१) मी तुला फोन लावायचा खूप प्रयत्न केला नाही पण लागतच नव्हता. नेटवर्क इश्यू असणार नक्की. (समोरच्या माणसाला साऱ्या जगाचे फोन येत असतात आणि missed call alert मध्ये याचं नावही नसतं)
२) मी तुला फोन लावत होतो पण तुझा फोन बिझी होता सारखा. (समोरचा माणूस call waiting सुविधा वापरतो हे माहीत नसतं यांना)
३) तुला Whatsapp मेसेज पाठवले होते, पण तुला मिळाले कसे नाहीत? माझ्याकडून तर send झाले होते!(यांना वाटतं की Whatsapp मध्ये सर्व्हरवर आलेला मेसेज हरवू शकतो किंवा पुढचा माणूस मूर्ख आहे)
४) मी तुला FB/Whatsapp मेसेंजरला ब्लॉक केलं नाहीये. काहीतरी तांत्रिक कारण असेल. (समोरच्या माणसाला you can't reply to this conversation असं FB/Whatsapp इमानेइतबारे दाखवत असतं जेव्हा कुणी ब्लॉक करत)
५) माझ्या Whatsapp मधून लोकेशन शेअरच होत नाहीये. काहीतरी प्रॉब्लेम आहे! (स्वतः नेमके कुठे आहोत हे दुसऱ्या व्यक्तीला न सांगण्यासाठीची लोणकढी थाप)
६) मी तुला फोनवर ब्लॉक केलेले नाहीये. (यांना फोनवर कॉल केल्यावर पहिल्या 2 सेकंदात रिंग बंद होऊन फोन बिझी आहेचा IVRS सर्वकाळ येतो)
७) मला तुझं ईमेल मिळालंच नाही अरे, मी spam मध्ये पण चेक केलं! (पुढच्या माणसाला कसलाही delivery failure आलेला नसतो. उलट कधीकधी read report पण आलेला असतो)
८) मी जरा जास्तच बिझी होतो त्यामुळे 2-3 दिवस reply करता आला नाही (ही व्यक्ती रात्रंदिवस FB, Whatsapp वर रात्रंदिवस रतीब घालत असताना समोरच्या व्यक्तीला दिसत असते)
९) We will update you soon. (हे कंपन्याचे HR म्हणतात जे कधीच हो की नाही ते धड सांगत नाहीत)
अशा बऱ्याच सबबी अजून आहेत ज्या मी माझ्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात खूपदा ऐकल्यात किंवा लोकांना दुसऱ्यांना ऐकवताना पाहिलंय. या सगळ्या सबबी ह्या धादांत खोट्या असतात कारण माणसे खोटं बोलतात, तंत्रज्ञान नाही. या सबबी बहुतांश वेळेस एकमेकांना न बोलण्यासाठी, न भेटण्यासाठी, रिपोर्टिंग न करण्यासाठी किंवा पैशाचे व्यवहार टाळण्यासाठी असतात.
एखाद्या व्यक्तीशी आपल्याला बोलायचं नसेल किंवा संबंध ठेवायचा नसेल तर त्याला तसं स्पष्ट सांगणं हे केव्हाही चांगलं. पाश्चिमात्य देशांत हा प्रकार लोक सहजपणे, योग्य शब्दात कारण सांगून करतात. त्याच्यामुळे दोन्ही व्यक्तींचा वेळ वाचतो. भारतीय लोकांना मात्र कुणाला "नाही" म्हणायला हिंमतच होत नाही, मग ती गोष्ट कामाची असो, प्रेमाची असो, बोलण्याची असो किंवा पैशाची असो. उगीच पुढच्या माणसाला ताटकळत ठेवायचं.
त्यात एक स्वार्थयुक्त भीतीपण असते की काय जाणो उद्या या माणसाची आपल्याला गरज पडली तर? उगीच एखादी गोष्ट ताणत ताणत न्यायची आणि मग तिला चरे पाडायचे हा भारतीय लोकांचा स्थायीभाव आहे. एखादी व्यक्ती आपल्याला आयुष्यात मित्र म्हणून हवी असते, पण तिच्याशी आर्थिक किंवा व्यावसायिक व्यवहार करता येऊ शकत नाही हे त्या व्यक्तीला स्पष्ट सांगण्यात काहीही वाईट नाही.
एखाद्या कुटुंबातील व्यक्तीशी आपलं रक्ताचे नाते असले तरी त्या व्यक्तीशी आपण संबंध ठेवू इच्छित नाही हेही सरळ सांगता येतं. जसं GF-BF मध्ये ब्रेकअप होतं तसं घनिष्ट मित्रांमध्ये, नातेवाईक लोकांमध्ये, व्यावसायिक नात्यांमध्ये पण ब्रेकअप होत असतं. आणि हे ब्रेकअप व्यवस्थित कारण सांगून, एकमेकांना विश्वासात घेऊन खूप सुंदर पद्धतीने करता येतं.
त्यासाठी वर दिलेल्या सबबी सांगायची गरज पडत नाही. प्रत्येक रिलेशनशिपला एक expiry date असते. काही रिलेशनशिप आपल्यासमोर संपतात तर काहींची expiry date आपण मेल्यानंतर असते जेव्हा लोक माघारी आपणाला दोष देतात. त्यामुळे या असल्या गोड गोंडस सबबींच्या मागे लपण्यापेक्षा सरळ "नाही" म्हणायला शिका. नकारात काहीही वाईट नाहीये!
लेखक- डॉ. विनय काटे
नाही
निवडक सोशल मिडीया
विनय काटे
2021-07-25 14:00:02
Chandrakant Chandratre
4 वर्षांपूर्वीअगदी योग्य.
थोडक्यात पण उत्तम कालसुसंगत लेख.. Dare to Say No यावर पुष्कळ लिहिले गेले आहे.. पण माझा अनुभव सांगतो.. प्रामाणिकपणे जगणे कठीण आहे.. पुष्कळ गैरसमज होतात.. अनेकांना हे झेपत नाही त्यामुळे खोटं बोलावे लागते.. एक उदाहरण सांगतो.. एका घरगुती कार्यक्रमासाठी मित्राचा फोन आला होता.. मी प्रामाणिकपणे सांगितले की मला वेळ भरपूर आहे पण खूप कंटाळा आलाय. त्यामुळे मी येणार नाही.. मित्राला राग आला.. पण मी खोटं बोललो असतो की तब्येत बरी नाही, पाहुणे आले आहेत वगैरे... तर त्याचे समाधान झाले असते.. जगावे कसे? हा कठीण प्रश्न आहे असं म्हणतात ते उगाच नाही 😎
Rajesh Jadhav
4 वर्षांपूर्वीछान लेख....होकार देउन संकटात पडण्यापेक्षा नाही मन्हणे सर्वोत्तम...
Rajesh Jadhav
4 वर्षांपूर्वीछान लेख....होकार देउन संकटात पडण्यापेक्षा नाही मन्हणे सर्वोत्तम...
sumitra jadhav
4 वर्षांपूर्वीसबबीखाली खरी परिस्थिती लपवणे हा एक प्रकारचा मानसिक कमकुवतपणा असू शकतो. जे सत्य सांगण्याने कुणाचेच फार नुकसान होणार नाही, ते व्यक्त करण्याची सुध्दा भीती वाटण्याने अधिक नुकसान सबबी सांगणार्याचे होते. यासाठी मन सजग ठेवणे आणि खरे बोलणे याने खूप समाधान मिळते.
Nandkumar Wader
4 वर्षांपूर्वीनकाराची आपली एक भाषा असते... सौम्य शब्दातला स्पष्ट अर्थातला नकार ... सांगणाऱ्यास नि ऐकणाऱ्यास ..समजतो कुठेही कटूपणा येत नाही .. तसंच कठोर शब्दातला चिडणारा नकार दोघांच्याही पचनी न पडणारा...कटूपणा बरोबर वैमनस्य वाढविणारा नकार ... ... ती वेळ ठरवते नाही ,नकार कसं सांगायचं आणि मग त्याचे कालसापेक्ष परिणाम मात्र आपण निरंतर भोगामचे एव्हढंच आपल्या हाती असतं
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीआपण म्हणता ते खरं आहे .
rsrajurkar
6 वर्षांपूर्वीखूपच स्पष्ट पणे नाही म्हणायचे यायलाच पाहिजे .छान लेख .
asmitaphadke
6 वर्षांपूर्वीnice article
arush
6 वर्षांपूर्वीफाटक्या तोंडाच्या म्हणुन कुप्रसिद्धअसतात ह्या व्यक्ति
Shubhada
6 वर्षांपूर्वीथोडक्यात आणि मुद्देसूद मांडणी. छान लेख.
pjanaokar
6 वर्षांपूर्वीKhupach parkhad
Dipikashelar
6 वर्षांपूर्वीGood one