अमेरिका १९५० (ऑडीओसह)


अंक – विविधवृत्त, दिवाळी १९५१

भारतीयांनी अमेरिकेला जाणे सत्तर वर्षांपूर्वी फार नित्याचे नव्हते. त्यामुळे तेथील ऐश्वर्याच्या नवलकथा आणि जीवनशैलीविषयी सर्वांनाच कुतूहल होते. आयएमएफच्या कचेरीत त्याकाळी उर्मिला जुन्नरकर या मराठी स्त्रीने नोकरी केली हे महाराष्ट्रासाठी फारच सन्मानाचे. तिथे फिरताना आलेले अनुभव, सीडी देशमुख अमेरिकेत गेले होते तेंव्हा त्यांच्या विद्वत्तेचे झालेले दर्शन हे सगळेच जून्नरकर यांनी या लेखात ओघवत्या शैलीत लिहिलेले आहे. योगायोगाने त्या एका थरारक प्रसंगाच्या साक्षीदारही झाल्या. १ नोव्हेंबर १९५० रोजी  अमेरिकेचे तेंव्हाचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन यांच्या हत्येचा प्रयत्न झाला, तो अगदी जुन्नरकर आणि त्यांचे आप्तमित्र यांच्या समोरच. व्हाइटहाऊसमध्ये काही दुरूस्तीचे काम सुरु असल्याने ट्रुमन तेंव्हा ब्लेअर हाऊसमध्ये राहात होते. जुन्नरकर आणि मंडळी नेमकी  ब्लेअर हाऊसच्या समोर असतानाच हा गोळीबार झाला होता. ट्रुमन हे १९४५ ते १९५३ अशी तब्बल नऊ वर्षे अध्यक्ष होते.

हा लेख ऐकण्याची सोयही उपलब्ध आहे. तेंव्हा वाचा किंवा ऐका, अथवा दोन्हीही.आठवणींची कांही टांचणे (मूळ शीर्षक)

कु. उर्मिला जुन्नरकर या इंटरनॅशनल मोनोटरी फंडच्यया कचेरीत काम करीत होत्या व त्या निमित्ताने त्यांचे अमेरिकेत व युरोपमध्ये कांही काळ वास्तव्य झाले होते. आतां त्या पुन्हा हिंदुस्तानांत परत आल्या असून त्यांच्या परदेशनिवासांतील कांही आठवणी या अंकांत आम्ही प्रसिद्ध करीत आहोत.

****

मी अमेरिकेत येऊन कांही महिने लोटले होते व तेथे त्यावेळी नुकत्याच आलेल्या माझ्या काकांबरोबर चार जुलईच्या स्वातंत्र्योत्सवांत आमच्या एका मित्राबरोबर आम्ही जाण्याचे ठरविले. आम्हां तिघांत मीच जास्त दिवस वॉशिंग्टनला राहिले असल्यामुळे वाटाड्याचे काम मजकडेच आले. प्रथम आम्ही ज्या भागांत संरक्षक दलाच्या कवाइती, मिरवणुकी होत्या, तिकडे गेलो. त्या मिरवणुकींत दलाच्या निरनिराळ्या विभागांतील सैनिक तर होतेच, पण त्यांच्याबरोबर विश्र्वविद्यालयीन व शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनी, बॉयस्काउट, मागील लढायांत काम केलेले सेवानिवृत्त सैनिक या सर्वांनी आपआपले गणवेष घालून भाग घेतला होता व त्याबरोबरच शृंगारलेले रथ, नटविलेल्या मोटरी, वगैरे निरनिराळ्या आकर्षक तऱ्हांनी ही मिवणूक सजली होती. मिरवणूक पाहण्यासाठी शिस्तीने दुतर्फा असलेला प्रचंड जनसमूह व त्याबरोबरच वाजत जाणारे सुस्वर वाद्यांचे ताफे हा सर्व देखावा अतिमनोहर होता. हे बघितल्यावर आम्ही दुसऱ्या एका भव्य व मोकळ्या मैदानाकडे गेलो. तेथे एक मोठे स्टेडियम बांधून त्यावर तिकिटे विकत घेऊन बसणाऱ्यांची सोय केलेली होती व भोंवताली हिरवळीवर बसून किंवा उभे राहून बघण्याची सोय असल्यामुळे लाखों लोक तेथे जमा झाले होते. या सर्वांना दिसेल अशा सोईने समोर एक विद्युत् प्रकाशित स्टेज तयार केले होते. त्यावरून मधून मधून त्या दिवसाची व अमेरिकन स्वातंत्र्यासंबंधीची निरनिराळ्या पुढाऱ्यांची भाषणें होत होती. कांही नाट्यप्रयोग उत्कृष्ट, कॅबारे (Cabaret), नाच, गाणी व इतर खेळ चालू असतांना मधून मधून होणाऱ्या तोफांच्या सलामींना साथ देण्याकरितांच की काय आकाशांत मेघगडगडाट होऊन व लखलखणाऱ्या सौदामिनीनंतर लगेच पर्जन्यवृष्टी सुरू झाली. तेव्हा कांही प्रयोग आटोपते घेऊन, आकाशांत उडविणाऱ्या दारूकामाला व आतषबाजीला सुरुवात केली गेली. शक्य त्या लोकांनी झाडाखाली आश्रय घेऊन व इतरांनी पावसांत तसेच भिजत राहून ते कमालीचे कलाकुसरीचे देदीप्यमान चित्ताकर्षक दारूकाम बघितले. ते संपल्यानंतर हा लाखों लोकांचा प्रचंड समुदाय पावसांतून शिस्तीने परतला. अशा वेळी वाहन मिळणे शक्य नसल्यामुळे आम्ही पायींच घरी जाण्याचे ठरविले; कारण ज्यांच्या स्वतःच्या मोटरी होत्या, त्यांना सुद्धां माणसांच्या व मोटरींच्या त्या तुफान गर्दीमुळे आपल्या मोटरी मैल दोन मैल दूरच ठेवाव्या लागल्या होत्या. तेथे बघितलेले खेळ व दारूकाम आणि रस्त्यांतील लखलखाटांतून पावसांतून शिस्तीने जाणारा उत्साहपूर्ण जनसंमर्द यांतील जास्त चित्ताकर्षक काय होते, हे सांगणे कठीण आहे.

अमेरिकन वराची सप्तपदी

आपल्या अमेरिकेतील वकील विजयालक्ष्मी पंडित यांनी केलेले कन्यादान हा एक अपूर्व प्रसंग होता. परंतु मी येथे परत आल्यावर विविध वृत्तांतमध्ये आलेले अशोक भडकमकर व मेधा भट यांच्या लग्नप्रसंगीचे साद्यंत वर्णन वाचल्यामुळे त्या प्रसंगाची पुनरावृत्ती मी करीत नाही. या निमित्ताने दुसऱ्या एका प्रसंगाची आठवण येऊन त्याचे वर्णन करण्याचा मोह टाळतां येत नाही. निसर्गोपचार (Naturopath and Herbal Specialist) करणाऱ्या एका अमेरिकन डॉक्टरला हिंदुस्थानसंबंधाने पुष्कळशा वाचलेल्या व ऐकलेल्या माहितीमुळे एक प्रकारे हिंदुधर्म व संस्कृती यांबद्दल फार आपुलकी व प्रेम वाटत होते. या माणसाचे नुकतेच एका इंग्रजी बाईशी त्याच्या पद्धतीने लग्न झाले होते. परंतु त्याच्या मनाने एकच वेड घेतले होते, की अग्नीसमोर सप्तपदी झाल्याशिवाय आपल्या लग्नाची खरी सांगात झाली असे मानतां येणार नाही व त्याबद्दल तो आपल्या एका हिंदी मित्राला याबाबत मदत करण्यास सांगत असे. त्या आपल्या हिंदी मित्राकडे माझे काका गेले असतांना तो त्यांना मुद्दाम भेटावयास आला व हिंदुस्थानविषयक सर्व माहिती विचारून हिंदुस्थानांत येऊन स्थायिक होण्याची त्याने इच्छा प्रदर्शित केली. आपल्याला Naturopath म्हणून कोठे नोकरी मिळेल का वगैरे चौकशी करितां या बाबतींतील अडचणी आम्ही त्यास सांगितल्या व इतर गोष्टींवरून गोष्टी निघतां पुनः तो सप्तपदीचा विषय निघाला. या बाबतींत त्याला लागलेली तळमळ व ध्यास लक्षांत घेऊन तेथील विश्र्वविद्यालयांत काम करणाऱ्या आमच्या मित्राला या बाबतींत कांही तरी मार्ग काढण्याबद्दल आम्ही विनंती केली. बंगलोरकडचा संस्कृत जाणणारा एक स्वामी शोधून काढला. वाशिंग्टनला माझ्या मैत्रिणीकडे कांही दिवस राहावयास आलेले “स्केनेकटेडींत” स्थायिक झालेले सुप्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ हिंदी गृहस्थ व त्याचे कुटुंब काकांच्या पूर्वीच्या ओळखीमुळे भेटले होते व त्यांनी आपल्या मुलांची अमेरिकन मुलीशी वैदिक हिंदु पद्धतीने लग्ने केल्याची आठवण झाली. त्याच्याकडून लग्नविधीचे पुस्तक मिळविण्याबद्दल आमच्या मित्राला सांगितले. अशा तऱ्हेने मिळविलेल्या ह्या व दुसऱ्या पुस्तकांच्या आधाराने होम करून पाट मांडून पुण्याहवाचन वगैरे करून त्या अमेरिकन दांपत्याचा सप्तपदीचा समारंभ एकदांचा पार पडला!

स्वामीस पंचवीस डॉलर दक्षिणा, मित्रमंडळीस पार्टी व त्या माणसास शांती व समाधान मिळाले!

देशमुखांचे फ्रेंच भाषेवरील प्रभुत्वजागतिक बँकेच्या व इन्टरनॅशनल मॉनेटरी फंडाच्या पॅरिस येथे भरलेल्या सभेला मला फंडाकडून कामानिमित्त हजर राहण्याचा योग आला. या सभेचे अध्यक्ष आपले हिंदुस्थानचे अर्थमंत्री श्री. चिंतामणराव देशमुख हे होते व व त्यांचे इंग्रजीतून केलेले अध्यक्षीय भाषण त्यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीस, लौकिकास व दर्जास साजेसे महत्त्वपूर्ण, विचारपरिप्लुप्त व माननीय असे तर होतेच, परंतु त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष सभेच्या उद्घाटन समारंभास आले असतांना त्यांच्या स्वागतार्थ फ्रेंच भाषेंतून केलेले भाषण तर फारच प्रशंसनीय झाले. समयोचित फ्रेंच वाक्प्रचार व फ्रेंचासारखीच उच्चारशैली वगैरेमुळे उत्कृष्ट फ्रेंच वक्त्याने करावे अशा दर्जाचे ते भाषण झाले होते व त्याची सर्वांकडून होत असलेली प्रशंसा ऐकून आम्हां हिंदी लोकांना साहजिकच अभिमान वाटला. त्यांनी सायंकाळी दिलेल्या पार्टीस फ्रान्सचे अध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री, इतर राजकारणी व निरनिराळ्या क्षेत्रांतील अधिकारी मंडळी व त्यांच्या पत्नी इत्यादी बरीच बडी पाहुणे मंडळी उपस्थित होती व त्यामुळे तो प्रसंग हिंदुस्थानच्या कीर्तीत अविस्मरणीय भर टाकणारा असाच झाला. या सभेमध्ये कांही परकीय राष्ट्रांनी धोरणी राजकारण व कारवाया ह्यांनी आपला कार्यभाग कसा साधून घेतला हे मोठे पाहण्यासारखे होते; परंतु त्याबद्दल जास्त लिहिण्याचे हे स्थळ, काळ व प्रयोजन नव्हे. पण यामुळे सभेचे काम अपेक्षेपेक्षा लवकर आटोपले व त्यामुळे मला व माझ्याबरोबर काम करणाऱ्या अमेरिकन मैत्रिणीला युरोपांतील कांही देशांत सफर करण्याची संधी मिळाली व प्रेक्षणीय स्थळे व संस्था पाहतां आल्या.

श्रद्धाळूपणा सगळीकडे सारखाच!

रोममध्ये पुण्यवर्ष (Holy Year) असल्यामुळे खूपच गर्दी होती व सर्व देशांतून लाखों कॅथलिक्स येत असत. पोपच्या वॅटिकन् (Vatican) मधील राज्यांत त्याचे स्वतःचे सैनिक, निराळी पोस्टाची तिकिटें वगैरे सर्व स्वतंत्र आहे. ठराविक वेळी पोप आपल्या राजवाड्यांतून बाहेर जमलेल्या हजारो अनुयायांच्या रांगेंतून जातांना दोन्ही हातांनी सर्वांना आशीर्वाद देत जातो व त्या आशीर्वादाचे कायमचे प्रतीक म्हणून त्या वेळेला हातरुमाल, अत्तराच्या वाटल्या वगैरे बाहेर काढून व त्या पोपच्या नजरेखालून जातील अशा तऱ्हेने धरून आशीर्वाद घेतात. त्या जनसंमर्दाचा भाविकपणा व भक्ती आपल्याकडील भोळ्या भाविक लोकांपेक्षा निराळी नाही!

अध्यक्षांच्या खुनाचा प्रयत्न!युरोपांतून परत आल्यानंतर एक दिवस मी व माझी मैत्रिण फ्रान्सिस लंच आटपून परत ऑफिसकडे जात होतो. अमेरिकेच्या प्रेसिडेन्टचे सरकारी निवासस्थान व्हाइट हाउस हे असून जेव्हा त्यांत डागडुजी, रंगसफेती वगैरे चालू असते तेव्हां व्हाइट हाउससमोरील ब्लेअर हाउसमध्ये प्रेसिडेन्ट राहतात. त्या दिवशी प्रेसिडेन्ट ट्रूमन ब्लेअर हाऊसमध्येच होते. आम्ही ब्लेअर हाउससमोर येतो न येतो तोच दोन-चार बार ऐकू आले व वाटले की टायर पंक्चरचेच किंवा मोटरच्या बॅक फायरिंगचे हे आवाज असावेत. इतक्यांत पुन्हा दोन चार बार ऐकू आले. तोंच आमच्याजवळ असणाऱ्या दोन अमेरिकन बायका कोणी तरी खाली पडल्याचे एकमेकींस दाखवीत होत्या. आम्हीही पुढे होऊन बघतो तो पेनसिल्व्हानिया अव्हेन्यूवरील ट्रॅम लाइनवर एक संरक्षक पोलिस गोळी लागून मरून पडलेला दिसला. इतक्यांत पुन्हा बार होऊन ब्लेअर हाउस समोरील हिरवळीवर गोळ्या लागून पडलेले दोन इसम दिसले. धांवपळ सुरू झाली व लोकांची गर्दी जमली. इतके होत आहे तो सर्व बाजूंनी पोलिस वगैरे येऊन खरा प्रकार लक्षांत आला. प्रेसिडेंट ट्रूमनचा खून करण्याकरीता आलेल्या इसमांनी दारावरील पोलिसावर गोळ्या घालून आंत जाण्याचा प्रयत्न करतांच दुसऱ्या एका पोलिसाने त्या इसमावर गोळीबार केल्यामुळे त्यांतील दोघेजण जखमी झाले व दुसरे धरले गेले. तोपर्यंत अम्ब्यूलन्स, पोलिस, गाड्या वगैरे येऊन त्यांनी सर्व परिस्थिती आपल्या काबूत आणून रीतसर पुढील व्यवस्था करण्यांत आली. ही सर्व घडामोड इतक्या तडकाफडकी, डोळ्याचे पाते लवते न लवते तो झपाट्याने झाली, की संभाव्य संकटाची कल्पना येण्यास जरा वेळच लागला! मग आमच्या लक्षांत आले की आम्ही असलेल्या फुटपाथवरील जवळच्याच दुकानाच्या कांचा गोळ्या लागून फुटलेल्या होत्या! थोडक्यांत निभावले, नाही तर काय प्रसंग गुदरला असता देव जाणे! फ्रान्सीसला नक्कीच वाटले, की पोपने दिलेल्या आशीर्वादानेच आम्ही शिरसलामत या प्रसंगांतून निभावलो! हा प्रसंग अविस्मरणीय होता व त्या ऐतिहासिक घटनेला मी साक्षी होते. एका देशाचे भवितव्य बदलून टाकू पाहणारी ही घटना आमच्या डोळ्यांदेखत अभावितपणे घडत होती. त्यावेळच्या मनःस्थितीचे वर्णन करणे शक्य नाही. त्याची फक्त अनुभवानेच कल्पना येणे शक्य आहे. असा अनुभव कोणालाही न आलेला बरा; पण जर कोणावर असा प्रसंग आलाच, तर आमच्यासारखेच शीरसलामत सुटण्याचे भाग्य त्याला लाभो, हीच दिवाळीची व नववर्षाची इच्छा.

**********

लेखिका – उर्मिला जुन्नरकर

विविधवृत्त , अनुभव कथन , श्रवणीय

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.