठरावीक शहारंचा विचार करतो, जसे : न्यूयॉर्क. परंतु, काही अपवाद वगळता बहुतेक सुप्रसिद्ध शिक्षण संस्था या अमेरिकेच्या छोट्या शहरांमध्ये स्थित आहेत. या संस्थांकडे पुष्कळ जमीन आणि मुबलक निधी उपलब्ध असतो, त्यामुळे संपूर्ण शहरभर त्या पसरलेल्या असतात, ज्याला कॅम्पस असेही म्हणतात. कॅम्पसमध्ये सर्व प्रकारच्या शिक्षणाची आणि सोयी-सुविधांची व्यवस्था असते. एकाच शिक्षण संस्थेत आर्टस अँड सायन्स, मेडिकल इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, बिझनेस इत्यादी शांखांची व्यवस्था असते; त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण पद्धतशीरपणे होते. मी माझ्या युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॅम्पसमध्ये शिक्षण घेतो. ही संस्था ब्रेन रिसर्च आणि कॅन्सर रिसर्च यांसाठी अमेरिकेत प्रसिद्ध आहे. गमतीची बाब म्हणजे, युनिव्हर्सिटीचे स्वतःचे एअरपोर्टसुद्धा आहे. युनिव्हर्सिटीची स्वतःची ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, ज्यामध्ये संपूर्ण कॅम्पसमध्ये आणि शहरामध्ये सुविधा देणाऱ्या बस आणि टॅक्सी यांची मोबाइल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. सर्वांसाठी या सुविधा मोफत असतात. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे इथे लोक शिक्षणाला प्रचंड महत्त्व देतात. अमेरिकन समाजव्यवस्थेत जरी आर्थिक विषमता असली तरी विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होणार नाही याची परिपूर्ण काळजी घेतली जाते. केवळ एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील आवड आणि गुणवत्तेच्या आधारावर सर्वांसाठी शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध आहेत. तसेच कोणत्याही प्रकारचे शिक्षण कमी किंवा अधिक महत्त्वाचे नाही. भारतात पदवी शिक्षणासाठी ठरावीक नेमून दिलेले विषय घेण्याची आवश्यकता असते. अमेरिकेत काही ठरावीक आवश्यक विषय वगळता विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार इतर कोणतेही विषय घेण्याची अनुमती असते. उदाहरणार्थ, सायन्स शाखेत असणाऱा विद्यार्थी सायन्ससोबत म्युझिक, फाइन आर्टस किंवा स्पोर्टस हा विषयही घेऊ शकतो. भारतामध्ये प्रामुख्याने गुणवत्ता ही परीक्षेतील गुणांच्या आधारे ठरवली जाते आणि परीक्षा या पुस्तकांमध्ये दिलेल्या माहितीच्या आधारावर तयरा केल्या जातात. अमेरिकेतील उच्च शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणजे उपलब्ध असणाऱ्या माहितीसोबतच विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर भर दिला जातो. विद्यार्थ्यांचे पालक किंवा शिष्यवृत्ती शैक्षणिक फीची जबाबदारी घेतात. विद्यार्थ्यांचे इतर खर्च : उदाहरणार्थ, राहण्याचा, खाण्याचा इतर गरजांचा खर्च विद्यार्थी स्वतः काम करून पूर्ण करतात. ही कामं म्हणजे साधारणपणे कॅम्पसमधील विविध कार्यालये, कॅफेटेरिया, टीचिंग असिस्टंट, रिसर्च असिस्टंट इत्यादी स्वरूपात उपलब्ध होतं. यामागील मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत आर्थिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, तसेच सर्व प्रकारच्या कामांकडे समदृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन देणे हा असतो.
नंदादीप शाळेच्या अशा अनेक आठवणी आज सोबत आहेत. मित्रांसोबतची धमाल, पीटीच्या तसाला केलेली मस्ती, परीक्षांच्या वेळी टेन्शन घेऊन केलेला अभ्यास, मधल्या सुट्टीमध्ये एकत्र खाल्लेला डबा... न संपणारी यादी आहे. त्या वेळेस रविवारी चित्रकलेच्या तावडेबाई आमच्या एलिमेंटरी इंटरमिजिएट ड्रॉइंग सर्टिफिकेट परीक्षेचे क्सासेस घ्यायच्या. आता रिसर्च करताना जसं स्वातंत्र्य आहे, तसं चित्रकलेच्या त्या तासाला आम्हांला पूर्ण मोकळीक मिळायची. स्टील ड्रॉईंगच्या नावाखाली मग आम्ही कधी मिळतीत त्या वस्तू समोर ठेवून, तर कधी बाहेर मैदानात एखाद्या झाडावर बसून चित्र काढत असायचो. त्यावेळेस की-पॅड मोबाइल फोन असायचे. एकदा त्या मोबाइल कॅमेऱ्याने आम्ही ग्राऊंडवर फिरून फिरून खूप फोटो काढले. तावडेबाईंना ते एवढे आवडले, की त्यांनी ते फोटो प्रिंट आणि लॅमिनेट करून शाळेमध्ये पहिलं फोटो एक्झिबिशन भरवलं. पुढे पुढे आशाताई गवाणकर प्राथमिक शाळेत आम्ही वॉल पेंटिंगसारखे यशस्वी आणि सुंदर प्रयोग केले. आयुष्यात यश आणि अपयश हे पायऱ्यांप्रमाणे असतात. प्रत्येक यशाला थोड्या अपयशाची आणि प्रत्येक अपयशाला थोड्या यशाची किनार असते. मी नंदादीपमध्ये असताना परदेशात किंवा आज आहे त्या क्षेत्रात जाण्याचा विचारही केला नव्हता. परिस्थितीनुसार आवडी बदलत गेल्या आणि जिद्दीमुळे मार्ग सापडत गेले.  
(नंदादीप विद्यालयाच्या २०२२च्या वार्षिक अंकातून साभार)
सागर कासार
(गोरेगाव, नंदादीप विद्यालयाचा माजी विद्यार्थी)

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी शाळा , मातृभाषेतून शिक्षण , सागर कासार , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया

  1. Abhay Dhopawkar

      3 वर्षांपूर्वी

    अमेरिकेत छोट्या शहरात मोण्या युनिव्हर्स सिटी आहेत हे आजच समजले लेख खूपच माहीतीपर आहे धन्यवाद



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen