पावसाळा सुरू झाला की माणसाच्या मानसिकतेत काही सुक्ष्म बदल होत असावेत. विशेषतः त्याच्या खाण्यापिण्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात. आणि त्या दृष्टीकोनामुळेच त्याच्या जठराग्नीतील तीव्रता वाढत असावी. नाहीतर एरव्ही खाण्यापिण्याकडे लक्ष न देणारे या काळात छोट्या मोठ्या गोष्टींत रस घेतात. पावसाळा माणसांना थोडा मृदु बनवतो, काहीसा काव्यात्मकही. कदाचित नेहमीच्या धावपळीत त्याला जी काहीही न करता बसण्याची उसंत मिळत नाही, ती या काळात मुबलक मिळते. माणूस आदिमानव म्हणून जगत असताना पावसाळा हा त्याच्यासाठी गुहेत काहीही न करता बसण्याचा काळ होता. काहीतरी करत राहण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्या काळात त्याला चिंतन करण्याचे व्यसन लागले असेल. वादविवाद करण्यासाठी, चित्रं काढण्यासाठी आणि हत्यारं व शिल्पं निर्माण करण्याची प्रेरणा त्याला याच काळात त्यामुळेच मिळाली असेल. आणि त्यातून अनेक काव्य व तत्वज्ञानांचा पाया घातला गेला असेल.
आणि अर्थातच त्याचा याच काळात नेहमीचा शिकार आणि फळांचा आहार बाजूला पडून नवीन प्रकारचे खाणे त्याच्या समोर आले असावे. त्यातून त्याच्यातील सृजनशील स्वभावाला, मुख्यतः गरजेतून नवे धुमारे फुटले असावेत. आताही, इतके पावसाळे पाहिल्यानंतरही प्रत्येक पावसाच्या दिवशी खिडकीत नुसते दोन घटका उभे राहिले तरी नेमाड्यांच्या भाषेत 'स्थिती' होते. मग वेगवेगळे वास नाकात यायला लागतात. ते मनातील विविध कोपऱ्यात विखरून पडलेल्या आठवणीतील असतात. पाऊस पाहात खिडकीत उभे राहिले आणि स्थिती झाली की पहिला वास असतो चहातला गंजनाचा. बाकीच्या दिवशी गरज असलेला चहा पावसात अचानक ऐश आणि सेलिब्रेशनचा क्षण बनून जातो. मला वाटतं याचं महत्वाचं कारण म्हणजे त्याला टीटाइम लागत नाही. दुपारचे चार वाजलेत की सहा याला पावसाळ्यात काही अर्थ नसतो. बस पाऊस पडला पाहिजे. पावसात कॉफीचाही आनंद घेतात. पण चहाच्या आनंदाला तोड नाही. बाहेर जोरदार पावसाच्या सरी कोसळत असताना त्याच्या अंगांगात भिनणाऱ्या साउंड इफेक्टच्या पार्श्वभूमीवर चहा बनवणे हा तर आध्यात्मिक अनुभव असतो. चहा उकळायला लागला की त्याच्या उष्ण वाफा तुम्हाला तुम्ही स्पेशल असल्याच्या भावना देतात. त्यात मग गवती चहाच्या काड्या पडल्या की आसपासच्या परिस्थितीचा विसर पडलाच म्हणून समजायचा. नाकात शिरणारा गंजनाचा गर्द गंध तुम्हाला प्रवासाला घेऊन जातो. त्या मोजक्या क्षणांत तुम्ही किती रानांची भटकंती करता आणि किती जणांना कुठे भेटता हे सांगणे कठीण आहे. कारण प्रत्येक वेळी हा अनुभव वेगळाच असतो.
मग आपल्या आवडत्या कपात चहा ओतायचा असतो. एरव्ही घाईगडबडीत असताना कोणताही कप चालतो पण पावसाळ्यात नाही. कारण तो कप घेऊन तुम्हाला तुमच्या आवडीच्या जागी खिडकीत किंवा त्या लगतच्या आरामखुर्चीवर बसायचं असतं. चहा ओतला जात असतानाच काहीतरी खायची हुक्की येते. ती भूक नसते तर जीभेची चाळवाचाळव असते. असा विचार मनात येतो न येतो, नाकात भज्यांचे वास अस्वस्थ करून सोडतात. कांदा भजी सगळ्यांची फेव्हरेट. पण त्या जोडीला बटाटा भजी, ढोबळी मिरची, वांगी याची भजीही बहार आणतात. गोव्यात असलात तर तिथली (आणि फक्त तिथेच मिळणारी) खास मिर्ची भजी हवीतच. त्या मिरची भज्यांनी जीभेवर केलेल्या किंचित हलक्या हल्ल्यानंतर चहाचे तप्त वार म्हणजे विचारायलाच नको. एकीने नुकतीच जखम देऊन गेल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी केवळ नजरेने छळ करणारी भेटावी तसा अनुभव. मग गोव्यातच असल्यास तेथे फक्त पावसाळ्यात उगवणारी अळंबी मिळते. अवघा महिना दीड महिना. त्याचे कळे आता पाच रुपयाला एक इतके महाग असते. गोव्याचा गरम मसाला घालून केली जाणारी ही अळंबीची भाजी तेवढ्या काळात कोंबड्या आणि बकऱ्यांना हरवते. याच वातावरणात जीभ कणसांसाठी खवळून उठते. रस्त्याकाठच्या कणीस भाजणाऱ्यांकडून विकत घेऊन ते खात खात जाणे ही गम्मत असली तरी प्रत्यक्ष भाजण्यांतही एक वेगळी मजा असते. आणि कणीस खाल्ल्याची आठवण मागे राहते ती त्यावरच्या मुक्तहस्ते उधळलेल्या तिखटलिंबाच्या ओठांबाहेर टिकून राहणाऱ्या हुळहुळण्याने. तीच बाब उकडलेल्या शेंगदाण्यांची. पावसाशिवाय उकडलेल्या शेंगा खाणारा माणूस रखडलेल्या ट्रेनमधला प्रवासीच असू शकतो. पावसात शेंगा उकळायची आपोआप हुक्की येते. थोडीशी हळद आणि मीठ घालून असतील नसतील तितक्या शेंगा टोपात उकळायला ठेवायच्या. तीही कणसाप्रमाणे हिशोबाने खायची नसतात. बाजूला टरफलांचा ढीग जमला की अरारारा असे खोटेच उद्गार काढून त्यातील चुकून राहिलेले दाणे शोधायचे असतात.
पावसात प्रत्येकाच्या खाण्यापिण्याबद्दलची कल्पकता उफाळून येते. एकतर हव्या असलेल्या अनेक गोष्टींची कमतरता असते आणि दुसरं या गोष्टींसाठी माणसाकडे खूप वेळ असतो. पावसाआधी म्हणूनच बेगमी करतात आणि एरव्ही न केले जाणारे पदार्थ घरात बनतात. कुळथाचा कट हा त्यापैकीच एक. कुळीथ उकळून त्याचे फक्त पाणी घेऊन बहारदार रस्सा केला जातो. त्याला कट म्हणणे अत्यंत संयुक्तिक आहे. त्या कटात सहभागी झालेले आपल्या उरलेल्या दिवसातील अपॉईंटमेट कट करतात. मला अशी शंका येते की नेहमी कामानिमित्त बाहेर राहणाऱ्या पुरुषांना एखाद दिवस घरी अडकवून ठेवण्यासाठी बायकांनी हा कट केलेला असावा. कट संपवल्यानंतर करण्याजोगी सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे ओढुनी चादर झोपी जावे. हेच दिवस सुक्या मासळीच्या पूजनाचे. पावसाळ्यात सुक्या मासळीला जो मान आणि भाव मिळतो तो एरव्ही क्वचितच प्राप्त होतो. अपवाद अर्थात सुक्या कोळंबीचा. पावसात सुक्या मासळीचे रस्से बनतात. पावसाळ्यातील सगळ्या संध्याकाळी सुक्या मासळीच्या भाजण्याने भरून निघतात. ताटं मांडायची वेळ झाली हे त्यावरूनच कळतं. याच कल्पकतेचं एक उदाहरण म्हणजे फुटी कढी किंवा खट्टी कढी. म्हणजे खोटी कढी. याला खोटी कढी म्हणतात त्याला कारण म्हणजे त्यात काहीच नसतं. म्हणजे ती मच्छी कढी असते पण त्यात कोणतीही मच्छी नसते. सुकी सुद्धा नसते. नुसतीच नारळ, मिरची आणि चिंचेच्या वाटणाची कढी असते ती. पावसात काहीच हाताशी नसताना ती भातासोबत खाण्याच्या हेतूने बनवली जाते. या कढीसोबत जेवढा भात खाल्ला जातो त्याची तुलना फक्त चांगल्या वरणासोबत खाल्या जाणाऱ्या भाताशीच होऊ शकते. बाकी कोणीही त्याच्या जवळपासही पोचू शकत नाही. आणि हे घडते बाहेरच्या वातावरणामुळे. कौलं फाटणाऱ्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर, दिवे गेलेले असताना आणि वाऱ्याने बंद खिडक्याही वाजत असताना ही कढी जेवणाच्या ताटात तुफान माजवते. एरव्ही तिच्या वाटेला कोणी जात नाही. एखादी नेहमीची बिलो एव्हरेज दिसणारी कॉलेजमधील दुर्लक्षित मुलगी ट्रिपमध्ये भिजल्यानंतर भल्याभल्यांच्या विकेट्स काढते तसे आहे हे. आणि अशा तुफानी पावसाच्या रात्री रम मजा आणते. तरुणाईच्या काळात परवडणारी आणि हँगओव्हर न देणारी ओल्ड माँक अशा रात्रीच्या मैफली अधिक संस्मरणीय करते. रिमझिमणाऱ्या पावसात व्हिस्की वगैरे ठीक आहे. पण आषाढातल्या पावसाला सर्वोत्तम प्रत्युत्तर म्हणजे रमच. रम असली की आपोआप रमाच्या आठवणी त्याच्या वासाप्रमाणे खोलीभर पसरतात. अशा वेळी बाहेरचा थोडा पाऊस डोळ्यांत उतरला तरी कोणालाही काही वाटत नाही. मात्र काही पेगांनी रमल्यानंतरची भूक राक्षसी असते. त्याची आधी तरतूद नाही केली की सगळी रात्र खराब होते. अशा वेळी पावसाच्या दिवसांत अंडी घरात असली की कोणतीही काळजी वाटत नाही. जसे एरव्ही घरात बटाटा असल्यावर वाटतं तसं. अंडं हे सर्वकालीक, सर्वतारक खाद्य आहे. उगीच गम्मत म्हणून पासून ऐनवेळी आलेल्या पाहुण्यांच्या सोयीपर्यंत आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र, उपाशीपोटी, भरल्यापोटी, डॉक्टरांनी सांगितलं म्हणून, डॉक्टरांनी सांगितलं नसलं तरी, डॉक्टरांनी सांगून देखील, भाजून, तळून, परतवून, कच्चं, भाज्या टाकून, नुसतं मीठ टाकून.... असंख्य कारणं आणि प्रकार. माझ्याकडे एक पुस्तक आहे रेसिपीजचं. त्यात फक्त अंड्याचे प्रकार आहेत. आणि ते १००१ आहेत. पावसात खाण्यापिण्याची मजा घेण्यासाठी काहीतरी विलक्षण किंवा वेगळेच पदार्थ हवेत असं नाही. रूटीनमध्येही अशा अनेक संधी येतात, फक्त आपली जीभ आणि डोळे जिवंत ठेवले पाहिजेत. कुठेही गाडीने जात असताना ब्रेक घेण्यासाठी वाटेवर क्वचित दिसणाऱ्या चहाच्या टपरीच्या शोधात असताना काही उसळी आणि मिसळी भेटतात. त्यावेळी भूक लागलेली आहे की नाही हा मुद्दा अत्यंत गौण असतो. पाऊस कानात बँड वाजवत असताना भिजल्या अंगाने टपरीवरील बाकावर टेकल्या टेकल्या केवळ उसळ वा मिसळीच्या उल्लेखानेच जिभा लवलवू लागतात. मग वाफाळत्या उसळीत बुचकळ्या काढणाऱ्या पावासोबत दहा मिनिटाच्या ब्रेकचे नियमच ब्रेक होतात. भजी, उसळी आणि मिसळी ही कोणत्याही भुकेविना केवळ आठवणीच्या आणि पावसाच्या जोरावर न मोजता खायच्या वस्तू आहेत. एरव्हीही भजी, उसळ मिसळ नेहमीच आकर्षित करतात, पण पावसात त्याकडे दुर्लक्ष करू शकणारा एकतर योगसामर्थ्याच्या अंतिम पातळीवर पोचलेला असला पाहिजे किंवा भयंकर आजाराने जीभेची चवीची क्षमता घालवलेला पेशंट असला पाहिजे. माणूस हा सतत काही ना काही उपद्व्याप करणारा प्राणी असल्याने पावसाळ्यात त्याचे फार हाल होतात. त्यामुळे तो वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्याच्या अथवा खाण्याच्या उद्योगात स्वतःला गुंतवतो. त्यासाठी तो पुरुष असला तर उगीच हे कर आणि ते कर असे छळून बायकांचा जीव खातो. नाहीतर (बायकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे) स्वतःच कालविता हातात घेऊन स्वयंपाकघरात लाल महालातल्यासारखा धिंगाणा घालतो आणि स्वतःच शाहिस्तेखान बनून गुपचूप पडून राहतो. पुरुषांच्या जिभेचे चोचले घरच्या बायकांकडून पूर्ण होणे कठीण. त्यासाठी तुम्ही एकतर योगसामर्थ्याच्या अंतिम पातळीवर पोचलेला असल्याने पाया सूप आणि ग्लुकोज बिस्किट यांच्यातील फरक ओळखता येत नसला पाहिजे किंवा भयंकर आजाराने जीभेची चवीची क्षमता घालवलेले पेशंट असल्या कारणाने तोंडात दिलेले जिभेवर रजिस्टर न होता त्याची थेट पोटात डिलिव्हरी होत असली पाहिजे. अशा वेळी रश्श्यांची झलक मनमुराद लुटावी. त्यात बटाटा टॉमेटो रस्साही पावांच्या लाद्या संपवतो. त्याआधी तो दोनेक तास एकत्र चुलीवर रटरटून दो जिस्म एक जान व्हायला हवा. किंवा पावसात भिजत पन्नास किलोमीटरचा प्रवास करून आल्यानंतर कोंबडीचा तिखट रस्सा खावा. किंबहुना अशा रश्श्यासाठी असा पन्नास किलोमीटरचा प्रवास पावसात करावा. काही वेळा पावसाचा मारा असा झकास असतो की कोंबडीचा पीस बाजूला राहून रस्सा ओरपला जातो. (शाकाहारी लोकांसाठी महत्वाचा खुलासा इथे पीस म्हणजे तुकडा असे आहे. कोंबडी खातात म्हणजे पिसासकट नाही, तर पीस करून) पावसाळ्यात खाण्यापिण्यातील एक वेगळी गंमत असते ती रानभाज्यांची. डोंगरकपारीत राहणारे आदिवासी किंवा चार पैसे कमवण्याच्या हेतूने नेहमी तयार असलेले गावकरी रानाडोंगरात फिरून या भाज्या गोळा करतात आणि नजिकच्या शहरात किंवा बाजाराच्या ठिकाणी विकायला घेऊन येतात. पूर्वी आर्थिक परिस्थिती आणि नैसर्गिक स्रोतांचा अधिकाधिक उपयोग खाद्यात परिवर्तीत करण्याच्या हेतूने रानभाज्यांचा सर्रास वापर सगळ्या घरांत व्हायचा. घरातील स्त्रीलाही त्याची चांगली माहिती असायची. एखादीला नसली की आसपासच्या बाया तिला सोबतीला घेऊन ती बनवायच्या आणि एक्सपर्ट करून सोडायच्या.
आता सगळीकडे शिक्षणाने सुधारणा झाल्या, विशेषत्वाने मध्यमवर्ग सुशिक्षित बनला. म्हणून या रानभाज्या वगैरे गावठी आणि गरीबांचा प्रकार बनला आणि त्याबद्दलचे अज्ञान या रानभाज्यांच्या आवकीच्या व्यस्त प्रमाणात वाढले. असो. तरीही रानभाज्यांची चव पावसाळ्यात मजा आणते. कारण एरव्ही त्याच्या वाटेला कोणी जात नाही, कारण त्या उपलब्धच होत नाहीत. दुसरं असं की त्या अत्यंत सोप्या पद्धतीने केल्या जातात. त्यात आधुनिक महिलांच्या नियतकालकात हवे असलेले प्रयोग आणि ग्लॅमर त्यांना नसते. कुलुची भाजी, आंबट वेल, देठ, किल्ल अशी त्याची नावे असतात. त्यात नुसती लसणाची फोडणी, कधी आमसुलं टाकून तर कधी नारळ किंवा सुकी कोलंबी टाकून ती बनवली जाते. प्रत्येक प्रदेशात त्याच्या आपापल्या जाती आणि प्रकार असतात. पंधरा दिवस ते महिनाभराच्या काळापुरते त्यांचे अस्तित्व असते. ते आपल्या आयुष्यात नोंदले जायला पाहिजे. टाकळा तर सगळ्यांनाच माहिती आहे. तो पावसाळा संपेपर्यंत वाढतो आणि नंतरही काही काळ असतो. पण त्याची भाजी खायची ती फक्त पहिल्या पंधरा दिवसात, त्याच्या पहिल्या पिकाची. तेर किंवा अळुची पानेही या काळात उगवतात. ती आता काही रानभाजी नव्हे, ती राजरोस सगळीकडे असते आणि दिसते. या रानभाज्यांचे पावसाळ्यांतच आढळणारे अस्तित्व पावसाळ्यापुरते राहू द्यावे. त्याचे कृषीतंत्रज्ञान मांडून त्यांनाही बारमाही भाजी बनवू नये. आता काहीही कधीहीचा जमाना असल्याने सगळ्या भाज्याफळांतील रसच निघून गेलाय. पावसाळ्यात कलिंगडं पाहून मला जितकं औदासिन्य आलं तितकं आमच्या कॉलेजमध्ये शेकडोंची स्वप्नसुंदरी असलेल्या अनिताचा मेंदी लावलेले केस आणि चांदीच्या कडांचा चष्मा लावलेला फोटो फेसबुकवर तीस वर्षांनी पाहूनही आले नव्हते. पावसाळ्याने मात्र नित्य यावे. तो नेहमीच्या साध्या गोष्टीत विशेष भाव निर्माण करतो. साधेपणातील गोडी म्हणजे काय ते पाऊस जितका सांगतो, तितकं अजून कोणी सांगत नाही. पाऊस एकंदर आयुष्याचे ओझे कमी करतो. माणसाला संथावतो. सततच्या विचार, चिंतांनी भंडावले जाणारे त्याचे डोके शांतवतो. यंत्रासारखे चालणारे शरीर माणसाळवतो. आणि आपले खरे प्रेम केवळ खाद्यपदार्थांवर आहे ही सुखासीन आणि निश्चिंतीची भावना सिद्ध करतो. समोरचा उकळता रस्सा तेवढा खरा बाकी सगळं मिथ्या आहे, या जीवन तत्वज्ञानाची सत्यता पावसाळ्यात जितकी सिद्ध होते, तितकी कधीही अंगी बाणवत नाही.
लेखक - इब्राहीम अफगाण; अंक- भवताल, वर्ष- दिवाळी २०१५
पावसाळी खादाडी
निवडक सोशल मिडीया
इब्राहीम अफगाण
2021-06-04 12:00:02
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच छान लेख . पावसाळा कसा भोगावा ( खाऊन ) हे अगदी रसिकतेने लेखकाने विशद केले आहे . आवडला .
Bilwadal
7 वर्षांपूर्वीपावसाळी हवेत अन्नब्रम्ह अनुभवले. . चव , ग॔ध जाणवले
vilasrose
7 वर्षांपूर्वीहा लेख वर्तमानपत्रात वाचला होता. आवडल्याने पुन्हा डिजिटल वाचला.पावसाळ्यात गरम भज्यासारखा खमंग लेख!??
dhananjay
7 वर्षांपूर्वीमस्त लेख, बाहेर रीमझिम चालु आहे. चहा घेत लेख वाचला.मजा आली. धन्यवाद.
Suchitabordekar
7 वर्षांपूर्वीखमंग पदार्थां सारखा खमंग लेख
sugandhadeodhar
7 वर्षांपूर्वीबाहेर मुसळधार पाऊस, हातात वाफाळता चहाकप, बशीभर खमंग भजी घेऊन खिडकी जवळ बसून पावसासह चहाभज्यांचा आस्वाद. रम्य स्वप्न.
asiatic
7 वर्षांपूर्वीमस्त. रसनेचे कोड पुरवणारेच सारे पदार्थ. मग तोंडाला पाणी सुटणारच की.
Monika
7 वर्षांपूर्वीखमंग लेख. पावसाळ्यातली खवय्येगिरी मस्तच .
Meenal Ogale
7 वर्षांपूर्वीखूप खमंग आणि चटकदार लेख ;लोकप्रभामधे यांचे याच विषयावरील वेगळ्या धर्तीचे लेख वाचल्याचे आठवले.अजून वाचायला आवडेल.
swarupabojewar
7 वर्षांपूर्वीटेस्टी लेख
Lucky
7 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख !
Ravindra Adkar
7 वर्षांपूर्वीekdam Rasarashit aani swadisht
asmita
7 वर्षांपूर्वीmast lekh
mukund parelkar
7 वर्षांपूर्वीsunder. just a warning we skp s have a fond of eating SHEVALA chi aamatee but last year after the meal my face became that of a monkey. from doctor, I come to know that now a days, some industries dump their acidic waste on these hills. so be careful. for non vegeterian, kolambee is added to this aamatee
gondyaaalare
7 वर्षांपूर्वीअप्रतिम आणि सकाळी सकाळी भूक चाळवणारा लेख .आज एकच मुश्किल गोष्ट अशी की ही सकाळ नेमकी महिन्यातून एकदाच येणाऱ्या उपासाच्या दिवशीची आहे . हा हन्त हन्त .......
Anand R. Bhangle
7 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख! पावसाळ्यात बेळगांंवहून गोव्याला जातांंना घाटांंतील झोपडीवजा हाॅॅटेलमधील वाफाळता चहा व त्याबरोबर मिळणारा गरमगरम उपमा बाहेरच्या दाट धुक्यातून कोसळत असलेला पाऊस पाहत हादडण्यातील थ्रिल काही औरच! ते प्रत्यक्षअनुभवायलाच हवे. अशा वेळी एव्हढ्या तुफान पावसात गोव्याला कसे व कधी पोहचणार असे क्षुल्लक विचार बाहेर ओढ्यासारख्या वाहत असलेल्या पाण्यात तरंंगत तरंंगत विरुन जातात.
Manjiri
7 वर्षांपूर्वीLiked it.Nice
CDKavathekar
7 वर्षांपूर्वीतोंडाला पाणी सुटलच,पण मन पण कसं गार्डन गार्डन झालं
mpshah
7 वर्षांपूर्वीTondala pani aale Mast.
Makarand
7 वर्षांपूर्वीभूक चाळवणारा आणि जुने पावसाळे आठवणारा खमंग,चुरचुरीत, चटकदार लेख.