मराठी शाळांची वाढती विद्यार्थीसंख्या


इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी कोरोना काळात केलेली शुल्क वाढ आणि त्याची सक्तीची वसुली यामुळे इंग्रजी शाळांतील पालकवर्ग मोठ्या संख्येने मराठी माध्यमाकडे वळल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांत वाचायला मिळतायत. अशा पालकांशी विशालाक्षी चव्हाण यांनी संवाद साधला आणि त्यांची माध्यमबदलामागील मानसिकता जाणून घेतली.
कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसाय बंद झाले. परंतु इंग्रजी शाळांनी त्यांचा धंदा बिनधास्त चालू ठेवला होता. कोरोना काळात ऑनलाइन वर्ग भरवले जायचे, पण फिया मात्र अव्वाच्या सव्वा घेतल्या जात होत्या.  ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या ऑनलाइन शाळेची फी भरली नव्हती, त्यांच्या मुलांना ऑनलाइन वर्गात बसू दिले जात नव्हते, त्यांच्या  परीक्षाही घेतल्या जात नव्हत्या. अनेक पालकांनी या खाजगी इंग्रजी शाळांच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलनंही केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मुजोर संस्थाचालक कोणालाही घाबरत नाहीत हेच चित्र समोर आलं. अनेक वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या प्राइम टाइमवर याविषयी बातम्या केल्या, पण परिस्थिती जैसे थे! मुळात पालकांनी या अशा मुजोर संस्थाचालकांच्या शाळांमध्ये आपल्या मुलांना प्रवेश तरी का घ्यावा? इंग्रजीचा ढोल वाजवणाऱ्या अनेकांना आता या खाजगी शाळांचा मनमानी कारभार नकोसा वाटू लागलाय, परंतु सांगणार कोणाला?
या पार्श्वभूमीवर आज मी अशाच एका नाडलेल्या पालकाची परिस्थिती मांडण्यासाठी हा लेख प्रपंच करावा असं ठरवलं. खाजगी शाळांच्या ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडून अनेक पालक आपल्या पाल्याला मातृभाषेतून शिक्षण देण्याचा निर्णय घेताना दिसतायत. इंग्रजी शाळा ते मराठी शाळा हा प्रवास खूपच विलक्षण आणि समाजातील मानसिकतेचे विविध कंगोरे उलगडणारा आहे. हा बदल समजून घ्यायला हवा. तरच आपण मराठीला उत्तम दिवस आणू शकू.

आता हेच चित्र पाहा ना! १९९० मध्ये पालकांनीच खाजगी शाळांना खिशातील भरमसाठ पैसे ओतून मोठं केलं. आणि आज २०२० मध्ये याच खाजगी शाळा पालाकांनाच संपवायला उठल्या आहेत. किती बोलकं चित्र आहे हे! कोरोना आला आणि अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. खाजगी क्षेत्रातील उद्योग बंद पडले. तिथे काम करणारे अनेक पालक आपल्या पाल्यांच्या  हजारो, लाखोंच्या संख्येत असलेल्या फिया भरू शकत नव्हते. इतकी वर्षं या अशाच अविचारी पालकांनी इंग्रजी माध्यामांच्या खाजगी शाळांना भरमसाठ फी देऊन पोसलं होतं, परंतु आता खरी वेळ होती या शाळांनी पालकांना सहकार्य करण्याची, पण तसं अजिबातच झालं नाही. शेवटी त्या संस्थाचालकांच्या व्यवसायाचाच भाग होता तो. आणि एखादा व्यवसायिक फक्त आणि फक्त येणाऱ्या पैशांचा विचार करत असतो. तसंच काहीसं या शाळांच्या संदर्भात झालं.

आता हे चित्र पाहा; एक पालक आपल्या मुलाला शाळेसाठी तयार करत आहेत. ते त्याच्या पायात बूट घालत आहेत, त्या बुटांची किंमत पाहताय ना? - १८०० रुपये. ही किंमत आठवून वडिलांचे डोळे पांढरे फटक पडलेयत. असे कित्येक पालक आहेत, जे खिशात पैसे नसतानाही खाजगी इंग्रजी शांळामध्ये आपल्या मुलांना प्रवेश घेतात. समाजात मोठेपणा करण्यासाठीही असतं बरेचदा ते. तिथला गणवेश, पायातली बुटं, विविध खर्चिक पुस्तकं, इतर शैक्षणिक साहित्य यांच्या फिया भरून-भरून हे पालक पुरते बेजार होतात आणि आपोआपच मुलांवर चांगले मार्क मिळवण्याचं अदृश्य ओझं येऊन पडतं. कित्येकदा इंग्रजीतून शिकवलेलं मुलांना समजतही नाही. परंतु, आपले आईवडील पोटाला चिमटा काढून, दिवस-रात्र मेहनत करून आपल्याला या महागड्या इंग्रजी शाळेत शिकवतायत म्हटल्यावर मुलंही ते अपेक्षांचं ओझं घेऊन शिकत राहतात, घोकंपट्टी करत राहतात. नैसर्गिक मातृभाषेपासून दूर करून दुसऱ्याच भाषेच्या पदरात तुम्ही तुमच्या मुलांना टाकताय खरे, पण त्या भाषेतून ज्ञानार्जन करण्याची तुमच्या मुलाची इच्छा आणि क्षमता आहे की नाही हे देखील पालकांनी समजून घेणं गरजेचं आहे.
 
या चित्रात विद्यार्थ्याला त्याच्या दप्तराचं ओझं आहेच, पण त्यासोबत त्याच्या पालकाच्या पाठीवर भरमसाठ फीचं ओझंही आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या फिया भरता-भरता पालकांचं कंबरडं मोडून जातं. पण, इंगजीतूनच आपलं मूल शिकलं पाहिजे आणि तेही मोठ्यातल्या मोठ्या खाजगी शाळेत, यासाठी पालक दिवस-रात्र मेहनत करत राहतात. आई-वडील दोघेही नोकऱ्यांचा गाडा ओढत राहतात.

शाळेतलं शिक्षण समजून न घेता घोकंपट्टीच्या माध्यमातून मार्क मिळवले जातात. शालेय वयात मातृभाषेव्यतिरिक्त दुसऱ्या भाषेतून नवीन विषय शिकताना मुलांच्या मेंदूत कोलाहल तर असतोच, पण त्यामुळे विषयाची आवड आणि तो समजून घेण्याची मुलांची क्षमताही कमी-कमी होत जाते. खोट्या प्रतिष्ठेच्या नादी लागताना हे बालमानसशास्त्र समजून घेणं फार आवश्यक आहे.
इंग्रजी माध्यमातील शिक्षणाची आणखी एक बाजू म्हणजे, या शिक्षणासाठी भरमसाठ पैसा ओतावा लागतो. ओघाने शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलांवर भरमसाठ पैसे कमावण्याची जबाबदारीही येते, जी पालकांनीच त्यांच्याही नकळतपणे मुलांवर लादलेली असते. शिक्षण सुरू झाल्यापासून ते शिक्षण संपेपर्यंत पैसाच या मुलांना राबवत असतो, आणि कालांतराने नोकऱ्या मिळवून त्याच पैशाच्या मागे धावण्याची मुलांना सवय होऊन जाते. अगदी पैशांच्या दावणीला बांधलेली ही मुलं आयुष्यात मूल्यं, नाती, भावभावना या सगळ्याच्या पलीकडे गेलेली दिसतात.
कोरोना काळात आणि नंतरही अनेक पालकांनी आपल्या मुलांना सेमी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेतल्याचं चित्र खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय. इंग्रजी शाळेत असताना या मुलांना इंग्रजीतून सर्व विषय शिकावे लागत होते. सेमी इंग्रजीत फक्त गणित आणि विज्ञान हे विषय सोडता इतिहास, भूगोल असे विषय मराठीतूनच मुले शिकू लागली. सेमी इंग्रजी माध्यमात गणित आणि विज्ञान हे विषय शिकवण्याच्या पद्धतीतही बदल झाला. आधी मुलांना हे विषय इंग्रजीतूनच समजून घ्यावे लागत होते, परंतु सेमी इंग्रजी शाळेतील शिक्षक हे विषय इंग्रजी आणि मराठीतूनही समजावून सांगू लागले. त्यामुळे मुलांना त्या विषयांची आवड निर्माण व्हायला लागली. आणि मुले आधीपेक्षा जास्त आवडीने शाळेत जायला लागली आहेत. हे  असे अनुभव मी गेला महिनाभर अनेक पालकांच्या तोंडून ऐकतेय. पण या उदाहरणांमध्ये इंग्रजी शाळांच्या अर्थकारणाने त्रस्त होऊन पालकांनी हा सेमी इंग्रजी शाळेतील शिक्षक हे विषय इंग्रजी आणि मराठीतूनही समजावून सांगतात. त्यामुळे मुलांना त्या विषयांची आवड निर्माण व्हायला लागली. आणि मुले आधीपेक्षा जास्त आवडीने शाळेत जायला लागली आहेत. हे  असे अनुभव मी गेला महिनाभर अनेक पालकांच्या तोंडून ऐकतेय. पण या उदाहरणांमध्ये इंग्रजी शाळांच्या अर्थकारणाने त्रस्त होऊन पालकांनी हा सेमी इंग्रजीचा पर्याय स्वीकारला असल्याचं समोर येतं.  गोरेगाव येथील नंदादीप विद्यालयात शिकणाऱ्या राजेश पवार या विद्यार्थ्याची आई म्हणते, “या आधी आम्ही पवईला राहायचो, तिथे तो चौथीपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता, परंतु आता मी त्याचा या शाळेत सेमी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला आहे.”  काही कामानिमित्त या कुटुंबाला पवई येथील राहते घर सोडून गोरेगावात राहायला यावं लागलं, परंतु इथे आल्यावर त्यांनी कोणतीही दुसरी इंग्रजी माध्यमाची शाळा न निवडता मराठी माध्यमाची नंदादीप विद्यालय ही शाळा निवडली.
कोरोना काळानंतर अनेक मराठी शाळांची विद्यार्थीसंख्या वाढली. अनेक पालकांनी आपल्या पाल्यांचा इंग्रजीतून मराठीत असा माध्यमबदल केला. ही जमेचीच बाजू आहे. परंतु इंग्रजी शाळांच्या फिया परवडत नाहीत म्हणून मराठी शाळांची निवड होत असेल तर पालकांनी थोडा विचार करायला हवा. तुम्ही पर्याय म्हणून या शाळांकडे न पाहता, खरंतर मुलांनी पूर्णपणे मराठी माध्यमाच्या शाळेत शिकावं, जिथे त्यांना गणित-विज्ञान या विषयांसह इतर विषयांतील संकल्पनांही मुळातून कळतील, आणि मुलांचं शिकणं आनंददायी आणि ज्ञानपूर्ण होईल, असं जेव्हा सरसकट पालकांना वाटू लागेल तो खरा सुदिन!
विशालाक्षी चव्हाण
(लेखिका मराठी शाळेतील पालक आणि मराठी अभ्यास केंद्राची कार्यकर्ती आहे)
संपर्क क्र. ७५०६२६२८८८

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी शाळा , मराठी माध्यम , विशालाक्षी चव्हाण , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen