“शाळेतील संस्कारांमुळेच मी ह्या पातळीवर पोहोचू शकलो आहे. नंदादीपमधील माझे वर्गमित्र अजूनही एकत्रित येऊन गेट टुगेदर करतात किंवा ट्रीपला जातात. आम्ही सगळे वर्गमित्र वर्षातून एकदा निधी गोळा करून सामाजिक संस्थांना किंवा गरजू व्यक्तींना मदत करतो.” – गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रमोद देसाई आपल्या यशासाठी प्रेरणादायी ठरलेल्या शाळेविषयी सांगतायत -
...
माझे शालेय शिक्षण (दहावी २००२-३) नंदादीप विद्यालयामधून झाले आहे. पुढे बारावी सायन्स ठाकूर कॉलेज, कांदिवली आणि इंजिनीअरिंग पार्श्वनाथ कॉलेज ठाणे येथून पूर्ण केले. माझ्या घरच्यांची इच्छा होती की, मी पोलीस किंवा नेव्हीमध्ये करिअर करावे; पण त्यावेळी कॉम्प्यूटर (आयटी) हे उभरते क्षेत्र होते आणि मलाही त्याबद्दल खूप आकर्षण होते. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे सायन्सचे शिक्षण हा खूप मोठा प्रश्न होता. पण आपली इच्छाशक्ती असल्यास मार्ग सापडतोच. मला दहावीला चांगले मार्क्स असल्यामुळे ठाकूर कॉलेजला अॅडमिशन मिळाले. मी फक्त दोन विषयांसाठीच क्सासेस लावले होते, बाकी विषयांच्या नोट्स मित्रांकडून घेऊन अभ्यास केला. इंजिनीअरिंगसाठी बारावीनंतर सीईटी परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी अकरावीपासूनच परीक्षेची पूर्व तयारी केली. बऱ्याच कॉलेजेसमध्ये बारावी PMC (Physics, Chemistry, Maths) चे मार्क्स महत्त्वाचे असतात. बारावीला चांगल्या गुणांनी पास होऊन सीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन मी मेरीट लिस्टनुसार कॉलेज निवडले.
इंजिनीअरिंगला अॅडमिशन कसे घ्यायचे हा माझ्यापुढे एक मोठा प्रश्न होता. आई-वडिलांनी खूप काटकसर करून नातेवाईकांकडून पैसे उसने घेऊन माझी इंजिनीअरिंगची फी भरली. क्लासेस न लावता मी अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मनात निश्चय केला की, जेवढी माझी इंजिनीअरिंगची वार्षिक फी आहे, तेवढा पगार मला महिन्याला मिळालाच पाहिजे. कॉम्प्युटर इंजिनीअरिंग हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे.
ह्या पदवीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हल्पमेंट लँग्वेज (Coding), डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशन अशा तांत्रिक गोष्टींचा अभ्यासक्रम असतो. त्यामध्ये माझा काही जम बसला नाही म्हणून मी सॉफ्टवेअर टेस्टिंग (Functional / Automation) ह्या शाखेकडे वळलो. २००९ मध्ये माझे इंजिनीअरिंग पूर्ण झाले, तेव्हा आयटी क्षेत्रात खूप मंदी होती. त्यामुळे पहिल्या जॉबसाठी मला खूप संघर्ष करावा लागला होता. बऱ्याच कंपन्यांच्या मुलाखतींमध्ये अॅप्टिट्युड टेस्ट, टेक्निकल/एच.आर या गोष्टींना सामोरे जावे लागले. खूप प्रयत्नांनंतर एका एमएनसी कंपनीमध्ये माझी निवड झाली. सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये चांगला अनुभव आल्यावर मी आणखी काही कंपन्यांमध्ये काम केले. आयटी क्षेत्रात चांगले पद आणि वेतन मिळायला तुम्हांला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अनुभव घेत पुढे जावे लागते. नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याच्या कार्यप्रणाल्या शिकाव्या लागतात. मीही तसेच केले. एकाच कंपनीमध्ये राहून चांगले पद आणि वेतन मिळणे नशिबावर अवलंबून असते. ज्या प्रोजेक्टवर काम करत आहात, तो क्लायंट बाहेरच्या देशातला असेल तर परदेशी जाऊन काम करण्याची संधी मिळू शकते. सुरुवातीला माझे इंग्रजी फारसे चांगले नव्हते. त्यामुळे ज्यांचे इंग्रजी चांगले होते, त्यांच्याशी सतत संवाद साधून, नियमितपणे वृत्तपत्रे आणि पुस्तके वाचून मी इंग्रजी सुधारण्याचा प्रयत्न केला.
माझ्या पहिल्या कंपनीतून नवीन प्रोजेक्टच्या ट्रेनिंगसाठी मला २०११ मध्ये लंडनला जाण्याची संधी मिळाली होती. आधीच्या प्रोजेक्टमधील माझे काम आणि ज्युनिअर असून सुद्धा नवीन काही करून दाखवण्याची जिद्द यामुळे या संधीसाठी माझा विचार झाला असावा. २०१५ मध्ये मी टीसीएस (टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस) कंपनीत रुजू झालो. एका मल्टिनॅशनल बँकेच्या प्रोजेक्टमध्ये काम करताना बँकिंग क्षेत्राचा उत्तम अनुभव आला, नवनवीन माहिती मिळत गेली. त्याच प्रोजेक्टला सपोर्ट करण्यासाठी २०१९ मध्ये दक्षिण अमेरिकेत उरुग्वे या देशात जाण्याची संधी मिळाली. सध्या मी बायकोसोबत इथेच आहे.
भारतात आयटी क्षेत्रात काम करताना वेळेचे बंधन नसायचे. भारतीय क्लायंटच्या प्रोजेक्टवर काम करताना ओव्हरटाइम सुद्धा करावा लागायचा. बऱ्याचदा बारा तासांपेक्षा जास्त काम करावे लागायचे. जादा कामाचा मोबदला मिळणे किंवा न मिळणे हे कंपनी व प्रोजेक्टवर अवलंबून असते. परदेशात स्वतःचे ठरलेले कामाचे तास संपवून फॅमिलीला वेळ देण्यात जास्त प्राधान्य दिले जाते. सहा महिन्यांतून एकदा तरी आठ-दहा दिवसांची सुट्टी घेऊन प्रत्येक जण फॅमिली/ मित्रमंडळींसोबत बाहेर फिरायला जातात.
इथे स्वच्छता आणि शिस्तीचे काटेकोर पालन केले जाते. अनोळखी माणूस समोर आला तरी त्याला अभिवादन करतात, मान देतात. इकडे कोणीही रस्त्यावर थुंकत अथवा कचरा टाकत नाही. रस्ते खूप स्वच्छ ठेवले जातात. विनाकारण गाडीचा हॉर्न वाजवणे, हा समोरच्याचा अपमान मानला जातो. तसेच कोणतेही काम छोटे समजले जात नाही. साफसफाई करणाऱ्यांशी सुद्धा आदराने वागतात. इकडची मुले आवडीप्रमाणे जमेल त्या क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण करतात. बहुतांश शाळा-कॉलेजेस सरकारमान्य आहेत आणि इकडे देणगी हा प्रकार नाही. लोकसंख्या कमी आहे. स्पॅनिश ही उरुग्वेची मूळ भाषा आहे आणि येथे फार कमी लोकांना इंग्लिश भाषा बोलता येते. त्यामुळे आम्हांलाही स्पॅनिश भाषा शिकण्याची संधी मिळाली. इकडे क्रीडाक्षेत्राला प्राधान्य दिले जाते. हा देश फूटबॉल खेळासाठी खूप प्रसिद्ध आहे. मुले वयाच्या अठरा वर्षांनंतर आई-वडिलांवर अवलंबून न राहता स्वतंत्र राहणे पसंत करतात. जमेल ते काम करून स्वतःचे शिक्षण आणि दैनंदिन उदरनिर्वाह स्वतःच करतात. भारतीय कुटुंबाप्रमाणे इकडे मुलांवर वडीलधाऱ्या माणसांचे बंधन नसते, त्यामुळे काही मुले वाईट मार्गालासुद्धा लागतात. त्याबाबतीत भारतातील एकत्र कुटुंब पद्धत फार बरी वाटते. या देशात नाताळ हा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आमचे काही परदेशी मित्रमंडळी भारतीय सण आणि संस्कृती जाणून घ्यायला उत्सुक असतात.
मी नंदादीप शाळेत असताना खो-खोमध्ये आमच्या वर्गाचा संघ पहिला आला होता, ती आठवण नेहमी लक्षात राहील. दहावीत असताना माझ्या शाळेतील शिक्षकांनी खूप प्रोत्साहन दिले आणि योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळेच दहावीला शाळेत माझा सातवा क्रमांक आला होता. शाळेतील संस्कारांमुळेच मी ह्या पातळीवर पोहोचू शकलो आहे. नंदादीपमधील माझे वर्गमित्र अजूनही एकत्रित येऊन गेट टुगेदर करतात किंवा ट्रीपला जातात. आम्ही सगळे वर्गमित्र वर्षातून एकदा निधी गोळा करून सामाजिक संस्था किंवा गरजू व्यक्तींना मदत करतो. नंदादीपसारख्या उत्कृष्ट शाळेचा मी विद्यार्थी होतो, ह्याचा मला अभिमान आहे.
मित्रांनो, आयटी क्षेत्र खूप मोठे आहे आणि दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे. तुम्ही ह्या क्षेत्रात योग्य दिशेने आणि मेहनतीने खूप पुढे जाऊ शकता. परदेशी जाऊन तिकडची संस्कृती जाणून घेण्याची संधीसुद्धा मिळू शकते. नंदादीप शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडून तुम्हा सर्वांना भावी आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा! भरपूर शिकून स्वतःचे, कुटुंबाचे आणि आपल्या शाळेचे नाव मोठे करा!
(नंदादीप विद्यालयाच्या २०२२च्या वार्षिक अंकातून साभार)
प्रमोद देसाई
(गोरेगाव, नंदादीप विद्यालयाचा माजी विद्यार्थी)
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मातृभाषेतून शिक्षण
, मराठी माध्यम
, प्रमोद देसाई
, मराठी अभ्यास केंद्र
डाॅ.धोंडोपंत मानवतकर
3 वर्षांपूर्वीसन्माननीय प्रमोद देसाईजी आपल्या जीवनानुभवाची शिदोरी अत्यंत प्रेरणादायी आहे......खूप छान,अभिनंदन..!🌺💐