शाळेत अनेक विद्यार्थी कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातून येतात. अशा कुटुंबात शिकणारी तीच पहिली पिढी असते, त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावणे शिक्षकांचे कसब असते. या लेखात अशाच कुटुंबातून आलेल्या सुनीलची जिद्द आपल्याला दिसतेच, पण नंदादीप विद्यालयातले शिक्षक शंकर बळी यांची सुनीलला शाळेची गोडी लावण्याची जिद्दही खास वाखाणण्याजोगी आहे.
“हॅलो सुनील” - मी.
“सर, काय म्हणता? कसे आहात...?” - सुनील
जणू खूप वर्षे आम्ही भेटलोच नाही, अशा आत्मीयतेनं सुनील बोलत होता.
“सुनील, काम होतं रे एक.” मी
“काम..? मी काय काम करू शकतो सर? पण सांगा तरीही.”
“तुला शाळेत यायचंय रे.”
“येतो ना सर, सांगा, कधी येऊ? पण कशासाठी?”
“तू गेल्या वर्षी दहावी पास झालास ना! या वर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचंय तुला.”
“काय सर…! मला फक्त बावन्न टक्के तर मिळाले. मार्गदर्शन तर हायेस्ट येणारी मुलं करतात ना!”
“ती आधीची परंपरा होती सुनील, जी तुला मोडायची आहे.”
“मी येऊन काय करणार सर?”
“तू कसा अभ्यास केला हे सांगायचं विद्यार्थ्यांना.”
“मी कधी भाषण केलं नाही सर, चुकलं तर तुम्हीच बघा.”
“तू यायला पाहिजे, बस्स!”
इयत्ता नववी ब १ या वर्गाचा मराठी विषय मला वर्षाच्या अर्ध्यातूनच शिकवायला मिळाला. एकदा गृहपाठ तपासताना हडकुळा, काळासावळा मुलगा उभा राहिला. अभ्यास अपूर्ण होता. कारण विचारलं तर वर्गप्रमुखासहित सर्वांनी एकसुरात तक्रार केली,
“हा अभ्यासच करत नाही.”
“हा सुनील, सतत गैरहजर असतो.”
अशा अनेकांच्या तक्रारी, पण काळजीपोटी, सुनीलनं दररोज शाळेत यावं यासाठीच. माणसांचं मानसशास्त्र असतं, तसं समूहाचंही मानसशास्त्र असतं आणि ते वैयक्तिकतेकडून समूहाकडे धाव घेत असतं. त्यात स्वार्थाची जपणूक असतेच असते. इतर वर्गांपेक्षा माझा वर्ग सर्वांगसुंदर व्हावा, नावलौकिक मिळवावा, असं वाटणाऱ्यांना सुनीलनं शाळेला दांडी मारलेली, अभ्यास बुडवलेला कसं आवडेल? मीही त्याने नियमित शाळेत यावं म्हणून त्याला दम भरला.
पुढच्या वर्षी सुनील नववी (२०१८-१९) उत्तीर्ण होऊन दहावीत गेला नि अनायसे वर्गशिक्षक म्हणून मला त्याचाच वर्ग मिळाला. पंधरा जूनला शाळा सुरू होऊन आठ दिवस उलटले, दहा दिवस उलटले, सुनीलचा शाळेत पत्ताच नव्हता. अशा वेळी वर्गशिक्षक त्या विद्यार्थ्यांची माहिती मिळवतात, शोध घेतात. मी सुनीलचा शोध घेऊ लागलो. जुन्या हजेरीपटावरचा त्याचा पत्ताही त्रोटक होता – सामंत बंगल्याच्या बाजूला, गोरेगाव (पूर्व) मुंबई – ४०००६३. विद्यार्थ्यांना विचारलं तर पोस्टाजवळून सरळ जा, मग उजवीकडच्या नि नंतर डावीकडच्या इमारतीच्या आवारात जा, समोर रेल्वे रुळाच्या बाजूला झोपडपट्टी आहे, तिथेच सुनील राहतो.
इतक्याशा माहितीच्या आधारे सुनीलला भेटायचं ठरवलं. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर शोधाशोध सुरू केली. रेल्वेच्या इमारतीच्या बाहेरच्या ओट्यावर कोणी चटईवर तर कोणी जमिनीवर बसलेले. काहींचा पत्त्यांचा डाव सुरू होता. लहान मुलांसहित सगळे हवा खात होते. समोर रुळाच्या कडेला त्यांची झोपडपट्टी होती. चार उभी लाकडं, काही आडवी. छप्पर नि भिंती प्लास्टिक कागदाच्या. आत शिरायच्या आधी “सुनील पवार इथं राहतो का?” असं विचारताच, “व्हय, रातो की, पर अता घरी नाई. कामाला गेला.” त्यातल्या एकानं माहिती पुरवली, मला जे सांगायचं होतं ते मी एका दमात सांगून टाकलं आणि “त्याला उद्या शाळेत यायला सांगा” असा समारोप करून व त्या तरुणाचा मोबाइल नंबर घेऊन परत फिरलो. दुसऱ्या दिवशीही सुनील गैरहजर. त्या तरुणाचा फोन लावला तर उचलला जातो कुठे!
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यावर सुनीलची वस्ती गाठली. परत तेच - “सुनील घरी नाही.” “त्याच्या घरच्यांना भेटतो.” असं म्हणताच - “त्याच्या घरी कोणीच नाही.” परत नकार. पण मी निघालो पुढेच. जेमतेम तीन फूट गल्ली. पावसानं जमीन ओली झालेली. झोपड्यांमध्येही ओलसरपणा. आत शिरायच्या आधीच त्याची आई आणि बहीण माझ्यासमोर हजर. मी त्यांना समजावून सांगत असताना आमच्याभोवती वस्तीतल्यांची गर्दी जमली. त्यांनीही माझ्या सुरात सूर मिसळला. बघतो तर काय सुनीलही झोपडीतून माझ्यासमोर हजर झाला. त्याला अडचण विचारली तर फी, पुस्तकं, बॅग या पुढे अडचणींची मजल जातच नव्हती. “उद्या दुकानासमोर भेट सकाळी अकरा वाजता, शाळेत जायच्या तयारीत.” एवढं बोलून मी साऱ्यांचा निरोप घेतला. दुसऱ्या दिवशी अर्धा-पाऊस तास झाला तरी सुनील आलाच नाही.
परत संध्याकाळी सुनीलच्या वस्तीत धडकलो. तो समोर उभा. मी मात्र एकटा नव्हतो. मला वस्तीवाल्यांची साथ लाभली होती. त्याचं एक न ऐकता त्याला घेऊन दुकानात गेलो. परतताना ‘उद्या शाळेत आलं पाहिजे.’ असा दमही भरला. विवेक सकपाळ या माजी विद्यार्थ्यानं सुनीलला वह्या, कंपास घेऊन दिले. दुसऱ्या दिवशी सुनीलला वर्गात पाहून मला अर्धं जग जिंकल्याचा आनंद झाला.
सुनील तसा मितभाषी; कमी नि मोजूनमापून बोलणारा. तरीही अभ्यासविषयक शंका बिनधास्तपणे विचारणारा. परिस्थितीनं कमालीचा समंजसपणा त्याला दान केलेला. त्याच्या वडिलांचं आधीच निधन झालेलं. आई, बहीण अन् तो; असं तिघांचं कुटुंब, मिळेल त्या मोलमजुरीवर चालणारं. गोरेगाव पश्चिमेकडील आय.बी.पटेल महानगरपालिकेच्या शाळेतून ‘आकार’ संस्थेच्या माध्यमातून तो नंदादीप विद्यालयात आला. इयत्ता सातवीपासून नववीपर्यंत शाळेत सतत गैरहजर राहण्याचं कारणही सामान्य नव्हतं. सर्वसाधारणपणे विद्यार्थी पालकांकडून सर्व सुविधा, सुखसोयी मिळत असतूनही शाळेत येत नाहीत. संगत, अनास्था अशा प्रकारची अनेक कारणं असतात. पण सुनीलबाबत मात्र उलट होतं. शिकण्याची इच्छा असूनही घरची परिस्थिती त्याला शिक्षणापासून दूर नेत होती. शिक्षण घेण्याच्या कोवळ्या वयात तो परिस्थितीशी दोन हात करत होता. रेल्वे स्टेशनवर बूट पॉलिश करण्यापासून, कुर्ला, मालाड, जुहू वा सांताक्रुझ अशा मुंबईच्या उपनगरांमध्ये बिगारी काम करत होता. गाड्या पुसण्यापासून तर दुकानात साफसफाई करण्यापर्यंत सारी कामे करत होता. त्यातून त्याला दिवसाला दोनशे ते चारशे रुपये मिळायचे. कामातून वेळ काढून तो शाळेतही हजेरी लावत होता नि शिक्षकांनी विचारलं तर खाली मान घालून परिस्थिती झाकण्याचा प्रयत्न करत होता.
आता सुनील शाळेत चांगलाच रुळला होता. जमेल तशी उत्तरेही द्यायचा. अडलेल्या समस्येचं निराकरण करेपर्यंत जंग-जंग पछाडायचा. वर्गात इतरांशी त्याची जवळीक निर्माण झाली होती. स्टाफ रूममध्ये झालेल्या चर्चेनुसार सुनील कमी बोलण्यामागे ‘त्याची भाषा’ हे एक कारण होतं. त्याचं मूळ गाव वाशिम जिल्ह्यातलं. मी यवतमाळचा असल्याने आणखीनच जवळीक वाढली होती. ऑगस्टमध्ये झालेल्या पहिल्या चाचणीत सुनील बऱ्याच विषयांत नापास झाला. पहिल्या सत्र परीक्षेतही दोन-तीन विषय कच्चे राहिले. “काय रे सुनील? कसं व्हायचं अशानं?” मी चिंता व्यक्त केली तर त्यावर –“प्रिलियमला बघा सर. सगळ्या विषयांत पास होऊन दाखवतो की नाही ते.” सुनील प्रचंड आत्मविश्वासानं बोलला. हा आत्मविश्वासच त्याला यशाकडे नेणारा होता.
सुनीलनं मला दिलेला शब्द खरा करण्यासाठी जिवाचं रान करायचं ठरवलं होतं जणू! जमेल तिथून नि जमेल तसा अभ्यास वाढवण्याचा त्यानं चंगच बांधला होता. काही दिवस तीन डोंगरीच्या केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या अभ्यासिकेत अभ्यास करत होता. मी वर्गशिक्षक असल्यानं पहिली तासिका माझीच असायची. सुनील हल्ली दररोज उशिरा येत होता. कारण कळतच नव्हतं. विचारलं तर “सॉरी सर.” इतकंच बोलायचा. एक दिवस न राहवून त्याला वर्गाबाहेर घेऊन विचारलंच,
“काय रे? शाळेपासून तुझं घर चालत फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. मग तुला शाळेत यायला उशीर का होतो.?”
“आता मी गोरेगावात नाही राहत सर, मानखुर्दला राहातो.”
“म्हणजे?”
“सर, मानखुर्दहून वडाळा, तिथून अंधेरी नि मग गोरेगाव. लोकल बदलत यावं लागतं सर.”
“अरे, पण गोरेगावातून मानखुर्दला?”
“गव्हर्नमेंटनं फ्लॅट दिला सर, मानखुर्दला.”
“अरे वा! आनंदाची गोष्ट आहे. अभिनंदन! मला आधी सांगायचं ना.”
सुनीलला प्रवासाचा त्रास होत होता, पण झोपडीतून फ्लॅटमध्ये जाणं ही त्याच्यासाठी खूपच आनंद देणारी बाब होती. सुनीलला मुंबईत हक्काचं घर मिळालं होतं.
“सर... सर…”
“काय झालं सुनील? एवढा आनंद?”
“सर, तुम्हांला बोललो होतो ना! प्रीलियममध्ये पास होऊन दाखवणार म्हणून. झालो सर पास.”
खरं तर पूर्वपरीक्षा म्हणजे वार्षिक परीक्षा नव्हे! पण तरीही सुनीलचा आनंद गगनात मावत नव्हता. पूर्वपरीक्षेनं वार्षिक परीक्षेचा मार्ग सुकर बनवला होता. आशादायी परिस्थिती निर्माण झाली होती.
पहिली तासिका संपल्या-संपल्या वर्गशिक्षक गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना लगेच फोन करतात. गैरहजर असल्यामुळे मीही सुनीलच्या घरी फोन लावला ‘तर तो शाळेत गेला’ असं त्याच्या आईनं सांगितलं. ‘मग शाळेत का नाही आला?’ अशी माझी चिंता. संध्याकाळी परत फोन करून सुनीलशी बोलल्यावर दिवसभराच्या तणावातून मुक्त झालो. दुसऱ्या दिवशी त्याला विचारलं तर त्याचं उत्तर ऐकून रागवायचं की आनंदी व्हायचं, हेच मला कळत नव्हतं. कारण शाळेला दांडी मारून आणि अभ्यास बुडवून गैरहजर राहिल्याबद्दल रागावायचं की शाळेबाहेरच्या अभ्यासवर्गाला हजर राहून, मिळेल तिथून ज्ञानकण गोळा करत असल्याबद्द्ल आनंद व्यक्त करायचा. खाली मान घालून बोललेल्या “सॉरी” या शब्दात मला माझं उत्तर मिळालं. पूर्वपरीक्षेचा निकाल घसरू न देता त्यात वाढ करण्यासाठी सुनील प्रयत्नशील असायचा. विषय-शिक्षकांना तो सतत वर्गाबाहेरही गाठायचाच, पण त्याचबरोबर वैतीबाई, साळगेबाई, कानसेसर यांचीही मदत घ्यायचा. इयत्ता सातवीपासून आतापर्यंत ग्रंथपाल रेखाबाई यांच्याही संपर्कात सुनील आहे.
वार्षिक परीक्षेसाठी सुनीलला यशोधाम हायस्कूल हे केंद्र मिळालं. आमची शाळा रेल्वे स्टेशनजवळ नि हे केंद्र मात्र जरा लांबच. मानखुर्द ते केंद्र किमान दोन तासांचा प्रवास. परीक्षेच्या काळात त्याला माझ्या घरी मुक्कामाला येण्यास सांगितलं. कधीही ‘नाही’ हा शब्द न उच्चारणारा तो, तेव्हाही ‘हो’ म्हणाला. पण परीक्षा संपेपर्यंत आलाच नाही. त्या केंद्रात परीक्षेला असणारे विद्यार्थी सुनील दररोज पेपर द्यायला येत असल्याचं सांगायचे, पण मग मुक्कामाला का आला नसावा? त्याचा फोन लागत नव्हता तर कधी-कधी तो उचललाही जात नव्हता. परीक्षा संपल्यावर शाळेत भेटायला आला तेव्हा विचारलं तर, “कसं येऊ सर? मला कांजिण्या आल्या होत्या. तुमच्या मुलांना झाल्या असत्या तर...”
सुनीलनं मला परत एकदा गप्प केलं.
(नंदादीप विद्यालयाच्या २०२१च्या वार्षिक अंकातून साभार)
शंकर बळी
(लेखक गोरेगाव, मुंबई येथील नंदादीप विद्यालयामध्ये मराठी व समाजशास्त्र या विषयाचे शिक्षक आहेत.)
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
मातृभाषेतून शिक्षण
, मराठी माध्यम
, खडतर प्रवास शिक्षणाचा
, शंकर बळी
, मराठी अभ्यास केंद्र