आपण कुठेही बाहेरगावी निघालो की प्रथम त्या गावात राहण्या-खाण्याचा काय बंदोबस्त आहे ते पहातो . सध्याच्या इंटरनेट युगात तर हे काम एका 'क्लिक' सरशी होते. संगणकाशी चार-पाच मिनिटं खेळून आपण जिथे निघालो आहोत तिथलं एखादं हॉटेल बुक करून निश्चिन्त होतो. मध्ययुगीन हिंदुस्थानात अशी हॉटेलं होती का ? हिंदुस्थानाबाहेरून जे लोक (परदेशी प्रवासी ) येथे यायचे, ते आपल्या राहण्या-खाण्याची काय सोय करायचे? चला पाहूया गतकाळात डोकावून !
मध्ययुगीन हिंदुस्थानातील हॉटेलांविषयी आपल्या परदेशी प्रवाशांच्या वृत्तांतातून माहिती मिळते. १७ व्या शतकामध्ये बरेच युरोपियन प्रवासी हिंदुस्थानात येत. काही जण व्यापारासाठी , काही जण डॉक्टर म्हणून , काही जण सैनिक म्हणून , काही जण आपल्या राजाचे प्रतिनिधी म्हणून , काही जण साहस करण्याच्या ओढी पायी तर काही जण केवळ उत्सुकता म्हणून येथे येत. या पैकी बहुतेक प्रवाशांनी आपण हिंदुस्थानात काय पाहिले, कसे राहिलो , कसा प्रवास केला , येथील लोक कसे आहेत याबाबत तपशीलवार लिहून ठेवले आहे . त्यांचे प्रवासवृत्तांत मनोरंजक आणि माहितीपूर्ण तर आहेतच , शिवाय या प्रवासवृत्तांतां मधून आपल्याला आधुनिक काळातील काही गोष्टी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या काळातही अस्तित्वात होत्या ! हे वाचून आश्चर्य वाटते .
या गोष्टींपैकींच एक गोष्ट म्हणजे हॉटेलं! त्या काळात युरोपमध्ये प्रवाशांची उत्तम बडदास्त ठेवणारी हॉटेलं होती; त्यांना इन (inn ) असे म्हणत असत. या हॉटेलांमध्ये उतरलेल्या प्रवाशाला झोपण्यासाठी उत्तम बिछाना, थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार शेकोटी , बीयर सारखे एखादे पेय आणि भाजलेले मांस (बहुतांश युरोपियन मांसाहारी असल्यामुळे) अशा सर्व सुखसोयी पुरवल्या जात असत. हिंदुस्थानात मात्र इतक्या सुखसोयी असलेली हॉटेलं नव्हती आणि त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास होत असे. कारवान-सराया- अर्थात हिंदुस्थानातील लॉजिंगची (आणि काही वेळा बोर्डिंगचीही ) सोय :- मँडेलस्लो , निकोलस विदिंगटन , पीटर मंडी , ताव्हेर्निये , बर्निए , सर थॉमस रो ही प्रवासी मंडळी त्या काळातील हिंदुस्थानी हॉटेलांचे वर्णन करतात. या हॉटेलांना कारवान-सराई असे म्हणत असत.
फ्रेंच प्रवासी ताव्हेर्निये म्हणतो , " सराई म्हणजे पन्नास-साठ झोपड्यांभोवती भिंती व कुंपणासहीतची वस्ती. या ठिकाणी पीठ, भात, लोणी आणि भाज्या विकणारे स्त्री-पुरूष आहेत. उपजिविकेसाठी हे लोक भात, रोठ इत्यादी जिन्नस शिजवूनही देतात. कधी एखादा मुसलमान प्रवासी गावात आला तर तो बकरीच्या किंवा कोंबड्याच्या मांसासाठी गावात शोध घेतो ; दरम्यानच्या काळात ही जेवण शिजवणारी माणसे त्याला हवी असलेली खोली साफसूफ करून त्यामध्ये एक खाट टाकून देतात. मग या खाटेवर हा प्रवासी आपली गादी घालतो." सर्वच सरायांमधून राहण्याची व खाण्याची सोय होतंच असे असे नव्हते; काही सराया म्हणजे केवळ राहण्यापुरते केलेले आडोसे असत. असाच एक मँडेलस्लो नावाचा प्रवासी या सरायांबद्दल काय म्हणतो पहा :-
"गुजराथच्या राज्यात व एकंदरीतच मुघल साम्राज्यात आपल्याकडील 'इन' सारखी हॉटेलं आढळत नाहीत. मात्र शहरांमध्ये आणि काही खेड्यांमध्ये , 'सराई' नावाच्या सार्वजनिक इमारती असतात. या सराया धनिक लोक, एक धर्मादाय काम म्हणून आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना आसरा मिळावा आणि त्यांना उघड्या आकाशाखाली झोपावे लागू नये या उद्देशाने बांधतात. या कारवान-सराया म्हणजे चार भिंती व डोक्यावर एक छप्पर एवढेच असते; त्यामुळे इथे उतरणाऱ्या प्रवाशाला खाण्या-पिण्याचा व त्याला लागणाऱ्या इतर गोष्टींचा बंदोबस्त स्वतःलाच करावा लागतो." परंतु काही कारवान-सरायांमधून थोड्या अधिक सोयी असत. निकोलस विदिंगटन हा प्रवासी आपल्याला सांगतो , "अजमेर आणि आग्रा या दोन गावांमध्ये, दर दहा कोसांवर प्रवासी व त्यांच्या सोबत असलेली जनावरे यांना राहण्यासाठी सराया बांधलेल्या आहेत. या सरायांमध्ये असणाऱ्या सेविका प्रवाशांच्या व त्यांच्या सोबत असलेल्या जनावरांच्या खाण्या-पिण्याची काळजी घेतात. या साठी त्या ३ डेनियर (एक नाणे) एवढे शुल्क आकारतात.
पीटर मंडी हा इंग्लिश प्रवासी देखील अशा सेविका सरयांमध्ये असल्याचे सांगतो. तो म्हणतो, "सरायांमधून 'मेत्राणी' नावाच्या सेविका असतात . या सेविका सराई मधील छोट्या खोल्यांची देखभाल करणे, प्रवाशांना जेवण तयार करून देणे ; त्यांना झोपण्यासाठी खाटा लावून देणे" अशी कामे करतात. काही खोल्यांमध्ये दोन, काहींमध्ये तीन , तर काहींमध्ये चार खाटा असतात; व दररोज सकाळी प्रत्येक खाटेसाठी १ किंवा २ पैसे एवढे शुल्क आकारले जाते." युरोप मधील सुखसोयींनी युक्त असणारी 'इन' आणि हिंदुस्थानातील कारवान-सराया, या त्या-त्या देशातील रूढी-परंपरांनुसार जन्माला आलेल्या संस्था होत्या. हिंदुस्थानांतील माणसांना उघड्या आकाशाखाली झोपण्याची सवय असल्याने त्यांना आडोशाला चार भिंती असल्या तरी पुरेसे होत असे.
हिंदूंना स्वतःचे अन्न स्वतः शिजवून खाण्याची सवय असल्यामुळे ते सरायांमध्ये देखील स्वतःचे जेवण स्वतः तयार करीत. समाज आणि जाती व्यवस्थेमुळे त्यांना इतरांसोबत एकाच टेबलावर बसता येत नसे व एका आचाऱ्याने तयार केलेलं जेवण देखील चालत नसे, त्यामुळे युरोपातील 'ईंन' सारख्या सुखसोयी येथे नसणे स्वाभाविक होते. प्रत्येक गावात कारवान-सराया असतंच असे नाही. उदाहरणार्थ पीटर मंडी आपल्याला सांगतो की , "आग्रा आणि अहमदाबाद या मध्ये एकही कारवान- सराई नाही" अशा वेळी हे प्रवासी एखाद्या देवळात , मशिदीत किंवा एखाद्या पडक्या इमारतीत आसरा घेत. सर थॉमस रो या प्रवाशाला कारवान-सराईच्या अभावी मांडू (मध्य प्रदेश ) येथे एका पडक्या थडग्याच्या जवळ आसरा घ्यायला लागला होता व तो सांगतो की, "त्या रात्री सिंहाच्या आणि लांडग्याच्या ओरडण्यामुळे मला झोप मिळाली नाही."
दक्षिण हिंदुस्थानामध्ये मात्र देवळं आणि मशिदींमधून प्रवाशांची राहण्याची सोय होत असे परंतु एकंदरीतच हिंदुस्थानातील कारवान-सराया कोंदट आणि अस्वच्छ असत. मुघल बादशहाचा राजवैद्य आणि फ्रेंच प्रवासी बर्निए म्हणतो, "या सरायांमध्ये शेकडो लोक आणि त्यांचे घोडे, खेचरं आणि उंट एकत्र राहतात. उन्हाळ्यामध्ये या कारवान-सरायांमध्ये प्रचंड उकडते व श्वास घेणे मुश्किल होऊन जाते आणि थंडीच्या दिवसात आजूबाजूला असलेल्या जनावरांच्या श्वासामुळेच काय ती उब मिळते व त्यामुळे येथे असलेली लोकं थंडीमुळे मरत नाहीत इतकंच !" काही वेळा योग्य जेवण न मिळाल्यामुळे किंवा येथील पाणी बाधल्यामुळे या युरोपियन प्रवाशांचे आतोनात हाल होत असत.
असाच एक प्रसंग एकदा 'करेरी' नावाच्या एका प्रवाशावर आला होता. करेरी एकदा गलगला येथून गोव्याकडे निघाला होता. त्याला वाटेत तीन दिवस काहीही खायला मिळाले नव्हते व स्थानिक लोकांची भाषाही त्याला येत नव्हती. भूक असह्य झाल्याने त्याने एके ठिकाणी काही लोकांना खाणाखुणा करून , "मला काहीतरी खायला द्या" असे सांगण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने एका माणसाला तो काय बोलतोय ते समजले व त्याने करेरीला नाचणीची एक भाकरी करून दिली. करेरी म्हणतो , "मला ही भाकरी अजिबात आवडली नाही , परंतु मी तीन दिवस काही खाल्ले नव्हते , त्यामुळे अत्यंत दुःखी होऊन मी ती कशीबशी गिळली" कारवान-सरायां खेरीज काही परदेशी माणसांनी देखील या काळात हिंदुस्थानात हॉटेलं चालू केली होती. मुंबई येथे 'सायमन दे माही' नावाच्या एका फ्रेंच माणसाचे हॉटेल होते असे आबे कारे नावाचा प्रवासी सांगतो.
संदर्भ :- १) Travels Of Thevenot and Careri २) Travels In India, Jean Baptiste Tavernier ३) The Travels Of The Abbe Carre In India And The Near East (1672-1674)
चित्र :- १७व्या शतकातील कारवानसराई
लेखक- सत्येन सुभाष वेलणकर ; १७ मे २०१८
मध्ययुगीन हिंदुस्थानातील हॉटेलं
निवडक सोशल मिडीया
सत्येन वेलणकर
2018-05-24 18:00:06
Milind Kolatkar
4 वर्षांपूर्वी"मला काहीतरी खायला द्या" ... करेरी म्हणतो , "मला ही भाकरी अजिबात आवडली नाही , परंतु मी तीन दिवस काही खाल्ले नव्हते , त्यामुळे अत्यंत दुःखी होऊन मी ती कशीबशी गिळली" अन्नदान नकोच अस्त इथल्याही स्थानिक मागणाऱ्यांना..! :-) माज!!
Prachij
7 वर्षांपूर्वीलेख आवडला. सराया म्हणजे धर्मशाळा ना? त्या तीर्थयात्रांच्या मार्गावर सर्वत्र असाव्यात असं वाटलं होतं.
Shandilya
7 वर्षांपूर्वीठीक आहे..