अचानक आलेल्या पावसाने सूनेने टेरेसवर घातलेले सुकवण घरात घेताना सोपानरावांची त्रेधातिरपीट उडत होती. नातवाला नुकतेच शिकवणी वर्गाला सोडून आले होते. त्याचीही चिमुकली मदत होणार नव्हती. सगळे घरात घेईपर्यंत थोडंफार भिजलेच. पण फॅन चालू करून त्यांनी त्याखाली ते सुकवण ठेवले. इतक्यात त्यांचा मोबाईल वाजला.
सूनेचा कॉल होता. सुकवण आत घेतले काय विचारत होती. शिवाय चिंटूचीही खबर घेऊन तिने फोन ठेवून दिला. संध्याकाळचे पाच वाजले असतील. थोड्या वेळात सूनबाई घरी येणार होती. त्यानी गॅस वर कढई ठेवली आणि बाकीची तयारी करायला लागले. सुरूवातीला चहा करताना सुद्धा त्यांच्या खुप चुका व्हायच्या. पण सकाळच्या वेळेला किचनमध्ये सुनेबरोबर लुडबूड करून त्यांनी चहाचे तंत्र आत्मसात करून घेतले होते आणि एक दिवशी सून आणि मुलगा ऑफीसमधून एकत्र घरी आल्यावर त्यांना फक्कड चहा देऊन सरप्राईज दिलं होतं. सागर तर वेडाच झाला होता. ज्या बाबांना गॅस कसा पेटवतात ते माहीत नव्हते त्यांनी चक्क चहा केला होता आणि तोही लाजवाब.
त्या दिवसापासून त्यांचे आणि नातवाचे प्रयोग सुरू झाले. यु ट्यूबवरून रेसिपीज बघून नवीन नवीन काहीना काही बनवू लागले. मुलगा आणि सून ऑफीसला गेले की सोपानराव, मुलगा आणि सूनेला कसं खुश करता येईल हे बघायचे. आज मृगाच्या अगोदर आलेल्या अवकाळी पावसामुळे त्यांना वेगळेच कायतरी करायचे सुचले होते आणि चक्क गॉगल लावून ते कांदा चिरायला बसले होते. असेच एक दिवशी सावित्रीबाईंचा म्हणजे त्यांच्या बायकोचा हात भाजला होता आणि सागरही नेमका घरी नव्हता. सोपानराव नुकतेच कामावरून आले होते . तेव्हा सावित्रीबाईंना त्यांना कांदा चिरायला सांगताना किती विनवण्या कराव्या लागल्या होत्या तेव्हा कुठे त्यांनी कांदा चिरला होता. तो ही वैतागत. त्याची आठवण आज त्यांना झाली आणि त्यांचे मन गतकाळात फिरत राहीले.
ते नुकतेच रिटायर्ड झाले होते. रिटायर्डमेंट नंतर बायकोसाठी त्यांनी खुप काही करायचे ठरविले होते. ती माऊली पण खुप खुश होती. पण ते सुख नियतीला पाहावले नाही. सावित्रीबाईंना ब्रेन कॅन्सर आहे हे कळल्यावर सोपानरावांच्या पायाखालची जमिन सरकली. ती आता काही दिवसांची सोबती होती. सोपानरावानी रंगवलेल्या स्वनांचा चुराडा झाला. सोपानराव तिची खुप काळजी घेऊ लागले. तिला काही हवं नको ते पाहू लागले. डिसेंबरचा शेवटचा आठवडा असेल. सावित्रीबाईंच्या खोलीतून कसलातरी आवाज आला. सोपानराव लगेच आत गेले. सावित्रीबाईंना धाप लागली होती त्या जोरजोरात श्वास घेत होत्या. सोपानरावांनी त्यांचा हात हातात घेतला तर हातात एक चुरगळलेला कागद होता. सावित्रीबाईनी त्यांना तो खुणेनेच वाचायला सांगितला. त्यांनी तो उघडला आणि वाचायला सुरूवात केली.
" प्रिय सोपान, माफ करा तुम्हाला एकेरी हाक मारते आहे. पण आज तसं म्हणावसं वाटतय. खुप दिवसांपासून तुम्हाला एकदा तरी एकेरी हाक मारावी अशी माझी इच्छा होती. पण कधी हीम्मत केली नाही. मी आता फार जगेन असं वाटत नाही. कालच सुनबाई आणि सागर बोलताना काही गोष्टी कानावर आल्या. खरतरं आज तुम्हाला हे सांगणार होते. पण काल रात्री पासून माझा आवाजच फुटत नाहीये. असो, बहूतेक त्यांना माझ्या मृत्यूची चाहूल लागली आहे. माझ्या जिवंतपणी , मरणोत्तर गोष्टींचे बोलणे चालू होते. मला माझी काळजी नाहीये. माझ्या पश्चात तुमचे कसे होईल याची चिंता मला लागून राहीली आहे. जवळचे तुटपुंजे धनही मुलांच्या लग्नात आणि माझ्या औषधोपचारात संपत आलेय. कालचे सुनेचे शब्द ऐकून मला तुमची काळजी अधिकच वाटू लागली आहे. मी मेल्यानंतर तुम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याविषयी सून बोलत होती. त्यावर सागर काही बोलला नसला तरी त्याचे मत बदलायला वेळ नाही लागणार. तर आता तुम्हाला शहाणं बाळ बनून राहावे लागणार आहे. मुला- सुनेची अडचण न बनता त्यांची सोय बनावी लागणार आहे. कदाचित दोघेही नोकरीला असल्यामुळे माझ्या पश्चात तो निर्णय घेत असतील. पण तुम्हालाच तुमचे अस्तित्व दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाहीये. थोडे मनकवडे व्हावे लागणार आहे. घरातील छोटी मोठी कामे आपली समजून केलीत तर तुमचाही वेळ निघून जाईल. मी असताना हक्काने एखादी गोष्ट मला सांगत होता आणि ती मी करत होते. पण आता तुमची कामे तुम्हालाच करावी लागतील. मला माहीत आहे तुमच्यासाठी हे सुरूवातीला कठीण जाईल आणि तुमच्या मनात हे ही आलं असेल हे सर्व करण्यापेक्षा मी वृद्धाश्रमात का जाऊ नये? वृद्धाश्रमात पैसा फेकला की सर्व होईल न होईल पण इथे आपल्या माणसात राहता तरी येईल. एक सांगू आपली सुन देखील एक स्त्री आहे. जशी मी आहे. एका स्त्रीच्या काही अपेक्षा असतात त्या ओळखून वागले की तिलाही ओढ लागेल. त्यांच्या प्रायव्हसीज, आवड निवड, कल हे सारं जपले कि ती माणसं आपली बनतात. शेवटी माणुस सर्वात जास्त कशाचा भुकेला असेल तर ते प्रेम आहे. तेच तुम्हाला तुमच्या मुलासोबत सून आणि नातवावर करायचे आहे. त्यांचं मन ओळखून वागायचे आहे. तुम्ही म्हणाल माझ्यावर कोण प्रेम करणार? एक नियम मला माहीत आहे. एखाद्याला प्रेम दिलतं तर ते सव्याज तुम्हाला परत मिळत असते. तसचं तुम्हाला मिळेल. मी म्हणतेय म्हणुन एकदा शहाणं बाळ बनून बघा. घरं तुमचेच आहे पण त्यात अस्तित्वहीन बनून राहू नका. सर्वांचे आवडते बनून जगण्यात पण एक मजा आहे." तुमची सावित्री..
सोपानरावांचे डोळे पाणावले होते. मरणाला टेकलीये पण किती काळजी करतेय. तिचं पुर्ण आयुष्य सगळ्यांची काळजी वाहण्यातच गेले. आपण तर कधीच तिचं म्हणण ऐकले नव्हते. आपले ते खरं करत आलो होतो. आज ती गोष्ट करण्याची वेळ आलीये. तिची शेवटची इच्छा म्हणून तरी शहाणं बाळ व्हायला हवं. सोपानरावानी वचन देण्यासाठी आपला हात त्यांच्या हातात दिला. सावित्रीबाईंच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट हास्य दिसले. पण काही वेळच. सोपानरावांचा हात घट्ट पकडून ती केव्हाच अनंतात विलीन झाली होती.
त्या दिवसापासून सोपानराव हळू हळू आपल्यात बदल घडवून आणू लागले. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपला खारीचा वाटा उचलू लागले. दोन महिन्याने सुनेने वृद्धश्रमा विषयी बोलायचा प्रयत्न केला. पण तो शेवटचा होता. त्यानंतर कधीच तो विषय त्या घरात निघाला नाही. मुला- सुनेला वेळ असेल नसेल तेव्हा अगदी चक्की वरून दळण आणण्या पासून, घरातील साफसफाई करण्यात सोपानरावांनी कधी लाज बाळगली नाही. ते प्रसंग, मुड्स ओळखून आपले वागणे बदलू लागले. त्यांना एक गोष्ट चांगलीच पटली होती. एखाद्याला आपल्याकडून काहीच अडचण होत नसेल तर त्या व्यक्तींपासून आपल्यालाही काहीच त्रास होत नाही. त्याचा प्रत्यय त्यांना घरात येऊ लागला. सुनेचे वागणे बदलले. तिही त्यांच्याशी प्रेमाने वागू लागली. सागरला त्याच्याशी अगोदर कामापुरते बोलणाऱ्या बाबांचे आताचे वागणे आवडू लागले. तोही त्यांच्याशी मन मोकळे पणाने वागू , बोलू लागला.
एके दिवशी तर विस्मृतीत गेलेला त्यांचा वाढदिवस मुला सुनेने साजरा केला . हे सारं काही सोपानरावांसाठी नवीन होतं. एकंदरीत सावित्रीबाईंचे शहाणं बाळ घरात चांगलचं रांगू लागले होते. इतक्यात दारावरच्या वाजलेल्या बेलच्या आवाजाने सोपानराव तंद्रीतून बाहेर आले. तेलाचा हात कपड्याला पुसत त्यांनी दरवाजा उघडला. समोर मुलगा, सुन आणि नातू चिंब भिजून उभे होते. " अरे ,तुम्ही तर पुर्ण भिजलात की आणि सोहमला का आणलत? मी त्याला आणायला जाणारच होतो." असे बोलून सोपानरावानी बाथरूममधला गिझर चालू केला.
" बाबा , पाऊस खुप पडत होता म्हणून त्याला आणला , परत तुम्हालाही त्याला आणायला जावे लागलेच असते ना आणि तुम्ही पण भिजला असता." चिखलात भरलेले बूट काढता काढता सागर म्हणाला. बाहेर अजून पाऊस पडत होता. सर्वजण फ्रेश होऊन बाहेर बसले होते. सोपानराव किचनमध्ये जायला उठणार एवढ्यात त्यांची सुन सान्वी गरमगरम भजीने भरलेल्या प्लेटस घेऊन हॉलमध्ये येताना दिसली. " बाबा खरं सांगू का, मला ना आज असा पाऊस पडताना पाहून भजी खावीशी वाटली होती" भज्यांची एक प्लेट सोपानरावांकडे देत सान्वी बोलली. " अगं सान्वी, बाबा ना मनकवडे झालेत " बाबांच्या प्लेट मधली एक भजी उचलत सागर म्हणाला.
हे ऐकल्यावर सोपानरावानी गालातल्या गालत हसत सावित्रीबाईंच्या फोटोकडे पाहीले आणि भज्याचा एक तुकडा तोंडात टाकला. अगदी शहाण्या बाळासारखा...?
लेखक: नितीन राणे, कणकवली
शहाणं बाळ..
निवडक सोशल मिडीया
नितीन राणे
2018-05-07 17:29:05

प्रतिक्रिया
वाचण्यासारखे अजून काही ...

लता मंगेशकर - उत्तरार्ध
शांताराम खळे | 3 दिवसांपूर्वी
'एकाच रागात गाण्याचा कटाक्ष दिसत नाहीं तुम्हा मंडळींचा लताबाई !'
लता मंगेशकर - पूर्वार्ध
शांताराम खळे | 6 दिवसांपूर्वी
माझे नेहमीचे वाद्यवादक असल्याविना मी कधीं गात नाहीं
कथा : आयुष्याचा हिशोब
व. पु. काळे | 7 दिवसांपूर्वी
एक वृद्ध माणूस दुसऱ्या वृद्धाला आधार देत होता. दोन वेलींनी एकमेकांच्या आधाराने उंच होऊं असं म्हणण्यासारखंच होतं ते!
म. गांधी समाजवादी होते काय ?
राम जोशी | 7 दिवसांपूर्वी
सत्याग्रही तत्त्वज्ञान आदर्शवादी आहे तर समाजवादी तत्त्वज्ञान वास्तववादी आहे.
Vaishali Nake
4 वर्षांपूर्वीछान गोष्ट
Seema Joshi
4 वर्षांपूर्वीछान आहे गोष्ट
Vijayshree Jadhav
4 वर्षांपूर्वीअतिशय सुंदर विचार!
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीकाळाचा महिमा . छान लेख
MADHAVIMD
6 वर्षांपूर्वीकौटुंबिक जिव्हाळा टिकवलातर म्हातारपण हसत खेळत जाईल,मनकवडेपणा जपायला हवा.
सौ मीनाक्षी
7 वर्षांपूर्वीखरंच हे प्रत्येकाला साधायला हवं म्हणजे सगळ्यांचीच आयुष्य सुखी होतील
Dr. Vinita
7 वर्षांपूर्वीखूप छान
Janhavi
7 वर्षांपूर्वीतसं पाहिलं तर प्रत्येका मध्ये शहाणे बाळ लपलेले असते.
Mahesh Pokharanakar
7 वर्षांपूर्वीछान लेख आहे!
bookworm
7 वर्षांपूर्वीमस्त! स्वतःमधील बदल इतका सोपा असता तर किती बरं झालं असतं! या लेखामुळे मन विचार करू लागलं. वागण्यामध्ये थोडासा समजूतदारपणा जरी आणला तरी भवताली चांगले लोक असल्याचं लक्षात यायला लागतं.