सीमेवरचे गाव बेळगाव : संस्कृती आणि बोलीभाषा


बेळगाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गाव. बहुसंख्येने मराठी भाषक असूनही हा भूभाग राज्य पुनर्रचनेनंतर कर्नाटक राज्यात समाविष्ट झाला. इथल्या मराठी संस्कृती-भाषेत कानडी-कोकणी संस्कृती व भाषा कशी एकजीव झाली आहे, याचा आढावा घेणारा विजयालक्ष्मी विजय देवगोजी यांचा हा लेख -
गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाणारे मूळ ‘वेणुग्राम’ असे नाव असणारे बेळगाव हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एक महत्त्वाचे शहर असून, महाराष्ट्रीय-कर्नाटकीय संस्कृतीचा एक सुरेखसा संगम ठरलेले आहे. दूध-साखरेसारख्या या दोन्ही संस्कृती एकमेकींत विरघळलेल्या आढळतात. पूर्वी मुंबई प्रांतात असलेला हा भाग भाषावार प्रांतरचनेमुळे कर्नाटकात गेला; पण येथील सीमावासीयांनी आपली मराठी भाषा व संस्कृती जपली आहे. ख्रिश्चन, मुसलमान, जैन, लिंगायत, बौद्ध आणि अठरापगड हिंदू लोकांचे वसतिस्थान असलेल्या शहराचे भूषण म्हणजे कोल्हापूरकडील बाजूला असलेला भुईकोट किल्ला आणि एक विशाल तलाव. किल्ल्यामध्ये जैन धर्मियांची ‘कमलबस्ती’ आहे, आणि किल्ल्याभोवती खंदक आहे. बेळगावच्या पश्चिमेला पाच-सात छोटी छोटी तळी आहेत. त्यांना आरगन तलाव म्हणतात. त्याची कुळकथा थोडक्यात अशी - ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी बेळगावमध्ये या तळ्यापासून जवळच सोल्जर्स कॅम्प उभारले होते. कॅम्प विभागात बोर्ड लिहिला होता, Dogs and Indians are not allowed असा. त्यावेळी वेळ समजण्यासाठी दर तासाला बंदुकीतून एक गोळी उडवायची अशी पद्धत रुढ केलेली, त्यामुळे आवर गन (Hour Gun) असे नाव पडले. पुढे त्याचेच आरघेण म्हणजे ‘आर घेणे’ (बेळगावी बोलीभाषेत बळी घेणे) झाले. त्याचेच पुढे आरगन तळे असा अपभ्रंश झाला. अशा या कुंद्यासारख्या गोड बेळगावची संस्कृती काही पैलूंवरून पाडण्याचा प्रयत्न करू.
खाद्यासंस्कृती -
बेळगावचा कुंदा आणि मांडे हे प्रसिद्ध असे दोन खाद्यपदार्थ आहेत.रोजच्या सकाळच्या न्याहरीला न्याहरी न म्हणता ‘भाकरी खाल्याशी काय?’ असे म्हणतात. घरोघरी सकाळी-सकाळी धपधप असे भाकरी बडवण्याचे आवाज कानी पडतात. सोबत प्रसिद्ध असे मसुराचे दबदबीत कालवण किंवा काळ्या वाटाण्याची उसळ. मसूर या कडधान्याला चणया असे संबोधले जाते. ही मसूर आणि हरभरा ओले असताना खाण्याची मजा काही औरच.‘कुमुद’ ही तांदळाची जात प्रसिद्ध आहे. त्याबरोबर काळ्या भाताचे वाणही सुप्रसिद्धच. शेतात मध्येच एक गादा (म्हणजे वाफा) काळ्या भाताचा पेरतात. जेव्हा लोंब्या वाऱ्यावर डुलतात, तेव्हा हिरव्यागार शेतात हा काळ्या रंगाचा एकच वाफा सुरेख उठून दिसतो आणि त्या भाताचा वास आसमंतात दरवळतो. या तांदळाच्या पिठापासून बनवलेला पदार्थ म्हणजे ‘दिवशी’ किंवा ‘फळ’ किंवा ‘वासुदेवाच्या टोप्या’. ह्यात अंड्याची कोशमीर (बुर्जी) घालून गरम-गरम खाण्याने ब्रह्मानंदी टाळी लागते. अतिशय पौष्टिक असणारा हा पदार्थ बाळंतीण बाईसाठी खास बनवतात.उसाचा रस म्हणजे पर्वणीच. मशीनवर रस न काढता बैलांनी फिरवलेल्या चरकातून काढलेला रस अतिशय चवदार लागायचा. घाण्याच्या पाठीमागच्या बाजूला वाळलेल्या गवताच्या पिंजरावर बसून आलेपाक चुरमुऱ्यासोबत रस पिणे म्हणजे परमानंदच. त्यात असलेला ओला फुटाण्याचा लाडू म्हणजे तर खासच चव. आता हे सारे लयाला गेले आहे.
देवदेवता –
बेळगावला प्रत्येक घरी एक कुलदैवत आणि एक कुलदेवता आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूरचा ज्योतिबा हे कुलदैवत आणि कर्नाटकातील सौंदत्तीची यल्लम्मा (यल्ल अम्मा म्हणजे सर्वांची आई) ही कुलदेवता. ज्योतिबाच्या गुलाबी गुलालाबरोबर यल्लम्माचा पिवळा भंडारा हा प्रत्येकाच्या कपाळी विराजमान असतो. दर मंगळवारी, शुक्रवारी यल्लम्माच्या नावे जोगवा मागितला जातो. घरोघरी परड्या, चवार, जग आणि गळ्यात दर्शन असते. गावाबाहेर मातंगी देवीचे मंदिर असते. सौंदत्तीच्या यात्रेहून आल्यावर अगोदर त्या मंदिरात उतरतात. मग घरचे लोक तेथे जाऊन मातंगीची पूजा करूनच आपल्या माणसांना घरी घेऊन येतात. बेळगावच्या आसपास जी खेडी आहेत, तिथल्या प्रत्येकाची एक देवता आहे आणि त्या देवतांच्या नावावरून मुलांची नावे ठेवण्याची पद्धत प्रत्येक गावात रुढ आहे.
उदा. १.  यळ्ळुरगाव : देवी चांगुणा, नावे मुलगा – चांगप्पा, मुलगी – चांगुणा  २. बोकमुर : सटवाई देवी. मुलगा – शटुप्पा, मुलगी – शटुली ३. बसवाणकुडची : बसवाण्णादेव. मुलगा – बसाप्पा, बसव कंग्राळी : कलमेश्वर देव. कल्ल म्हणजे कानडीत ‘धोंडा’ अर्थात हा धोंडदेव. मुलगा – कल्लाप्पा, मुलगी – कल्ली . काकती, कणबर्गी : सिद्धेश्वर देव, मुलगी सिद्धाप्पा. उंचगावची देवी : मळेकरीण. मोहनगा : देवी भावकाई. मुलगा – भावकू, मुलगी – भागीरथी. पिरनवाडी : पिराचे स्थान. वडगाव, शहापूर : मंगाई देवी
बहुतेक बेळगावकरांच्या घरी करेव्वा नावाची देवी असते आणि तिचे स्थान मात्र घराच्या मागे एका दिवळीत असते. करेव्वा म्हणजे करी+आव्वा म्हणजेच काळी आई. ही काळी आई म्हणजेच शेतकऱ्यांची काळी शेतजमीन, जी सृजनशील असते आणि हिच्यामुळेच शेतकऱ्याचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे हिला सृजनशील स्त्रीचे, पुत्र देणाऱ्या स्त्रीचे प्रतीकात्मक रूप मानून हिची पूजा केली जाते आणि गर्भवती बकरीच्या पोटातील बाळासकट गर्भच अर्पण केला जातो. आता मात्र ही पद्धत बंद होत आहे. उचगावाची मळ्यातली देवी ‘मळेकरीन’ हिलाही बकऱ्यांचाच मान देऊन नातेवाईकांना जेवायला बोलावले जाते. आजारपणात भंडारा आणि कडुनिंबाचा पाला हा यल्लम्मा देवीचाच उपचार करतात आणि नंतरच डॉक्टरकडे जातात. ‘उदो गे आई उदो’ आणि ‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’ या जयजयकाराने कोणत्याही कामाची सुरुवात करणारी बेळगावची जनता आजही भोळीभाबडी आहे.
नातेसंबंध -
कर्नाटक-महाराष्ट्र संस्कृतीचे बंध घट्ट जुळलेल्या या बेळगावी संस्कृतीत आईला ‘आऊ’ असे संबोधतात. (शिवाजी महाराज जिजाऊंना आऊसाहेब म्हणायचे.) वडिलांना किंवा वडीलभावाला आप्पा म्हणतात, जे कानडी संस्कृतीत आढळते. भावाला ‘आप्पा’ आणि बहिणीला ‘ताई’ म्हणतात.येथील लोक लग्नसंबंध आपापसातच करण्याकडे कल असलेले आहेत. भावाच्या लग्नापासूनच बहीण त्याची मुलगी सून करून आणण्याच्या बेतात असते. हे लग्नाच्या लोकगीतात आढळते. भावाला बहीण उंबरठ्यात अडवते आणि म्हणते -
दार धरीयो पाय धरीयो, का भेनी दार धरियो?
बंधु तुजी कन्या मीया मागो येतो.
बंगला देईन भेनी, गाडी देईन भेनी
माजी कन्या तुज्या घरी देणं न्हाई
बंगला नको बंधू, गाडी नको बंधू
कन्या नेईन मीया शरतीनं।।
वाटेल ते करून मोठ्या शर्थीने भाचीला सून करून नेण्याचा निर्धार बहीण प्रकट करते. नात्यात जमले नाही, तर शेजारी, शेजारी नाहीतर पलीकडच्या गल्लीत, नाहीच तर गावाच्या दुसऱ्या भागातच सोयरीक पाहतात. मुलगी लांब देणे दूरच, पण सूनही लांबची न करण्याकडे कल असतो. हल्ली मात्र महाराष्ट्रापर्यंत सोयरिकी हळूहळू वाढत आहेत.
घरे -
लांबलचक रेल्वेच्या डब्यासारखी घरे ही बेळगावची खासियत. तुळशीवृंदावन, विहीर, बाजूला डोण आणि धुण्याचा दगड, घरासमोर मोठा दगड, जो दिवसभर उन्हाने तापल्याने रात्रीही गरम राहतो आणि त्यावर रात्री बसून गप्पा मारण्याचे सुख काही औरच. हल्ली ही घरे फ्लॅट सिस्टिम नावाचा राक्षस गिळंकृत करत आहे.
सणवार -
नागपंचमी, दसरा, दिवाळी, होळी इत्यादी धार्मिक सण दणक्याने साजरे होतात. नागपंचमीला कर्नाटकी पद्धतीने तंबीट हमखास हवेच. घरोघरी झोपाळे बांधले जातात. मामाच्या घराकडून भाचीसाठी खोबऱ्याच्या वाट्या, रिबिनी आणि गोंडे आजही येतात. (कदाचित सोयरीक मिळविण्याची पद्धत असेलही)
दिवाळी पाडव्याला शेणाच्या गवळण्या, पेंद्या, कृष्ण, वाडा इत्यादी बनवून झेंडूच्या फुलांनी त्यांना सजवून उखळाभोवती, घराच्या अंगणात, घराच्या कोपऱ्यात त्यांना स्थान देतात. गवळी लोक आपल्या म्हशींना शृंगारून त्यांना गल्लीतून पळवत नेतात. ते पाहण्यासाठी गल्लीत दुतर्फा गर्दीच गर्दी होते. चुन्याने गाईची पावले काढतात. एकंदरीत कृष्णाशी निगडित साऱ्या गोष्टी केल्या जातात. संध्याकाळी लहान मुली प्रत्येक घरी कोपऱ्यात बसवलेल्या मुख्य गौळणीची आरती करून येतात.
कार्तिक महिन्यात देवळादेवळांत कार्तिक लावले जातात, म्हणजेच देवासमोर तेलाचे दिवे पेटवून चुरमुरे-खोबऱ्याचा प्रसाद वाटला जातो. पहाटे विठोबाची काकड आरती होते. दहीभाताने शंकराच्या पिंडीला माखले जाते. होळी पेटवलेल्या दिवळी महादेवाच्या मंदिरासमोर जाऊन इंगळ्या न्हाणे हा प्रकार असतो. पुरुष होळीतल्या इंगळावरून म्हणजेच विस्तवावरून चालत जातो. स्त्रिया ओले वस्त्र डोक्यावर घेऊन बसतात आणि पुजारी त्यांच्या डोक्यावर इंगळ ओततो. हे इंगळ्या न्हाणे म्हणजे नवस मागून घेण्याचा प्रकार असतो आणि तो फेडला जातो. कर्नाटकात शंकराची जास्त भक्ती केली जाते, ती लिंगायत पंथात. बेळगावी लोकांनी हीदेखील संस्कृती आत्मसात केली आहे. दसऱ्यात नऊ दिवस अंबाबाई, लक्ष्मी, कालिका, मंगाई इत्यादी देवींची उपासना चालते. तेच वाढणे म्हणजेच देवीच्या दिव्याला तेल देऊन येतात. ‘रव’ म्हणजेच कोंब, त्याचे घट बसवून त्या घटाभोवती पेरणी करतात. गणपतीच्या दिवसांत तर घरगुती गणपतीबरोबर सार्वजनिक गणपती उत्सवही अतिशय दणक्यात साजरा होतो. गल्लोगल्ली आरास करून गणेशमूर्ती बसवलेल्या असतात. वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते. 
या धार्मिक सणांसोबत शिवजयंतीही एखाद्या सणापेक्षाही मोठ्या दणक्यात साजरी होते. गल्लोगल्ली शिवजन्माचा सोहळा साजरा होऊन संध्याकाळी शिवचरित्रावर आधारित शोभायात्रा निघते. याला गाडे निघणे असे म्हणतात. हे शिवजयंतीचे गाडे म्हणजे बेळगाववासीयांच्या मर्मबंधातील एक ठेव आहे.
कुस्ती -
आखाड्यात जाऊन प्रत्यक्ष कुस्ती पाहणे हा देखील बेळगावी संस्कृतीचाच भाग होता. दर मंगळवारी कुस्तीच्या आखाड्याला जत्रेचे स्वरूप यायचे. चंबा मुत्नाळ आणि टोपाण्णा गोजगे या पहिलवानांनी बेळगावकरांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ही खास कोल्हापुरी संस्कृती, बेळगावी संस्कृती बनून गेली.
व्यवसाय -
बेळगावातील वडगाव आणि खासबाग या उपनगरात खास बेळगावी साड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या साड्यांना परराज्यात खूप मागणी आहे. तसेच चांदीच्या वस्तूंना झिलई देणे हा देखील घरोघरी केला जाणारा व्यवसाय स्त्रियांना हातभार देऊन जातो. त्यासाठी उळी, गुंडा, बुरूस, रिंगे, तांबडी वाळू, परात एवढीच सामग्री पुरेशी आहे. या झिलईच्या व्यवसायामुळे कितीतरी कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो आहे.
संस्था -
वाङ्‍मय चर्चा मंडळ, नगर वाचनालय, सरस्वती वाचनालय, दै. तरुण भारत इत्यादी संस्थांनी बेळगाववासीयांचे मराठीपण अजूनही जपले आहे. कर्नाटक सरकारच्या बडग्याखाली पिचूनही महाराष्ट्रात जाण्याची अजूनही आस धरून असलेल्या बेळगाववासीयांचे मराठीपण या संस्थांनी आजपर्यंत विझू दिलेले नाही.
लग्न समारंभ -
पाच सुवासिनी, ज्यांना बेळगावी भाषेत ‘होवळ्या’ असे संबोधले जाते, त्याच लग्नाचा सारा विधी पार पाडतात. लग्न संपेपर्यंत वेगवेगळी लोकगीते गातात. शेवटी होवळ्यांच्या ‘भाकरी’चा कार्यक्रम होऊन सांगता होते. तांदळाच्या पांढऱ्या शुभ्र भाकरी आणि वांगे-बटाटे, तिखट सांडगा, सुके झिंगे यांची चटकदार भाजी करतात. ती पाहूनच रसवंती खवळते. पंचवीस-तीस भाकऱ्या आणि भाजी प्रत्येकाच्या वाट्याला येते. (जणू त्यांच्या कामाचा मोबदलाच!)
लग्न समारंभात खीर आणि बुंदीचे लाडू हे जेवण प्रसिद्ध. त्याला सिमीट-काँक्रीट म्हणतात.
फक्त बेळगावातच आढळणारी आणखी एक पद्धत म्हणजे मावळे आयार (मामाचा आहेर, मावळा हा शब्द महाराष्ट्रातील शिवाजीराजांचे मावळे यांच्यामुळे सर्वज्ञात आहेच.) नवऱ्या मुलाकडून हा द्यावा लागतो. (मामाची हक्क असलेली मुलगी आपण नेतो, त्याचाही मोबदला असू शकतो कदाचित!) कर्नाटकात गावाचा उल्लेखही लग्नाच्या गीतातून येतो -
तहानलाडू भूकलाडू बांधून शेल्याच्या पदरी
चला जाऊ बाजारी हुक्केरीच्या (कर्नाटकातील गाव)
हुक्केरी बाजारी, तिते बसले सरग
आमाला गरज हळदीची
बेळगावी बोली भाषा -
बेळगावच्या बोलीभाषेचा एक वेगळाच गोडवा आहे. स्वराचे विशिष्ट वळणाने काढले जाणारे हेल, लकबी, उच्चारांची ढब यांची एक शैली बनली आहे. बेळगावी भाषेवर कानडी आणि कोकणी भाषांचा परिणाम आढळतो. काही भाषातज्ज्ञांच्या मते, बेळगावी भाषेतले ग्याल्लास, यल्ल्यास, यन्नाव, जान्नाव या वळणाने जाणारे उच्चार, बोलण्याची ढब ही ‘चंदगडी भाषा’ असे समजले जाते. पण, आम्हा सर्व अस्सल बेळगावकरांच्या मते, ही चंदगडी भाषा नसून खास बेळगावी भाषा आहे. खास श्रमजीवी वर्गाची आणि शेतकऱ्यांची असलेली ही बेळगावी ‘बोलीभाषा’ तिचा थाट जरी चंदगडी वळणाचा असला, तरी तिचा खास असा बाज बेळगावी बोलीचा आहे. सीमाभागातील मराठी संस्कृतीची ती अस्सल बेळगावी बोली आहे. त्यामुळे साहित्य क्षेत्रातील दिग्गजांनी कितीही चंदगडी भाषा असे संबोधले, तरी खरा अस्सल बेळगावकर या भाषेला चंदगडी नाही, तर बेळगावी बोली असेच म्हणतो आणि पांढरपेशा समाजाने या भाषेला कितीही व्हग्गी भाषा म्हणून नाक मुरडले, तरी हिचा गोडवा कमी होत नाही. आणि खरा बेळगावकर मात्र कायमच या भाषेचा अभिमानी होता, आहे आणि या पुढेही राहील.
रावसाहेबांच्या मुखातून पु. ल.नी अजरामर केलेली कानडी वळणाची भाषा ही देखील बेळगावी बोलीभाषा नसून, कानडी मनुष्य मराठी कसे बोलतो त्याचा मासला आहे. कारण, कर्नाटकच्या आतल्या भागातून येणारे व्यापारी लोक ज्यांना मराठी येत नाही, ते कानडीचे हेल काढूनच मराठी बोलणार, जसे की,
खास हो गाणं तुमचं ते.परंतु तुमचं तबलजी, ते कुचकुचत वाजवतंय की!
हे तबला वाजिवतंय की मांडी खाजवतंय होss
प्रकाश संतांनी ‘लंपनचे भाविविश्व’ अजरामर केले ते शारदासंगीत, वनवास इत्यादी पुस्तकातून. यातून त्यांनी जी भाषा वापरली आहे, ती बेळगावी बोली नसून कानडीमिश्रित मराठी भाषा आहे. उदा. काय लंपूसाहेब, ओठ बाहेर काढून बसून सोडलात आज सक्काळी, सक्काळी. एकदम मज्जा ऐद नोरडीss अभ्यास इल्ला. येन इल्ला.
खाली दिलेल्या सीमाभागातील गावांमध्ये ही बेळगावी बोलीभाषा बोलली जाते आणि सीमाप्रश्नाशी निगडित असलेल्या या भागाने या बोली भाषेचे जतन केले आहे. सीमाभागाशी निगडित असणारी बेळगावची काही गावे-खेडी अशी :
कणबर्गी, कलखांब, चंदगड (महाराष्ट्रातील नव्हे)
तारीहाळ, बाळेकुंद्री, मुतगा, निलजी, कुडची, सांबरी
हालगा, जुनेबेळगाव, धामणे, हट्टी
राजहंसगड, यळ्ळुर, बिडी
वाघवडे, देसुर, मच्छे
किणये, बिजगर्णी, बावगे, बामनवाडी, बाळकमट्टी, खादरवाडी, मजगाव, पिरनवाडी, बहादूरवाडी, हंचेनट्टी, सावगाव, हंगीरगे, मंडोळी
बेळगुंदी, बाकमूर, बोकमुर, बेन्नाळी
बाची, उचगाव, हिंडलगा
आंबेवाडी, जाफरवाडी, लहान कंग्राळी
काकती, होनगा, कंग्राळी
बेळगाव शहरातील शहापूर, अनगोळ, खासबाग, वडगाव हे भाग
बेळगावी भाषेची वैशिष्ट्ये -
स्त्रियांच्या बोलण्यात येते, जाते, पाहते असे स्त्रीवाचक शब्द न येता; येतो, जातो, बघतो, असे शब्द येतात. लहान मुले एकमेकांशी ‘बे’च्या पाढ्यात बोलतात. उदा. खटे ग्यल्लास बे? जा, बे, जा. मोठ्या माणसांना ‘गा’ हा आदरार्थी शब्द लावतात. उदा. काय गा मामा कव्वा येल्लास गा? जानं न्हास काय गा? स्त्रिया आपुलकीने संवादात ‘गे’ शब्द वापरतात. उदा. भांगलुस येनं न्हास काय गे बाई? बेळगावी भाषेवर कानडी आणि कोकणी भाषांचा अधिक परिणाम झाल्याने त्या भाषेतून आलेले शब्द आढळतात. पण बेळगावी भाषेचे स्वतःचेही खास शब्द आहेत.
बेळगावी भाषेतील काही शब्द
डोगल – गुडघा, टकलं – डोकं, व्हाण – चप्पल, बावगा – बागुलबुवा, चकोट – चांगले, व्हंजी – वन्स, व्हनी -वैनी, आळ – मजूर, कवाट – अंडे, कोंबा – कोंबडा, व्हटका – ढेरपोट्या, व्हगं – खेडवळ, चणया – मसूर, घट्टगड्डे – नवलकोल, गड्डे – बटाटे, निंबार – ऊन, दिक्कोमाळ – माळाच्या दिशेने, टंपलवारी – टेंपररी, माटीस  जाणे - अंत्यविधीला जाणे, मदानास जाणे – शौचाला जाणे, तिक्क – तिखट, वाळकू – काकडी
कानडी वळणाचे शब्द
मंग - माकड, मुगळ – बोळ, मॉड – मळभ, बिंदगी – लहान कळशी, करबेव – कडीपत्ता, म्हणी – पाट, भाव – विहीर, झंपर – पोलके, आंगी – सदरा इत्यादी.
वरील बेळगावी भाषेचा साहित्यात संवादरूपाने उपयोग केला तो भीमराव गस्ती, आतिवाडकर आणि कुमारी वेसणे (म्हणजे मी स्वतः) यांनी.
बेळगाव हे बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. सौंदत्ती येथील रट्टा राज्यकर्त्यांनी बेळगावची स्थापना केली. बिचीराजाने १२०४ मध्ये बेळगावचा किल्ला बांधला. इतक्या या प्राचीन शहरातील भाषेचा परिणाम इतर भागातील भाषांवर पडला. मूळ बोलीभाषा जी आजही बोलली जाते, तिला मात्र बेळगावी न म्हणता चंदगडी असे संबोधले जाते.
बेळगावातील साहित्यकार
प्रसिद्ध साहित्यिक ‘मोचनगड’कार रा. भि. गुंजीकर, ‘यमुनापर्यटन’कार बाबा पद्मनजी, कवी कृ. ब. निकुंब, इंदिरा संत, प्रकाश संत, जी. ए. कुलकर्णी, माधुरी शानभाग, अनंत मनोहर, हे सर्व साहित्यिक बेळगाव शहराचे देणे आहे. अशी ही बेळगावी संस्कृती आणि बोलीभाषा कन्नडच्या रेट्यामुळे दबली जात आहे. वाढत्या नागरीकरणामुळे सीमाभागातील ही बेळगावी बोलीभाषा गावापुरतीच मर्यादित होऊन तिचा टक्काही घसरत आहे. मला वाटते, आणखी चार-पाच पिढ्यांनंतर ही भाषा काळाच्या उदरात गडप होणार की काय? कारण, हल्ली सारे वैश्विक होत आहे. त्यामुळे आपली संस्कृती, बोलीभाषा यांचे संवर्धन करणे; हे त्या-त्या भागातील नागरिकांचे आद्य कर्तव्यच आहे.
बेळगावी बोलीभाषेचा नमुना
“आऊ, ये की गे लगुनं, पड्यात पोरं खेळोलल्ली तवा त्यास्नं मंगी पाट लागली, किस्नामा गेला आणि त्यान गुंड्यान मारल्यानं बग मंग्यान्सी, तकर आपणीच पायात पाय गुतपाळोन पडला म्हणे बग. लईच लालाय म्हणे त्यास, चल जाऊन बगून तर युवा त्यात.”
“खरं सांगोलीस काय बळ्यान गे?”
“न्हा गे बाई बळ्यान कास सांगो? हाबग पोरीसाटनं हुंदळा काडुचं म्हणून निसणीवरनं माळ्यावर चडलो तर वरच्या धुळ्यानं बावगा हुन बसलो, आंगोळी करूचं म्हचल्यारं पाण्याचा ठेंबका बी न्हाय डेऱ्यात म्हणून बिंदगा घ्युन पाणी हानुचं म्हणून भाविवर जाऊलल्लो तर परशा आरडेत येलं, “किस्नामा पडला, किस्नामा पडला”, म्हणून.”
“बटकुर खरं सांगताय काय बळ्यान कय म्हायती? म्हणून म्हटलो बगुन तर युव्वा त्यास म्हणून तुज बलवुललाव बग.”
“व्हय, हा मन एवडा साळोता फिरीवतो चटाकदिशी आणि येतो. सावलं बी बदलन्नाव घे म्हणेस.”
“फिरीव फिरीव, तोपर्यंत मीया वाळकं चार घ्युन येतो किस्नामास द्यूस. कल बाजारातन हानलाव कामाट्यांबरोबर बाजार भरलाय बग गड्ड्यानी, घटत गड्यांनी, मिरशेंगा, तुपशेंगा, कामट्यानी, बोंबळच फिरली बग ते बगुन.
“जा, गे, घ्युन ये जा. आग्गे बाई ह्यो बग शंकऱ्यामाबी हिकडीच युलाय.
“ये गा शंकऱ्यामा!”
“आऊ, किस्नास मंग्याण पाडीवल्यान म्हणे आणि बसलाय आत्तं मुंगळात निकोन, त्यास हूडकुसाटन जाऊलाल बग आमी पासाजण.”
“मामा, त्या मंग्यास नुस्तं हुसाकला मारशीगिरशीला आणि, म्हरोतिचा अवतार गा तो म्हणून म्हणतो.”
“न्हाय लेकी, मारनं न्हाव घे, नुसत हुसकलुन त्या दिकोमाळ करून येतो. ह्या माज्या व्हणा जरा ऱ्हांऊ देत तुज्या दारात, न्हायतर मीया बी किस्नासकचं पड्यान गिड्यान खटेयेतर.”
संदर्भ –
लोकसत्ता – १२ मे २०१३ मायबोली – डॉ. प्रमोद मुनघाटे
महाराष्ट्र टाइम्स – १० जून २०१७ राजा शिरगुप्पे
अनंत मनोहर – महाराष्ट्र टाइम्स ९ मार्च २००२ बेळगाव : कालपरवा ते आज
वनवास, संगीत शारदा लेखक – प्रकाश संत
१९८० – जी. एस. एस. कॉलेज वार्षिक अंक
विजयालक्ष्मी विजय देवगोजी
संपर्क - ८४४६३७५२५१

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


सीमेवरचे गाव , बेळगाव , संस्कृती , बोलीभाषा , विजयालक्ष्मी देवगोजी , मराठी अभ्यास केंद्र

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen