(भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रातून १८४८ ते १८५० ह्या काळात लोकहितवादींची शतपत्रे प्रसिद्ध झाली, त्यांमधील हे एक पत्र) जातीभेद हिंदु लोकांचें कांही वर्णन लिहावयाचें असलें, तर मुख्यत्वेंकरून ब्राह्मण लोकांचे लिहावें. म्हणजे त्यांत सर्व लोकांचे, स्थितीचें वर्णन आलें; कारण हिंदु लोकांत विद्येचे महत्त्वाचे मुख्य मालक ब्राह्मण आहेत; व त्यांचीं मतें लोकांमध्यें प्रबल आहेत. यास्तव आम्ही बहुधा हिंदु लोकांचें वर्णन लिहावयाचें असलें, म्हणजे ब्राह्मणाचेंच लिहूं व तेणेंकरून सर्वांचें वर्णन झालें, असें समजावें. प्राचीन हिंदु शास्त्राप्रमाणें लोकांचे चार वर्ण आहेत. ते अशा प्रकारचे वर्ण दुसर्या देशांत नाहींत. हिंदुस्थानांत मात्र अशी व्यवस्था आहे. ते चार वर्ण असे- एक ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चवथा शूद्र. शास्त्रांत असें लिहिलें आहे कीं, हे चारी वर्ण कुळपरंपरागत चालावेत. जो ब्राह्मण त्याचा वंशही ब्राह्मणच. तसें, जो शूद्र त्याचा वंशही शूद्रच, असा नियम स्मृतिरूप धर्मशास्त्रांत आहे; परंतु तें शास्त्र लिहिण्यापूर्वी व पश्चात् असा नियम चालला असेलसें वाटत नाहीं; कारण वाल्मीक ऋषि हा प्रथम कोळी होता व नंतर ऋषि झाला. गाधि राजा क्षत्रिय असतां ब्राह्मण झाला. पाराशर ऋषीनें शूद्र स्त्री केली. हरिश्चंद्र राजानें काशीस जाऊन महाराचें कर्म पत्करिलें व किती एक राजे क्षत्रिय असतां ब्राह्मण झाले. तसेंच, दुसरे ब्राह्मण असतां क्षत्रिय झाले, अशीं वर्णनें पुराणांत लिहिलीं आहेत. आणि मोठ्या कुळांत राजे वगैरे जे लिहावयासारखे झाले, त्यांची नांवें पुराणांत सांपडतात. तेव्हां त्या काळीं अशी बहुधा चाल असेल; परंतु सर्वांचीं नांवें पुस्तकांत लिहिलीं गेलीं नाहींत, म्हणून पक्के समजत नाहीं. तथापि चाल पुष्कळ होती, असें विचारें करून सिद्ध होतें. आणि उत्तम मार्ग हाच कीं, कर्में करून जातीचा आणि वर्णाचा निश्चय असावा. ब्राह्मण असून शूद्राहूनही नीच कर्म करील, तर तो ब्राह्मण नव्हे. तसेंच क्षत्रियानें ब्राह्मणकर्म केलें, तर तो ब्राह्मण व्हावा, असें केलें नाहीं, तर किती एक अयोग्य लोक ब्राह्मणाचे नांवाने मिरवतील. आणि किती एक वास्तविक ब्राह्मण शूद्राचे नांवानें आच्छादित रहातील. जर कोणीं राजानें असा नियम केला कीं, जे हल्लीं कामदार आहेत, त्यांजकडे तीं कामें वंशपरंपरा चालवावयाची, तर ते जोंपर्यंत आहेत, तोंपर्यंत तीं कामें बरोबर चालतील. पुढें त्यांचे मुलगे वगैरे अर्थातच मूर्ख निघतील. कारण बापाप्रमाणे मुलगा निघतो असा निश्चय नाहीं. यास्तव ज्याचे त्याचे स्वयमेव गुण पाहून त्याची योजना करावी, हा उत्तम पक्ष होय. नाहीं तर घालमेल होऊन जे शहाणे ते मागें राहून मूर्ख मंडळी परंपरेच्या कायद्याचे जोरानें सर्व मोठे मोठे कामांत शिरूं लागेल व मग त्या राज्यांत काय व्यवस्था होईल बरें? बाकी चार भेद हिंदुस्थानांत आहेत. इतर देशांत नाहींत असें नाहीं. प्रत्येक मुलखांत चारी वर्ण आहेतच. (१) पंडित, (२) शिपाई, (३) सावकार आणि (४) चाकर हे सर्वत्र आहेत. याशिवाय तर कोठेही चालावयाचें नाहीं; परंतु अंतर इतकेंच आहे कीं, अन्य देशांत हे धर्मपरंपरा चालत नाहींत. वाणी आहे आणि त्याचा मुलगा बुद्धिमान निघाला, तर तो पंडितांमध्यें जातो. आणि पंडिताचा मुलगा मूर्ख निघाला, तर तो चाकरांत जातो. अशा रीतीनें हे चारी वर्ण सर्व देशांत आहेत. परंतु हिंदुस्थानांत त्यांचीं वेगळालीं कुळें झालीं आहेत. आम्हांस वाटतें कीं पूर्वी जातींत फेरफार होण्याची चाल असे. रावण ब्राह्मणाचा मुलगा, परंतु दैत्य झाला; कारण तो महादुष्ट होता. याजवर किती एक लोक असें म्हणतील कीं, ते मागले युगांतील लोक. त्यांचें उदाहरण आतां घ्यावयाचें नाहीं; परंतु हें म्हणणें उपयोगी नाहीं; कारण वर्ण, व्यापार व जात तर मागील युगांतीलच आहे. व मागील युगांत तरी माणसेंच होतीं. देवाचे अवतार जरी झाले, तरी मनुष्यें होतींच. प्रत्येक जीव देत नव्हता; व आतां सारखेच सर्व लोक तेव्हांही होते. म्हणजे दुष्ट होते व सुष्टही होते. फरक इतकाच कीं, आतां विचार करीत नाहींत. बहुधा चालीवरून चालतात. सांप्रत काळचे ब्राह्मण कोणी विद्वान् आहेत काय, असें पाहिलें तर सर्वांस दिसेल कीं, हे भट विद्वान् नाहींत. शुद्ध टोणगे दिसतात. त्यांस कांहींच ज्ञान नाहीं. जसें बैरागी अंगास राख लावून भीक मागतात, तसे कोणत्या तरी वेषानें हे पोट भरितात. हे स्वभावानें आळशी व काम करावयास नको. तेव्हां निर्लज्जपणानें भीक मागून पोट भरितात. एवढाच त्यांचा रोजगार आहे. मला वाटतें कीं, त्यापेक्षां आचारी, पाणके बरे. व हे त्याहून निंद्य. कारण हे हरामाचें खातात. आणि लोकांस यांपासून कांहीं उपयोग नाहीं. ब्राह्मणांचा स्वधर्म असा आहे कीं, आपली सद्वर्तणूक आणि पवित्रपणा बाळगून विचार करीत अरण्यांत स्वस्थ बसावें म्हणजे तेच मुनी व ऋषि होत. व असें त्यांचें कर्म पवित्र व वागणूक निर्दोष म्हणून, राजे ब्राह्मणांस थरथर कापत होते. व सर्व लोक त्यांचें भय बाळगीत होते. अशा कथा आहेत, व ते आपले सत्कर्में करून व उपदेशेंकरून सर्वांस सुशिक्षा लावीत होते, व धर्मसुधारणेचा आणि लोकहिताचा विचार करीत होते. तेव्हां लोकही त्यांस मानीत होते. त्या प्रकारचा एक तरी ब्राह्मण काशीपासून रामेश्वरापर्यंत आतां आहे काय? आतांचे ब्राह्मण असे आहेत कीं, जेवावयापुरती काळजी करितात. सकाळपासून पोट कोठें भरेल, याचा शोध करून जेवावयास मिळालें, म्हणजे उताणे पडतात. किंवा स्वस्थ गोष्टी सांगत बसतात. कोणी म्हणतो कीं मीं ५० लाडू खाल्ले. कोणी म्हणतो कीं मी शेरभर तूप प्यालों. सारांश जे भटांचे मंडळींत क्षणभर बसतात ते जाणत असतील कीं, त्यांचें भाषण किती उपयोगाचें व किती शास्त्रपर आहे. त्यांचा मोठा गुण ज्यावरून ते आतां प्रशंसा पावतात, तो खावयाचा आहे. म्हणजे जो फार खाईल तो उत्तम भट. गृहस्थही मूर्खच असतात. त्यांस वाटतें कीं, ब्राह्मण जितकें खातील तितकें आम्हांस विशेष पुण्य लागेल. मी एका गृहस्थाचा खरा वृतान्त जाणतों कीं, त्याचा बाप मेला आणि त्याजजवळ पांच हजार रुपयांची जिनगी होती. तेव्हां त्याचें मनांत काय वेड भरलें, तें न कळे. त्याणें असा बेत केला कीं, हे सर्व रुपये ब्राह्मणभोजनांत घालावयाचे. मग त्याणें दोन चार वर्षेंपर्यंत शेंकडों ब्राह्मणांस यथेच्छ परोपरीनें भोजन घातलें. आणि आपली सर्व जिनगी गमावली. तेव्हां मला असा चमत्कार वाटतो कीं, हे ब्राह्मण फार दुष्ट आहेत. त्या गृहस्थास कोणी असें म्हटलें नाहीं कीं, ‘अरे, तुम्ही, पोरें-बाळें व बायका जेणेंकरून मरतील, असा हा धर्म कोठला? तूं आपले कुटुंबाचें रक्षण कर’ असा उपदेश कोणीं एकाही ब्राह्मणानें केला नाहीं. सर्वांनीं त्याचें सरेतोपर्यंत खाल्ले व सरल्यावर घरोघर निघून गेले. दुसरे उदाहरण, बाजीराव पेशवे यांणीं अनंत ब्राह्मण जेवावयास घातले. त्यांस तर नेहमी हेंच वेड होतें; परंतु त्यांतील एका ब्राह्मणानें तरी असें म्हणावयाचें होतें कीं, ‘अरे राजा, तुझें कर्म प्रजा-पालन करावयाचें, तें तूं नीट कर; प्रजेपासून जुलमानें पैसा घेऊन रिकामे ब्राह्मणांस जेवूं घालूं नको; कर कमी कर; बंदोबस्त नीट ठेव. व्यभिचार करूं नको, राज्य बुडवूं नको; फौज नीट बाळग; हेंच तुला स्वर्गास नेईल; लूट करून ब्राह्मणांस घातल्याचा उपयोग नाहीं,’ असें एकानें तरी सांगितलें काय? नाहीं. तस्मात् हे ब्राह्मण लुटारू आहेत. हे धर्माचें नाव करून लुटतात. पेशव्यांचे राज्यांत एकच ब्राह्मण होता आणि जोंपर्यंत तो होता, तोंपर्यंत तें राज्य कृतयुगाप्रमाणें चाललें. त्या ब्राह्मणाचें नांव रामशास्त्री होय. एके दिवशीं माधवराव पेशवे स्नानसंध्या करीत असतां शास्त्रीबावा भेटीस गेले, तों वर्दी आली कीं, श्रीमंत स्नानसंध्येंत आहेत. तेव्हां त्यांस संताप आला व तसेच आंत गेले आणि त्यांनी विनंती केली कीं, ‘‘मला आज्ञा द्यावी. मी काशीस जातों. कारण आमचीं कर्में तुम्ही करावयास लागला. तेव्हां आतां आम्ही रहाणार नाहीं.’’ श्रीमंतांनी पुसलें, ‘‘हें काय?’’ त्यांणीं सांगितलें कीं- ‘‘तुम्ही ब्राह्मण जातीचे खरे; परंतु तुम्ही स्नानसंध्येचा धर्म सोडून क्षत्रियाचा धर्म घेतलांत. आणि शिपाईगिरी करून राज्य करितां. आतां स्नानसंध्या केली तर धड ब्राह्मणाचें कर्मही साधावयाचें नाहीं. व वेळ फुकट जाऊन क्षत्रियांचे कर्मही बुडवाल. आणि कोणतेंच कर्म न केलेंसें होऊन नरकांत जाल. तर तुम्ही जी वेळ स्नानसंध्येत घालतां तीच वेळ रयतेस दाद देण्यांत घालवा. व येथून दोनशें कोसपर्यंत तुमचे अमलांत कामगार कसे काय करितात, हें पहा. जप कशाचा करितां? जर तुम्हांस जप करावयाचा असेल, तर राज्य सोडा. आणि दुसरा कोणी गादीवर बसवा आणि वनांत चला. तुम्हीआम्ही बरोबर जाऊं व असें करावयाचें नसेल, तर राज्य चांगल्या रीतीनें नीट करा. लोकांचे घात करूं नका. अशी स्नानसंध्या ईश्वरास मान्य होणार नाही.’’ असें सांगून त्या दिवसापासून त्यानें श्रीमंतांस प्रात:काळीं दरबारांत येऊन बसावें, असें ठसवून दिलें. याचें नांव ब्राह्मण व याचें नांव सारासार विचार. ज्यानें आपले अकलेस आलें, तें खरें जाणून सुचविलें; भीड धरिली नाहीं; तोच धन्य. तसेंच, जेव्हां घाशीराम कोतवालानें कांही माणसें मारलीं, तेव्हां रामशास्त्री यांजकडे नाना फडणीस यांणीं शास्त्रार्थ नेला आणि सांगितलें कीं, ‘मी तुमची स्नेही आहें. व माझा स्नेही घाशीराम आहे. त्यापक्षीं याचा जीव जाऊं नये, असें करावें.’ त्यांनी सांगितले कीं, ‘मी वास्तविक असेल तेंच सांगेन. तुमचा प्रपितामह आला तरी सत्याचा अव्हेर तुमचे भिडेमुळे मी करणार नाहीं.’ आणि त्यांणीं तसेंच श्रीमंतांस सांगितलें, व त्याजवरून त्याचा वधही झाला. सारांश, जे असे असतील ते ब्राह्मण. नाहीं तर सहस्त्रभोजनास पुष्कळ जमतात. तेव्हां विचारावें, तुमचें नांव काय? ‘ब्राह्मण.’ ‘येतें काय?’ ‘शंख.’ ‘जेवतां किती?’ ‘चार शेर.’ ‘करतां काय?’ ‘आगांतुकी.’ वा: हे ब्राह्मण कशाचे? आतांचे शास्त्री यांजवळ म्हटला तो शास्त्रार्थ तयार आहे. ‘भटजीबुवा, असत्य भाषण केलें, तर काय करावें?’ उत्तर - ‘ब्राह्मणास पुतळी दक्षणा द्यावी.’ यावरून हल्लींचे ब्राह्मणांत कांहीं विचार, नीति किंवा पवित्रपणा नाहीं. शास्त्री व भट मजूरदार आहेत. जसे हेलकर्यास चार पैसे दिले, म्हणजे कोसभर जातो व आठ पैसे दिले म्हणजे दोन कोस. तद्वत् पांच रुपये दिले म्हणजे प्रायश्चित्त, व शालजोडी दिली म्हणजे दारू प्याली तरी चिंता नाहीं, तो निर्दोष. असा ब्राह्मणांचा रोजगार आहे. ********** लेखक - लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख (भाऊ महाजन ह्यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रातून ती १८४८ ते १८५० ह्या काळात लोकहितवादी या टोपण नावाने गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे प्रसिद्ध झाली.) image credit www.allpaedia.com खालील लेखही अवश्य वाचा. अधिकचा दुवा - १. शतपत्रे क्र. ३९- वर्णविचार लोकहितवादींबाबत जाणून घेण्यासाठी मराठी विश्वकोशाच्या लोकहितवादी या लिंकवर क्लिक करा. रिया प्रकाशनाने २०१६ मध्ये शतपत्रांची नवी आवृत्ती प्रकाशित केली आहे. Google Key Words - Shatapatre, Lokhitwadi, Gopal hari Deshmukh, Social Reformer, Indian Caste Issue.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
shripad
6 वर्षांपूर्वीसांप्रत काळचे ब्राह्मण कोणी विद्वान् आहेत काय, असें पाहिलें तर सर्वांस दिसेल कीं, हे भट विद्वान् नाहींत. शुद्ध टोणपे दिसतात. ???